शनिवार, २ मे, २०२६

आहुती

फार लहानपणी दूरदर्शनवर रविवारी बरोबर चार वाजता लागणाऱ्या चित्रपटा़मध्ये 'आहुती' हा मराठी चित्रपट पाहिला होता. यूट्यूबवर अचानक तो सापडला आणि मी पहायला सुरुवात केली. 
अश्विनी भावे मुख्य भुमिकेत आणि तिच्यासह रमेश भाटकर, डॉ.मोहन आगाशे, यशवंत दत्त, महेश मांजरेकर, सुनील बर्वे, स्मीता तळवलकर, अविनाश मसुरेकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला आणि जबरदस्त कथानक असलेला हा चित्रपट. 
आशा या तरुणीची ही कथा. 
अतिशय सुंदर, निडर आणि हुशार असलेल्या आशाच्या ( अश्विनी भावे ) हातून एक चूक होते. प्रेमात पडण्याची ! तिच्या महाविद्यालयात नव्याने रूजू झालेल्या प्राध्यापकाच्या ( रमेश भाटकर ) ती अजाणतेपणे प्रेमात पडते. तो तर तिच्यावर पहाताक्षणीच फिदा झालेला असतो. एका शिबिराच्या निमित्ताने ते जवळ येतात आणि ती त्याला आपलं सर्वस्व देऊन टाकते. 
ती आनंदात असते, तिला तिचं प्रेम मिळालेलं असतं. तो रजा काढून गावी जातो आणि इकडे हिला दिवस जातात. ती घाबरते, त्याच्या रुमवर जाते, तो परत आला का चौकशी करायला. तिथे गेल्यावर तिला कळतं की याचं लग्न झालेलं आहे. तिला धक्का बसतो. ती घरी येऊन आईच्या कुशीत शिरून रडते. आपल्या हातून चूक झाली कबूल करते. आता आईबापांच्या पायाखालची जमीन सरकते. आई म्हणते गर्भ पाडून टाकू पण ही तयार होत नाही. वडील मग म्हणतात अशा मुलींचं लग्न जुळवणारे एक परिचित आहेत त्यांना सांगतो, तीही निर्धाराने म्हणते, तुम्ही म्हणाल त्याच्याशी लग्न करते आणि मग तिचं एका परिस्थितीने गरीब  विधुर मुलाशी लग्न लावून टाकतात. 
ती पहिल्या रात्री नवऱ्याला सगळं सांगायला जाते तर तो म्हणतो मला कल्पना आहे, पण मी तुझा स्वीकार केलाय, तुझ्या बाळाला मी माझं नाव देईन. तीही मग आनंदी होते. नवरा अतिशय छान मिळाला याचं समाधान काहीच काळ टिकतं. दरम्यान हिचे आईवडील एका अपघातात स्वर्गवासी होतात, आशा एकटी पडते. हिला अनैतिक संबंधातून मुलगी होते आणि तिकडे नवरा ( यशवंत दत्त ) खरे रंग दाखवतो. तो तिला जबरदस्तीने आपल्या एका उद्योजक मित्राशी ( डॉ.मोहन आगाशे ) संबंध ठेवायला भाग पाडतो. त्याबदल्यात घरबसल्या आणि काहीही काम न करता याला घर, गाडी, पैसा सगळं मिळणार असतं. 
ती अर्थातच नकार देते, एकदा चूक झाली म्हणून काय बाजारबसवी करणार आहात का मला, असा भावनिक सवालही करते, पण तो कसला ... त्याने आपल्या पहिल्या पत्नीलाही जाळून मारून टाकलेली असते, तो हिला काय जुमानणार ! 
आणि आशाच्या दुर्दैवाचे भोग परत सुरू होतात. रमाकांत म्हणजे तोच नवऱ्याचा मित्र जे म्हणेल जसं म्हणेल तसं नवऱ्याच्या जबरदस्ती मुळे दुर्दैवी आशाला वागावच लागतं नाहीतर मुलीला मारून टाकेन अशी धमकी त्याने तिला दिलेली असते. 
पुढे आशाच्या दुर्दैवाचे भोग इतके दाखवलेत की पहाताना आपल्या अंगावर काटा येतो. 
खरंच, सुंदर स्त्रियांचे भोग काही निराळेच असतात. काही काहींसाठीच सौंदर्य हे वरदान ठरतं, काही काहींना मात्र सौंदर्य हा शापच मिळालेला असतो. 
तसंच या जगात एकट्या बाईने रहाणंही फार कठीण आहे, अगदी अजूनही तीच परिस्थिती आहे हे देखील फार वाईट आहे. 
पुढे आशाच्या नशीबी जे येतं तोच खेळ तिच्या वयात आलेल्या मुलीच्याही बरोबर सुरू होतो इतक्यात आई म्हणून आशा आपल्या मुलीला बरोबर या विळख्यातून वाचवते आणि तिच्या खऱ्या वडिलांकडे पाठवून देते. एवढ्या वर्षात त्यानेही कधीच आशाचा वा आपल्या मुलीचा शोध घेतलेला नसतो. आशाची कहाणी तिच्या मुलीच्या तोंडून ऐकताना त्याला पश्चात्ताप होतो पण वेळ निघून गेलेली असते. आशाने आत्महत्या केलेली असते. मुलीची जबाबदारी प्राध्यापक पित्याकडे सुपूर्द केलेली असते ! 
शेवटी तिचा नसलेला बाप पकडला जातो. त्या मुलीला प्राध्यापकाची पत्नी आपल्या कुटुंबात स्थान देते आणि चित्रपट संपतो, पण आशा मात्र मनात घर करून जाते. 
आशासारख्या खूप दुर्दैवी, सुंदर मुली या जगात आहेत. त्यांना एकतर कोणाशीतरी तडजोड करावी लागतेच नाहीतर त्यांच्या चारित्र्याचे असे धिंडवडे काढले जातात. 
खरंच, आपला समाज कधी बदलणार कोण जाणे ? 
एखाद्याच्या आयुष्याची दुर्दशा होत असताना किंवा कोणी ती सहेतूक करताना दिसत असलं तरीही सगळे गप्प रहातात. त्यात आशासारख्या मुलींचं तर दुर्दैव इतकं की त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं रहाणारच कोणीही नसतं, मग काय आलेला डाव त्यांना खेळावाच लागतो. 
असो, 
भावनावेग आवरायलाच हवा म्हणून केवळ लेखणीला इथे विराम देते आणि देवाकडे अशा आशा जन्माला घालूच नयेत म्हणून प्रार्थना करते ! 
चित्रपट यूट्यूबवर आहे, पहा बघवतोय का तुम्हाला ! 

