एक हसीन निगाह का दिल पे साया है ...
जादू है जुनून है कैसी माया है ..ये माया है ....
हे ... हे ... आहाहा ... हमममम ........
एक वादळ स्वतःच्या आत घेऊन जगणारी माया.. तिचा शोध हा स्वत्वाचा आणि स्वतःच्या स्वप्नांचा.. अक्षरशः स्वप्नातच जगणारी माया मेमसाब ... आपल्या स्वप्नांचा माग घेत घेत ती वास्तवापासून इतकी दूर दूर निघून जाते की परतीचे मार्ग उरत नाहीत. एकीकडे व्यवहाराने बरबटलेलं जग आणि अशा जगात स्वार्थी, लबाड आणि धूर्त माणसांच्या हाती मायासारखी स्वप्नाळू , निरागस आणि भाबडी मुलगी लागल्यावर ते तिचे लचके तोडल्यावाचून तिला सोडतील ते काय .. चित्रपटातही असंच होतं. स्वप्नांचं जग वसवायला निघालेल्या मायाच्या वाटेला जग निखारेच निखारे पेरत जातं आणि एक चटका लावणारा स्वतःचा शेवट करून माया निघून जाते या जगातून कायमची .. आणि आपण ते माया नावाचं वादळ .. सत्य की स्वप्न याचा शोध घेण्यासाठी पुनःपुन्हा स्वतःला तिच्या त्या मायानगरीत घेऊन जात रहातो. जादू है जुनून है कैसी माया है .. ये माया है .... सतत कानात रेंगाळत राहतं. तिचं असणं, तिचं वागणं, तिची अदा, तिचे पेहराव यावर भाळून आपण तिला बघत रहातो आणि वास्तवाच्या कसोटीवर तिचं वागणं सतत घासून पहात रहातो. ती कळते एखाद्यालाच किंवा एखादीलाच .. बाकी जगाच्या दृष्टीने ती एक स्वार्थी, खोटारडी, वासनांध, बाहेरख्याली अशी अनेक दूषणं लावलेली स्त्री असेलही ...पण एखादीलाच ती कळते. स्वप्नांचं बोट धरून केवळ स्वप्नांचेच इमले बांधत ती जगताना वरवर वाटत असली तरीही तिच्या आतमधलं वादळ .. ते ओळखता आलं तर तुम्हाला माया कळेल..
ती अशीच तर असते... स्वतःवर प्रेम करणारी, स्वतःच्या भाबड्या कल्पनेत रमणारी.. तिला आस असते तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रियकराची .. तिला प्रेम हवं असतं.. तिला जगरहाटी विसरून तिच्यावर आयुष्य उधळून देणारं कोणीतरी हवं असतं... की ती स्वतःतल्या खऱ्या मायाचा शोध घेत असते .. कोणास ठाऊक.. पण एका न पेलणाऱ्या वादळासारखं सतत स्वप्न उराशी घेऊन उर फुटेस्तोवर त्याचा माग घेत जाणारी माया खरं आयुष्यही वादळीच जगते आणि अखेर स्वतःशी हरून एका क्षणी स्वतःचं आयुष्य संपवून टाकते.
खूप लहानपणी या चित्रपटाविषयी ऐकलं होतं मी .. आणि अर्थातच अडल्ट मूव्ही या कॅटेगरीत मोडणाऱ्या या चित्रपटाविषयी फार काही कानावर पडणं त्या वयात शक्यही नव्हतं. हा चित्रपट कधी ना कधी पहायचा हे तेव्हाच ठरवलं होतं आणि तो योग या लॉकडाऊनच्या निवांत जीवनात चालून आला. असा चित्रपट एकदा पाहून ना समजतो, ना मन भरतं... असे चित्रपट समजून घ्यायचे असतील तर त्यातले बारकावे टिपावे लागतात .. त्या कथानकाबरोबरच कथेतील पात्रांचं नेमकं काय सांगणं आहे हे आधी समजून घ्यावं लागतं आणि त्यासाठी ती पात्र आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वतःच्या मनावर स्वार करून घ्यावी लागतात. संपूर्ण दोन दिवस सतत माया मेमसाबच्याच बरोबर मी वावरत होते.. असा भास मला होत होता. सुरूवातीला तिच्याबद्दल खूप प्रेम वाटलं .. मग तिचं जीवन जसंजसं पुढे गेलं आणि जसंजसं एकेक घटना घडत गेल्या त्या घटनांनी तिच्या मनावर , तिच्या जीवनावर झालेले परिणाम पहात गेले तसतसं अनेक टप्प्यावर अनेक भावना मनात वादळासारख्या उठून गेल्या. आणि अखेरीस .. तिची दया आली.. तिचा शेवट जसा होणार होता तसाच झाला खरा पण स्वप्न पहाणाऱ्या मुलींना हा समाज एवढी होरपळ, एवढी परवड का देतो, त्यांना ओरबाडून ओरबाडून का खाऊन टाकतो असा प्रश्न अजूनही मनावर नागासारखा फणा काढून डोलतोय.
