स्पार्कल शाळेची भन्नाट आयडीया,
लिंबांच्या सहाय्याने शिकवला अभ्यास
नाशिकमधल्या 'स्पार्कल शाळेत' कृतिशील शिक्षण पद्धती राबवली जाते तसंच, छोट्या छोट्या उपक्रमांमधून सर्वच विषयांशी मुलांची ओळख करून दिली जाते. कोव्हीडच्या या भयंकर अवघड काळात, जिथे सर्वच शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत, तिथे दरवेळी मुलांना घरात बसल्याबसल्या पुस्तकाखेरीज अन्य कोणत्या मार्गाने विविध विषय शिकवता येतील याचा विचार स्पार्कलचे शिक्षक सतत करत असतात आणि अशा विचारांती नेहमीच या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना घरबसल्या उपलब्ध साधनांमधून काय काय उपक्रम पालकांच्या मदतीने सहजी करता येतील याच्या एक से एक आयडीया सुचत असतात.
अशीच एक भन्नाट आयडीया नुकतीच या शाळेतील शिक्षिका, माधुरी भालेराव यांनी आपल्या ज्युनियर केजीतील विद्यार्थ्यांना करायला दिली होती. घरोघरी सहज उपलब्ध असलेल्या लिंबांचा वापर करून विद्यार्थ्यांना लिंबू सरबत करून प्यायला तर सांगितलेच पण कसे .. ? तर आधी त्या सरबताची क्रीया विषद करून, लिंब मोजून आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित, भाषा व विज्ञान या सर्व विषयांचा अभ्यासही शिकवला. अर्थात यासाठी पालकांची मदत घ्यावी लागलीच पण शाळेचे पालकही मोठे उत्साही .. ! ते या छानशा सोप्या उपक्रमात आपल्या मुलांबरोबर उत्साहाने सहभागी झाले.
सुरूवातीला वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांना लिंबातून मिळणाऱ्या 'व्हिटॅमिन सी'चे फायदे सविस्तर शिकवले, त्यानंतर लिंबं मोजायला सांगितली जेणेकरून मुलांचे अंकज्ञान वाढीस लागेल. मग विद्यार्थ्यांना लिंबाची चव घ्यायला सांगितली आणि त्याचबरोबर लिंबू सरबताची पाककृती वर्णन करायला सांगितली. हे करताना आपोआपच मुलांचे भाषाज्ञान वाढले .. विविध शब्द, क्रियापदं, विशेषणं यांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले तसेच ही शाळा द्विभाषिक असल्याने मुलांना एकाच वेळी दोन भाषांतील निरनिराळे शब्द शिकता आले. उदाहरणार्थ, Drink म्हणजे पिणे, Make म्हणजे बनवणे, Cut म्हणजे कापणे अशा प्रकारे शिकवल्याने मुलांची शब्दसंपत्तीही वाढली.
खरंतर, अशा उपक्रमांपेक्षा मुलांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षकांच्या सहवासात जे शिकवले जाते त्याचीच ओढ आता अधिक वाटू लागली आहे.. शाळेची इमारत, तिथलं वातावरण, शाळेतील मित्रमैत्रिणींबरोबर हे असे उपक्रम करताना मिळणारा आनंद या साऱ्यासाऱ्याची आस या चिमुकल्या मुलामुलींना लागली नाही तरच नवल .. पण हा कोरोना आला नि चालत्या गाड्याला खीळ घालून गेला.. !
असो, तर हे ही दिवस जातील आणि घरोघरी अडकलेली चिमुकली मुलं पुन्हा लवकरच शाळेत जातील. आपल्या शिक्षकांना भेटतील, मित्रांबरोबर दंगा करतील आणि मुख्य म्हणजे खूप खूप छान अभ्यास करतील असा दिवस लवकर येवो हीच आता देवाकडे प्रार्थना ...
- मोहिनी घारपुरे - देशमुख