बुधवार, १६ मे, २०१८

"संधीप्रकाशात"ली प्रेयसी

"संधीप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी .."
डॉ. सलील कुलकर्णींच्या आवाजात हे गाणं पहिल्यांदा ऐकलं आणि ऐकतच राहिले. एकदा, दोनदा, तीनदा .. आणि या गाण्याचा आपल्या मनातला अर्थ उलगडेपर्यंत ऐकत राहिले..
बा.भ. बोरकरांनी लिहिलेली ही कविता.. या कवितेचा अर्थ फार फार सुंदर आहे... त्यामुळेच एकेक कडवं ऐकताना आपल्याला हरवून जायला होतं. हे हरवणं म्हणजे हळव्या मनातल्या कोपऱ्यात लपवून ठेवलेली स्वप्नकल्पना कवितेच्या शब्दाशब्दासह जगत जाणं .. कवितेचे ते क्षण प्रेमाची जी अनुभूती देतात ती ज्याने त्याने आपापल्या स्वप्नरंजनात एकदातरी घ्यायला हवी. आपण ही कविता ऐकत जातो आणि आपली तहान वाढतच जाते.. आपण एकेका श्वासागणिक एकेक शब्दाचा स्पर्श स्वतःला करत जातो आणि अधिकाधिक अतृप्त होत जातो..
मरणाच्या उंबरठ्यावर टेकलेला तो कवी म्हणजे आपला प्रियकर, त्याची ती पवित्र प्रेयसी म्हणजे आपण .. अवतीभवती पसरलेला सोनेरी संधीप्रकाश.. एरवी तो कितीही सुंदर भासत असला तरीही या क्षणी त्या सोनेरी प्रकाशात जणू आपण न्हाऊन निघालोय आणि आपलं पावित्र्य उजळून गेलं आहे असं वाटायला लागतं..

मीच ती पवित्र प्रेयसी .. संधीप्रकाशात न्हाऊन निघालेली.. आणि माझ्या मांडीवर माझ्या प्रियकराचे, जो मरणासन्न असला तरीही माझ्या प्रेमासाठी, माझ्या पावित्र्यासाठी आसुसलेला आहे, अशा त्या एकनिष्ठ प्रियकराची एकेक इच्छा मी ऐकत जाते आणि पूर्ण करण्यासाठी तळमळत रहाते. कारण त्याचे आपल्या मांडीवर असलेले डोके खाली जमिनीवर ठेऊन देणे आता माझ्यासाठी केवळ अशक्य .. त्याच्या शेवटच्या घटीका त्याच्या शब्दरूपी कल्पनांतूनच आता मी पूर्ण करणार..
माझा प्रियकर मला सांगतोय,


आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा.
जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब:
तुझे प्रतिबिंब लाडेगोडे.
सुखोत्सवे असा जीव अनावर:
पिंजऱ्याचे दार उघडावे.
संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी.
असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवि कासावीस झाल्याविना.
तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची.
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे.
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली ..