माया मेमसाब .. एका मोठ्या हवेलीत वडील (डॉ.श्रीराम लागू) यांच्या समवेत ही त्यांची काहीशी अल्लड, स्वप्नाळू, उच्चविद्याविभूषित आणि आधुनिक विचारांची मुलगी माया ( दीपा साही ) रहात असते. एकदा वडील हवेलीच्या जिन्यावरून पडल्याचं निमित्त होतं आणि डॉक्टरांना हवेलीत बोलावण्यात येतं. पहिल्या भेटीतच हे डॉक्टरसाहेब (फारूक शेख) मायाकडे आकर्षित होतात... मग दोनचार भेटी काहीबाही निमित्तानं होतात आणि ते मायाला लग्नाची मागणी घालतात. वडीलांना अर्थातच एक चांगला डॉक्टर जावई म्हणून पसंत असतो.. त्यामुळे झटपट लग्नही होतं. माया खूप सुंदर असते आणि त्याचबरोबर तिच्या स्वतःकडून, स्वतःच्या आयुष्याकडून काही अपेक्षा असतात.. डॉक्टरसाहेबांशी लग्न होऊन त्यांच्या घरी येते तेव्हा ती उंबऱ्यापाशीच थोडीशी मनातून नाराज होते. याचं कारण, एका मोठ्या हवेलीत अर्ध्याहून जास्त आयुष्य काढलेली मायासारखी मुलगी आणि आज लग्नानंतर तिच्यासमोर जे घर असतं ते तुलनेनं अगदी साधं, मध्यमवर्गीय आणि त्याहीपेक्षा त्या घराला आर्टीस्टीक टच काहीच नाही हे पाहून ती जराशी खट्टू होते पण तरीही ती स्वतःवर विश्वास ठेऊन, आपण हे सगळं घर बदलून टाकू असं मनाला समजावते. अशातच त्यांच्या जीवनात एक भयंकर घटना घडते. सासूबाई नवपरिणीत दांपत्यासाठी घराबाहेरच्या मोकळ्या जागेत पूजा ठेवतात. पूजा सुरू असते. दोघंही आनंदाने पूजेत रमलेले असतात. इतक्यात तिथे एक माणूस ओरडत विव्हळत जगण्याची भीक मागत... वाचवा वाचवा म्हणत पळत येतो, त्याच्यापाठीमागे लखलखत्या तलवारी घेऊन माणसं लागलेली असतात. परिस्थिती हाताबाहेर जाते .. लोक घाबरून इतस्ततः पळायला लागतात. माया आणि डॉक्टरसाहेब आपल्या घराच्या दिशेनी धावतात, पण तितक्यात त्यांच्या डोळ्यादेखतच ती माणसं, त्या माणसावर वार करतात आणि अक्षरशः त्याचं डोकं, तलवारीच्या एकाच वाराने, धडावेगळं करतात. त्याच्या रक्ताची चिळकांडी मायाच्या चेहऱ्यावर उडते ..
या घटनेनंतर माया तशी बेचैन आणि काहीशी आजारी, अस्वस्थच रहायला लागेत. आता तिला या मनःस्थितीतून बाहेर काढायचं म्हणजे, तिची अधिक काळजी घेणं आलंच आणि तसंच तिच्यावर अधिक विश्वास दाखवणं, तिला आवडतील अशा गोष्टी करण्यासाठी तिला सतत प्रोत्साहन देणं हे सगळं डॉक्टर (मायाचा नवरा) करायला लागतो... पण वेळ ..? तिच्यासाठी वेळ काढणं मात्र त्याच्यासाठी फार अवघडच गोष्ट असते. तरीही तो एक चांगला नवरा असतो. त्याला शक्य होईल त्या प्रकारे तो तिला वेळ देत असतोच. पण तरीही ती एकटी असते हे मात्र खरं .. आणि या एकटेपणातच ती ' खरी माया ' असते.. तिला आयुष्याकडून जे हवंय ते ही खरी माया तिला सतत जाणवून देत असते.. खरी माया .. म्हणजे मायाच्या अंतर्मनाचा आवाज ..!
