गेले दोन तीन दिवसांपासून रणबीर इलाहाबादीया आणि समय रैना प्रकरण देशभरात गाजतंय. मी बातम्या पाहतेय, यूट्यूब पहातेय आणि माझं डोकं सुन्न होतंय. तसं तर ते नेहमीच अशा प्रकरणांनंतर होतंच. यापूर्वीही अशा घटना झाल्या आहेत. दरवेळी कोणीतरी एक बली का बकरा असतो आणि त्याने केलेल्या चुकीचे पडसाद देशभरात उमटतात, तेही इतके तीव्र की दरवेळी कुठूनतरी टोळ्या तयार होतात. चूक केलेल्या माणसाचे पुतळे करून ते जाळायला, त्या माणसाच्या तोंडाला काळं फासायला या टोळ्या इतक्या खुमखुमीने सक्रीय होतात, हा आक्रस्ताळेपणा पाहून माझ्यासारख्या संवेदनशील मनांना अनेक प्रश्न पडतात. त्यातलाच एक प्रश्न मला नेहमीच पडतो तो म्हणजे, उदात्तीकरणाच्या नादात आपण भारतीय लोक जीवनरस हरवून चाललो आहोत काय ?
कधी विचार केलाय तुम्ही असा ?
आपण जन्माला येतो ते आपलं नशीब घेऊन, आणि आपण जन्माला येतो ते जीवन जगण्यासाठी, ना तर जीवन हरवून बसण्यासाठी... मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे, पण म्हणून मृत्यूसमान जीवन जर आपण लोकांना देत असू तर ते चूक आहे. प्रत्येकाला आपलं जीवन सुंदर करण्याचा अधिकार आहे, आणि मुळात आधी प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा, आपल्याला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे, पण भारतात जी जीवनमूल्य पाळली जातात त्यात प्रत्येकच गोष्टीचं अवास्तव उदात्तीकरण केलेलं आहे. याचा परिणाम म्हणजे माणसांची जीवनं उमलून येत नाहीत तर ती अधिकाधिक कोमेजून जातात. निसर्गसुद्धा प्रत्येक फुलाला छान उमलू देतो आणि कालपरत्त्वे कोमेजून मग ते झाडावरून गळून पडतं, पण आपण माणसं दुसऱ्या माणसाला नीट उमलूच देत नाही. आपली त्यात सतत दुसऱ्याच्यावर शिरजोरी असते. सतत आपण दुसऱ्याला कमी लेखतो, कमी दाखवतो आणि सतत आपण स्वतःलाही फार बडे कोणीतरी असल्याचा देखावा करतो. नाही, मला हे नाही म्हणायचंय की या जगात फार मोठी माणसं खऱ्या अर्थाने झालीच नाहीत, पण मला हे म्हणायचंय की जिनके बसकी वो बात नही, त्यांच्यावर आपण आपलं उदात्तीकरण का लादतो सारखं सारखं ?
मी अशा कित्येक बायका पाहिल्यात ज्या खरंतर सामान्य, अतिसामान्य आहेत, पण या समाजव्यवस्थेमुळे त्या नेहमी स्वतःला मी फार ग्रेट असं दाखवतात, आणि जे आपल्याला चालतं. मी असे कित्येक पुरूष पाहिलेत जे स्वतः कर्तृत्वशून्य आहेत पण त्यांचा समाजातला वावर आणि त्यांची ज्या पद्धतीने ठेप ठेवली जाते ते बघताना मला वेदना होतात. त्याऐवजी एखादा स्वकर्तृत्वावर मोठा होण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती, जो कदाचित तिथपर्यंत पोचू शकत नसेल आणि त्यातूनही त्याच्या हातून आपल्या कामात चूक होत असेल तर मला अशा माणसाला इतर नाकर्त्या किंवा खोट्या आव आणणाऱ्या लोकांपेक्षा जास्त मार्क द्यावेसे वाटतात.
एखादी स्त्री तिच्या नवऱ्याच्या पश्चात तिचं जीवन रसरसून जगू शकत नाही याचं कारणंच हे आहे की आपण जीवनमूल्यांचं केलेलं उदात्तीकरण, पण त्या नादात आपण त्या स्त्रीचा जीवनरसच काढून घेतोय हे का नाही कळत या समाजव्यवस्थेला ?
आपण सामान्य लोकांना सामान्य पातळीवर त्यांचं जीवन रसरसून जगण्यात सगळ्यात बंधनं का घातलेली आहेत आणि सगळ्याच माणसांनी आपलं जीवन उदात्त पातळीवर न्यावं हा आपला कधीकधी दुराग्रह का आहे हे अनाकलनीय आहे. माणसांची मशीनं बनवली, माणसांना घोडे बनवून स्पर्धेच्या युगात सतत पळत ठेवलं, आणि इतकं सगळं करून पुन्हा त्यांच्या माथी अपयशी शिक्के मारून समाजात गुन्हेगारी निर्माण केली तरीही आपण आपली समाजव्यवस्था बदलायला तयारच नाहीये.
सतत लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याविषयी काय बोलतील, याची टांगती तलवार घेऊन जीवन जगतात माणसं.
त्यापेक्षा माणसांना छान मूल्यशिक्षण द्या, त्यांना त्यांच्या क्षमता आणि अक्षमतांची नीट ओळख करून द्या आणि त्यांच्यासह ज्या त्या माणसाला त्याच्या परीघात छान आनंदाने जगण्याची संधी द्या, स्वातंत्र्य द्या मग बघा प्रत्येक माणूस आपल्यासह हा समाज सुद्धा किती सुंदर करेल.
मागे मी एक विचार वाचला होता - You can never ask a fish to jump on a tree and then call him a fail attempt.
अर्थात, तुम्ही एखाद्या माशाला झाडावर चढायला सांगून वर त्या माशालाच अपयशी ठरवू नये.
तसंच आहे, प्रत्येक माणसाने उदात्त व्यक्ती व्हावं हा तुमचा दुराग्रह आहे, कारण प्रत्येकाच्यात तेवढ्या क्षमता नाहीत हे मुळात आपण मान्य करायला हवं असं मला वाटतं. जीवनरस मात्र भरभरून उपभोगण्याचा हक्क प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला आहे. त्यामुळे उदात्त होण्याची क्षमता नसणं हा काही त्या माणसाचा गुन्हा किंवा दोष नाही. मात्र त्याला देवाने जसं निर्माण केलंय आणि हे सुंदर जीवन जगण्यासाठी या भूतलावर पाठवलंय तर ते जीवन त्या माणसाने त्याच्या पद्धतीने आसुसून जगावं, त्यात कोणाचाही हस्तक्षेप असू नये.
अर्थात इथे पुन्हा स्वातंत्र्य आणि स्वैराचार हे मुद्दे येतातच, पण क्षणभर आपण गृहीत धरू की अशा व्यक्ती दिलखुलास जगतील, पण धुंद स्वैराचार करणार नाहीत. आयुष्यातले छोटे छोटे आनंद त्यांना मिळू द्यायलाच हवेत.
म्हाताऱ्या माणसांकडेच बघा. त्यांना रोजचा दिवस कंठणं आपण अवघड करून ठेवलंय. आधीच म्हातारपणाने त्यांचे हातपाय चालेनासे होतात, शरीराला नानाविध व्याधी चिकटलेल्या असतात, अशात आपण त्यांना जास्त खाऊसुद्धा देत नाही मनासारखं, का तर त्यांना त्रास होईल आणि आपल्याला त्याची काळजी वाटते म्हणून... पण हाच माणूस जन्मभर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी अंगावर घेऊन जीवन लढत असतो तेव्हा आपल्याला त्याची काळजी वाटत नाही हे कसं ?
याउलट पाश्चात्य देशांमधले ज्येष्ठ नागरिक बघा... म्हातारी आजीसुद्धा कायम छान सुंदर तयार झालेली असते. तिला कोणी हा प्रश्न नाही विचारत .. आज काय खास आहे ? आणि इथे भारतातील म्हाताऱ्या स्त्रीयांकडे बघा जरा... कित्येकींना तर घरात सून छळते, पुरेसं पोटभर अन्न खायला दिलं जात नाही, टीव्ही पहाण्यावर बंधन आणि त्याहीपेक्षा आता तुम्ही म्हातारे झालात, तुम्हाला अमुक एका गोष्टीची काय गरज असं म्हणून सगळं त्यांच्या हातून हळूहळू काढून घेतलं जातं. सुंदर साड्यांवर सुनांचा डोळा, सुंदर दागिन्यांवर मुलीचा डोळा... अरे कशाला... तुझ्याजवळ आहे नं हे सगळं मग म्हातारीला वापरू दे की तिचं सगळं छान छान, दिसू दे की रोज सुंदर... होऊ दे की छान तयार काहीच कारण नसताना ... पण नाही, आपण असं करत नाही.