असा हा माझा भाबडा, एकनिष्ठ प्रियकर .. त्याचं हे रूप पाहताना माझे नयनाश्रू संततधार वाहताएत.. तो जे कवितेतून सांगतोय ते ते स्वप्न आम्ही एकत्र जगत जातोय, कारण हे शेवटचे क्षण तेव्हाच अमृताचे होणार आहेत. त्याच्या डोळ्यासमोर आयुष्यभर त्याने वेगवेगळ्या रूपात पाहिलेली मी, माझी निरनिराळी छबीच तो याक्षणीही आठवतोय, जणू दर्पणात माझी निरनिराळी प्रतिमा त्याक्षणी तो पहातोय असा त्याला भास होतोय.. इतकी मी त्याची आहे, इतकी मी त्याच्या मनात खोलवर रूजलेली आहे. केवळ माझ्या प्रतिमांची उजळणी करताना त्याला होणारा आनंद म्हणजे जणू आमच्यासाठी सुखोत्सवच आहे आणि या सुखोत्सवाच्या आनंदातच त्याला मरण हवंय .. म्हणूनच तो म्हणतोय," सुखोत्सवे असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे.."
या संधीप्रकाशात चाललेला हा सुखोत्सव, हेच जणू माझ्यासाठी सोनेरी क्षण आहेत, हे सोन्याचे क्षण अनुभवता अनुभवताच माझी लोचने मिटून जावी अशी इच्छा जेव्हा तो बोलतोय तेव्हा मी व्याकूळ झालेय, अधीर झालेय ..
मला व्याकूळलेलं पाहून तो मला सांगतोय, अशा या माझ्या शेवटच्या क्षणी तू माझ्याजवळ स्वप्नभासाप्रमाणे असावीस आणि तसं झालं तरच मी कासावीस न होता सुखोत्सवात माझा प्राण सोडेन. आणि सखे, जेव्हा मी असा प्राण सोडेन तेव्हा तू माझ्या विझल्या देहावर तुळशीचं पान ठेव, तुझ्या घरी या तुळशीच्या पानांची वाण नाही .. असं तो मला सांगतोय तेव्हा मला जाणवतंय की मी त्याच्यासाठी इतकी पवित्र आहे की तो जणू माझ्या स्पर्शालाच तुळशीच्या पानाची उपमा देतोय. माझा स्पर्शच त्याला तुळशीप्रमाणे वाटतोय आणि माझ्या स्पर्शाने पवित्र झालेल्या पाण्याचे दोन थेंब त्याला मिळाले तरीही तेच त्याला तीर्थ वाटणार आहेत.. त्याच्या सुकल्या ओठांवर मी चुंबनरूपी फूल ठेवावे असे तो मला व्याकूळ होत सांगतोय .. आजन्म या माझ्या ओठांनी त्याला जी भूल पडली आहे, तीच भूल त्याला या शेवटच्या क्षणीही हवी आहे ..
माझ्या सहवासाच्या पावित्र्यात आयुष्य जगलेला माझा प्रियकर मरणाच्या शेवटच्या क्षणीही मला मागतोय, त्याच्या मृत्यूनंतरही त्याला माझं पवित्र प्रेम हवंय .. आणि मी ते देणार .. साऱ्या दुनियेची तमा न बाळगता, मी त्याची एकूणएक इच्छा पूर्ण करणार .. कारण या निष्पाप प्रियकराने माझ्यावर जे निर्व्याज प्रेम केले आहे ते माझ्यावर दुसऱ्या कुणीही केलेले नाही.. त्याच्या प्रेमामुळे, त्याच्या चिंब चिंब भावनावेगाने मी जगत गेले एकेक क्षण आणि माझ्यातली मी, पवित्र मी, आपोआपच उजळत गेले आहे..
त्याने मला प्रेम दिले, नी त्याच्यामुळे मला अर्थ मिळाला .. नाहीतर माझे जगणे केवळ निरर्थकच उरले असते..
तो सगळ्या इच्छा सांगता सांगता केव्हाच निघून गेलाय .. मला सोडून .. आणि मी तरीही त्याचा मुका देह मांडीवर घेऊन या संधीप्रकाशात बसून आहे .. कारण त्याला माझा पवित्र स्पर्श हवाय, मरणाच्या पश्चातही हवाय.. आता मी त्याच्या सुकलेल्या ओठांवर माझे ओठ टेकवल्यावाचून राहू शकणार नाही .. त्याची ती अंतिम इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी त्याचा देह खाली ठेऊच शकत नाही .. माझ्या ओंजळीत त्याचा निष्प्राण निस्तेज चेहरा आता मी घेतलाय.. देहातून निघून गेलेल्या माझ्या प्रियकराला छातीशी घट्ट घट्ट कवटाळत मी त्याला निरोप देणार आहे.. कायमचाच .. पण, हे चार क्षण माझ्यासाठी फार फार अवघड होऊन बसले आहेत.. माझा कंठ दाटून आलाय, माझे नयनाश्रू कोरडे होत चालले आहेत.. पण माझ्यासमोर असलेल्या या माझ्या प्रियकराला तिथे तसं सोडून मी जाऊच शकत नाहीये.. 

ना मी त्याला पुढल्या प्रवासाला जाऊ देऊ शकणार आहे .. कारण अत्ता, जाता जाता त्याने सांगितलेल्या एकेक इच्छा मी पूर्ण केल्या आहेत खऱ्या पण मग मी कशी हे मान्य करू, की ज्याच्या इच्छा आपण पूर्ण केल्या आहेत त्याचं अस्तित्वच आता उरलेलं नाही .. सांगा ना ..? मी काय करू सांगा ना ?
त्याचे शब्द माझ्या कानात गुंजताएत ..


संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी.
असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवि कासावीस झाल्याविना.
तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची.
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे.
वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली ..


मी कशी त्याच्या देहाला अग्नी देऊ ..?

ज्याने माझा स्पर्श आजन्म पवित्र मानला, त्याला मी माझ्याच हाताने कशी दूर लोटू ..? सांगा ना .. कुणीतरी सांगा ना .. !
आणि आता याक्षणी तो चुकार, लबाड सोनेरी संधीप्रकाशही कुठे निघून गेलाय आणि ही काळरात्र आम्हाला गिळून टाकायला आलीये .. तिलाही कुणीतरी आवरा ना .. आवरा ना .. !


- मोहिनी घारपुरे-देशमुख



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश