बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

Table number 21 #moviereview


नावावरूनच काहीतरी वेगळं वाटलं म्हणून हा चित्रपट नुकताच पाहिला ( झी५, यूट्यूबवर आहे) आणि सुरूवातीला काहीतरी पांचट, बोअरिंग वाटलेला हा चित्रपट शेवटी जो महत्वाचा संदेश देऊन जातो त्यामुळे हा चित्रपट एक ' जनहितार्थ ' मस्ट वॉच चित्रपट ठरतो म्हणून यावर ही पोस्ट लिहावीशी वाटली.
कॉलेजमध्ये गमतीच्या नावाखाली होणाऱ्या रॅगिंग प्रकारात आजवर किती कोवळ्या जीवांची आयुष्य बेचिराख झाली आहेत हा विषय घेऊन एका वेगळ्या पद्धतीने मांडणी करत हा चित्रपट बनवला गेला आहे.
सुरुवातीला आपल्याला मुख्य विषयाचा कोणताच संदर्भ लागत नाही त्यामुळे कथानक कळत नाही आणि इरिटेटींग वाटायला लागतं. पण चित्रपटाच्या शेवटी जेव्हा मुख्य कारण आणि मुख्य कथानक उलगडतं तेव्हा आपल्याला राग, दुःख, चीड, संताप आणि अगतिकता या साऱ्या भावना देऊन हा चित्रपट संपतो.
आज आपल्या देशात रॅगिंगमुळे किती तरूण तरूणी आत्महत्येस प्रवृत्त झाले, किती जण मानसिक रित्या कायमचे खचले, किती जणांची आयुष्य उध्वस्त झाली याची खरीखुरी आकडेवारी, बातम्यांची जुनी कात्रणं चित्रपटाच्या शेवटी दाखवली आहेत ती वाचताना अंगावर सर्रकन काटा आल्यावाचून रहात नाही.
खरंतर नुकतीच ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंगची घटना ताजी असताना आणि सोशल मीडियातुन त्यासंदर्भातील व्हिडिओ बघण्यात आल्याने हा चित्रपट पहाताना आणखीनच अंगावर आला.
विकृत पद्धतीने आपल्या समवयीन मुलामुलींचा असा छळ करणाऱ्या आणि त्याला ' गंमत ' ' मजा ' या गोड नावाखाली दडपणाऱ्या ज्या कोणाच्या घाणेरड्या डोक्यात ही कीड सर्वप्रथम आली असेल त्याला अक्षरशः शोधून जबर शिक्षा व्हायला हवी होती असा विचार कित्येकदा मनात आला, पण हद्द म्हणजे हे असले प्रकार थांबण्याऐवजी काळाच्या ओघात किती वाढत गेले आहेत हे लक्षात आल्याने आतातरी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन अशा ' उपद्रवी आणि उपद्व्यापी ' तरूण घोळक्यांच्या आणि विकृत डोक्याच्या तरूण तरूणींना वेळीच चांगलंच आवरलं गेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक लक्षं ठेऊन त्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे ही काळाची गरज आहे.
तर, एक वेगळा विषय मांडणारा हा चित्रपट नक्कीच एकदा पहावा आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा असे जाताजाता सांगावेसे वाटते.

- मोहिनी घारपुरे देशमुख

Translate

Featured Post

अमलताश