आज चंदा काकाचा वाढदिवस.
काका आज आपल्यात नाही .. पण त्याच्या स्मृती कायम माझ्याजवळ रहातील यात शंका नाही. त्याला जाऊनही आता बरीच वर्ष झाली, पण काकाचा हसतमुख देखणा चेहरा अजूनही डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा रहातो.
मी काकाविषयी का लिहीतेय .. कारण, त्याचं जीवन, आणि त्याचा संघर्ष मी डोळ्यांनी पाहिलाय. जीवनभरासाठी आलेल्या अपंगत्वामुळे तो खचला नाही, जीवनाशी झगडत राहिला.. माणसांशी नाही ! माणसांना आपलंसं केलं त्याने हसत हसत आणि जीवनाने घेतलेल्या एका अवघड वळणावरूनही तो पुढे चालत राहिला.. अथकपणे..
वाचताना अडखळला असाल ना तुम्ही ? अपंगत्व या शब्दापाशी.. ? साहजिकच आहे ते..
काकाची कहाणी कधी ना कधी मी लिहीणार होतेच.. लोकांपुढे मांडणार होतेच.. पण म्हणतात ना सगळ्याची वेळ ठरलेली असते.. जागा ठरलेली असते, तसंच असावं कदाचित.. काकाच्या संघर्षाची कथा आपल्यापुढे मांडण्यासाठी माझ्या ब्लॉगचीच जागा पूर्वनियोजीत असावी..
वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत काका एकदम नॉर्मल होता. पुण्यात नोकरीला लागला होता, सायकलींग करायचा, दररोज छान व्यायाम करायचा. माझे वडील श्री.महेश घारपुरे हे घरातले तीन नंबरचे भाऊ आणि काकाचा नंबर चौथा.. म्हणजे धाकटा आणि सगळ्यांचा लाडका. त्यातून तो दिसायला छान. वागायला बोलायला तर ही सगळीच भावंड छानच .. चंदा काकाचा स्वभाव खेळकर, बोलका .. त्यामुळे त्याचं सगळ्यांशीच जमायचं. अशातच अठराव्या वर्षानंतर एकाएकी काकाची पायातली शक्ती कमी व्हायला लागली. त्यामुळे चालताना पाय वाकडा पडायला लागला.. आधी सगळ्यांना वाटलं की याची काहीतरी मस्तीच सुरू आहे म्हणून सगळ्यांनी गंमतीत घेतलं आणि मग वयोमानापरत्त्वे जसं त्याच्या चालण्यात फरक जाणवू लागला त्यानंतर वैद्यकीय तपासण्या केल्या आणि त्यात काकाला मस्क्यूलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार झाल्याचं स्पष्ट झालं. या आजारावर अजूनही इलाज नाहीये. हा आजार तसा दुर्मिळच म्हणायचा. या आजारात स्नायूंमधली शक्ती हळूहळू क्षीण होत जाते. एकेक अवयव हळूहळू काम करेनासा होत जातो.. आणि जीवन जसं जसं पुढे सरकतं तसं तसं ते आणखीन आणखीन कठीण होत जातं, कारण, स्नायूंची शक्ती कमी कमी होत जाते..
तरीही काकानी आपलं जीवन फुलवलं. आर्टीलरी सेंटर, नाशिकमध्ये नोकरी केली. लग्न झालं.. संसार थाटला. स्नेहल काकूच्या रूपाने काळजी घेणारी सहचारिणी मिळाली आणि गौरवच्या रूपाने संसारवेलीवर फूल उमललं. दिवस पुढे पुढे सरकत होते.. आणि आजार बळावत चालला होता. आम्ही मुलं उन्हाळी सुट्टीत काकाकडे रहायला जात असू. तो बसल्या बसल्या आमच्याशी कॅरम आणि पत्ते खेळत असे.. दारावर कुल्फीवाला, बुढ्ढी के बालवाला आला की घेऊन देत असे. सिडकोतल्या घराच्या बाहेर असलेल्या ओट्यावर काकाला जरा आधार घेऊन येत बसता येत असे त्यामुळे काका तिथे बसून आम्हा मुलांचे खेळ बघी. नंतर नंतर कमरेतली शक्ती कमी झाली, हातातली शक्ती कमी झाली. त्यानंतर काकूला त्याला उठवावं, बसवावं लागे.. इतर विधींसाठीही काकूला त्याला मदत करावी लागत असे.. पण तरीही दिवस आनंदात पुढे चालले होते. जीवन फुलत होते.. एकीकडे जीवनाने एक गालबोट लावलं होतं पण तरीही जीवनाचे अनेक अन्य रंग त्याच्यासाठी उमलले होते. गौरव लहानाचा मोठा होत होता.
माझ्या वडीलांचा काकाला एकाच शहरात असल्याने आधार होता. रामाच्या नवरात्रात काका आमच्याकडे येई तेव्हा त्याला रिक्षातून उतरवून आमच्या घरी पायऱ्या चढवून आणण्याचं काम बाबा करत.. बाबांना दम्याचा त्रास, परंतु तरीही या भावंडांची इच्छाशक्ती दांडगी.. त्यामुळे एकमेकांसाठी हे भक्कम. पुढे बाबांनी आमच्या एका दारासमोर उतारच करून घेतला, ज्यावरून व्हीलचेअरवरून काकाला आत आणता येणे जरा सहज झाले.. पण खरंतर, शरीराची हालचाल फारशी नसल्याने नंतर नंतर काकाचं वजन वाढत होतं, त्यामुळे त्याच्यासाठी काहीही करणं म्हणजे दुसऱ्या माणसाच्या शक्तीची परीक्षाच असायची. सहचारिणी या नात्याने ही परीक्षा काकूने जन्मभर दिली असं म्हणायला हवं..
नंतर काकाने नवं घर घेतलं.. स्वतःच्या हिंमतीने.. तिथे स्वतःला हव्या तशा सोयी करून घेता आल्या. एक सायकल रिक्षा डिझाईन करून घेतली नि त्या रिक्षाचा एक चालक ठेवला. रोज काकाला या रिक्षात व्हिलचेअरसकट चढवण्याचं काम त्या माणसाला दिलं. मग व्हीलचेअर चढवली की सायकलरिक्षा चालवत तो माणूस काकाला ऑफीसपर्यंत नेऊन सोडे आणि पुन्हा संध्याकाळी घरी आणून सोडत असे. आम्ही मुली काकाला ऑफीसमध्ये जाऊन भेटत असू. काकाचं काम कम्प्यूटरवर असल्याने बैठं काम होतं.
सगळं सुरळीत चालू असतानाच एकाएकी संकटाची आणखी एक मालिकाच जणू काकाच्या कुटुंबावर कोसळली. काका सायकल रिक्षाने ऑफीसला जात असताना रिक्षाचालकाचा तोल जाऊन दोघेही सायकलसकट कोसळले .. अपघात झाला आणि या अपघातात काकाच्या मांडीचं हाड मोडलं. तातडीने दवाखान्यात नेलं परंतु, काकाच्या मांडीला फ्रॅक्चर करता येणंही शक्य नव्हतं. त्या अपघाताने काकाला एका जागी खिळवून ठेवलं ते कायमचंच..
पूर्वी त्याच्या हालचाली मर्यादीत स्वरूपात का होईना सुरू होत्या पण नंतर काकाला या अपघाताने पायावर उभंही रहाता येणं अशक्य झालं. जीवनाची बिकट वाट पुढे आणखीनच बिकट झाली..