हीच ती ओढ .. तिला ज्याची आस असते ते हे असतं .. तिला भरभरून प्रेम हवं असतं, भरभरून रोमान्स हवा असतो, तिला सौंदर्य हवं असतं, तिच्या स्वतःच्या प्रियकराबद्दलच्या काही ठोस कल्पना मनात असतात.. पण अर्थातच वास्तव हे नेहमी काहीतरी वेगळं असतंच. मग तिचा शोध सुरू होतो. ती आपल्या स्वप्नांच्या पातळीवर भवतालची प्रत्येक गोष्ट जोखायला लागते.. आणि हे करताना तिला भानही रहात नाही की ती काय करतेय. कधीकधी अवखळ, अल्लड मुलीसारख्या तिच्या भावना प्रवाही होत जातात.. आणि कधीकधी या भावनांच्या हेलकाव्यात ती स्वतःही गुदमरत रहाते. एकदा तर चक्क ती स्वतःवर कोणीतरी हल्ला केल्याचा बनाव रचून आपल्या नवऱ्याला भयभीत आवाजात फोन करून घरी येण्यास भाग पाडते. नवीनच लग्न झालेला तोही तिच्या अशा फोनने काळजीपोटी धावत घरी येतो. सगळं घर उथलपुथल झालेलं पहातो (जे खरं मायाने स्वतःच केलेलं असतं ) कारण, तिला पहायचं असतं, की ती अशी निष्प्राण पडलेली पाहून तो काय करतो .. तिला हवं असतं, त्याने झटकन तिच्यापाशी दोन अश्रू ढाळावे आणि माया .. तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नाही असं म्हणत स्वतःचा शेवट करावा .. आणि तेवढ्यात आपण त्याला थांबवावं पण छे तो तसं काहीच न करता पुलीस पुलीस म्हणत ओरडतो .. शेजारीपाजारी धावत येतात, मायाचे वडीलही येतात आणि मग ती चटकन उठून त्याला थांबवते.. त्याक्षणी तरी तो काही भावनिक बोलेल अशी तिची अपेक्षा असते .. तर त्याऐवजी तो म्हणतो, अरे माया .. तुम तो मरीही नही .... त्याचं हे वाक्य तिचं काळीज चिरत जातं. अर्थातच दोष त्याचा नसतो आणि तसंच दोष तिचाही नसतो. केवळ अपेक्षांची गणित चुकत असतात. तो एक साधा चाकोरीबद्ध जीवन जगणारा माणूस आहे हे एव्हाना तिच्या लक्षात यायला लागतं आणि ही जाणीवच तिला सतत डसायला लागते. याचं कारणच मुळात ते की ती माया असते. तिच्यासाठी जगणं म्हणजे केवळ स्वप्नवत ..
एव्हाना, वरकरणी दोघांचं जीवन छान सुरू असतं. दोघांना एक मुलगीही होते .. छाया.... आता तर तो आणखीनच कामात व्यग्र होऊन जातो आणि ती आई होते. पण घरकामात सतत रमणाऱ्यांपैकी ती मुळातच नसते.. आणि अर्थातच ती एक अत्यंत सुंदर, मादक स्त्रीही असतेच. मग काय .. भवतालच्या लोकांचं तिच्याकडे लक्ष गेल्यावाचून राहील थोडंच...
तिच्या डोळ्यातली स्वप्न विकत घ्यायला एका पायावर तयार असलेले, आणि तिच्या डोळ्यातली स्वप्न तिच्याबरोबर जगू पहाणारे कित्येक पुरूष तिच्या भवताली वेगवेगळ्या नात्यांच्या आडून रूंजी घालायला लागतात. तिशी चाळीशीतल्या घरातली एकटी विवाहीत स्त्री .. जिच्या नवऱ्याला तिच्यासाठी वेळ नाही आणि मुळात जिला स्वतःचं जीवन जगायची ओढ आहे .. ती अशा नजरा किती काळ थांबवू शकणार ..
