'विठ्ठला बा लोकराया'ने दिला 'संगीत देवबाभळी'ला जन्म
एक शोध सुरू होतो, विठ्ठलाचा अन् त्यानिमित्ताने स्वतःचा ...
एक असं गीत जे विठ्ठल आणि वारकरी यांच्यातलं नातं वर्णन करतं.. एक असं गीत जे शब्दाशब्दातून वारकऱ्यांच्या मनाची साक्ष देतं, अन् एकेका स्वरातून काळजाच्या आत आत रुतत जातं..
विठ्ठला बा लोकराया, पावसाळे सोड तू
या दिगंती मेघ सारे, सावळाले जोड तू
नाशिकचे प्रसिद्ध संगीतकार आनंद ओक यांच्यासमोर जेव्हा लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द जाऊन पोहोचले तेव्हा जणू साक्षात् विठ्ठलानेच चाल सुचवावी एवढ्या वेगाने या शब्दांचं गाणं, आनंद यांच्या माध्यमातून झालं.
शब्द वाचता वाचताच संगीतकार आनंद त्याला चाल लावत जातात काय अन् हे गीत पुढे एकेका टप्प्यातून मोठं मोठं होत जातं काय, इतकं मोठं की भविष्यात मराठी रंगभूमीला संगीत देवबाभळीसारखं अर्थपूर्ण, अजरामर नाटकही देऊन जातं ... जणू काही पांडुरंगच या सर्व माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करीत असावा असं हे सत्य..
त्याचं झालं असं की प्राजक्त यांनी विठ्ठलाचं आणि वारीचं सुंदर नातं उलगडणाऱ्या विठ्ठला बा लोकराया या गीताचे शब्द केवळ कागदावर उतरवले होते आणि त्या शब्दांना चाल लावून त्याचा व्हीडीओ करायचा एवढंच त्यांच्या मनात होतं.
लोकराया लोपला की
झोपला वैकुंठी तू
मीच पाही वाट वेडी
की वेगळाल्या पंथी तू
असे या गीताचे मूळ शब्द. अत्यंत प्रतिभावान अशा आनंद यांनी वाचताक्षणी गीताला चाल लावली खरी पण व्हीडीओ करण्यापूर्वी नेमका पाऊस पडून गेला आणि गीताचे शब्द आणि व्हीडीओतील शॉट्स जुळणार कसे असा प्रश्न चित्रमुद्रण करणाऱ्या अभिषेक कुलकर्णींसमोर उभा राहिला.. मग काय, पुन्हा विचारमंथन सुरू झाले. थोडेसे शब्द बदलले अन् नवं गीत पुन्हा रूजायला सज्ज झालं.
एकेक दृश्य टिपलं गेलं, वारकरी, विठोबा, हिरवळ, पाऊस सारे सारे विठ्ठलाच्या रंगी रंगलेले... अन् अखेरीस विठ्ठला बा लोकरायाचं चलत् चित्रणही अत्यंत सुंदर, मनाला विठूरायामय करणारं झालं.
जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात, टाळ चिपळ्यांच्या गजरात हे गाणं संगीतकार आनंद यांनी स्वरबद्ध केलं असलं तरीही नेहेमीच्या ठणठणाटापेक्षा हे गाणं काही निराळं, आत्मानुभूती देणारं झालं आहे.
श्वास रखुमाई, आत्मा विठूराया,
चित्त चंद्रभागा, पंढरी ही काया
विठ्ठला बा लोकराया, पावसाळे सोड तू ,
या दिगंती मेघ सारे सावळाले जोड तू
या गीताबद्दल आनंद सांगतात, मला स्वतःला वारीबद्दल खूप अप्रूप वाटायचं. विठ्ठलावरचं एखादं गाणं आपण स्वरबद्ध करावं अशी माझी स्वतःची फार पूर्वीपासून इच्छा होती. या गाण्याच्या निमित्तानी ही इच्छा पूर्ण झाल्याने माझं स्वतःचही हे फार आवडीचं गाणं आहे. जशी एखादी पाककृती करताना त्यात सगळं साहित्य, सगळे पदार्थ योग्य प्रमाणात घातल्यानंतरच ती स्वादीष्ट होते तसंच, अगदी तसंच गाण्याचंही असतं. खूप जास्त संगीत, अकारणच वाद्यांचा प्रमाणापेक्षा जास्त आवाज असं काही झालं तर ते संगीत कधीही श्रोत्यांना आवडू शकत नाही.
विठ्ठला बा लोकराया या गाण्यात पखवाज, टाळ या पारंपरिक वाद्यांबरोबरच पाश्चात्य वाद्यांचाही वापर करून एक छान रसनिर्मिती केली आहे. अगदी साध, सुंदर असं हे गाणं श्रोत्यांना आत्मशोधाच्या पायरीपर्यंत नेऊन ठेवतं, अगदी सहजचं.
या गाण्यातूनच पुढे इन सर्च ऑफ विठ्ठल या डॉक्युमेंटरीवजा फिल्मचा जन्म झाला आणि त्यानंतर सध्या व्यावसायिक रंगभूमीवर गाजत असलेल्या संगीत देवबाभळी या संगीत नाटकाचाही अंकुर रूजला. आनंदजी सांगतात, विठ्ठला बा लोकराया या गाण्यातूनच संगीत देवबाभळीची ठिणगी पडली.
या नाटकातील सर्व चौदा गाण्यांनाही आनंद यांनीच संगीत दिलं आहे. सध्या रंगभूमीवर गाजणाऱ्या या नाटकाकरीता त्यांना सर्वोत्तम संगीतकार म्हणून नामांकनही मिळालेलं आहे हे विशेष..
तर असं हे गाणं अनेकांना इतकं आवडलंय की या गाण्याच्या रिंगटोनचीही मागणी विठ्ठलप्रेमी मंडळी करत असल्याचे कळते.
खरंच, एक असं गाणं जे जणू साक्षात् विठ्ठलाकरवीच जन्माला आलं असावं, अन् वेगवेगळ्या माध्यमातून प्रवाही होत गेलं असावं काय असा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहत नाही हेच खरं...
- मोहिनी घारपुरे - देशमुख
..............
गाण्याची लिंक -

जितकं सुंदर गाणं आहे तितकेच सुंदर तुम्ही शब्दांकन केलं आहे.... गाणं म्हणण्यापेक्षा अभंगच म्हणावा लागेल....अप्रतिम
उत्तर द्याहटवाधन्यवाद रोहित ..
हटवावाह , सुंदर ! 💐👌👍🌷😍
उत्तर द्याहटवाधन्यवाद केशवजी ..
हटवाधन्यवाद ..
उत्तर द्याहटवा