इथे तरूणांचीही तीच कथा आहे. ज्या वयात जबरदस्त शारिरीक आकर्षण वाटतं, त्या वयात आपण त्यांना इतकं बांधून ठेवतो, मुलींशी बोलायचं नाही, मुलांकडे पहायचं नाही, असं वागायचं नाही, तसे कपडे घालायचे नाहीत. अरे त्या वयात जर ती मुलं तशी राहिली नाहीत, तशी वावरली नाहीत तर हळूहळू त्यांच्या स्वप्रतिमेला आणि नंतर हळूहळू सामाजिक प्रतिमेला किती मोठा धक्का बसतो, आणि आत्मविश्वासाची तर पार ऐशीतैशी होऊन जाते. मग असे पंख छाटलेले पक्षी किती मोठी भरारी मारू शकतील बरं याचा विचार करा आणि मग आईबाप रडत रहातात, आमच्या मुलांमध्ये सगळं होतं तरी त्यांचं अमुक काही चांगलं झालंच नाही. पण मग जेव्हा तुमचा मुलगा तुम्हाला सांगत होता की असं नाहीये, मी असं करून पहातोय, मी माझ्या पद्धतीने माझं आयुष्य जगतोय तेव्हा तुम्ही लोकांना थांबवून मुलाला त्याच्या पद्धतीने आनंदाने आणि स्वातंत्र्याच्या छान चौकटीत बसवून दिलेलं आयुष्य उपभोगू का दिलं नाहीत ?
सतत त्याला केस असे का केलेत, केस रंगवलेत का, कपडे असे का घातले असं करत टोमणे मारत असताना तुम्ही त्या उमलून आलेल्या जीवाला खुरटवून टाकताय हे तुमच्या का लक्षात येत नाही.
एखाद्याला कितीही वाटलं की त्याने टाटा, बिर्ला, अंबानी व्हावं पण त्याने तसा अभ्यास केला नाही तर होतो का तो कधी टाटा, बिर्ला, अंबानी... नाही ना... पण मग जर तो टाटा, बिर्ला, अंबानी होत नसेल तर मग काय त्याला तो जे आहे ते म्हणून आनंदाने जगण्याचाही अधिकार नाहीये का ? सगळीकडे समाज आणि चार लोकं कशाला मध्ये मध्ये येतात कळत नाही.
असो, तर हे विचार मनात आले याचं कारण तो इंडिया हॅज गॉट लेटंन्ट नावाचा शो... तरूण मुलांनी तरूण मुलांच्या वयात वेड्यासारखं बरळताना हद्द पार केली म्हणून देशभरात चाललेली छी थू.., अगदी योग्यच आहे. कुठेतरी हे थांबायला हवंच होतं. पण एरवी सगळ्यात लुडबुड करणारे आपण जेव्हा असा शो जन्माला येतो तेव्हा पहिल्याच एपिसोडनंतर आपण थांबवला का नाही हा माझा प्रश्न आहे. अनेक एपिसोड्स आपण चवीचवीने पाहिले आणि जेव्हा आपल्या भारतीय मानसिकतेला धक्का देणारी विधानं आली तेव्हा आपण विरोध केला... पण मग तोपर्यंतही त्या शो मध्ये हेच सगळं सुरू होतं की... मग ते का चाललं तुम्हाला ? याचं कारण त्यात विकृत का असेना एक जीवनरस होता आणि तो तुम्हीही उपभोगत होताच की...
तर ते असं सगळं आहे. उदात्तीकरणाच्या नादात आपण लोकांचा जीवनरसच हरवून टाकतोय हे आपल्याला कधी कळेल.
अहो माशाला उडता येत नाही हे मान्य करा आणि माशाला त्याच्या पाण्यात स्वच्छंद पोहू द्या. तो मासा म्हणून जगेल, मासा म्हणून मरेल. तुम्ही कशाला त्या माशाला राजहंस पक्षी बनवायला जाताय हे मला कळत नाही...
- मोहिनी घारपुरे - देशमुख