मग एक असतो दुकानदार लाला (परेश रावल) .. तिच्याकडे ये जा सुरू करतो. तिला तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू घेण्याचा मोह दाखवतो.. तिला जाणवतं, आपण आपलं जगणं, आपलं रहाणीमान बदलू शकतो .. ती विकत घेत जाते .. तिचं घर सजवत रहाते... स्वतःला सजवत रहाते. हा लाला मोठा वाईट्ट माणूस असतो .. पण ते या बिचाऱ्या फुलपाखराला ओळखण्याची शक्तीच नसते. ती तिचं विश्व तिला हवं तसं रंगवत असते नं...
अशातच जवळच्याच घरी रहाणाऱ्या ललीतकुमारची (शाहरूख खानची) नजर या सुंदर स्त्रीवर पडते. मग थोडीफार ओळख .. थोडीफार मैत्री आणि थोडंफार अव्यक्त प्रेम या टप्प्यापर्यंत माया आणि ललीतचा प्रवास होतो पण अशातच ललीतला दुसऱ्या शहरात निघून जावं लागतं... ते सगळं अर्धवटच रहातं खरं पण इकडे मायाने एवढी वर्ष आपल्या आत बंदीस्त करून ठेवलेल्या वादळाने आता हलकेच डोकं वर काढायला सुरूवात केलेली असते.
अशातच एका सकाळी, ठाकूर रूद्र प्रताप सिंग ( राज बब्बर ) जखमी अवस्थेत आपल्या नोकरांच्या साथीने डॉक्टरांच्या घरी येतो. बंदूक साफ करताना म्हणे गोळी सुटली आणि खांद्याला लागली तर रक्तबंबाळ झालो असं त्याच्या तोंडून ऐकताच डॉक्टर त्याच्या खांद्यातली गोळी काढण्यासाठी त्याला घरातच केलेल्या ओपीडीत नेतात. रक्ताची चिळकांडी उडते तेव्हा छोटा असिस्टंट ते पाहून चक्कर येऊन कोसळतो, आता अशावेळी चटकन डॉक्टरसाहेब मायाला ( आपल्या पत्नीला ) मदतीसाठी बोलावतात. शुभ्र पांढऱ्या साडीत ती नाजूकनार तिथे अवतरते आणि तिला पहाताच रूद्रप्रताप सिंग तिच्याकडे आकृष्ट होतो. पुढच्याच क्षणाला त्याची ती तिच्या पाठमोऱ्या शरीरावर रोखलेली नजर तिला जाणवते, त्याची उघडी भरदार छाती पाहून तीही तत्क्षणीच त्याच्याकडे ओढली गेलेली असतेच म्हणा .. पण ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. तिला जाणवत असतं की ती आगीशी खेळतेय .. पण एकदा का ही आग भडकली की ती शमवणं वाटतं तितकं सोपं नसतंच म्हणा. मग पहिली अचानक एका जत्रेत झालेली त्या दोघांची ओझरती भेट .. मग तो त्यांच्या कुटुंबाशी घरोबा वाढवायला लागतो आणि मग अर्थातच संधी निर्माण करून ती दोघं भेटतात .. ही भेट मायाला खचितच आवडणारी .. कारण, रूद्र कदाचित तिच्या स्वप्नातला पुरूष आहे असं तिला त्या क्षणांना वाटलेलं असतं. इकडे जशा भेटी वाढतात तसं तिकडे घरी सासूबाईच्या लक्षात यायला लागतंच की सुनेचं काहीतरी निराळचं चाललंय. मग एकदा ती टोकतेही .. जुने रितीरिवाज, वागण्याबोलण्याच्या चौकटी सगळ्या सांगायला लागते .. पण छे .. माया .. ती याला बधणार कशी .. आणि तिचं म्हणणं बरोबर असतंच.. कारण, आपण आयुष्य स्वतःसाठी जगतो .. दुसऱ्यांसाठी नाही. पण, असं सगळं या समाजाला ऐकूही येत नाही .. तो अशा स्त्रीलाच निरनिराळी बिरूदं लावून तिची कानउघाडणी करत रहातो. ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला, ज्याला सारी बंधनं झुगारून प्रेम दिलं तो प्रियकरही अशावेळी शेपूट घालून पसार होतो.
