'पोंगे' हा प्रकार पहिल्यांदा आयुष्यात येतो तो शालेय जीवनात..!
माझ्याच नाही; तर जवळपास सगळ्यांच्याच बालपणातला फार फार आवडीचा चटपटा प्रकार म्हणजे हे पोंगे..!
माझ्या शाळेच्या मध्यवर्ती ठिकाणी जी पाण्याची टाकी होती तिथे रामनाथ काकांचं एक छोटं टपरीवजा दुकान होतं. या दुकानात लाल रंगाच्या छोट्या गोळ्या, निरनिराळ्या प्रकारची बिस्कीट्स, चिक्की, बोरकूट आणि हे पोंगे हमखास विक्रीसाठी ठेवलेले असतं. अगदी दोन पाच रूपयांना हे सगळे प्रकार उपलब्ध होते आणि बरीच मुलं ज्या दिवशी जवळ डबा नसेल त्या दिवशी काकांच्या दुकानातून काहीबाही खाऊ घेत असत. लाल छोट्या गोड गोड गोळ्या आणि पोंगे हा माझ्या आवडीचा खाऊ. ते पोंगे प्रत्येक बोटात अडकवून खाताना इतकी मजा यायची. मुख्य म्हणजे बोटंही लहान लहान असल्याने प्रत्येक बोटात एक एक लांब लांब पोंगा व्यवस्थित अडकवता यायचा.. मग 'कुर्रूम कर्रम' करत करत हे पोंगे पुढल्या काही मिनीटातच फस्त होऊन जायचे. बालपणीचा हा सुखाचा काळ सरला तशी पोंगे वगैरे प्रकार खाणंही केव्हाच बालपणीच्या सुरम्य दिवसात मागे पडून गेलं. मग शिक्षण, पदव्या मिळवणं, अभ्यास करणं आणि या साऱ्यात स्वतःला एक व्यक्तिमत्व म्हणून घडवताना बालपणातले हे सगळे सोबती कुठेतरी मागे पडून गेले.
लग्न होऊन अमरावतीत आले तेव्हा पहिल्या वर्षी गौरी गणपतीच्या दिवसात अमरावतीत भरलेल्या जत्रेत आम्ही सगळे कुटुंबीय फिरायला गेलो. पहाते तर काय .. छोट्या छोट्या रस्त्यांवर माणसांची गर्दी तर अपेक्षित होतीच पण रस्त्यांच्या दुतर्फा थोड्या थोड्या अंतरावर पोंगे विक्रेत्यांच्या गाड्या दिसत होत्या. गंमत म्हणजे, या विक्रेत्यांसमोर सतत लहान मुले आणि त्यांच्या बरोबरीने मोठी माणसंही पोंगे खायला झुंबड उडवीत असल्याचं दिसलं. घरातून निघाल्यापासून माझ्या लहानग्या पुतण्याने आणि पुतणीने, "काकू, आपण ना जत्रेत गेल्यावर मस्तपैकी आलूपोंगे खाऊ" असा लडीवाळ हट्ट धरलाच होता. पण हा आलूपोंगे म्हणजे नेमका काय प्रकार असतो हे मला तोवर माहीतच नव्हते आणि त्यामुळेच मी याबाबतीत थोडीशी गोंधळलेलीच होते. जत्रेतील रस्त्यांच्या दुतर्फा जेव्हा हातगाड्यांवर पोंगे आणि सोबत द्रोणात आलूची (म्हणजे बटाट्याची बरं का 😇) भाजी विकताना लोकं दिसली तेव्हा माझी उत्सुकता शिगेला पोहोचली.
