सोनेरी गाणं - 6


लेफ्ट टर्न बँडच्या एका गाण्याची जन्मकथा 
या गाण्याचा व्हीडीओ झालाय तुफान व्हायरल


लेफ्ट टर्न बँड -
जयराज जोशी (ड्रम्स),
 सुराग सुभेदार (व्होकल्स, गिटार),
 सस्मीत रूद्र (कीबोर्ड)
 रीगन डीमेलो (बास)

तुम्ही तुमच्या कामात असता आणि इतक्यात व्हॉट्सअॅपवर एक लिंक येते .. एका गाण्याची, तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला ती पाठवलेली असते म्हणून तुम्ही उत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक करता, आणि एकीकडे हातातली कामं उरकायला लागता. इकडे गाणं सुरू होतं... एक असं संगीत ऐकू यायला लागतं ज्याच्या तालावर तुमचे पाय आपोआपच ठेका धरायला लागतात.. सहज म्हणून तुम्ही फोन हातात घेता आणि आता गाणं पहायला लागता.. गाण्यात कोणीच हिरो नाही हिरोईन नाही .. तर गाण्याचे मेन कॅरेक्टर म्हणून चक्क जीआयजो, बार्बी, डायनोसोर, छोटा भीम, डोरेमॉन आणि खूप सारी खेळणीच दिसायला लागतात. आता तुम्हाला खूप खूप उत्सुकता वाटते आणि तुम्ही हातातली सगळी कामंधामं सोडून गाण्याचा व्हीडीओ अगदी एकाग्रतेने पहायला लागता.. सुरूवातीपासून ते शेवटापर्यंत गाणं पहाता पहाता तुम्ही त्यात इतके रंगून जाता की शेवटी तुमच्या गालावर खुदकन् हसू उमटल्याशिवाय रहात नाही..


 खेळण्यांच्या सहाय्याने दृश्यनिर्मिती करतानाचे काही क्षण

मुंबईतल्या चार भन्नाट, क्रिएटीव्ह तरूणांच्या लेफ्ट टर्न या बँडने नुकतंच रिलीझ केलेलं 'फक इट' हे गाणं मी नुकतंच पाहिलं, अनुभवलं आणि मला माझ्या सोनेरी गाण्यांच्या पानात या एका गाण्याविषयीचं आणखी एक सोनेरी पान जोडल्यावाचून रहावलंच नाही. 
गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, या गाण्यात चारही लीड आर्टीस्टनी स्वतः कुठेच चमकोगिरी थेट न करता, सगळ्या खेळण्यांचा वापर करून आणि त्यावर स्वतःचे फोटो चिकटवून कठपुतलीवजा अॅक्ट खेळण्यांच्या माध्यमातून दाखवत एक भन्नाट व्हीडीओ सादर केला आहे. 
ही आयडीया मुळात सुचणं, त्यासाठी भरपूर डोकं लावून आणि स्वखर्चाने सगळं शूट पार पाडणं हे खरोखरीच दाद देण्याजोगंच आहे. 
आणि मुख्य म्हणजे या गाण्याचं म्यूझिक आणि व्हीडीओ असला काही अफलातून केला आहे की आजवर असं काही तुम्ही पाहिलं असल्याची शक्यताच नाही. 
ही आयडीया कशी सुचली हे जाणून घेण्याकरीता मी लेफ्ट टर्नचे लीड सिंगर सुराग सुभेदार यांच्याशी गप्पा मारल्या आणि ही सगळी भन्नाट प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

