आपल्या जीवनात आहाराचं किती महत्व आहे हे तुम्ही सगळ्या जाणताच ! रोजच्या जेवणात मला सलाड कच्च खाण्याऐवजी मला निरनिराळ्या चवदार कोशिंबिरी स्वरूपात खायला प्रचंड आवडतं.
मी इथे माझ्या सोप्या झटपट करता येण्याजोग्या कोथिंबिरीच्या काही रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून मला कळवा, आणि हो तुमच्या आवडीच्या कोथिंबिरीची रेसिपी मला जरूर कळवा.
१. गाजर काकडीची कोशिंबीर
गाजर आणि काकडी ( प्रमाणाची गरज नाही, कोणत्याही प्रमाणात एकत्र केलं तरी चालतं ) किसून घ्या. एका बाउलमध्ये हा कीस आणि त्यात दही घाला. वरून आवडीनुसार साखर, मीठ घाला आणि हि़ग, मोहोरी, कढीपत्ता आणि आवडतं असल्यास मिरची किंवा तिखट घालून खमंग फोडणी द्या. चटपटीत कोशिंबीर तयार !
२. बीटाची कोशिंबीर
कच्चं बीट सोलून किसून घ्या. त्यात साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला. वरून तडका द्या आणि लिंबू पिळा. कोशिंबीर तयार !
३. बीट कोशिंबीर (प्रकार २ )
बीट सोलून, बारीक फोडी करून छान उकडून घ्या. आता त्यात दही, साखर आणि चवीपुरतं मीठ घाला. छान एकत्र करा. सुंदर गुलाबी रंगाची कोशिंबीर तयार !
४. कांदा कैरीची कोशिंबीर
कांदा आणि कैरी मस्त किसून घ्या. आता त्यात गूळ किसून घाला. वरून तिखट, मीठ चवीनुसार आणि हिंग, मोहरीचा तडका द्या. घरात कोणताही लोणचं मसाला असेल तर तो चवीपुरता घाला, छान एकत्र करून पाच दहा मिनिटं झाकून ठेवा. अगदी जेवायच्या वेळेस वाडा म्हणजे छान चव मुरलेली लागेल.
५. टोमॅटोची कोशिंबीर
टोमॅटोच्या बारीक फोडी करा. त्यावर साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला, आवडत असल्यास त्यावर तडका घाला, किंवा तडका न घालताही छान लागते. लिंबू किंवा थोडसं दही घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा. कोशिंबीर तयार !
६. मुळ्याची कोशिंबीर
मुळा किसून साखर, मीठ, दही आणि दाण्याचं कूट घाला की चवदार कोशिंबीर तयार !
तर मैत्रिणींनो,
कोशिंबिरीचा मूळ फंडा तुमच्या जर एव्हाना लक्षात आला असेल तर तुम्ही अशाच प्रकारे कोणतीही कोशिंबीर अगदी आयत्या वेळीही तयार करून खाऊ शकता, हो की नै ? चला मग आजपासून तुमच्या दोन्ही वेळच्या जेवणात कोशिंबीर नक्की समाविष्ट कराच !
धन्यवाद
मोहिनी घारपुरे देशमुख