हे दुःख ती सहन करू शकत नाही..." पता नही सपनोंको छूतेही उनके रंग क्यूँ बिखर जाते है ...? माया के साथ ऐसा नहीं हो सकता ..! " हे तिचे उद्गार ऐकताना ज्यांचं काळीज हलणार नाही ती माझ्या दृष्टीने खरी माणसंच नाहीत.. मग ती एकदा आत्महत्येचा प्रयत्नही करते पण तितक्यात तिची मदतनीस तिला सावरते आणि माया वाचते.
मग जणू आयुष्याला पुन्हा एक कलाटणी मिळावी, असा एक प्रसंग येतो. एका दुसऱ्या शहरात हवापालट म्हणून माया आणि तिचा नवरा जातात तेव्हा अचानक ललित कुमारची भेट होते. एकेकाळचा साधासुधा, तिच्यावर भाळलेला ललीत कुमार आता मोठा, मॅच्युअर माणूस झालेला असतो. मायावरचं प्रेम तो त्या भेटीत, तिच्या पतीच्या नकळत व्यक्त करतो आणि अर्थातच .. हो ना करता करता .. माया ते प्रेम स्वीकारते. पण आता मायाही खूप बदललेली असते. त्याच्या भेटीसाठी ती चक्क नवऱ्याला गाण्याचा क्लास लावतीये अशी थाप मारून ट्रेनने प्रवास करून आठवड्यातून दोन दिवस जायला लागते. पण ती असं करत असली तरीही ती खोटारडी किंवा नीच असते असं नाही, तर ती मनस्वी असते, तिला आयुष्य भरभरून जगायला आवडत असतं, आणि मुख्य म्हणजे तिला तिच्यावर भरभरून प्रेम करणारं कोणीतरी हवं असतं. हीच तर तिच्या आतली ओढ .. तिच्यातली माया असते नं ..
इकडे सासूबाईंचा देहांत होतो आणि अगदी त्याक्षणी तिच्या भाबडेपणाचा फायदा घ्यायला केव्हाचा टपलेला लाला तिला गाठतो... अगदी त्या फ्युनरलच्या ठिकाणी येऊन तो तिला म्हणतो, किती चांगली संधी आहे ही मॅडम.. तुम्ही तुमच्या नावावर सगळी संपत्ती करून घ्या आता ... आणि ती .. भाबडी .. तिला यातला डाव कळणं कठीणच .. ती चक्क त्यांचं ऐकते. काही दिवसातच लालाने दिलेल्या कायदेशीर कागदांवर काहीतरी थाप मारून आपल्या नवऱ्याकडून सह्या करून घेते. त्याचा तिच्यावर विश्वास असतो. किंबहुना तिनी असं काही कायदेशीर माहिती काढून आपल्याकडून सह्या घेतल्या आहेत याचं त्याला अंमळ कौतुकच वाटतं.
इकडे ललीतकुमारशी भेटीगाठी वाढतात .. ती त्यालाही सर्वस्व अर्पण करते.
अशातच लालाच्या कपटीपणाला आता आणखीनच धार चढलेली असते. तो मायाला आजवर दिलेल्या उधारीवरच्या सगळ्या वस्तूंच्या बदल्यात चक्क तिच्यावर कायदेशीर कारवाई करतो. तिच्या घरावर, तिच्या संपत्तीवर तो नीलामीची नोटीस पाठवतो. मायाला नोटीस मिळताच तिचा थरकाप उडतो. काही लाख रूपये तिला लालाचे परत करायचे असतात, आजवर ज्या माणसाने तिच्या आधारे स्वतःची तुंबडी भरून घेतलेली असते तो माणूस आता संधी मिळताच असा उलटला हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. तो कपटी, कारस्थानी ... आणि ती बिचारी.. त्याच्याकडे पुन्हा जाऊन .. मदतीची याचना करते. पण आता त्याने डाव साधलेला असतो. मग ती बिचारी, काही पैशांसाठी तिच्या प्रियकरांचे उंबरठे झिजवते पण तिला कोणीच मदत करत नाही. ललीतकुमार म्हणतो, अरे माया... तुम इस वक्त यहाँ .. वो मेरे घरमालिकको यहाँ लडकीयोंका आना पसंद नही है ... असं म्हणत तिला तिथून गोड शब्दात हाकलून लावतो. मग ती शेवटचा पर्याय म्हणून रूद्रप्रतापकडे धाव घेते .. पण छे .. तिच्या अशा वेळांना तोही हलकटासारखाच