हल्लीच्या काळात एक अशी तरल प्रेमकथा घेऊन एखादा चित्रपट समोर येतो आणि माझ्यासारख्या संवेदनशील मन असलेल्या प्रत्येकाच्याच थेट काळजाला हात घालतो. कितीही टीका झाली, कितीही नकारात्मक परिक्षणं छापून आली तरीही मला मात्र 'औरोमें कहाँ दम था ' हा चित्रपट आवडून गेला. विशेष म्हणजे या कथेची मांडणी, यातील गाण्यांचे शब्द, संवाद आणि कास्टींग इतकं सही झालेलं आहे की बघताना माणूस त्या कथेत हरवून गेल्याशिवाय रहात नाही.
तर कथा सुरू होते ती कृष्णा या पात्रापासून. तब्बल पंचवीस वर्ष जेलमध्ये असलेल्या कृष्णाची ही कथा.
अजय देवगण या कृष्णाच्या भूमिकेत आहे आणि अजय देवगणचा यंग एजमधला अपिअरन्स शंतनु माहेश्वरी नामक एका उमद्या अभिनेत्याने अगदी चोख साकारला आहे. त्याचं ते पडद्यावर निरागस वावरणं, स्वप्नाळू वृत्ती आणि आपल्या भावनांशी प्रामाणिक रहात आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काय वाट्टेल ते करून जाण्याचा एक वेडा, भोळसट स्वभाव ... सारं सारं काही या अभिनेत्याने एकदम परफेक्ट दाखवलंय.

कृष्णा त्याच्या ऐन तारूण्यात वसू नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. चाळीतच रहात असलेली वसू रोज येता जाता दिसत असते. हा वसूसाठी वेडा झालेला असतो. वसूही मग त्याच्या प्रेमात पडते. लग्न, संसार, करिअर, आयुष्य याच्या आणाभाका घेत हे स्वप्नाळू दिवस एकमेकांना डेट करण्यात सुखाचे चाललेले असतात. अशातच एक भयंकर वादळ या दोघांवर येतं. पक्या नावाचा मुलगा कृष्णावर खुन्नस काढण्यासाठी मित्रांच्या सहाय्याने एका रात्री वसूवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करायला लागतो. खरंतर वसू आणि कृष्णाच्या आयुष्यातली ती संध्याकाळ फार फार सुरेख ठरलेली असते. कृष्णाला दोन वर्षांसाठी कंपनीतर्फे जर्मनीला पाठवण्यात येणार असतं आणि हीच गुडन्यूज त्याने वसूला सांगून ती संध्याकाळ भविष्याचं सुंदर प्लॅनिंग करण्यात आणि आता दोन वर्ष भेटणार नाही या काहीशा खंतावल्या अवस्थेत एकमेकांसोबत घालवलेली असते. रात्री उशीरा कृष्णाबरोबर वसू चाळीच्या गल्लीपाशी येते आणि कोपऱ्यावर उतरून कोणी पाहू नये म्हणून पायी पायी झरझर घरी चाललेली असते, आणि तेव्हाच पक्या आणि त्याचे ते टपोरी मित्र वसूवर झडप घालून तिला चाळीलगतच्या एका गोदामात नेतात. गल्लीच्या टोकावर उभ्या असलेल्या कृष्णाला याची काहीच कल्पना नसते. तो निवांत तिथे उभा असतो. वसू घरी पोचल्याचा अंदाज घेतला की मग तो तिथून गाडीवर चाळीत शिरणार असतो, कोणाच्याही नकळत. पण हाय रे, तो दिवसच काहीसा दुर्दैवी असतो. कारण काही दिवसांपूर्वीच कृष्णाने पक्याला त्यांच्या गल्लीतल्या पारसी चाचाच्या बेकरीत चाचाला लूटमार करणाऱ्या तिघांच्या टोळीतला एक पक्या असल्याचे ओळखून नंतर त्या पक्याला चांगलंच थोबडवलेलं असतं. कृष्णाचा चांगुलपणा आणि पक्याचा नीचपणा... अखेर पक्या सूडबुद्धीने वागतोच आणि वसुला त्या रात्री गाठतोच.
पुढे काय होतं... कृष्णाला या सगळ्यात तुरूंगवास का भोगावा लागतो, आणि त्यातही पुढे वसूचं काय होतं... ती लग्न करते का, तिचा नवरा कोण असतो... या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पहायलाच हवा... किमान एकदा तरी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
मला आवडलं ते म्हणजे या कथेची गुंफण.
