बुधवार, १६ जुलै, २०२५

अमलताश

अमलताश

एक अतिशय तरल प्रेमकथा ...

खरंतर अशी टॅग लाईन लिहून मी कधीच चित्रपटांविषयी लिहीत नाही पण का कोण जाणे आज हे असं लिहीलं गेलं. 
एक ती आणि एक तो यांची कुठेतरी भेट होते आणि हळूहळू त्या भेटीचं रूपांतर प्रेमात होतं आणि सरतेशेवटी ' they lived happily ever after ' हा मेसेज देत जनरली प्रेमकथा संपतात पण अमलताश वेगळाच आहे. प्रेमाचा एक वेगळा आविष्कार... तो ही वेगळ्या उंचीवर आणि मनाच्या तितक्याच तरल हळव्या भावभावनांचं दर्शन घडवत ... अतिशय रोमॅंटीक संगीताच्या साथीने हा चित्रपट खुलत जातो आणि आपल्यासारख्या तरल माणसांच्या काळजाचा ठाव घेऊन मनात दरवळत रहातो. 
हे असे चित्रपट बनवणारी माणसं, त्यात अभिनय करणारी माणसं आणि ते चित्रपट पहाणारी माणसं ठार वेडी असतात. यांना जगरहाटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी गवसलेलं असतं आणि जे त्यांना कध्धीच शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणून मग आपल्याजवळ असलेल्या कलेच्या माध्यमातून ते व्यक्त होण्यासाठी धडपड करत असतात. 
एरवी हा चित्रपट चारचौघात, चारचौघांबरोबर जाऊन पाहिला असता तर कदाचित इतरांप्रमाणे तो 'बरा' या कॅटेगरीत अजाणतेपणी ठेवला गेला असता, पण असे चित्रपट एकट्याने पहावेत, अनुभवावेत आणि आत झिरपू द्यावेत. पहिल्या भेटीत ते उलगडत नाहीत. मी ही दोन वेळा चित्रपट पहायला सुरूवात केली पण काही ना काही कारणाने मध्येच बंद करावा लागला पण अखेर जेव्हा तिसऱ्यांदा तो पाहिला तेव्हा अनुभवत मुरवत जाणीवेच्या पातळीतून आत झिरपत गेला. 
चित्रपटाची कथा सांगायला गेले तर एका ओळीत सांगता येईल पण तसं करणं म्हणजे गुन्हाच ठरेल कारण मग तुम्ही चित्रपट पाहून त्याने दिलेल्या अत्यंत सुंदर आणि तरल अशा आविष्काराला मुकाल... म्हणून हा चित्रपट कोणी कोणाला सांगू नये तर तो आपापल्या स्पेसमध्ये राहून निवांत अनुभवावा ! 
' अमलताश ' ... हे असं नावंच सांगतं की चित्रपट किती रोमॅंटीक आहे 😊 
राहुल देशपांडेनी रंगवलेला चित्रपटाचा नायक आणि पल्लवी परांजपेनी रंगवलेली नायिका... सुंदर..
साधी आणि सहज ! 
अर्थात कधीकधी ... म्हणजे जेव्हा मी भावनिक पातळीवर तेवढी खोलात शिरलेली नसते तेव्हा इतकी सहजता पडद्यावर पाहाताना ती देखील कृत्रिम सहजता असल्याचं जाणवतं आणि मला कंटाळवाणं होतं. पण अशा कथांना अशा अभिनयाची गरज असते हे देखील खरं. 
म्हणूनच अमलताश निवांतपणे अनुभवताना खुलतो तोवर तो एकसुरी कंटाळवाणाही वाटू शकतो.
अर्थात् हे तर आपल्या मनोवृत्तीवरही अवलंबून आहे.
चित्रपटाचं संगीत, गाणी म्हणजे तर आणखी एक वेगळीच तरल अनुभूती आहे... निश्चितच! एखाद्या वेळी तुमच्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसी सोबत असताना ही गाणी हे संगीत लावावं आणि त्यातल्या शब्दन्शब्दाची आणि संगीताची जादू आकंठ अनुभवावी...इतकं सुरेख...
मला जाता जाता विशेषत्वाने लिहावंसं वाटतं ते राहुल देशपांडेंबद्दल... अशा पद्धतीचे चित्रपट आणि अशा पद्धतीच्या नायकाच्या भूमिकेसाठी ते परफेक्ट आहेत. एरवी गायक म्हणून त्यांना सगळेच ओळखतात, पण एक असा हळवा नायक म्हणून जेव्हा ते चित्रपटात दिसतात तेव्हा अनेक तरल युवतींच्या मनातला एक गोड, समंजस, साधा, सहज आणि भावपूर्ण नायक त्यांच्यात सापडतो. त्यांचा या भूमिकेनंतर असंख्य तरूणी त्यांच्या प्रेमात पडल्या असतील मला खात्री आहे 😊
नायिकेच्या भूमिकेत असलेल्या पल्लवीने दिसण्याच्या आणि वावरण्याच्या बाबतीत बाजी मारली आहे 😊 पण तरीही ती जरा नाटकी (कृत्रिम) वाटली... पण तरीही एकंदरीत छानच आहे 😊.
नायकाच्या बहिणीच्या भूमिकेत राहुल यांची बहीण दीप्ती मते आहेत. एक दोन प्रसंगी त्यांच्या तोंडी पेरलेल्या ' नालायक ' वगैरे शिव्या या जरा खटकल्या याचं कारण त्या शिवीसदृश उद्गार ... जो आपल्या जवळच्या माणसांकरता लटक्या रागात कधीकधी सहजपणे आपणही करतो, पण ताईच्या एकूण इमेजला आणि स्पष्ट शब्दोच्चारांना मात्र ते उद्गार शोभलेले नाही...ते जरा टोकदार झालेत, थोडे बोथट करता आले असते पण असो त्याने मूळ चित्रपटाला काहीच फरक पडत नाही. हे केवळ माझे प्रेक्षक म्हणून निरीक्षण येथे मांडलेय इतकेच ! 
तर ... असा हा अमलताश... 
दिग्दर्शक सुहास देसलेंचं त्यांच्या या कलाकृतीबद्दल कौतुक आणि चित्रपटातील अन्य सगळे अभिनेते...त्यांच्याही सहज अभिनयाबद्दल त्यांचा कौतुकाने उल्लेख करायलाच हवा! 

चित्रपट यूट्यूबवर अॅड फ्री स्वरूपात उपलब्ध आहे जरूर पहा..

- मोहिनी घारपुरे देशमुख

Translate

Featured Post

अमलताश