- मोहिनी घारपुरे देशमुख 




शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

निरनिराळ्या कोशिंबिरी

वाचक मैत्रिणींनो,
आपल्या जीवनात आहाराचं किती महत्व आहे हे तुम्ही सगळ्या जाणताच ! रोजच्या जेवणात मला सलाड कच्च खाण्याऐवजी मला निरनिराळ्या चवदार कोशिंबिरी स्वरूपात खायला प्रचंड आवडतं. 
मी इथे माझ्या सोप्या झटपट करता येण्याजोग्या कोथिंबिरीच्या काही रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून मला कळवा, आणि हो तुमच्या आवडीच्या कोथिंबिरीची रेसिपी मला जरूर कळवा‌.

१. गाजर काकडीची कोशिंबीर 
गाजर आणि काकडी ( प्रमाणाची गरज नाही, कोणत्याही प्रमाणात  एकत्र केलं तरी चालतं ) किसून घ्या. एका बाउलमध्ये हा कीस आणि त्यात दही घाला. वरून आवडीनुसार साखर, मीठ घाला आणि हि़ग, मोहोरी, कढीपत्ता आणि आवडतं असल्यास मिरची किंवा तिखट घालून खमंग फोडणी द्या. चटपटीत कोशिंबीर तयार ! 

