सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

FLOAT


एक छोटासा मुलगा, त्याचे वडील त्याला हाताला धरून चाल चाल पाव पाव करत चालायला शिकवत आहेत. मुलाची चार दोन पावलं पडताना वडीलांचा चेहरा कौतुकाने खुलून आला आहे. इतक्यात एक छोटसं गवताचं नाजूकसं फूल त्यांना दिसतं. पोरगं ते हातात पकडतं आणि वडील त्याला अलवार फुंकर मारतात. फुल कापसासारखं हवेत उडून जातं.. आणि त्या फुलासारखंच ते छोटंस मूलही हवेच्या झोतावर आकाशात तरंगायला लागतं... एवढा वेळ कौतुकाने आपल्या पोराचं चालणं बघत बसणाऱ्या बापाच्या डोळ्यात एकाच वेळी क्षणार्धात आश्चर्य आणि धक्का दोन्हीही दिसतं..



आपल्या पोराला उडता येतं ? हा धक्का पचवणं बापासाठी खूप अवघड. 
आता हा गौप्यस्फोट लोकांसमोर होऊ नये यासाठी बाप धडपड करायला लागतो. पोराला एका बंद, अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवतो.. तर तिथेही पोरगं हवेवर तरंगायला लागतं. हे असं किती दिवस त्याला कोंडून ठेवणार .. म्हणून मग त्याला शाळेत पाठवतो. शाळेत पाठवताना त्याला जॅकेट घालून लपवण्याचा प्रयत्न करतो, त्याने हवेत उडायला लागू नये म्हणून त्याच्या पाठीवरल्या बॅगेत वजन म्हणून दगडं भरतो.. पण छे .. कशानेच काहीच फरक पडत नाही. हवा आली की पोरगं उडायला लागतं. 
एकदा तर गंमतच होते, शाळेतून घरी येताना मध्येच बाग लागते आणि पोरगं वडिलांचा हात सोडून अक्षरशः त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून चक्क कंपांऊंड वॉलवरून उडत उडत बागेत जाऊन पोचतं. लोकांना हे दिसू नये म्हणून वडील त्याचा पाठलाग करतात आणि उडणाऱ्या आपल्या पोराला जबरदस्तीने जमिनीवर आणतात, त्याला पकडून ठेवतात.. अखेरीस अपराधीपणे विचारतात ... "व्हाय यू जस्ट कान्ट बी नॉर्मल ?"



हा सगळा प्रकार पाहून बागेतली मुलं आणि त्यांचे आईवडील डोळे विस्फारतात... आणि मग क्षण दोन क्षणाची शांतता ...
अखेरीस वडील स्वतःच झोक्यावर बसतात आणि उडणाऱ्या मुलाला मांडीवर घेऊन झोका खेळता खेळता एका क्षणी त्याला हवेत तरंगायला मोकळं सोडून देतात. पोराला जाणवावं की तो वेगळा असला तरीही या जगात एकटा नाही, तर त्याचा बाप त्याच्या सोबत आहे म्हणून स्वतः वडील झोक्यावर झुलत मुलाबरोबर हवेत तरंगण्याचा आनंद घ्यायला लागतात...सगळं जग विसरून जेव्हा ते आपल्या वेगळेपणाचा आनंद घेतात तेव्हा बागेतली लोकं स्तब्धपणे पहात रहातात आणि हे बापलेक आता आपल्या एका निराळ्याच आनंदी जगात प्रवेश करून जगण्याचे क्षण सोबत साजरे करत असतात. 


डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही शॉर्टफिल्म पाहिली आणि फिल्मच्या शेवटी दिग्दर्शकाने दिलेल्या मेसेजने माझं मन हळवं झालं. स्क्रीनवर मेसेज येतो .. 

For Alex
Thank you for making me a better dad
Dedicated with love and understanding to all families with children deemed different 

( प्रिय अॅलेक्स,
मला एक चांगला पिता बनवल्याबद्दल तुझे आभार.
ही फिल्म प्रेम आणि समंजसपणाने त्या सर्व कुटुंबांना अर्पण, ज्यांच्या घरात निराळी मुलं वाढत आहेत.)

या फिल्मबद्दल गुगलसर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती वाचून आणखीनच हळवं व्हायला झालं. कारण ही फिल्म बनवणारा आणि लिहीणारा बॉबी रूबिओ याची ही सत्यकथा आहे. त्याचा मुलगा अॅलेक्स स्वतः ऑटीस्टीक आहे, आणि त्यावरूनच बॉबीला ही फिल्म लिहिण्याची प्रेरणा मिळाली. 
पिक्सारच्या स्पार्कशॉर्ट्स प्रोग्राम अंतर्गत ही फिल्म रिलीझ करण्यात आली, याचं कारण पिक्सारने अशा सर्व कथा, ज्या लोकांना सांगायच्या आहेत आणि ज्यात निराळा संदेश आहे त्यांना स्पार्कशॉर्ट्स असे नाव देऊन त्या या उपक्रमांत समाविष्ट केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे, या उपक्रमात वर्षभरातून एखाददोनच फिल्म्स समाविष्ट केल्या जातील, ज्या लो बजेट फिल्म असल्या तरीसुद्धा त्या फिल्म्स मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने सामाजिक बदल घडवू शकतील एवढा परिणाम साध्य करतील. 

फ्लोट .. नावातंच सगळं काही सांगितलंय .. पण आपल्याला त्या अर्थापर्यंत पोचण्यासाठी फिल्म पहावी लागते. अगदी तसंच जसं आपल्याच घरातल्या निराळ्या क्षमता असलेल्या मुलांच्या मनाचा तळ गाठण्यासाठी आधी सारं जग आपण ढवळून काढतो आणि मग सरतेशेवटी आपल्याला कळतं की त्यापेक्षा आपलं मूल आपल्याला प्यारं .. मग ते कसं का असेना ..

