मंगळवार, २८ मे, २०१९

एक होता विदूषक


माझे अत्यंत लाडके अभिनेते स्व. लक्ष्मीकांत बेरडे जेव्हा वारले तेव्हा मला अतोनात दुःख झालं होतं. करियरच्या ऐन भरात त्यांनी जो आनंद दिला तो अतुलनीय .. मी तर त्यांची फार चाहती होते. त्यांनी केलेल्या सर्व  चित्रपटांपेक्षा खूप निराळा असल्याने हा चित्रपट मला पहयाचा होता. पूर्वी टीव्हीवर मी हा चित्रपट पाहिला होता पण तेव्हा मी तो समजण्याइतकी मोठी नव्हते. गेल्या आठवड्यात मात्र यूट्यूबकृपेने हा चित्रपट पुन्हा पाहिला आणि थक्क झाले. लक्ष्मीकांतजींच्या आठवणीने पुन्हा एकदा ह्रद्य व्हायला झाले. खरंच, लक्ष्मीकांतजी .. म्हणजे तुमचा आमचा लक्ष्या ..


हा मनुष्य फिल्म इंडस्ट्रीत कसा आला याबद्दलची मला फारशी माहिती सापडली नाही पण तो आला , त्यानं पाहिलं आणि तो जिंकला ही ओळ लक्ष्याच्या बाबतीत खरी ठरते. 
एक होता विदूषक या चित्रपटातील त्यांचा अभिनय बघताना तर कित्तीतरी दृष्यात आपल्या अंगावर काटा येतो.. आणि कित्तीतरी वेळेला डोळे पाणावतात. 
लहानगा आबुराव (लक्ष्या).. त्याचा बा कोण ते माहीत नाही पण आई तमाशा कलावंत. आबुराव लहान असताना त्याची आई (मधू कांबीकर) एका नेत्याची ठेवलेली बाई म्हणून जगत असते. हा नेता म्हणजे (मोहन आगाशे) .. आबुरावचं लहानपण यात घुसमटत असतं. नेत्याची मुजोरी  बिनबापाच्या आबुराववर .. तो म्हणेल तसं यानं अन् याच्या आईनं रहायचं. मग एकदा काय होतं, आबुराव छान नकला करतो हे माहीत असल्यानं हा नेता त्याला सांगतो, आबुराव, मला हाशीव .. लहानगा आबुराव नेत्यासमोर त्याच्या प्रतिस्पर्ध्याची नक्कल अशी काही बेफाम करतो की या नेत्याला हसता हसता हार्टअटॅक येतो आणि त्याचे प्राणच जातात. ही बातमी आईला कळते आणि आबुराववर येऊ घातलेलं संकट ओळखून ती रातोरात गाव सोडते. दुसऱ्या गावी बहिणीचा तमाशाचा फड असतो तिथे जाते नि आसऱ्याला रहाते. बहिण तोऱ्यात आणि आबुराव अन् त्याच्या आईचे मात्र कष्टाचे दिवस येतात. तमाशाच्या फडाचं नाव मात्र दिवसेंदिवस मोठं होतं. 
आबुरावही आता लहानाचा मोठा झालेला असतो. एक दिवस त्याचा तमाशा पहायला एक नटी येते. ही नटी म्हणजे वर्षा उसगावकर .. खरंतर प्रेमात धोका खाल्याने ती आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत आलेली असते पण आबुरावचा खेळ पाहून ती एवढी हसते की तिच्या मनातलं सार मळभ दूर होऊन जातं. आता तिला जगायचं असतं. ती आबुरावला भेटते आणि फिल्म ऑफर करते. आयुष्यात आलेली ही संधी आबुरावला घ्यावीशी वाटते आणि तेव्हाच ती नटी आपल्या प्रियकराला (तुषार दळवी) जळवण्यासाठी आबुरावबरोबर प्रेमाचं नाटक करते. पहिल्या चित्रपटानंतर ती आबुरावशी लग्नही करते. आबुराव खूष असतो .. आयुष्यातली त्याची स्वप्न एक एक करून पूर्ण होण्याच्या मार्गावर असतात पण अशातच त्याला तिचं खरं रूप कळतं. तो कोलमडतो. इकडे तमाशात पूर्वी तो जिच्यावर प्रेम करत असतो ती मुलगी मरते आणि मरताना आबुरावच्या आणि तिच्या प्रेमाची खूण असलेली मुलगी जन्म घेते. या मुलीचा सांभाळ आबूरावचे आजोबा (निळू फुले) आणि त्याची आई करतात पण एक दिवशी आईदेखील मरते. हा आईच्या मृत्यूचा निरोप द्यायला आजोबा आबूरावला भेटायला शहरात येतात आणि येताना त्या चिमुकलीला सोबत आणतात. ही मुलगी .. कधी हसलेलीच नसते.. जेव्हा आबुरावला कळतं ही आपलीच मुलगी आहे आणि आपली आई आता कायमची गेली या दोन्हीही धक्यानी तो अक्षरशः मनातून हलतो. पण तरीही त्या चिमुकल्या मुलीला तो सांभाळण्याचं ठरवतो. तिला काही दिवस बोर्डींगच्या शाळेत ठेवतो आणि त्याचदरम्यान त्याला लक्षात येतं की आपण जिच्याशी लग्न केलंय तिला आता आपल्यात रस उरलेला नाही. आपण तिच्यासाठी फक्त एक खेळणंच बनून राहिलोय. तिला वाटेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारा तिचा विदूषक .. तो खंतावतो .. फार फार दुःखी होतो. मग मनातून पक्का निश्चय करतो आणि आपल्या मुलीला बोर्डींग स्कूलमधून घेऊन कायमचं घरी आणतो. त्याच दिवशी त्याच्या बायकोचा निर्धार पक्का झालेला असतो, ती ते घर सोडून निघालेली असते कायमची, तिच्या पूर्वीच्या प्रियकराबरोबर रहायला.. 
