मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

व्यसनांच्या विळख्यातून सुटायचंय ? मग मी घेतलेल्या या मुलाखती एकदा गंभीरपणे ऐकाच !

व्यसनं ही समाजाला लागलेली कीड आहे असं मला वाटतं. व्यसनं करणाऱ्यांचं वाढत प्रमाण आणि व्यसनांनी केव्हाच ओलांडलेल्या सामाजिक मर्यादा ही खरंतर आपल्या सर्वांसाठी प्रचंड काळजीची बाब आहे, मात्र आपण आधुनिकतेच्या नावाखाली व्यसनांचं समर्थन करू लागलो आहोत जे अतिशय चुकीचं आहे. व्यसनी माणूस किंवा बाई किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती स्वतःच्या व्यसनांच्या विळख्यात स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचीही वाताहत लावत असते. परंतु आपण कुटुंबिय बरेचदा फार वेळ दवडतो आणि व्यसनी व्यक्तीला इलाज घेण्याच्या टप्प्यापर्यंत आणता आणता फार उशीर करतो. या सगळ्यात आपल्याला जो मनस्ताप होतो आणि आपली जे बेअब्रू होते ते सगळं परत कमावणं अनेकांना जमतही नाही. अनेक आयुष्य निष्पाप असूनही उध्वस्त होतात, कारण त्यांच्या घराला ही व्यसनांची कीड लागलेली असते. 
व्यसनांच्या विळख्यातून या समाजाला सोडवणे ही पत्रकार म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला माझीच जबाबदारी वाटते. जेव्हापासून या समस्येचे गांभीर्य जाणवले तेव्हापासून तर या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मी खारीचा वाटा उचलू पाहिला आहे. 
माझ्या मनात या प्रश्नाचे जे जे कंगोरे मला दिसले, जाणवले, त्या विषयी मी अंतःप्रेरणेने आणि मला शक्य होईल तसंतसं काम करायला लागले. 
महाराष्ट्र पत्रकार संघाच्या व्यासपीठावर जेव्हा मला गेल्या वर्षी काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मी मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांना आमंत्रित करून सोशल ड्रिंकींग या विषयावर त्यांची मुलाखत घेतली. तसंच काही दिवसांपूर्वी ब्राह्मण उद्योगब्रह्म ग्रुपच्या व्यासपीठावरून तरूणांमधील व्यसनाधीनता या विषयावर निर्धार व्यसनमुक्ती केंद्राचे निवासी संचालक तुषार नातू यांची मुलाखत घेतली.
मित्रांनो,
हा ब्लॉग वाचणारे तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांचे अधीन असाल, मग प्रमाण कितीही असो, कमी जास्त खूप जास्त .. तरीही या दोन्हीही मुलाखती आवर्जून संपूर्ण ऐका आणि तुमचं व्यसन आजच सोडा. त्यासाठी काही मदत लागली तर मला जरूर संपर्क करा, मी आपल्याला योग्य त्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवून देईन. पण मित्रांनो, काहीही झालं तरीही व्यसनं करू नका. व्यसनांनी जीवनाची जी राखरांगोळी होते ती खरंतर अपयशानेसुद्धा होत नाही. एकवेळ अपयशी माणसाला चांगले मित्र किंवा समाजातील चांगले लोक आपलसं करतीलही परंतु, व्यसनी असलात तर तुम्ही स्वतःच स्वतःच्या हाताने जीवन उद्ध्वस्त करत आहात आणि तुमच्या कुटुंबाचंही जीवन तुम्ही सतत धोक्यात आणत आहात हे लक्षात घ्या आणि आजपासूनच स्वतःला बदलायला सुरुवात करा.
व्यसनांपासून स्वतःला सोडवा आणि तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं जीवन पुन्हा फुलवा...
- मोहिनी घारपुरे - देशमुख 


(तुम्ही जर ही पोस्ट वाचून आणि या मुलाखती ऐकून स्वतःला बदललंत, किंवा तुम्हाला जर व्यसनांपासून मुक्ती हवी असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा)


श्री.तुषार नातू सरांची मी घेतलेली मुलाखत ... जरूर पहा


आदरणीय मुक्ता पुणतांबेकर यांची मी घेतलेली मुलाखत जरूर पहा.


 

Translate

Featured Post

अमलताश