मंगळवार, ८ मे, २०१८

रोज एक कविता (उपक्रम समाप्ती)

रोज एक कविता करायची असं ठरवलं आणि गेले दोन महिने दररोज थोडावेळ तरी नियमीतपणे काव्यप्रदेशात रमत गेले. आपल्या आत खोल खोल दडलेलं नेमकं काय असं आहे ज्याने आपोआपच आपल्याला आत्मविश्वास मिळतो याचं उत्तर शोधण्याचाच जणू माझ्यासाठी हा प्रवास होता. माझ्यासाठी माझ्यापुरतं हे उत्तर मला मिळालं .. प्रतिभेच्या रूपात.. कदाचित तुमच्या आत जे दडलंय ते याहून काहीतरी निराळं असेल ..
सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं की लगेच उत्तर, प्रतिक्रीया मिळते हीच या माध्यमाची ताकद आहे. त्यामुळेच मी रोज फेसबुकवर एक कविता लिहीत गेले आणि तुमच्या बऱ्या वाईट प्रतिक्रीयांचा आनंद घेत गेले.
मोहिनी, अगं तू कविता कशी काय करायला लागलीस एकदम?
हा प्रश्न मला अनेकांनी विचारला. तर त्याचं खरं उत्तर हेच आहे की मला कविता सुचत होत्याच पण एकंदरीतच आपल्याकडे अत्यंत प्रतिभावंत कवी आणि दर्जेदार कविता सोडल्यास अन्य कवी आणि कविता यांच्याबाबत जो हेटाळणीचा सूर लावला जातो त्यामुळे मी कदाचित कविता करण्याला फार महत्त्व देत नव्हते आणि स्वतःतील ही प्रतिभा स्वतःच झाकोळून टाकत होते.
कविता चांगलीच असावी हा अट्टाहास ठेवूनच कविता करत गेले पण नेहेमीच तो यशस्वी झालाच असे नाही. फेसबुकवर पोस्ट केलेली कविता मी नंतर माझ्या काही आप्तेष्टांना व्हॉट्सअॅपवर शेअर करत होते. त्यासाठी मी 110 कॉंटॅक्ट्स आणि 8 ग्रुप्सवर ब्रॉडकास्टलिस्टच्या माध्यमातून रोज माझी कविता पाठवत गेले. रोजच्या कवितेला लगेचच ही मंडळी रिप्लाय देऊन त्यांचे मत कळवत होती.
एका ग्रुपवर तर फक्त माझ्याच कवितांच्या पोस्टची गर्दी झाली तेव्हा एका सदस्याने ग्रुपचे नाव बदलून चक्क "मोहिनी काव्यसंग्रह" असा नाव बदलण्याचा आतातायीपणा केला तेव्हा मला फार बेचैन व्हायला झाले. एकाने मला हलवायाची उपमा दिली.रोज बुंदी पाडल्याप्रमाणे कविता करतेस त्याने कवितेची किंमत कमी होते असा सूज्ञ सल्लाही दिला. याउलट अनेकांना माझं कौतुकही वाटलं. खूप मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी आणि जवळच्या मंडळींनी मला फोन करून माझं कौतुक केलं.. छान कविता करतेस अशी दिलखुलास प्रतिक्रीया दिली.. अनेक ग्रुप्सवरही मला माझ्या कवितांबद्दल अनेकांनी प्रेम दिलं, कौतुकभरल्या लेखी प्रतिक्रीयाही दिल्या. हा सगळा माझ्यासाठी विलक्षण कैफ चढवणारा अनुभव ठरला. फेसबुकवर कविमन, रसिकमंच (मूलतः रूद्रम् फॅन्स) आणि अक्षर मैफल या ग्रुप्सवर मी माझी कविता पोस्ट करत होते, या सर्व ग्रुप्सच्या सदस्यांनीही मला खूप प्रोत्साहन दिले, आवडलेल्या कवितांना भरभरून दाद दिली. या सर्व अनुभवाने मी समृद्ध झाले. मला माझ्यातली नवी मी गवसले आणि पुन्हा एकदा जगायला मजा आली.
कविता करणं सोपं काम नाही. र ला र आणि ट ला ट जुळला म्हणजे कविता होत नसतात. कमीत कमी शब्दात एक पूर्ण अर्थ मांडणं आणि शब्दांच्या लयबद्धतेचे भान ठेवत समोरच्याच्या काळजाला भि़डणं म्हणजे कविता..
ती ठरवून करता येते पण तिची भट्टी दरवेळी जुळेलच असं मात्र नाही, किंबहुना ती अपेक्षाच ठेऊ नये. मी रोज कविता करत असताना माझी प्रत्येक कविता प्रत्येकालाच आवडावी आणि प्रत्येकानेच दाद द्यावी असली भ्रामक कल्पना आधी मी दूर ठेवली होती कारण मी फक्त काव्यनिर्मितीतला आनंद घेत होते आणि मनातल्या विचारांना, प्रतिभेला वाट मोकळी करून देत होते. त्यामुळे कोणाच्या टीकेने फारवेळ खेद वगैरे करत बसले नाही. शिवाय मला वाटतं, जसं चित्र काढायला येण्यासाठी सुरूवातीला वेडी वाकडी वळणं, रेषा हातातून कागदावर उमटाव्या लागतात तसंच कविता उत्तमोत्तम जमण्यासाठी मुळात कविता करत जायला हवं. तेच महत्त्वाचं... आपला शब्द तोलून मापून डौलाने मांडण्यासाठी मुळात त्यादृष्टीने प्रतिभेला साकडं घालायला लागतं. लिहीत रहायला लागतं. मी हेच करत होते.
आज या काव्यप्रवासाचे दोन महिने पूर्ण झालेत. आता मात्र मी कविता करत रहाणार हे नक्की. फक्त दोन महिने रोज कविता केलेल्या इथे शेअर करत होते त्याऐवजी सुचतील तेव्हा कविता लिहीन आणि त्यातली बेस्ट कविता तुमच्यापुढे फेसबुकच्या माध्यमातून ठेवत जाईन..
यापुढेही तुमचे प्रेम असेच मिळत राहील असा विश्वास वाटतो...
#रोजएककविता #उपक्रमपूर्ती

- मोहिनी घारपुरे-देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश