यूट्यूबकृपेने नुकतीच एक अफलातून शॉर्टफिल्म माझ्या पहाण्यात आली.. जिचं नाव, नयनताराज् नेकलेस. हे असं वेगळंच नाव, त्यातून कलाकारांमध्ये खुद्द कोंकणा सेन .. त्यामुळे ही फिल्म पहाण्याची उत्सुकता शिगेला पोचली. फिल्म पहायला सुरूवात केली तेव्हा बरेच संदर्भ नीट उकलत नव्हते पण तरीही शेवटापर्यंत ती पहात गेले आणि त्यातून मिळालेला एक छान, छोटासा आणि टोकदार संदेश माझ्या मनाशी आपली खोल निशाणी सोडून गेला.
मत्सर, हव्यास, तूलना आणि स्पर्धा हेच ते अवगुण जे कदाचित स्त्रियांच्या ठायी जरा निराळ्या पद्धतीने आणि प्रॉमिनंटली उमटलेले अनेक प्रसंगात दिसतात.. ही कथा याच अवगुणांवर बेतलेली.
तर, कथा सुरू होते..नव्यानेच दुबईहून येथे भारतात स्थलांतरीत झालेली, स्टायलिश, हायफाय नयनतारा .. तिची ओळख होते ब्यूटीपार्लर चालवणाऱ्या अलकाशी. मग काय, ती तिच्या स्टाईलीश, हायफाय असण्याच्या सुरस कथा अलकाला सांगत रहाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगणारी साधी अलकाला नयनताराची जणू भुरळच पडते.
दोघींची मुलं, एकाच शाळेत शिकणारी, त्यामुळे दिवसभर मुलांना घेऊन सोबतीने क्लासला सोडायला जाताना, कधी बागेत खेळायला नेताना नयनतारा आणि अलकाच्या गप्पा रंगायला लागतात. तिच्या गोष्टी ऐकताना अलकालाही नयनतारासारखं व्हावंसं आपोआपच वाटायला लागतं. उच्चभ्रू, स्टायलिश आणि हायफाय .. पण तिला ते शक्य नसतं.
अशातच सोशल मीडियाची आणि तिची ओळखही नयनतारा करून देते, ज्यावरून एकदा अलकाला तिचा जुना मित्र, शाळेतला, सापडतो. थोड्याशा गप्पा होतात, चॅटींग होतं आणि एक दिवस भेटायचं ठरतं. एका आलिशान रेस्तराँमध्ये अलका आपल्या मित्राला भेटायला जाणार असते हे कळल्यावर नयनतारा या डेटसाठी अलकाला आपल्या स्टाईलनी तयार करते.. मेकअप, कपडे, हेअरस्टाईल .. आणि निघतानिघता नयनतारा अलकाला आपला एक महागडा नेकलेस गळ्यात घालून देते.
अलकाला आज फार भारी वाटत असतं. तिच्या उभ्या आयुष्यात तिनं कधी स्वतःला असं थाटामाटात ठेवलेलं नसतं, ना कधी स्वतःवर असा वेळ, पैसा खर्ची घातलेला असतो.
अलका आलिशान रेस्तराँमध्ये जाते, मित्राला भेटते आणि परत येते तो बिल्डींगबाहेर तौबा गर्दी .. पोलीस आलेले दिसतात. अलका चपापते. कशीतरी वाट काढत वर जाते तो तिला धक्का बसतो, कारण, बिल्डींगमध्ये एक नाही तर दोन खून झालेले असतात. नयनताराचा आणि तिच्या मुलाचा, आणि तो खून खुद्द नयनताराच्या नवऱ्यानीच केलेला असतो..
अलका हादरते.. ती स्वतःला सावरण्यासाठी नयनताराच्या गाडीत जाऊन एकटीच बसते.. एरवी याच कारमध्ये नयनताराच्या शेजारी बसून त्यांनी तासन्तास सोबत घालवलेला असतो. तिच्या फॉरेन ट्रीप्स, पुढल्या वर्षी मुलाला घेऊन डिस्नीलँडचं प्लॅनिंग, तिचं महागडं शॉपिंग, तिचा उंची फोन हे सगळं अलकानं तिथेच बसून, तिच्यासोबत वावरताना अनुभवलेलं असतं.. आता याक्षणी तिचं स्वतःचं अस्तित्वही तिला ओळखू येत नसतं इतकी ती नयनतारामय झालेली असते.
