गुरुवार, २५ जून, २०२०

सोनेरी गाणं - 7

" Kitchen Band "  

इस्पॅलियर शाळेच्या दहाव्या वर्षातील पदार्पणाची कल्पक कथा 

लॉकडाऊनमध्ये साकारलं अनोखं गाणं


'सोनेरी गाणी' ही लेखमाला सुरू करण्याचा माझा मानस मुळातच हाच होता, की अशा प्रत्येक गाण्याची नोंद घ्यावी ज्यात संगीतकाराने काही निराळे प्रयोग केलेले आहेत. आजवरच्या सर्व सोनेरी गाण्यांच्या पेजेसमधील लेखांचा तुम्ही आढावा घेतलात तर तुम्हालाही हे जाणवेल की ज्या गाण्यांची दखल या लेखमालेमध्ये मी घेत निघाले आहे, ती गाणी खरंच काहीतरी निराळी, काहीतरी वेगळी आहेत. संगीत ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कोणत्याही सीमेशिवाय, कोणत्याही मर्यादेशिवाय सर्वत्र पोहोचते आणि त्याने सारं विश्व आपोआपच एकमेकांशी जोडलं जातं. एवढं उदात्त कार्य केवळ संगीत हेच माध्यम करू शकतं. वाहणाऱ्या हवेला, खळाळत्या पाण्याला, पावसाच्या सरींना, घराघरातल्या निरनिराळ्या वस्तूंना असलेले नाद म्हणूनच माणसं आपापल्या शक्तीने, बुद्धीने आपल्या काबूत करण्याचा प्रयत्न करतात आणि बरेचदा ते निरनिराळ्या माध्यमांच्या, वाद्यांच्या आधारे शक्य होत आलेलं आहे. या सर्व आवाजांमधूनही पुन्हा माणसांनी आपापली गाणी, आपापलं संगीत आजवर नानाविध प्रकारांनी तयार केलं आहे.
असंच एक संगीत .. असंच एक गाणं .. ज्याला म्हटलं तर नाद, लय, ताल, सूर सारं काही आहे .. त्याला शब्द नसले तरीही त्यातून आपोआपच जे चैतन्य पसरत जातं ते फार ऊर्जात्मक आहे... आणि म्हणूनच त्याची नोंद माझ्या सोनेरी गाण्यांमध्ये करावीशी मला आवर्जून वाटली.
नाशिकमधील इस्पॅलियर शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त काहीतरी कल्पक उपक्रम राबवावा असं शाळेचे संस्थापक सचिन जोशी व प्राजक्ता जोशी यांना वाटत होतं. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थी आणि शाळा दोन्हीही बंद .. मग काय करणार .. यावर विचारमंथन करत असतानाच किचन बँड ही एक सुंदर कल्पना त्यांना सुचली. स्वयंपाकघरातील विविध भांड्यांचा आवाज, विविध धान्यांचा आवाज, पाण्याचा आवाज हे सगळे आवाज घेऊन काही करता येईल का असा विचार त्यांनी आपल्या म्यूझिक टीमसमोर मांडला आणि तत्क्षणी संगीत शिक्षक नरेश लोखंडे यांनी या कल्पनेला अनुमोदन देत त्यावर काम सुरू केले.


शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या पालकांना फोन करून, कोणकोणते आवाज हवे आहेत, ते रेकॉर्ड कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. 
अनेक आवाज अशा पद्धतीने रेकॉर्ड केलेली जेव्हा हाती आले तेव्हा नरेश सर आणि विकी सरांनी धून बनवली. सध्याचे अवघड दिवस, कोरोनामुळे आलेले नैराश्य.. मळभ हे सगळं निघून जाईल ही आशा देणारं गाणं म्हणून 'आनेवाला पल जानेवाला है' , ' जिंदगी मिलके बिताएंगे  हाल ए दिल गा के सुनाएंगे ', ' छोडो कल की बाते ', ' आओ बच्चो तुम्हे सुनाए ' या गीताच्या धूनवर किचन बँड मोठ्या रंजक पद्धतीने गुंफला. हे संपूर्ण संगीत संकलन महेश सरांनी केले आणि एक सुंदर संगीत या माध्यमातून पंधरा दिवसांतच आकारास आले. 


नाशिकमधील इस्पॅलियर ही अनुभवातून शिक्षण देणारी शाळा असल्याने सतत नावीन्यपूर्ण, सृजनशील उपक्रम करण्यात शाळा अग्रणी असते. यापूर्वीही शाळेने प्लास्टीक बँड, रोबोट बँड, बांबू बँड, टॅप बँड असे नानाविध प्रयोग करून संगीत क्षेत्रात कल्पकतापूर्ण भर घातली आहे. संगीत क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र, शास्त्र विषय व अन्य अनेक विषयात असेच कल्पक उपक्रम शाळा वेळोवेळी राबवित असते. मुलांमधील कल्पकतेला चालना मिळावी हा मुख्य उद्देश अशा उपक्रमांमागे असतो. 
संस्थेने हे वर्ष 'इयर ऑफ इनोव्हेशन' या थीमअंतर्गत साजरे करण्याचे योजिले असल्याने त्याअंतर्गतच ही पहिली निर्मिती करण्यात आली आहे. 

या बँडमध्ये विद्यार्थ्यांनी जे नाद वापरले आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष व्हिडीओत पहाल तर नक्कीच थक्क व्हाल .. आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांची देहबोली पाहताना आपल्यालाही त्यांच्याइतकाच आनंद ते त्यांच्याही नकळतच देत जातात हेच या गाण्याचे विशेष.. 

सोनेरी गाण्यांच्या या लेखमालेत म्हणूनच तर एक नवं पान या 'किचन बँड'ला देताना मला अतिशय आनंद होत आहे !

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

किचन बँड पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा -
 

Translate

Featured Post

अमलताश