शनिवार, ४ जानेवारी, २०२५

सावित्री पावली !

संध्याकळची दिवेलागणीची वेळ.
आज सावित्रीबाई फुलेंची जयंती. दिवसभर ती त्यांच्याविषयी सोशल मीडियावर वाचत होती. संध्याकाळी तोंड हातपाय धुवून आरशासमोर उभी राहिली.
आज पहिल्यांदाच तिनं मोठ्या कौतुकाने कपाळावर सावित्रीबाईची चिरी लावली आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे आपल्या दारात तुळशीपुढे तिनं 'ज्ञानाची पणती' सुद्धा उजळली. ती मनोमनी खूश झाली.

इकडे रात्री नवरा आला, दर दोन चार दिवसांनी येतो तसा झिंगूनच घरी आला आणि पैशावरून कटकट करू लागला. नेहमीप्रमाणे कशावरून तरी हिची ' अक्कल ' निघाली. आज कशी कोण जाणे ती काही वेळ उगी राहिली. थोडावेळ याचा कांगावा तिनं शांतपणे ऐकला. तिला वाटलं, हा काय नशेत बोलतो, भांडतो तसा वागेल आणि थोड्या वेळाने गप्प बसेल. पण छे, ही जितकी गप्प तितका त्याचा आवाज चढायला लागला. दर दोन वाक्यात पुन्हा पुन्हा हिची अक्कल निघायला लागली. आता मात्र हद्द झाली. आज कुठूनतरी हिच्यात बळ आलं, ती उठली, चालू लागली . घराच्या कपाटातील आतील आणि उघडला, गेले बरेच महिने यानं तिला दिलेल्या पगारातली कुठे कुठे लपवून ठेवलेली रक्कम तिनं आणली आणि क्षणात तो पैसा याच्या थोबाडावर भिरकावला.
" घे, किती पैसे पाहिजे तुला घे ... माझी अक्कल काढतोस रे पैशावरून ? तुझा पैसा तूच तुझ्या मौजमजेवर उधळतोस, व्यसनावर खर्च करतोस... मी मात्र असे लावून ठेवतेय पै अन् पै तू दिलेल्या पगारातील पैशातून.. आणि तू माझीच अक्कल काढतोस? खबरदार इथून पुढे माझ्याशी या भाषेत बोललास तर !" 
ती रागानं चळाचळा कापत होती, तोंडानं त्याला झापत होती... आणि काही क्षणातच तो गप्प झाला होता.

थोडावेळ गेला, वादळ निवतंय असं तिला वाटलं पण पुढच्या काही क्षणातच तो नागोबासारखा पुन्हा फणा काढून आला. 
ही घाबरली, पण पुन्हा हिची 'बुद्धी' मदतीला आली. आता तो डिवचत होता पण ती गप्प राहिली आणि संधी मिळताच ती त्याच्या पुढून सटकली. दुसऱ्या खोलीचं दार तिनं चपदिशी लाऊन घेतलं आणि बाहेरून फुत्कारणारा तो नवरा नामक नाग अखेर चुपचाप दुसऱ्या खोलीत निघून गेला.

आज खऱ्या अर्थाने तिची सावित्री माय तिला आशीर्वाद देऊन गेली. लग्नानंतर तिने हळुहळू गमावलेला तिचा आत्मविश्वास, तिचा बाणेदारपणा, तिचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने तिची ' अक्कल ' जागेवर आली होती. 

कपाळावरची रेखलेली सावित्री मायची चिरी आता कपाळावर पुसट झाली होती पण मेंदूच्या आत खोल शिरली होती...कायमची ! 

- मोहिनी घारपुरे देशमुख 

#सावित्रीमाय  

Translate

Featured Post

अमलताश