खूप सारी तरूण , उत्साही आणि भन्नाट कल्पनाशक्ती असलेली मंडळी जेव्हा एकत्र येतात आणि काही कल्पक काम करतात तेव्हा आपल्या सारख्या जनसामान्यांसाठी एक पर्वणीच असते. गाण्याच्या क्षेत्रात तर अशा कल्पकतेची काहीच कमी नाही. किशोर कुमारजींचं यॉडलिंग असो, किंवा ए. आर रेहमानचं एक दक्षिण भारतीय टच असलेलं संगीत असो, कविता कृष्णमूर्तींचा तार सप्तकातला आवाज असो किंवा आशा भोसलेंनी म्हटलेली एक से एक आयटम साँग्ज असोत .... हे सगळं जेव्हा म्हणजे ज्या ज्या काळात लोकांसमोर आलं त्या त्या काळी ते सगळं नवीनच होतं... आणि म्हणूनच लोकांना ही सगळी मंडळी अक्षरशः आपल्या या निराळ्या गुणवत्तेनी वेड लावून गेली. म्हणूनच, गाण्याबरोबरच एखादी हटके आयडीया हिट होते हे जणू या बँडमधील रॉकस्टार्सनीही केव्हाच ओळखलेलं असाव आणि म्हणूनच आपलं प्रत्येक गाणं काहीतरी निराळं करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला असावा. 
एरवी स्पर्धापरीक्षांमागे धावणारी, किंवा नैराश्याशी झगडत असलेली आजची अनेक तरूण मंडळी मोठ्या संख्येने भवताली  दिसत असताना, केवळ चार सहा तरूणांनी एकत्र येऊन एक हिंदी पॉप रॉक बँड तयार करणं, त्यासाठी वेळ, पैसा आणि आपली संपूर्ण कल्पकता लावून या क्षेत्रात झोकून देऊन काम करणं हे सगळं सगळं कौतुकास्पदच आहे. 
जयराज जोशी (ड्रम्स), सुराग सुभेदार (व्होकल्स, गिटार), सस्मीत रूद्र (कीबोर्ड) आणि रीगन डीमेलो (बास) हे चौघेजण एकेकाळचे चांगले मित्र. हे चौघेहीजण गाण्याच्या क्षेत्राशी संबंधीत आणि अशातच बॉलीवूड शोजमध्ये म्यूझिशिअन म्हणूनही दीर्घ काळपर्यंत काम करत होते. अशातच एकदा या चौघाहीजणांच्या लक्षात आलं, की आपण बॉलीवूड शोज करतोय ते खरंय पण त्यात आपलं मन रमत नाहीये. याचं कारण, आपलं स्वतःचं असं काहीच आपल्याला त्यात करता येत नाहीये... आणि इथूनच या चौघांच्या एका वेगळ्या क्रिएटीव्ह प्रवासाला सुरूवात झाली.. आणि जन्म झाला लेफ्ट टर्न या बँडचा ..!
मग गाणी बनवायला सुरूवात केली.. खरंतर, सुरांमध्येच चोवीस तास रमायला सुरूवात केली असं म्हणायला हवं. आयडीया कोणाला कधी आणि का कशी सुचेल याची उत्तरं खरंतर कोणीच कल्पक व्यक्ती कधीच देऊ शकत नाही, तसंच, या चौघाही भन्नाट क्रिएटीव्ह लोकांचं झालं. कारण, जसा एक ग्रुप बनला तसा एकमेकांना केव्हाही नवनव्या आयडीयाज सुचायला लागल्या. गाणी जन्माला यायला लागली. पण मग आता या गाण्यांना लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हा प्रश्न होता. यावरही वर्षभरातच उत्तर मिळालं.
एका शांतनिवांत भागात एका मित्राच्या बंगल्यावर स्टुडीओ करायची परवानगी मिळाली. मग या चौघांनी तोवर शोजमधून जमा केलेला पैसा लावून स्वतःचा असा स्टुडीओ बनवला आणि मग लेफ्ट टर्नचा प्रवास आणखी जोमाने सुरू झाला. 
मी जेव्हा सुरागशी या संपूर्ण प्रवासाबद्दल, त्यांच्या बँडबद्दल, त्यांच्या या गाण्याबद्दल गप्पा मारल्या तेव्हा तर यांचे आणखीही काही चांगले गुण मला कळले. 
सुरागने त्यांंच्या एकंदरीतच या सांगितिक प्रवासाविषयी जे सांगितलं ते ऐकून मला या मुलांचं फारच कौतुक वाटलं. तो सांगत होता, " आम्ही चौघंजणं आमच्याच घरानजीक एक डॉन बॉस्को शेल्टर आहे तिथल्या अनाथ मुलांबरोबर खेळायला, त्यांना गाणी शिकवायला वगैरे जायचो तेव्हा आम्हाला या मुलांसाठी काहीतरी करावं असं वाटायला लागलं. मग आम्ही चौघांनी आमच्या भागातल्या काही कॉर्पोरेट ऑफीसेसमध्ये जाऊन परफॉर्म केलं आणि त्यांना आवाहन केलं की आम्हाला काही देण्यापेक्षा या अनाथ मुलांसाठी काही द्या. हे आवाहन करून त्यांनी त्या ऑफीसेसमध्ये आठवडाभरासाठी काही बॉक्सेस ठेवले व लोकांना स्वेच्छेनी अनाथ मुलांसाठी काही वस्तू द्यायला उद्युक्त केले.




