अश्विनी भावे मुख्य भुमिकेत आणि तिच्यासह रमेश भाटकर, डॉ.मोहन आगाशे, यशवंत दत्त, महेश मांजरेकर, सुनील बर्वे, स्मीता तळवलकर, अविनाश मसुरेकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला आणि जबरदस्त कथानक असलेला हा चित्रपट.
आशा या तरुणीची ही कथा.
अतिशय सुंदर, निडर आणि हुशार असलेल्या आशाच्या ( अश्विनी भावे ) हातून एक चूक होते. प्रेमात पडण्याची ! तिच्या महाविद्यालयात नव्याने रूजू झालेल्या प्राध्यापकाच्या ( रमेश भाटकर ) ती अजाणतेपणे प्रेमात पडते. तो तर तिच्यावर पहाताक्षणीच फिदा झालेला असतो. एका शिबिराच्या निमित्ताने ते जवळ येतात आणि ती त्याला आपलं सर्वस्व देऊन टाकते.
ती आनंदात असते, तिला तिचं प्रेम मिळालेलं असतं. तो रजा काढून गावी जातो आणि इकडे हिला दिवस जातात. ती घाबरते, त्याच्या रुमवर जाते, तो परत आला का चौकशी करायला. तिथे गेल्यावर तिला कळतं की याचं लग्न झालेलं आहे. तिला धक्का बसतो. ती घरी येऊन आईच्या कुशीत शिरून रडते. आपल्या हातून चूक झाली कबूल करते. आता आईबापांच्या पायाखालची जमीन सरकते. आई म्हणते गर्भ पाडून टाकू पण ही तयार होत नाही. वडील मग म्हणतात अशा मुलींचं लग्न जुळवणारे एक परिचित आहेत त्यांना सांगतो, तीही निर्धाराने म्हणते, तुम्ही म्हणाल त्याच्याशी लग्न करते आणि मग तिचं एका परिस्थितीने गरीब विधुर मुलाशी लग्न लावून टाकतात.
ती पहिल्या रात्री नवऱ्याला सगळं सांगायला जाते तर तो म्हणतो मला कल्पना आहे, पण मी तुझा स्वीकार केलाय, तुझ्या बाळाला मी माझं नाव देईन. तीही मग आनंदी होते. नवरा अतिशय छान मिळाला याचं समाधान काहीच काळ टिकतं. दरम्यान हिचे आईवडील एका अपघातात स्वर्गवासी होतात, आशा एकटी पडते. हिला अनैतिक संबंधातून मुलगी होते आणि तिकडे नवरा ( यशवंत दत्त ) खरे रंग दाखवतो. तो तिला जबरदस्तीने आपल्या एका उद्योजक मित्राशी ( डॉ.मोहन आगाशे ) संबंध ठेवायला भाग पाडतो. त्याबदल्यात घरबसल्या आणि काहीही काम न करता याला घर, गाडी, पैसा सगळं मिळणार असतं.
ती अर्थातच नकार देते, एकदा चूक झाली म्हणून काय बाजारबसवी करणार आहात का मला, असा भावनिक सवालही करते, पण तो कसला ... त्याने आपल्या पहिल्या पत्नीलाही जाळून मारून टाकलेली असते, तो हिला काय जुमानणार !
आणि आशाच्या दुर्दैवाचे भोग परत सुरू होतात. रमाकांत म्हणजे तोच नवऱ्याचा मित्र जे म्हणेल जसं म्हणेल तसं नवऱ्याच्या जबरदस्ती मुळे दुर्दैवी आशाला वागावच लागतं नाहीतर मुलीला मारून टाकेन अशी धमकी त्याने तिला दिलेली असते.
पुढे आशाच्या दुर्दैवाचे भोग इतके दाखवलेत की पहाताना आपल्या अंगावर काटा येतो.
खरंच, सुंदर स्त्रियांचे भोग काही निराळेच असतात. काही काहींसाठीच सौंदर्य हे वरदान ठरतं, काही काहींना मात्र सौंदर्य हा शापच मिळालेला असतो.
तसंच या जगात एकट्या बाईने रहाणंही फार कठीण आहे, अगदी अजूनही तीच परिस्थिती आहे हे देखील फार वाईट आहे.
पुढे आशाच्या नशीबी जे येतं तोच खेळ तिच्या वयात आलेल्या मुलीच्याही बरोबर सुरू होतो इतक्यात आई म्हणून आशा आपल्या मुलीला बरोबर या विळख्यातून वाचवते आणि तिच्या खऱ्या वडिलांकडे पाठवून देते. एवढ्या वर्षात त्यानेही कधीच आशाचा वा आपल्या मुलीचा शोध घेतलेला नसतो. आशाची कहाणी तिच्या मुलीच्या तोंडून ऐकताना त्याला पश्चात्ताप होतो पण वेळ निघून गेलेली असते. आशाने आत्महत्या केलेली असते. मुलीची जबाबदारी प्राध्यापक पित्याकडे सुपूर्द केलेली असते !
शेवटी तिचा नसलेला बाप पकडला जातो. त्या मुलीला प्राध्यापकाची पत्नी आपल्या कुटुंबात स्थान देते आणि चित्रपट संपतो, पण आशा मात्र मनात घर करून जाते.
आशासारख्या खूप दुर्दैवी, सुंदर मुली या जगात आहेत. त्यांना एकतर कोणाशीतरी तडजोड करावी लागतेच नाहीतर त्यांच्या चारित्र्याचे असे धिंडवडे काढले जातात.
खरंच, आपला समाज कधी बदलणार कोण जाणे ?
एखाद्याच्या आयुष्याची दुर्दशा होत असताना किंवा कोणी ती सहेतूक करताना दिसत असलं तरीही सगळे गप्प रहातात. त्यात आशासारख्या मुलींचं तर दुर्दैव इतकं की त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं रहाणारच कोणीही नसतं, मग काय आलेला डाव त्यांना खेळावाच लागतो.
असो,
भावनावेग आवरायलाच हवा म्हणून केवळ लेखणीला इथे विराम देते आणि देवाकडे अशा आशा जन्माला घालूच नयेत म्हणून प्रार्थना करते !
चित्रपट यूट्यूबवर आहे, पहा बघवतोय का तुम्हाला !
- मोहिनी घारपुरे देशमुख


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा