मला फार आवडला तो आणखी एक छोटा मुलगा .. जो चित्रपटभर भाव खाऊन जातो. एकाकी, अनाथ असलेल्या त्या छोटुकल्याचं जगात कुणीच नसतं पण तो किती निखळ, किती छान आणि किती धीटुकला असतो. एका प्रसंगी तो निराश तरूण त्या छोटुकल्याला भेटतो तेव्हा तो छोटा मुलगाही या निराश तरूणाची कळी खुलवण्यासाठी असं काही बोलतो, वागतो की त्याचं कॅरेक्टर पाहताना आपणही हरखून जातो.
निराश तरूण ( निश ) ला समजून घेणारी जानकी एकेकाळी स्वतः या परास्थितीतून गेलेली असल्याने तिचं त्याला समजून घेणं एकीकडे आणि दुसरीकडे यदुची त्याच तरूणाबद्दलची सर्वसामान्यतः जशी सगळयांचीच असतात तशी मतं.. ! ते यदुचं कॅरेक्टर म्हणजे आपला समाज .. जो मानसिक आजारांना 'नाटकं' समजतो. ज्यांना असं वाटतं की तोंड पाडून बसलेली व्यक्ती ही नाटकं करत असते कारण मग तिला कामं टाळता येतात नि फुकटचं, आयतं गिळायला मिळतं .. ! हीच समाजधारणा आजही आहेच ..
पण तरीही डॉ. आगाशेंचं कॅरेक्टर, इरावती हर्षेंचं कॅरेक्टर ही अशी माणसं भवती आहेत..
सुमित्रा ताईंनी एकूण एक प्रसंग, एकूण एक व्यक्तिरेखा किती विचारपूर्वक निवडल्या आहेत, रंगवल्या आहेत हे पूर्ण चित्रपट पहाताना हजारो वेळा मनात येऊन गेलं माझ्या..
तो मुख्य भुमिकेतला निश .. त्यानेही उत्तम काम केलंय.. ,
एकच वाटलं अशा प्रकारच्या विषयांवरचे चित्रपट हे आता फार 'प्रेडीक्टेबल' झालेले आहेत, अर्थात त्यात वेगळेपण कसं आणायचं हे ही सांगणं जरा अवघडच आहे !
असो .. सुमित्रा ताईंचं यानिमित्ताने वेळोवेळी स्मरण होतच राहील यात शंका नाही .. त्या ग्रेटच होत्या हेच खरं .. !
- मोहिनी घारपुरे-देशमुख