हे बॉक्सेस जेव्हा घरी आणले तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या ऑफीसेसमधून अनाथ मुलांसाठी खूप छान छान खेळणीच आली आहेत.. आणि त्याचदरम्यान लेफ्टटर्नने तयार केलेलं एक ब्रेकअपवरचं गाणंही रिलीज करायचं होतंच. मग ती खेळणी पहाताच यांचाच वापर करून व्हीडीओ बनवण्याची आयडीया आली.
ही सगळी खेळणी पाहून त्यावरून एक एक सीन , एक एक सिच्युएशन क्रिएट केली. हे सगळं तीन चार तासाचं काम .. शिवाय या चार क्रिएटीव्ह तासात एकमेकांसह धमाल दंगामस्ती तर सुरूच होती .. त्यातूनच काही काही जोक्स तयार झाले ते देखील गाण्यातल्या सिच्युएशन्समध्ये खेळण्यांचा वापर करून चित्रीत करायची शक्कल सुचली. 
स्टेज, बार, तिकीट काऊंटर, रेड कार्पेटवरून एन्ट्री हे सगळं काही या चौघांनीच स्वतः क्राफ्टद्वारे तयार केलं हे विशेष. तसंच, लाईट्ससाठी लेझरच्या कीचेन्सचा वापर केला. मग लिरीक्सनुसार सीन्सचा क्रम ठरवला. दर सेकंदासेकंदाचे सीन्स अक्षरशः लिहून काढले. आपल्या गाण्यात आपणही दिसलो पाहिजे तरच लोकांना आपली ओळख होईल या विचाराने आधी प्रत्येकाचे स्टुडीओत जाऊन आठ दहा निरनिराळ्या एक्स्प्रेशनमधले फोटोज काढले आणि मग वेगवेगळ्या सिन्समध्ये प्रत्येकाचे हे चेहरे खेळण्यांवर लावून त्या माध्यमातून स्वतः व्यक्त झालो. प्रत्यक्ष शूट करायला आणखी एका मित्राची जो प्रोफेशनली काम करतो, त्याची मदत घेतली. प्रत्यक्ष शूटींगला सर्वाधिक वेळ लागला पण फायनली जे गाणं, जे व्हीज्युअल्स मिळाले त्याने खूप धमाल आणली. 
सुराग हे सगळं सांगत असताना एकदम कूल होता.. म्हणजे, ही एवढी सगळी क्रिएटीव्हीटी असलेला मुलगा प्रत्यक्षात एवढा सहज शांत कसा असू शकेल असा प्रश्न कोणालाही पडला असता. पण खरं सांगू का, ज्याला कल्पकता वापरायची असले तीच माणसं आधी स्वतःशी सतत एकाग्र रहाण्याचा प्रयत्न करत असतात.
जेमतेम वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या या बँडचं हे तिसरंच गाणं आहे. मात्र येत्या ऑगस्टमध्ये लेफ्टटर्न बँडतर्फे चौदा गाण्यांचा एक व्हीडीओ अल्बम रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरातच ही मुलं थेट राज्यसभा टीव्ही गाजवून आली आहेत. 31 डिसेंबर 2019 ला रात्री बारा वाजता या बँडने आपला परफॉर्मन्स थेट राज्यसभा टीव्हीवरून दिला यासाठी त्यांचे विशेष कौतुक आहेच. 

कल्पक माणसांना फक्त स्वतःची वाट शोधायची असते.. एकदा का त्यांना त्यांची वाट सापडली की त्यांचा मार्ग ठरलेला असतो, त्यांची मंझिल त्यांना स्वतःच त्या मार्गाने तिथवर घेऊन जात असते.

सुराग आणि लेफ्ट टर्न बँडला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा .. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख 




( हे गाणं पहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -  https://www.youtube.com/watch?v=3fQZJxuIUZE )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश