मग यात नेमकं आहे तरी काय असा प्रश्न अर्थातच तुम्हाला पडला असेल. तर ... सांगते, सगळं सांगते... पण अट एकच विषय गंभीर आहे, खोल आहे त्यामुळे वरवर वाचून सोडून द्यायचा नाही आणि दुसरं म्हणजे लिहिणारीबद्दल मनात कोणतेही गैरसमज बाळगायचे नाहीत. ही अट मान्य असेल तरच पुढे वाचायला लागा ... मी तर म्हणेन ... एकदा वाचाच आणि ही वेबसिरीज पहाच म्हणजे डोळे उघडतील आणि न बोलण्याच्या विषयाबद्दल तुम्ही मोकळे व्हाल. मोकळं होणं म्हणजे अश्लील, उथळ होणं नव्हे बरं का, तर, मनापासून व्यक्त होणं, मग भले माध्यम कोणतंही असो...
तर, ही वेबसिरीज अशीच... मोकळीचाकळी ... खुल्लम्खुल्ला ...
तरीही यात आपल्याला अश्लीलता सापडत नाही. काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवयलंय असं कुठेही अजिबात वाटत नाही. आपण नग्न शरीरं आणि त्यांचे लैंगिक व्यवहार जरी स्क्रीनवर पहात असलो तरीही त्यात आपण अडकत नाही तर त्याच्याही पुढे जाऊन त्या त्या नात्यातली सुंदर भावनिक गुंतागुंत आपल्याला दिसू लागते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी जोडपी दिसतात तसंच त्याउलट अगदी चटकन् एकमेकांकडे तशा दृष्टीने आकर्षित होऊन एकमेकांबरोबर एका रात्रीपुरता लैंगिक व्यवहार करणारीही जोडपी दिसतात. आपण हे सगळं पहातो, तरीही यापलिकडली गोष्ट आपल्याला जास्त जास्त गुंतवून ठेवण्यात यशस्वी होते.
तर कथानक थोडक्यात असं-
एक बिली नावाची स्त्री, हुशार, अभ्यासू, एक्स्पेरिमेंटल आणि स्वतःच्या भावनांशी अत्यंत प्रामाणिक.
तिचा नवरा कूपर ... जो ्अत्यंत टिपिकल नवरा आहे. ज्याने कधीच चाकोरीबाहेरचं काहीच जणू केलेलं नाही. शांत, सुस्वभावी, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा, आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा आणि उत्तम करिअर करणारा ग्रेट नवरा.
या जोडप्याला दोन मुलं होतात आणि दुसऱ्या मुलाच्या जन्मापासून खरी कथा सुरू होते. कारण, बिलीला नवऱ्याकडून जशा प्रकारच्या शरीरसंबंधांची अपेक्षा असते तसलं एक्सायटींग असं त्यांचं सेक्स लाईफ नसतं, आणि बिलीला राहून राहून त्याचा मनापासून त्रास होत असतो. कूपर परफेक्ट नवरा असतो, आणि कदाचित एखाद्या सामान्य स्त्री साठी परफेक्ट सेक्स पार्टनरही असू शकतो, पण बिली तशी नसते ना...
बिलीच्या पूर्वायुष्यात ब्रॅड नावाचा तिचा बॉयफ्रेंड ... ज्याने तिला हवा तसा लैंगिक आनंद दिलेला असतो, त्या ब्रॅडची आठवण आता बिलीला दिवसेंदिवस अनावर व्हायला लागते. करिअर संसार यात गुरफटलेला कूपर खूप चांगला माणूस असला तरीही तिला ब्रॅडने दिलेल्या लैंगिक सुखाची सतत आठवण येत असते. म्हणून मग बिली एक दिवशी तिच्या लॅपटॉपमध्ये तिच्या मनातली ही घुसमट लिहीते... आणि तिथून कथानकाला वेगळीच कलाटणी मिळते.
ती काय कशी आणि पुढे कसं कथानक वळतं हे सगळं सविस्तर लिहीण्यापेक्षा तुम्ही ही वेबसिरीज दोन्ही सिझन जरूर पहावे असं मला वाटतं.
सगळ्यात महत्त्वाचं मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की आपल्याकडेच काय तर एकंदरीतच लग्न ठरवताना मुलात आणि मुलीत ते इन्स्टिंक्ट आहे की नाही याचा विचार करण्याचा अवधीच दिला जात नाही. आजच्या काळातही त्यासाठी मुलामुलींना एकमेकांबरोबर वेळ घालवावा याकरिता परवानगी मिळवावी लागते. पण ज्या कारणासाठी विवाह करायचा, त्याचा पायाच अनेक जोडप्यांमध्ये कुटुंबाच्या दबावामुळे मिसिंग रहातो आणि तो पुढे जन्मभर मिसिंग रहातो, याबद्दल कोणालाच फार विशेष लक्ष घालून ही व्यवस्था बदलावीशी वाटलेली नाही हे खरंतर मला विशेष वाटतं.
बिली एक स्वतंत्र स्त्री असते. तिच्या आवडीचा पुरूष जोवर तिला मिळत नाही तोवर ती ज्या ज्या प्रकारे आपलं आयुष्य पुढे नेत रहाते, भावनिक गुंतागुंत न करता, ते पहाणं फार सुखद अनुभव आहे. आपल्याकडे अशा स्त्रीला कधीच बाहेरख्याली, उथळ आणि अशी अन्य नाही नाही ती विशेषणं देऊन समाजाने चोची मारून मारून बेजार केलं असतं. ही बिली मात्र खरंच तशी नाही. ती विचारी स्त्री आहे आणि स्वतःचं आयुष्य स्वतःचे निर्णय घेऊन चुका करत करत शिकत ती पुढे जातेय.
एकीकडे ब्रॅडसारखा उथळ, तिच्यावर प्रेम असूनही जबाबदारी टाळणारा पुरूष आणि दुसरीकडे कूपरसारखा अतिशय जबाबदार प्रेमळ नवरा अशी दोन टोकं थेट समोर असताना कोणीही स्त्री साहजिकपणे कूपरसारखाच जोडीदार निवडेल. पण बिली मात्र तशी नाही. तिला समाजाची भीती नाही, तसंच तिला स्वतःच्या जगण्याचं खरं मोल कळतं. जीवन हे सुरक्षित चौकटीत नाही तर जीवन हे रसरसून जगण्यात आहे हे या बिलीला नीट उमगलं आहे. म्हणूनच तर तिची घालमेल होते. एका चौकटीत बंद राहून जगण्याचा प्रयत्न करूनही ती त्यात अयशस्वी होते. किंबहुना कूपरलाच त्याचा जीवन जगताना स्वतःहून घेतलेला खोटा बुरखा, नकली मुखवटा एका क्षणी असह्य होतो. कोणी म्हणेल, बिलीच्या नादी लागून कूपरही वाया गेला... क्षणभर आपल्याला तसंही वाटून जातं. पण नाही, कूपरही खरंतर रसरसून आयुष्य जगायला लागतो. आणि ब्रॅड ... त्याचा प्रवास विरूद्ध दिशेनी ... म्हणजे काय नात्यांमधल्या भावनिक व्यवहारात सपशेल धप्पी खात खात एक दिवस त्याचं त्याला जाणवतं की आपण किती चुकतोय. नात्यामध्ये प्रेम असणं आणि शरीरसंबंध ठेवत नाती जपणं यापलिकडे, जबाबदारीने ते नातं सांभाळण्यात किती गोडवा आहे हे त्याला उमगतं आणि तो बदलतो..
तर अशी ही सेक्स लाईफ ...
खरंय, दोन माणसं जवळ येऊन कुटुंब तयार करू शकतात. त्या कुटुंबाचा पाया प्रत्येक जोडप्याचा वेगवेगळा असतो. म्हणजे कोणा दोन व्यक्तींना प्रेम महत्त्वाचं वाटेल, कोणा दोघांना सुरक्षितता महत्त्वाची वाटेल, कुणा दोघांना आर्थिक आधार महत्त्वाचा वाटेल ... पण जर लग्न करून कुटुंब तयार होत असेल तर त्याचा पाया शरीरसुख असला पाहिजे. कारण, ज्या नात्यात हे सुख मिळत नाही अशी लग्न मग हलकेच काळाच्या ओघात करपून जातात. अशा कुटुंबात फक्त तक्रारीचा सूर उरतो आणि कालांतराने अशी जोडपी एकमेकांपासून दूरावतात. एकाच नावेत बसून अशी अस्वस्थ रहात जीवन कंठणारी अनेक जोडपी मी पाहिली आहेत.
लैंगिक सुख मिळवण्यासाठी आपल्याकडे केवळ विवाह हीच सर्वमान्य रीत आहे. त्यामुळे मी इथे विवाहसंस्थेविषयी लिहीलं आहे. परदेशात मात्र तसं नाही. तिथली जोडपी आपल्या लैंगिक सुखासाठी अनेक पर्याय वापरतात. तेसुद्धा या वेबसिरीजमध्ये अतिशय खूबीने कथानकाच्या निरनिराळ्या आयामांमधून दाखवलेलं आहे. आपल्याकडे असं वर्तन कोणी केलं तर समाज अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडेल, त्यांना वाळीत टाकेल, जगणं असह्य करेल.
दोन व्यक्तींच्या खाजगी सुखात खरंतर समाजाचा काय आणि कसा संबंध येतो हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. पूर्वी तरी अनौरस संततीच्या दृष्टीने समाजाचा वचक अशा नात्यांवर असणं एकवेळ मान्य होतं, पण आताच्या काळात जिथे संतती नियमनाची साधनं सुरक्षितरित्या वापरू शकत असताना खरोखरच सेक्स लाईफबद्दल थोडंसं मोकळं वातावरण निर्माण व्हायला काय हरकत आहे. पण अर्थातच यात अनेक धोके आहेत. अनेक मुली मुलं फसवली जाऊ शकतात त्यामुळे काळजी घेणं हेच बेहतर ...
पण, समजा असेल एखादी स्त्री बिलीसारखी रसरसून जगणारी ... तर ?
स्वतःवर प्रेम करणारी, स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक असणारी ?
तिलाही हा समाज विकृतपणेच बघेल का... आजच्या काळातही ?
कुणास ठाऊक !!!
या लेखानंतर तरी अशी एखादी बिली तुम्हाला भेटली तर तिच्यातला आणि एखाद्या उथळ बाईतला हा फरक निदान तुम्ही तरी ओळखू शकाल हीच आशा आहे...
- मोहिनी घारपुरे - देशमुख