मित्राशी झालेल्या भेटीता अलकाला स्वतःलाही हे जाणवलेलं नसतं की ती सगळा वेळ त्याच्याशी तेच बोलत होती ज्या छानछोकीच्या गोष्टी तिनं आजवर नयनताराकडून ऐकलेल्या असतात. तिचं तिलाही कळत नाही की ती त्याच्यापुढे स्वतःला नव्हे तर नयनतारालाच जणू सादर करते आहे इतकी ती नयनतारामध्ये हरवलेली असते. तिची कॉपी करताना, तिची स्टाईल मारताना अलका इतकी हरवून जाते की आपल्या मित्राला आपल्या मुलाचं नावही चुकीचं, म्हणजे नयनताराच्या मुलाचं नाव सांगते....
आणि आता घरी पोहचते तो समोर हे असं आक्रीत घडलेलं....
अलका हादरते.. आणि तेव्हाच दुसरीकडे गर्दीत कर्णोपकर्णी वाहत आलेल्या वार्ता तिच्या कानावर आदळत रहातात...
" इनका कुछ लोनवोन का चक्कर था... रोज पुलीस आती थी घरपे.. उसी वजहसे आज ये सब हो गया.. "
आणि या वाक्यांबरोबर सगळा प्रकार आपल्यासमोर उलगडत जातो.
वरवर फार हवीहवीशी वाटणारी श्रीमंती, थाटमाट, स्टाईल पण प्रत्यक्षात त्यामागे दडलेली सिक्रेट्स.. कर्जबाजारीपणाची..
नयनताराज् नेकलेस जो मरतामरता अलकाच्या गळ्यात ती देऊन गेलेली असते.. तो फार सुंदर, मोहक नि हवाहवासा वाटणारा असला तरीही प्रत्यक्षात तो तर जणू गळफासच असतो !
बेगडी सौंदर्याचा, श्रीमंतीच्या खोट्या कल्पनांचा, भुलवणाऱ्या त्या प्रत्येक खोट्या नि अवास्तव स्वप्नाचा गळफास..
दागिने, छानछोकीची रहाणी, उच्चभ्रू वर्गात वावरणं आणि आपल्या प्रत्येक गोष्टीतून स्वतःच्या स्टायलिश अंदाजाचं कौतुक करत रहाणं हे कोणाला आवडत नाही.. विशेषतः या सगळ्याला अलकासारखी साधी चाकोरीबद्ध जीवन जगणारी बाई भुलली नाही तरच नवल.. पण हे वरवरचं उथळ, बेगडी जीवन ओळखण्याइतपत जीवनाचे रंग अलकाने पाहिलेले नसतात. म्हणूनच ती भुलत जाते आणि स्वतःला हरवत जाते..
आपल्या भवताली अशा अनेक अलका आहेत आणि अशा अनेक नयनताराही आहेत. अगदी प्रसंगानुरूप आपणही कधी अलकाच्या भूमिकेत जगतो तर कधी नयनताराच्या भूमिकेत जगतो.. आणि म्हणूनच, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मला हेच सांगावसं वाटतं, की या अशा बेगडी जगातल्या उथळ आणि वरवर मोहमयी वाटणाऱ्या गोष्टींपासून सावध रहा.
आपल्यातली ईर्षा, मत्सर, स्पर्धा आणि मोह आणि हव्यास या साऱ्या अवगुणांना एका मर्यादेपलिकडे जाऊ देऊ नका.
या महिला दिनाला या निमित्ताने एका वेगळ्या दृष्टीकोनातून तुमच्यापुढे हा विचार मांडण्याचा माझा हा प्रयत्न.. आशा आहे, आपल्यातील नकारात्मक विचार आणि असे अवगूण झटकून टाकून वेळीच त्यातून स्वतःला सावरून आपण आपले जीवन खऱ्या आनंदाप्रती, जीवनाच्या खऱ्या मूल्यांप्रती रूजवून जीवनाची आनंदाने वाटचाल करू...
- मोहिनी घारपुरे -देशमुख
copyright@mohineegharpure-deshmukh
copyright@mohineegharpure-deshmukh