बऱ्याच दिवसांनी सविस्तर अशी पोस्ट लिहावीशी वाटली, निमित्त झालं ते कोरा कागझ चित्रपटाचं !
पूर्वी कधीतरी हा चित्रपट पाहिला होता पण यातलं ते गाणं ऐकलं की तेव्हापासून नको बाई असले रडके पिक्चर असं मनात वाटून जायचं.
जीवनकथा सांगणारे चित्रपट मला स्वतःला फार आवडतात. त्यामुळे पुन्हा एकदा अशा रडक्या चित्रपटांच्या नादी लागायचं काम कितीही वेळा नाही ठरवूनही मी करत असतेच, कहर म्हणजे पूर्वी असे चित्रपट पहाताना अक्षरशः घळाघळा रडायला यायचं मला, आता जरा निवलंय ते प्रकरण .. (हुश्श .. वाचले )
तर ... कोरा कागझ
एक छान सुरस कथा. साधी सोपी गोष्ट, चारचौघांच्या घरात सहज घडेल अशी मांडणी, पण आशय किती खोल.
श्रीमंत घरची मुलगी एका सामान्य परिस्थिती असलेल्या पण बुद्धिमान, देखण्या आणि कष्टाळू मुलाच्या प्रेमात पडते. लग्न करून संसार थाटते. मुलीच्या आईची सतत हिच्या संसारात लुडबुड. तिच्या सुमार परिस्थितीवरून सतत टोमणे आणि तीचा संसार चालवायला आपण स्वतःच पुढाकार घेण्याचा कहर वेडेपणा करणारी ती माऊली. तिच्या त्या मूर्खपणात इकडे लेकीचं आणि जावयाचं बिनसतं. नवरा रागीट आणि बायको सगळ्यांचं मन जपायला जाणारी... पण तरीही झुकतं माप आईकडे... अखेर मुलाच्या आत्मसन्मालाला अनेक प्रसंगांतून ठेच लागत जाते आणि एक दिवशी संसार मोडतो. जावई लेकीला माहेरी पाठवून देतो ते कायमचंच...
इतके दिवस संसार सावरून घेत काहीसे गप्प झालेले लेकीचे वडील अखेर एक दिवशी आपला संताप, दुःख व्यक्त करतात. लेकीच्या आईला तिच्यामुळेच लेकीचा संसार उध्वस्त झाला ही जाणीव करून देतात आणि लेकीलाही तिच्या चुकीची जाणीव करून देत चांगलीच कानउघडणी करतात, पण ... तोवर वेळ निघून गेलेली असते.
इकडे तो ... मनाने उध्वस्त झालेला...शहर सोडून, नोकरी सोडून कायमचं कुठेतरी निघून जातो.
मध्ये बराच काळ लोटतो. आता ती एकाकी पडलेली आणि तोही दुसऱ्याच कोणत्यातरी शहरात तिच्याचसारखा एकाकी पडलेला...
रोज संध्याकाळच्या विशिष्ट वेळेला ती वाट बघते, तो परतून येण्याची ... पण तो कधीच येत नाही
कोऱ्या कागदासारखं आयुष्य .. कोरंच रहात
अखेरीस,
एका क्षणी दोघे चुकून भेटतात ... कैक वर्षांनी ... आणि मधल्या काळाचं अंतर मिटतं. क्षणाच्या रागाने, थोड्याशा गैरसमजांनी तुटलेलं नातं पुन्हा जुळतं ते दैवी कृपेनेच असंच म्हणायला हवं...
पण
प्रत्यक्ष आयुष्यात असं फार फार क्वचितच घडत असावं.
एकदा गैरसमज झाले की माणसं ते दूर करण्याची संधीच देत नाहीत कोणालाच आणि रागाच्या भरात केलेली एक चूकही माणसाचं जीवन उध्वस्त करून जाते ते कदाचित कायमचंच !
हेच शिकवणारा हा चित्रपट
जया बच्चन, विजयानंद, सुलोचना, ए.के.हंगल ... सगळ्यांचीच कामं अप्रतिम झालेली आहेत. गाणी तर एक से एकच ...
पण आपण कलाकृतीचा आनंद घेताना मनोरंजन तर करून घ्यावंच पण अशा चित्रपटातून जगण्याप्रती दिलेली शिकवणूकही आत्मसात करत करत पुढे जावं असं मला वाटतं.
वाईट घटना घडल्या की नेहमी चित्रपटांना दोष दिला जातो, कदाचित काही लोकांच्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या डोक्यावर, मनावर चटकन ते तसे चित्रपट बिंबतही असतील, ना नाहीच... पण याच न्यायाने, जेव्हा असे चांगले, दर्जेदार चित्रपट पडद्यावर येतात तेव्हा त्यांचाही परिणाम माणसांवर खरंतर व्हायला पाहिजे. चित्रपट हे जीवनाचंच प्रतिबिंब आहे, त्यामुळे कोणताही चित्रपट बघताना त्यातला आशय आणि जीवनामृत रसरसून प्यायला पाहिजे असं मला आवर्जून सांगावसं वाटतं.
धन्यवाद
- मोहिनी घारपुरे - देशमुख
तुमचं आयुष्य नि माझं आयुष्य समांतर रेषांसारखं सुरू आहे. जे तिथे घडतं तेच थोड्याफार फरकानी इथे घडतं. जे इथे घडतं तेच थोड्याफार फरकानी तिथेही घडतं. तरीही आपण पोहोचतो निरनिराळ्या दिशांना, निरनिराळ्या ठिकाणांना .. याच प्रवासाच्या गंमतीजमती, अडीअडचणी वाचा माझ्या या ब्लॉगवर .. जिथे कधी तुम्ही सांगा मी ऐकेन, कधी मी सांगेन तुम्ही ऐका.. मोकळे व्हा, मनसोक्त जगा .. मग जाणवेल .. वेगळं वेगळं असलं तरीही, तुमचं आमचं सेम असतं !
मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२
कोरा कागझ
लेबल:
मला भावलेला चित्रपट
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)