वागतो. जिसने सारी जिंदगी दूसरोंके सहारे काटी हो ... हे त्याचे तिच्याबद्दलचे उद्गार ऐकताच तिच्या डोळ्यावरची त्याच्याप्रती असलेल्या प्रेमाची झापडं क्षणार्धात उडतात... तो म्हणतो, मानो या ना मानो, ये सब नजरका धोका है.... हे त्याचे शब्द ऐकताना ती पार घायाळ होते.. पण तरीही त्याक्षणी तिच्यातली एक बाणेदार आणि सच्ची स्त्री त्याला सुनावतेच, मुझे लगता था की तुम मुझसे प्यार करते हो .. लेकीन वो मेरी नजरका धोका था.. असं म्हणून ती तिथून निघते खरी .. पण येतायेताच घराशेजारीच असलेल्या ओळखीच्या हकीम चाचांकडे डोकावते. तिथे एक जहर की शीशी असते ... कधीची .. कोणा खोटारड्या अरबी विक्रेत्याने लोकांना उल्लूत काढण्यासाठी रस्त्यात मांडलेला तमाशा जेव्हा पोलिस उधळून लावतात तेव्हा या हकीम काकांनी ती शीशी हस्तगत केलेली असते कोणाचं लक्ष नसताना .. त्यात नेमकं काय औषध आहे की वीष आहे हे त्यांना पहायचं असतं म्हणून .. आणि हे ओळखीतल्या सगळ्यांनाच माहीत असतं... आणि ती गोष्ट मायालाही माहित असतेच... आज जेव्हा आयुष्याच्या वास्तवाचा एवढा चरचरीत निखारा तिला जाळायला तिच्या दिशेनी आलेला असतो तेव्हा त्याचा चटका बसण्याआधीच स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय तिने घेतलेला असतो. ती क्षणार्धात कोणाच्याही नकळत त्या शिशीतलं ते द्रव पिऊन टाकते आणि अपेक्षेप्रमाणेच त्यातल्या विषाने ती संपते...
तिचा मृत्यू एक गूढ बनून रहातो.. मग गुप्तहेर जेव्हा तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी येतात तेव्हा या मायाचं हे असं बेबंद, बेधुंद जीवन, नव्हे त्या जीवनाचे इतस्ततः विखुरलेले तुकडे ते गोळा करत रहातात .. आणि शेवटी हाती एक कोलाज लागतो..
पण हा कोलाज म्हणजे एखादं चित्र नसतं... तर कॅलिडोस्कोपमधून जसे रंगाचे निरनिराळे तुकडे एकत्र येत चित्र दिसत रहातं.. ती माया तशी असते. सगळ्यांकडे तिचे काही तुकडे सापडतात .. पण ती तिच्यापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. माया म्हणते नं तसं... सब माया के साथ रहना चाहते है .. मै अकेलीही हार गयी ..
अशीच तर असते तिची कहाणी...
चित्रपटाच्या शेवटी आपल्या डोळ्यात मायासाठी पाणी तरळतं. तिच्या त्या प्रत्येक प्रियकरासाठी ज्याने केवळ तिचं शरीर लुचलं, त्या कपटी लालासाठी ज्याने तिचा सर्वतोपरींनी फायदा घेतला आणि तिचा भाबडा नवरा जो तिला सगळं देत गेला पण तरीही तिला जे हवं होतं तेवढं सोडून .... या सगळ्यांसाठी आपल्या मनात तिरस्कार निर्माण होतो.. पराकोटीचा राग येतो. कालपर्यंत जिच्या देहभोगासाठी तिच्यावर जीव उधळून निघाले होते त्यांच्यापैकी कोणीच तिच्यावर खरं प्रेम केलं नव्हतंच आणि वेळेला माणुसकी म्हणूनही कोणी तिला मदत केली नाही हे किती अमानवी म्हणायचं.. जनरीत जनरीत म्हणतात ती हीच का ..
उपभोग घ्यायला ज्यांना काडीचीही लाज वाटली नाही तीच माणसं नंतर त्याच स्त्रीला चालू, बाहेरख्याली, उनाड वगैरे शिक्के मारून तिचे हे हाल करतात यावर विश्वास बसत नाही. माणसंच ती .. माणूस नावाच्या प्राण्यावर विश्वास ठेवणंच खरंतर चूक .. नव्हे गुन्हा...