मधेच आजचा कृष्णा, मधेच भूतकाळातला कृष्णा... यांची छान साधलेली सरमिसळ. कथा छान फुलवत नेताना मधेमधे पेरलेली संवादसदृश गीतं... ही गीतं नुसतीच काहीतरी शब्दयोजना केलेली नाहीत तर ही गीतं कथानक आणखी सुंदर करतात, प्रेमात पडलेल्या आणि पुढे दुर्दैवाचे दशावतार पाहिलेल्या या प्रेमिकांची मनं, त्यातला शब्द न् शब्द, व्याकूळता सारं काही या गीतांमधून व्यक्त होतं. Sometimes it Never Ends ...या टॅगलाईनसह संपलेला हा चित्रपट मनात कित्तीतरी वेळ रेंगाळत रहातो. बॉलीवूडला नेहमीच हॅप्पी एन्डींगची सवय आहे, त्यामुळे असा वेगळ्या वळणावर थांबवलेला, संपवलेला की पॉझ दिलेला हा चित्रपट अनेकांच्या पचनी पडला नसावा असे मला वाटते.
तब्बूचं पूर्ण पात्र इतकं तरल दाखवलंय... तिची वेशभूषा, तिचे हावभाव सगळ्यातून तिची तरलता आणि एखाद्या कवितेसारखी गेयता असलेली सुंदर मुलगी इतकी विलोभनीय पद्धतीने दाखवलीये की आहा ... तरूण वयातली वसू सई मांजरेकरने साकारलीये. महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी सई वसूच्या भूमिकेत सुंदर दिसलीये. फक्त मला असं वाटलं की तब्बूच्या चेहऱ्याशी हीचा चेहरा साधर्म्य राखत नाही, त्यामुळे हे कॅरेक्टर जरा मनात प्रस्थापित व्हायला वेळ लागला. त्याऐवजी एखाद्या उभट चेहऱ्याची आताच्या काळातली अभिनेत्री या भूमिकेसाठी घेतली असती तर तब्बूच्या चेहऱ्याशी नंतर आपण प्रेक्षक जास्त कनेक्ट करू शकलो असतो असे वाटले.
पण अर्थात, सई मांजरेकरचा अभिनय उत्तमच आहे आणि ती दिसायलाही सुंदर आहे. या भूमिकेत ती नवतरूणी, सुंदर, स्वप्नाळू आणि पुन्हा मी म्हटलं तसं फार लिरीकल अशी लोभस दिसलीये. त्यामुळेच कदाचित तिची निवड झाली असणार यात शंका नाही. वसुची जी व्यक्तिरेखा दाखवलीये ना ती अशी काही सुंदर आहे की अगदी कोणीही त्या व्यक्तीरेखेच्या प्रेमातच पडेल आणि तसाच तो कृष्णा. तारूण्यातला अवखळ कृष्णा आणि नंतर परिस्थितीने दगडासारखा कठीण होत गेलेला कृष्णा हा या व्यक्तीरेखेचा मोठा परीघ अजय देवगण आणि त्या नव्या उमद्या शंतनु माहेश्वरी दोघांनीही इतका सुंदर दाखवलाय की पहायलाच हवा.
जाता जाता, वसूच्या नवऱ्याच्या भूमिकेतल्या जिमी शेरगीलचा आणि कृष्णाला कैदेत असताना भेटलेल्या एका भाईच्या भूमिकेत असलेल्या सयाजी शिंदेंचा उल्लेख तर करायलाच हवा. या दोघांनाही अचानक चित्रपटात पहाताना एकदम मस्त वाटलं आणि जिमी शेरगिलचा नवा आणखी मच्युअर अवतार पहाणं हे आताच्या काळात, म्हणजे ज्यांनी तारूण्यातल्या जिमी शेरगिलला पाहिलंय त्यांच्यासाठी फार मस्त अनुभव ठरेल यात शंका नाही.
माहिती नाही, या चित्रपटाला इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया का आल्या...
कदाचित प्रेमकथा कळण्यासाठी स्वतः सुद्धा कधीतरी एवढ्या तरल आणि पवित्र प्रेमाची अनुभूती घ्यायला लागते तेव्हाच अशा सुंदर प्रेमकथा मनापासून कळू शकतात...
नक्की पहा आणि मला कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
- मोहिनी घारपुरे देशमुख
![]() |
(Photo Credit - Bollywood Hungama) |