फिल्ममध्ये जेव्हा तो बाप चिडून त्या मुलाला म्हणतो, "व्हाय यू जस्ट कान्ट बी नॉर्मल .. ?" तेव्हा त्या बापाची हतबलता, चिडचिड आणि समाजाच्या चौकटीत न बसणाऱ्या असल्या एका निराळ्या क्षमता असलेल्या मुलाचा बाप होण्यातलं आपलं दुर्दैव, त्या बापाची अगतिकता सारं सारं एका क्षणात आपल्यापर्यंत पोचतं.. आणि अखेर जेव्हा बापाला लक्षात येतं, की त्याला, ज्याच्यात निराळ्या क्षमता देवानं दिल्या आहेत त्याला बदलणं तर शक्य नाही, पण आपण त्याच्यासाठी शक्य तितकं बदलून दोघांचंही आयुष्य फुलवू शकतो मग जग काही का म्हणेना .. हे जेव्हा त्याला उमगतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदी भाव.. साऱ्या जगापेक्षा निराळंच त्या दोघांचं जग.. जिथे स्वीकार आहे, प्रेम आहे आणि दुसऱ्याच्या अक्षमता किंवा निराळ्या क्षमतांचा आदर आहे .. ते जग किती सुंदर दिसतं.. प्रेक्षक म्हणून आपण त्या जगात केव्हाच जाऊन पोचतो.

या फिल्मची प्रोड्युसर क्रिसी कबाबा एका मुलाखतीत म्हणते, जो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करून त्यांचं व्यक्ती म्हणून असणं साजरं करायला शिकवणारी ही फिल्म आहे..
खरंच आहे, आपल्याकडे माणसं जशी आहेत तशी आपण त्यांना स्वीकारत नाही, तर प्रत्येक माणसाला आपण सिस्टीमप्रमाणे, समाजाच्या नियमांमध्ये, चौकटींमध्ये बसवण्यासाठी बदलण्याचा वृथा अट्टहास करतो. पर्यायाने आपल्या पदरी बरेचदा माणसांबद्दल निराशाच पदरी येते. याचं कारणंच हे आहे, की माणसांचं व्यक्ती म्हणून असणं आपल्याला कळत नाही, त्यांची सुखदुःख, त्यांच्या क्षमता नि त्यांच्या मर्यादा या कशाशीच आपल्याला काहीच करायचं नसतं, आपल्याला फक्त सिस्टीममध्ये बसणारी माणसं हवी असतात आणि त्यासाठी आवश्यक त्या चौकटीतल्या क्षमता नि मर्यादा त्यांच्याकडे असल्याच पाहिजेत असा आपला अट्टहास असतो. मग, जेव्हा निराळी बालकं जन्माला येतात तेव्हा आपण त्यांना पचवू शकत नाही... आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही. त्यांच्यातलं वैगुण्यच आपण पहात रहातो, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीव नकोसा होईपर्यंत आपण कावळ्यासारखे त्यांना चोची मारत रहातो.. कधी शब्दांनी ... कधी कृतीतून .. आपला अस्वीकार दर्शवत रहातो.. पण त्यांना बदलण्यापेक्षा आपण स्वतःला बदललं तर हा विचारही आपल्याला नकोसा असतो. 

याबाबतीत करोनाकाळात विदर्भात झालेली एक सत्यघटना आठवते. एका गावात डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीने कुटुंबासह आत्महत्या केल्याची बातमी एके दिवशी पेपरात वाचली, कारण वाचलं तेव्हा जीव कळवळला. त्यांच्या मोठ्या मुलाला एका कानाने ऐकू येत नव्हतं, तर गावातले लोक त्याला खूप त्रास देत.. त्या आपल्या मुलाचा असा छळ सहन होत नाही म्हणून डॉक्टरांनी अखेरीस कुटुंबासमवेत मृत्यू स्वीकारला... अरेरे ही बातमी आजही डोळ्यांपुढे दिसते. त्या कुटुंबाचा फोटो डोळ्यांपुढे अस्पष्टसा दिसतो. ज्या गावाला वैद्यकीय सेवा पुरवली तिथली माणसं त्याच डॉक्टरांच्या दिव्यांग मुलाशी असे क्रूरपणे कसे काय वागत होते... प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

माणसांना आपल्यापेक्षा निराळं काहीतरी दिसलं की त्याची टर उडवण्याची, त्याला त्रास देण्याची एक क्रूर बुद्धी आपोआपच होत असावी बहुधा, ज्यांच्यात सत्व गुण आहे ते तरी किमान अशा प्रकारे दुसऱ्यांना छळायला जात नाहीत. बाकी सगळा आनंदच असतो. 
म्हणूनच, फ्लोट सारखी फिल्म पहाताना एका वेगळ्या सुंदर पद्धतीने या वेगळेपणाला मांडलं गेल्याबद्दल फार फार कौतुक वाटलं. वेगळ्या क्षमता असलेलं मूल हे त्याच्या क्षमतांसह स्वीकारलं तर किती सुंदर असू शकतं हा विचार या फिल्मने दिला..
विशेषतः ऑटीस्टीक मुलं जी आपल्याच दुनियेत आपल्याच विचारांवर अहोरात्र तरंगत असतात .. त्यांच्यासाठी फ्लोट हे नाव किती सार्थ आहे या फिल्मचं असं मनोमनी प्रकर्षाने जाणवलं.

मला खात्री आहे, तुम्हालाही ही स्पार्कशॉर्ट फिल्म नक्कीच आवडेल.. जरूर पहा..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 


Translate

Featured Post

अमलताश