जेव्हा ती त्या छोट्या मुलीला बघते आणि तिला कळतं की ही आबुरावची मुलगी आहे तेव्हा तिला खोटंच वाटतं ..तिला वाटतं हा चेष्टाच करतोय.. पण नंतर तीही अतीव दुःखाने आबुरावचा निरोप घेते नि आपल्या वाटेला लागते. 
आता उरतो आबुराव आणि ती न हसलेली छोटी मुलगी. आयुष्य पुढे सरकत रहातं. अशातंच एकदा आबुरावचा बालमित्र (दिलीप प्रभावळकर), जो आता राजकारणात उतरलेला असतो, तो त्याला भेटायला येतो. मग हळूहळू ओळख वाढवत स्वतःच्या फायद्यासाठी आबुरावचा वापर करून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत स्वतः पोहोचतो आणि आबुराव मात्र त्याच्या हातचं बाहुलं होत जातो. विधानसभेवर उमेदवार म्हणून हा राजकारणी आपल्या मित्रालाच, आबुरावलाच उभं रहाण्याची गळ घालतो आणि तिथून या विदूषकाचं आयुष्य पलटतं. पण त्याला याची जाणीवच नसते. तो फक्त मैत्रीपोटी एकेक गोष्ट करत चाललेला असतो. अशातच एकदा आबुरावचे आजोबा, गुरू (निळू फुले) विधानसभेचं कामकाज कसं चालतं हे पहाण्यासाठी त्याच्याबरोबर जातात तेव्हा आबुरावचं भाषण असतं. तळागाळातल्या लोकांचा आवाज मांडण्याऐवजी आबुराव त्या भाषणात त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून या लोकांची खिल्ली उडवतो. आजोबा ते ऐकून रागात निघून जातात आणि घरी आल्यावर आबुरावला त्याच्या बोलण्याची जाणीव करून देतात. तमाशाच्या फडात आपल्या अभिनयानं राजकारण्यांचं धाबं दणाणून सोडणारा एकेकाळचा वाघ्या असलेला आबूरावचा आज राजकारण्यांनी कसा विदूषक करून ठेवलाय याची खंत व्यक्त करतात आणि त्या क्षणी आबूरावला आपलं भरकटलेलं आयुष्य जाणवतं.. ज्यानी त्यानी आबूरावचा घेतलेला फायदा त्याला आयुष्याच्या या वळणावर बोचायला लागतो.. लहानपणीचे  दिवस आठवतात .. तमाशाच्या फडावर नाचणारी आई, त्या फडावर नाचणारी आपली प्रेयसी आणि आपण .. आणि आजचे आपण यातला जमीन अस्मानचा फरक लक्षात येतो. आता त्याला यातून बाहेर पडायचं असतं. 
एक होता विदूषक नावाच्या शेवटच्या चित्रपटाचं आबुरावचं शूटींग आणि त्यातला शेवटचा सीन करताना आबूरावला हार्टअटॅक येतो .. लोक टाळ्या वाजवतात आणि मग लक्षात येतं की हा उठत नाहीये .. मुख्यमंत्री मित्र हजर असतोच तो त्याच्यावर उपचाराची सोय करतो. तातडीने उपचार  मिळतात.. पण का .. तर मुख्यमंत्र्यानं त्याच्या वाढदिवसाच्या सभेत आबुरावचं भाषण ठेवलेलं असतं.. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की ते येऊ शकणार नाहीत सभेला तर तेव्हा हा मुख्यमंत्री चक्क म्हणतो, आबूरावनं आलं पाहिजे, सभेत भाषण दिलं पाहिजे आणि तिथं कोसळलं पाहिजे.. तुमच्या प्रमोशनच बघू आपण ... अरेरे .. 
आबूराव भाषण द्यायला उभा होतो सभेच्या दिवशी .. एका क्षणी वाटतं हा आता कोसळणार .. लोकांना वाटणार की केवढं ते प्रेम मुख्यमंत्र्यावर या त्याच्या मित्राचं .. पण पुढल्याच क्षणी आबूराव पुन्हा नॉर्मल होतो .. प्रेक्षकात बसलेली जाई, त्याची लेक, जी कधीच हसलेली नसते तीच त्याला दिसायला लागते फक्त .. तो गोष्ट सांगतो आणि शेवटी जाईच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. सभागृहात गोंधळ होतो.. लहान मुलांची गोष्ट नको म्हणून लोक ओरडाआरडी करतात आणि राजकारणी निघून जातात.. शेवटी एकटा पडलेला आबूराव आणि त्याच्या कुशीत त्याची लेक .. 
पुन्हा एक नवा प्रवास सुरू होतो आबूरावच्या आयुष्याचा .. आणि या प्रवासात त्याची लेक जिनं त्याला आता पप्पा म्हणून स्वीकारलेलं असतं ती त्याच्याबरोबर असते .. 
असा हा विदूषक .. आणि असं त्याचं आयुष्य ...