२. बीटाची कोशिंबीर 
कच्चं बीट सोलून किसून घ्या. त्यात साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला. वरून तडका द्या आणि लिंबू पिळा. कोशिंबीर तयार ! 

३. बीट कोशिंबीर (प्रकार २ )
बीट सोलून, बारीक फोडी करून छान उकडून घ्या. आता त्यात दही, साखर आणि चवीपुरतं मीठ घाला. छान एकत्र करा. सुंदर गुलाबी रंगाची कोशिंबीर तयार ! 

४. कांदा कैरीची कोशिंबीर 
कांदा आणि कैरी मस्त किसून घ्या. आता त्यात गूळ किसून घाला. वरून तिखट, मीठ चवीनुसार आणि हिंग, मोहरीचा तडका द्या. घरात कोणताही लोणचं मसाला असेल तर तो चवीपुरता घाला, छान एकत्र करून पाच दहा मिनिटं झाकून ठेवा. अगदी जेवायच्या वेळेस वाडा म्हणजे छान चव मुरलेली लागेल. 

५. टोमॅटोची कोशिंबीर 
टोमॅटोच्या बारीक फोडी करा. त्यावर साखर, मीठ, दाण्याचं कूट घाला, आवडत असल्यास त्यावर तडका घाला, किंवा तडका न घालताही छान लागते. लिंबू किंवा थोडसं दही घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा. कोशिंबीर तयार ! 

६. मुळ्याची कोशिंबीर
मुळा किसून साखर, मीठ, दही आणि दाण्याचं कूट घाला की चवदार कोशिंबीर तयार ! 

तर मैत्रिणींनो, 
कोशिंबिरीचा मूळ फंडा तुमच्या जर एव्हाना लक्षात आला असेल तर तुम्ही अशाच प्रकारे कोणतीही कोशिंबीर अगदी आयत्या वेळीही तयार करून खाऊ शकता, हो की नै ? चला मग आजपासून तुमच्या दोन्ही वेळच्या जेवणात कोशिंबीर नक्की समाविष्ट कराच ! 

धन्यवाद
मोहिनी घारपुरे देशमुख 


सोमवार, ५ जानेवारी, २०२६

Should Art meet us Halfway?

Many of us as audiences often feel that classical or intellectually complex art forms—whether performing or non-performing—are distant, intimidating, or simply “not meant for us.” They seem reserved for the elite, for those who have had the privilege of education, exposure, and cultural literacy. But then comes the larger and more honest question: who are these “normal” people that we think art does not belong to? A layperson is simply someone who hasn’t taken the time—or hasn’t had the opportunity—to understand a particular art form. And that is not a flaw; it is merely a matter of interest and education. Yet, if such individuals choose to observe, learn, and cultivate the skill of being an audience, a different world unfolds. They begin to engage with a wider emotional spectrum and a deeper spiritual resonance that these art forms quietly offer. It ultimately becomes a personal choice—whether to consume the easy, addictive junk of shallow entertainment or to nourish oneself with something richer, more meaningful, and transformative.

From the artist’s side, the story is equally nuanced. Artists are often introverted souls, deeply immersed in their inner worlds. They may dislike explaining their art, believing that the audience should automatically grasp the layers, metaphors, and emotional codes embedded in a complex prasang from the Mahabharata or Ramayana. But expecting every viewer to understand subtleties without guidance is unrealistic and, at times, unfair. This is not a call to dilute their mastery or lower the intellectual rigour of their craft. Rather, it is an invitation to fine-tune their expression—clarifying transitions, strengthening narrative cues, and making the emotional spine of the performance more transparent. When artists shape their work with this awareness, they meet their audience halfway, creating a space where depth and accessibility can coexist without compromise.

In the end, any art form is like a relationship with a high-value partner: it demands effort, patience, and growth from both sides. When audiences choose to learn and artists choose to open a door, the relationship becomes fuller, richer, and deeply fulfilling for everyone involved.

- Rucha Urdhwareshe Gharpure 




Translate

Featured Post

आहुती