बुधवार, ३१ जुलै, २०२४

स्वरगंधर्व सुधीर फडके - चित्रपट रसग्रहण

गंधर्व म्हणजे शापीत देव. 

'स्वरगंधर्व' ही उपाधी लाभलेले आपले सगळ्यांचे लाडके बाबुजी अर्थात श्री.सुधीर फडके यांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला आणि जाणवलं खरोखरच, ते गंधर्वच होते. जीवनभर इतके भोग भोगूनही ज्यांच्या गळ्यातली सरस्वती तशीच कायम तिथे विराजमान राहिली आणि भोग सरताच पुन्हा बाबुजींच्या गळ्यातून प्रकटली, याला काय म्हणावे ?

सरस्वतीचा साक्षात वास ज्यांच्या गळ्याठायी होता त्या माणसाला जीवनात असे आणि इतके अपरिमीत भोग भोगावे लागले. का ...? 

कर्माचा सिद्धांत... दुसरं काय !

आपणा माणसांची तोकडी बुद्धी, तिला प्रश्न पडतात, पण अनेक प्रश्नांची उत्तरे तिला सापडलेलीच नाहीत. जेवढं मोठं यश मिळतं, त्या यशापूर्वी काही काही माणसांच्या वाट्याला इतके भोग येतात की आपली बुद्धी दैवाच्या या गणितापुढे हार मानते. 

बाबुजींचा चित्रपट बघताना क्षणाक्षणाला हे जाणवत होते.

कित्ती लहान वयापासून त्यांना असलेली संगीताची आवड. बड्या बड्या गायकांची गाणी ऐकण्यासाठी सांगलीतील घरानजीकच्या हॉटेलबाहेर ताठकळत उभं राहून आपली संगिताची भूक भागवणारे लहानगे बाबुजी. सामान्य लोकांना वाटे हा छोटा मुलगा काहीतरी फुकट खायला मिळेल म्हणून आशेने रोज हॉटेलबाहेर उभा रहातो. लोक नावं ठेवू लागतात आणि मग त्याला आत जाऊन बसायला सांगतात तेव्हा लहानगे बाबुजी उत्तरतात, 'मला संगीताची भूक आहे ती मी इथे उभं राहून हॉटेलमध्ये लावलेल्या बड्या दिग्गज गायकांच्या रेकॉर्ड्स ऐकून शमवतो...' लोकं या उत्तरावर अवाक् ! 

असा हा गंधर्व... पुढे आयुष्य किती खाचखळग्यांनी भरलेलं. 

बाबुजींचं आयुष्य बघताना मन द्रवलं, डोळे पाणावले.

कित्तीतरी प्रसंग पाहून पोटात तुटलं.

एकाकी अवस्थेत वणवण फिरताना कधी अक्षरशः लोकांपुढे दोन वेळच्या जेवणासाठी हात पसरायची वेळ आली त्यांच्यावर, कारण पाठीशी कुणी नाही. केवळ काही दोन चार निष्ठावान खरे मित्र, पण ते ही कितीसे पुरणार नै...

अशा परिस्थितीत जीवन संपवून टाकण्याचाही प्रयत्न त्यांनी करणं कदाचित स्वाभाविकच. 

पण म्हणतात ना, या जगात देव आहे. आपले गतजन्मीचे भोग सरले की तो आपल्याला भरभरून देतो आणि जे देतो ते पुन्हा परत कधीच कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. 

बाबुजींची आणि गदिमांची भेट हा एक सुंदर योगायोग ज्या दिवशी घडला तो खरा सोनियाचा दिनु. 

मग बाबुजींच्या प्रतिभेला आणि कलेला कोंदणात बसवणारा जोहरी म्हणजे गदिमा, आणि दोघांनी पुढे आपल्याला जे दिलं ते अद्वितीयच ठरलं. 

बाबुजींच्या प्रत्येक सुरातली आर्तता आणि व्याकूळता, भावविभोर होणं हे सगळं किती सच्चं आहे हे त्यांच्या संघर्षाकडे पहाताना आपल्याला जाणवतं. 

कला ही एकमेव अशी गोष्ट आहे जी माणसाच्या जीवनात जितका सच्चेपणा आहे त्यानुरूप त्याच्या वाट्याला येते, त्याच्या जीवनात प्रतिभेच्या रूपाने प्रसवते. हे भाग्य फार थोड्या लोकांच्या वाट्याला येतं याचं कारणंच त्यांचा स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा..

बाबुजी असे होते... प्रामाणिक... सच्चे

असे चित्रपट पहाताना आपण त्याची समीक्षा करायचे नसते असं मला वाटतं, तर या चित्रपटांनी सांगितलेली कथा ऐकायची असते, ती अनुभवायची असते. त्या कलाकाराचं जगणं आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्या जगण्यातून त्याने जे न बोलता दिलंय ते आपल्याला वेचता आलं पाहिजे. 

शेवटी जाता जाता, एक गोष्ट खूप जाणवली, की संपूर्ण चित्रपटात बाबुजींबरोबर लतादिदी एकदाही का दाखवल्या नाहीत याचं कारण माझ्या अल्पमतीला, किंवा अज्ञानापोटी कळलं नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. 

दुसरं म्हणजे, पात्र निवडताना जे कलाकार निवडले त्यांची निवडले ते त्यांच्या दिसण्याशी साम्य साधणारे नव्हे तर व्यक्तिमत्वाशी साम्य साधणारे असे कास्टींग डिरेक्टरने माध्यमांना सांगितले, पण तरीही असे वाटले, की जे कलाकार निवडले ते तितकासा न्याय त्या भूमिकांना देऊ शकले नाहीत.

त्याचबरोबर संहिता ही अधिक भावपूर्ण लिहीता आली असती. काही काही प्रसंग अधिक परिणामकारक रितीने दाखवता आले असते असे वाटले. पण ठीक आहे. काही ना काही कारण असेलच, जेणेकरून दिग्दर्शकाने तसे करण्याचे टाळले आहे. 

एकंदरीतच... चित्रपट सुंदर आहे. बाबुजींवरील प्रेमाखातर आपल्यासारख्या रसिकांनी तो अधिक मायेने पहाणं हे अपरिहार्यच होतं. 

सुनील बर्वेंनी बाबुजी उत्तम साकारले आहेत... तरीही बाबुजींचे स्मरण झाल्याखेरीज रहात नाही हे सुनील बर्वेंचे यश की अपयश म्हणावे ... सांगणे कठीण आहे !

- मोहिनी घारपुरे देशमुख 

Translate

Featured Post

अमलताश