चित्रपट पहाताना विदूषकाची व्यथा मन हेलावून टाकते. प्रेयसी आणि नंतर बायको झालेली मेनका काय, नि राजकारणी मित्र काय, तो लहानपणी आईला छळणारा राजकारणी माणूस काय .. साऱ्यांनी फक्त या आबूरावला खेळणं म्हणून वापरलं आणि पोटभर खेळून झाल्यावर फेकून दिलं .. असं या आबूरावचं, विदूषकाचं जीवन .. 
खरंतर हा चित्रपट लक्ष्याच्या आयुष्याचा शेवटचा चित्रपट ठरावा हा निव्वळ योगायोग आणि तोही किती दुर्दैवी .. लक्ष्मीकांत बेर्डे फार मोठे अभिनेते होते.. त्यांनीही जन्मभर लोकांना हसवण्याचं काम केलं. आणि ते या चित्रपटानंतर वारले ... हा चित्रपट म्हणजे त्यांच्याच आयुष्याचं निराळ्या प्रकारे केलेलं कथन तर नसेल ना हा प्रश्न जाता जाता माझ्या मनात उपस्थित होऊन जातो.. कदाचित खरं उत्तर वेगळं काही असू शकेल .. किंबहुना वेगळंच असावं अशी प्रार्थना ..
चित्रपट लोकांना किती आवडला ते मला माहीत नाही पण हा चित्रपट फारच वास्तववादी आणि अत्यंत तरल आहे. चित्रपटातली गाणी, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं नृत्य, हावभाव आणि आशा ताईंचा काळीज चिरत जाणारा आवाज हे सगळे या चित्रपटाचे प्लस पॉईंट्स ..
लाल पैठणी रंग माझ्या साडीला तुम्ही यावं सजण रंग होळीला,
गडद जांबळं भरलं आभाळं, 
श्रावणाचं ऊन मला झेपेना
ही गाणी तर अक्षरशः वेड लावतात .. कित्ती वेळा ऐकली तरीही मन भरत नाही असं होतं या गाण्यांनी ..
आणि असं सगळं असलं तरीही लक्ष्मीकांत बेर्डे या माणसासाठी हा चित्रपट नक्कीच पहायला पाहिजे एकदा तरी आयुष्यात ... 
ज्यानं तुम्हाला हसवलं तो तुम्हाला हसवता हसवता केव्हा रडवून गेला तुम्हाला कळलंही नाही असं काहीसं आपलं होतं.. 
दिग्दर्शक जब्बार पटेल यांना तर या चित्रपटासाठी त्रिवार नमन... एक आगळा विषय, उत्कृष्ट पात्र निवड, उत्कृष्ट मांडणी ... या साऱ्यासाऱ्यातून जब्बारजींचं मोठेपण आणि वेगळेपण दिसतं.