मायासारख्या अनेक मुली .. ज्यांना भरभरून जगायचं असतं, ज्यांना खरं प्रेम हवं असतं .. पण अनेकींच्या नशिबी हे असे डोमकावळेच येतात... आणि मग अनेक अशा माया आपल्या सुखस्वप्नात हसीखुशी स्वतःला कायमचं या जगापासून विलग करून टाकतात. त्यांचं जगणं चारचौघींसारखं कधी नसतंच.. कारण, मुळात त्या चारचौघींसारख्या नसतातच.. पण या मुलींच्या नशीबी खुद्द देवाने हे असे काटे का पेरले असतील मग हा प्रश्न राहून राहून छळत रहातो...
एकंदरीतच माया मेमसाब हे गूढ ... पण तरीही तिच्या मनातल्या मायापर्यंत पोचण्यासाठी आधी तसं जीवन एकदा जगून तर पहा .. निस्वार्थीपणे दुसऱ्यावर भरभरून प्रेम करून तर पहा... छोट्या छोट्या गोष्टीत भरभरून आनंद तर घ्यायला शिका ... पण स्वार्थाने बरबटलेल्या या जगात मायासारखं फुलपाखरागत जगणं जमणं, हरएक के बस की बात नहीं.... हेच खरं...
चित्रपटाचं दिग्दर्शन, कॅमेरा यासाठी केतन मेहताला पैकीच्या पैकी मार्क द्यायला हवेत. तसंच, या चित्रपटातल्या एक से एक गाण्यांसाठी गुलझार साहेब आणि पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांचे शतशः आभार मानायला हवेत. त्यांना माया थेट कळली आणि त्यांना ती शब्दबद्ध करता आली, गाण्यांच्या , संगीताच्या साथीने व्यक्त करता आली आणि म्हणूनच तर ती शेकडो प्रेक्षकांपर्यंत पोचली...
खुद से बाते करते रहेना ... बाते करते रहेना हे गाणं असो किंवा, एक हसीन निगाह का दिल पे साया है हे गाणं असो, किंवा ओ दिल बंजारे .. जा रे .. खोल डोरीया सब खोल रे ... ही सगळी गाणी लता दीदींच्या आवाजात ऐकणं म्हणजे केवळ कर्णतृप्ती आणि मग ही गाणी कानातून थेट मनात उतरतात आणि सतत आंदोलत रहातात एवढी या गाण्यांची अफाट ताकद आहे.
माया मेमसाब या कॅरेक्टरसाठी दीपा साही हिची निवड करणं म्हणजे केवळ थोर म्हणायला हवं. कारण, माया मेमसाब म्हणजे ती नाही तर दुसरं कोण... तर तिच्याखेरीज दुसरा चेहरा, दुसरं व्यक्तिमत्व या मायाचं असूच शकणार नाही हे आपल्याला पटतं. माया म्हणजे अशीच असणार .. सुंदर .. नाजूक .. अवखळ ..आधुनिक आणि बेधुंद .. बेबंद .. ही माया दीपा साहींनी इतकी चपखल साकारली आहे की त्यासाठी त्यांना अक्षरशः नमन ..
किंग खान शाहरूख खानची हात पसरून नायिकेला प्रेमात पाडण्याची स्टाईल या चित्रपटानंतरच कदाचित फार फेमस झाली असावी. आणि अर्थातच तो दिसलाही फारच उमदा आणि त्याने अभिनयही अर्थातच तितकाच कसदार केला आहे. सगळ्यात राग राग येतो तो राजबब्बर आणि परेश रावलच्या कॅरेक्टरचा ... किती किती चीप असावेत हे असं वाटणं म्हणजेच त्यांच्या भूमिकेला आपण दिलेली एकप्रकारे पावतीच आहे असं म्हणावं लागेल..
तर अशी ही माया मेमसाब ....
तिच्याविषयी जाता जाता याच ओळी मलाही पुन्हा लिहाव्याशा वाटतात ....
चली गयी जो मंचली .. पुकारूंगा गली गली
वो लेके मेरी जिंदगी .. चली चली उधर चली
वो रूठी रूठी रहती है .. बहुत बहुत मनाया है
एक हसीन निगाह का दिलपे साया है ..
जादू है जुनून है .. कैसी माया है ... ये माया है .......
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(copyright @Mohinee Gharpure Deshmukh)