अंथरूणात बसून पुढची अनेक वर्ष त्याने काढली पण कधीही तो चिडलेला, वैतागलेला किंवा परिस्थितीवर रागावलेला असा मला दिसला नाही. केव्हाही त्याच्या घरी जावं .. चंदा काका .. चंदूडी अशी गोड गोड हाक मारावी की काका लगेच हसतमुखाने .. चला आली का मोना असं म्हणून स्वागत करायचा. निहीरा झाली तेव्हा मी आवर्जून काकाचा आणि काकूचा हा फोटो टिपून ठेवला होता जो आता या ब्लॉगसोबत जोडते आहे. या फोटोवरून काकाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख तर होईलचं तसंच त्याची शारिरीक अवस्थाही तुम्हाला दिसेल.
अखेरीस काकाची तब्ब्येत आणखीन खालावत गेली.. एक दोन वेळा पॅरेलिसीसचे झटके येऊन गेले, नंतर हार्टअटॅकही येऊन गेला .. पण देवकृपेने तो या सगळ्यातूनही बरा होऊन घरी परतला. डॉक्टर दरवेळी कल्पना देत की शरीराचे आतील अवयव, त्यांचेही स्नायू हळूहळू बलहीन होत जातील आणि प्रत्यक्षात ते तसं घडताना आम्ही सारी कुटुंबीय बघतच होतो. या आजारावर काहीही इलाज नसल्याने आमच्या सर्वांजवळ केवळ देवाकडे प्रार्थना करण्यावाचून काहीच नव्हतं.. तसंच सणावाराला किंवा एरवीही जेव्हा भेटावसं वाटेल तेव्हा माझे आईबाबा आणि आम्ही आवर्जून काकाकडे जात असू..
असं जीवन फुललं, बहरलं आणि नंतर क्षणात आमच्या हातून तो केव्हा निसटून गेला कायमचा ते कोणालाही कळलं नाही.. एके दिवशी ईश्वराचं बोलावणं आलं तेव्हाही तो घरात एकटा असतानाच..
या सगळ्यात खरी परीक्षा दिली ती माझ्या काकूने.. तिचा संघर्ष आज एवढी वर्ष आम्ही डोळ्याने पहात आहोत. ती एकट्याने झगडते आहे.. परिस्थितीशी दोन हात निर्धाराने करते आहे.. आम्ही सगळेच तिच्या सोबत आहोतच कायमच राहू यात शंका नाही.. पण प्रत्यक्ष ज्याच्यावर वेळ आलेली असते ती व्यक्ती खरी त्या जीवनाची योद्धा असते, आपण केवळ तिचे सहाय्यक ..
आजही काकाच्या पश्चात माझी काकू लोकरीच्या वस्तू, क्रोशाच्या वस्तू ऑर्डरनुसार बनवून देण्याचं काम करते, कधी कुणाला ऑर्डरनुसार विविध टेस्टी खाद्यपदार्थ बनवून देते. आज काका काकूचा मुलगा, गौरव हाताशी आलेला असल्याने तो देखील स्वतः मोठ्या अपघातातून सुखरूप बचावून, प्राणावर आलं बोटावर निभावलं या म्हणीची प्रचिती घेऊन आयुष्याशी लढतो आहे..
कधीकधी दुसऱ्याचं दुःख केवळ पहाण्यावाचून आपण काहीच करू शकत नाही. नियतीचे क्रूर खेळ माणसाला सहजी कळत नाहीत हेच खरं.. पण तरीही आईबाबांनी काकाकाकूची साथ कधीही सोडली नाही आणि आज हा ब्लॉग लिहून, काकाची कहाणी आपल्यापुढे मांडून मीही बाबांचा आणि आईचा वसा पुढे चालवत आहे.. कारण, माझ्याकडे काकापर्यंत पोहोचण्यासाठी या शब्दफुलांच्या ओंजळीचीच श्रद्धांजली ही सर्वात अनमोल भेट असेल याची मला खात्री आहे..
चंदा काका ... तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .. तू नसलास तरीही तुझ्या स्मृती कायम आमच्या जवळ आहेत..
तुझीच
मोना