मला आयुष्यात कधीतरी लक्ष्मीकांतजींना भेटायचं होतं.. कधीतरी त्यांच्याशी बोलायचं होतं.. हा चित्रपट पाहिल्यावर अजून विश्वासच बसत नाही की ते या जगात नाहीत ... कदाचित ते इथेच आहेत .. मराठी चित्रपटसृष्टीत .. त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या हसवण्याने आणि त्यांच्या या अशा एक से एक चित्रपटांमधून ते आपल्याला हवे तेव्हा आपल्यासमोर त्यांची कला सादर करायला उभे रहात आहेत .. कायमचं...
असा हा 'एक होता विदूषक ....चित्रपट'


- मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - loksatta)

मंगळवार, ७ मे, २०१९

पाठलाग



एक जबरदस्त, गूढ कथानक घेऊन मराठीत दिग्दर्शक राजा परांजपे यांनी बनवलेला पाठलाग हा चित्रपट पाहिला आणि अक्षरशः जागीच खिळले. खरंतर याच चित्रपटावरून नंतर हिंदीत मेरा साया हा चित्रपट बनवण्यात आला होता, तो मी कित्तीतरीवेळा पाहिला असेल पण पाठलाग पहाताना मला तरीही घाबरायला झालं, भावविवश व्हायला झालं .. हेच या मराठी संहितेचं यश ..

या चित्रपटाची कथा त्याकाळी नवीनच .. एका आईच्या पोटी जन्मलेल्या जुळ्या बहिणी, दोघीतली एक उनाड, तिचा पाय ऐन तारूण्याच्या उंबरठ्यावर पदार्पण करतानाच घसरतो, आई तिला हाकलून देते.. आणि नंतर त्या मुलीची वाताहत लागते ती थेट दरोडेखोरांच्या टोळीत सामील होण्यापर्यंत ... इकडे दुसरी जुळी बहिण मोठ्या वकीलाची लाडकी पत्नी म्हणून भरल्या घरात सुखाने नांदते. दोघींची आयुष्य निराळी होतात.. पण नियतीला हे मान्य नसते म्हणा किंवा गेल्या जन्मीचं काही उरलेलं देणं घेण्यासाठीच म्हणा जणू, एका भयंकर रात्री दरोडेखोर टोळीतली ती बहीण नांदत्या घरातील बहिणीच्या घरी संकटात आश्रय मागायला जाऊन पोचते. हिचा नवरा वकील नेमकाच तेव्हा परदेशी शिक्षणासाठी गेलेला असतो आणि शिवाय हिने आईची शप्पथ असल्याने आपल्या या जुळ्या बहिणीबद्दल घरात कधीही वाच्यताही केलेली नसते. पण अशा भयंकर रात्री, आजारी, थकली भागलेली आणि संकटात सापडलेली आणि मुख्य म्हणजे कित्येक वर्षांनी समोर आलेली बहीण ... तिला आश्रय कसा नाकारायचा .. म्हणून ही तिला एक रात्र आणि एक दिवसापुरता आश्रय देते खरी .. पण बहीण खूपच आजारी असल्याने रात्रीतून कोणाला न सांगता डॉक्टरला आणायला म्हणून गुपचूप घराबाहेर पडते.. आणि हाय रे .. दरोडेखोर हिलाच ती समजून पऴवून नेतात. इकडे हिच्या जागी घरी आजारी निजलेली ती मरते आणि तिकडे ती पोलिस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत पोलिसांच्या हाती लागते. आता सुरू होतो हिचा झगडा .. स्वतःला आपण ती नव्हेच हे सिद्ध करण्यासाठीचा ... मग अनेक संदर्भ, भूतकाळातल्या अनेक गोष्टी, अनेक आठवणी ती सांगत जाते.. कोर्टात .. पण कोणीही विश्वास ठेवत नाही.. खुद्द नवऱ्यालाही कळत नाही की आपणच आपल्या पत्नीला अग्नी देऊन समाधी बांधली आणि आता ही कोण बाई पुन्हा आपली पत्नी असल्याचा दावा करतीये ... एकेक घटना उलगडत उलगडत शेवटी कथानकातला हा खरा ट्विस्ट जेव्हा ती पतीला सांगते तेव्हा सारं नाट्य उघडकीस येतं आणि तो तीच आपली पत्नी असण्याविषयी ठाम होतो. 

.. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहिल्यापासून डॉ.चा अभिनय कसा होता हे पाहण्याकरिता हा चित्रपट पाहिला आणि त्यानिमित्ताने एका सुंदर मराठी चित्रपटाची अनुभूती घेतली. डॉक्टरांच्या अभिनयाला तसा या चित्रपटात फार स्कोप नव्हता हे खरं असलं तरीही हा चित्रपट तेव्हा नक्कीच गाजला असणार यात शंका नाही. याचं कारण म्हणजे, या चित्रपटाचं कथानक.
जयंत देवकुळे यांच्या आशा परत येते या कथेवरून पाठलाग हा चित्रपट ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे यांनी बनवला. पटकथा, संवाद, गीते गदिमांची तर प्रमुख कलाकार म्हणून भावना आणि डॉ. घाणेकर .. कदाचित डॉ. घाणेकरांचा हा दुसरा तिसराच चित्रपट असावा. पण तरीही त्यांचा अभिनय भूमिकेला साजेसा साधासुधा सरळ झाला आहे. शिवाय त्यांचं देखणं रूप चित्रपटाचा प्लस पॉईंट ठरला असणार हे नक्की. त्यांची सहअभिनेत्री भावना या देखील कसलेल्या अभिनेत्री असाव्यात असे वाटले. संवाद फेक आणि सुंदर अभिनय या तिच्या जमेच्या बाजू ..
तुम्ही जर मेरा साया हा सुनील दत्त आणि साधना यांचा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला जाणवेल की त्यातील अनेक फ्रेम्स या तंतोतंत पाठलाग चित्रपटासारख्याच वापरलेल्या आहेत. मला खूप मजा आली जेव्हा मी झुमका गिरा रे या गाण्याच्या ऐवजी पाठलागमध्ये असलेलं, नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक हे गाणं पाहिलं तेव्हा .. कारण, यातल्या नटीच्या अनेक स्टेप्स्ही जशाच्या तशा हिंदीतल्या झुमका गिरा रे गाण्यात साधना यांनी कॉपी केल्या आहेत. अर्थात तसं करण्यामागे काही कायदेशीर गोष्टीही असाव्यात. कारण मुख्य चित्रपट पाठलाग आणि त्यावरून हिंदीत मेरा साया हा चित्रपट बनवला गेला आहे हे येथे पुन्हा अधोरेखित करायला हवे.
तर मंडळी, राजा परांजपे आणि गदिमा यांचा हा उत्कृष्ट चित्रपट ..
तेव्हाच्या चित्रपटांची सगळी जादू म्हणजे संवाद, अभिनय, दिग्दर्शन आणि गाणी यावरच बेतलेली.. मोठे मोठे सेट्स नाहीत, भयंकर ड्रेपरी नाही, उग्र मेकअप नाहीत, लाऊड म्यूझिक नाही आणि तरीही साधेपणातही सुंदर कथानक हाताळणी हेच या जुन्या चित्रपटांचं वैशिष्ट्य ..
मला तर म्हणूनच हे श्वेतश्याम चित्रपट पहाताना मजा येते..
पाठलाग हा चित्रपट या सगळ्या कलाकारांच्या आणि दिग्गजांच्या कामासाठी पहायलाच हवा .. एकदातरी ..असं मी आवर्जून सांगेन ..

- मोहिनी

(photo credit - youtube )



Translate

Featured Post

अमलताश