मग आम्ही सारीजण एका विक्रेत्यासमोर उभे राहिलो. त्याने द्रोणात भाजी दिली आणि सोबत पोंगे दिले दहाबारा. आमची लहान लहान मुलं भराभर पोंगे आलूच्या भाजीवर दाबून (म्हणजेच भाजी पोंग्यात भरून) चुरूचुरू करत हा खाऊ खाऊ लागली आणि त्यांचं पाहून आम्हीही मोठ्या आनंदाने या निराळ्याच प्रकाराचा आस्वाद घेऊ लागलो तेव्हा मला माझेच बालपणीचे दिवस आठवले.
किती साध्या गोष्टीतला किती मोठा आणि किती निरागस आनंद .. अवर्णनीय आनंद ..
खरंच, कधीकधी वाटतं, सगळीकडे थोड्याफार फरकानी माणसं त्याच गोष्टी करत असतात त्यामुळेच कितीही फरक करायला गेलात तरीही माणसं एकमेकांशी जोडली जातातच, आणि त्याचं थेट कारण म्हणजे या अशा छोट्या छोट्या सुखाच्या गोष्टी ज्यामुळे माणसं एकमेकांना एकमेकांशी सहज गुंफू शकतात. 'तुमचं आमचं सेम असतं' असं मी या अर्थानीच नेहमी म्हणत असते. शहरं बदलली तरीही माणसांच्या आवडीनिवडी, सुखाच्या कल्पना यात भयंकर समानता आढळते. आणि त्याचंच हे एक छोटंस उदाहरण म्हणजे हा 'आलूपोंगे' प्रकार ..
खरंतर, असे कित्तीतरी पदार्थ आहेत जे सगळ्या शहरांमध्ये मिळतात पण तरीही त्या त्या शहरात त्या त्या पदार्थाची चव, तो बनवण्याची पद्धत, त्याचा आस्वाद घेण्याची पद्धत या सगळ्यात भिन्नता आहे आणि त्या भिन्नतेमुळेच तर जीवनात आनंद आणि माणसांमध्ये एकात्मता आहे. आता कोणाला प्रश्न पडेल की असं कसं .. तर हेच बघा ना .. पोंगे आवडतात म्हणून आलूपोंग्यांचाही स्वाद मी घेऊन पाहिलाच निराळ्या शहरात.. आणि मुख्य म्हणजे, माझ्या बालपणीचा एक प्रकार एवढ्या वर्षांनंतर मला एका परक्या शहरात गवसला तेव्हा मिळालेला आनंद लाखमोलाचा होता.
आणि आता माझ्या लेखनातून हा आनंद मी तुमच्यापर्यंतही पोहोचवला आहे. कोणास ठाऊक .. तुमच्यापैकी एखादा वाचक सहजच आज बाजारात चक्कर मारेल आणि येता येता पोंगे घेऊन येईल आणि मस्तपैकी तळून खाईलही हा लेख वाचल्यावर .. ! (अर्थात्, तुम्हीच ते वाचक असाल तर मला नक्की कळवा हं.. 😜)
शेअरींग मधला आनंद हा असाही उपभोगता येतोच माणसाला .. इच्छा असेल तर .. !
आलूपोंग्याची माझी साधी सोपी रेसिपी खास तुमच्यासाठी इथे शेअर करतेय -
1. उकडलेल्या बटाट्याची नेहमी करता तशी मस्तपैकी भाजी करून घ्या.
2. आता पोंगे तळून घ्या. किंवा बाजारातून तळलेले पोंगे घेऊन या.
3. आता ही भाजी पोंग्यांमध्ये भरा किंवा पोंगे भाजीवर दाबून एक एक घास खा.
4. आवडत असल्यास, एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि किसलेलं चीज सोबत ठेवा.
5. भाजी पोंग्यात भरली की तेच या कांदा कोथिंबीरीच्या बाऊलमध्ये प्रेस करा म्हणजे ते सगळं भाजीवर चिकटेल.
6. आता या पदार्थाचा मनभरेस्तोवर आस्वाद घ्या.
- मोहिनी घारपुरे - देशमुख
![]() |
मी घरी बनवलेले आलूपोंगे आणि सोबत चीज |