मंगळवार, १९ मे, २०२०

अॅनेटॉमी ऑफ अ साँग

सगळं जग लॉकडाऊनमध्ये घरात अडकलेलं असताना खरंतर अनेकांसाठी अनेक संधी घरबसल्या उपलब्ध होत आहेत हाच काय तो या भयंकर काळातला सकारात्मक भाग .. तर अशीच एक फेसबुकच्या वॉलवर आलेली संधी मी घेतली आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या संगीत या विषयातलं आणखी काही ज्ञान मिळवलं. ही संधी होती .. सुप्रसिद्ध ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार आणि जागतिक किर्तीची गायिका हंसिका अय्यर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यशाळेची.. कार्यशाळेचं नाव होतं.. 'अॅनेटॉमी ऑफ अ साँग' 
कोणत्याही गाण्याचा प्रवास नेमका कसा कसा होतो त्या सर्व टप्प्यांची बारकाईने ओळख या कार्यशाळेत कौशलजींनी करून दिली. एखादं गाणं, एखादी कविता कशी सुचते, त्याला चाल कशी लावली जाते, त्या चालीचं गाण्यात रूपांतर होत असताना संगीतकारांचा नेमका काय विचार असतो, त्या विचाराची पार्श्वभूमी काय असते, कोणत्या गाण्यासाठी कोणती आणि कशी सुरावट वापरावी, नेमका कसा वाद्यमेळ वापरावा हा सगळा सगळा विचार संगीतकार कसा करतो हे खुद्द एका अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू अशा संगीतकारानंच थेट उलगडून दाखवावं आणि आपल्याला ते घरबसल्या जाणून घेता यावं यातलं सुख एखाद्या संगीतप्रेमी माणसालाच अधिक प्रकर्षाने आकळेल .. 
दोन दिवस तब्बल तीन साडेतीन तास आम्ही कौशलजींशी या विषयावर ऑनलाईन बोलत होतो, प्रश्न विचारत होतो आणि हंसिकाजींच्या त्या अनुषंगाने येणाऱ्या काही सुरावटींचा आस्वाद घेत होतो. आम्ही तब्बल पंधरा जणं जगाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यशाळेला आनंदाने उपस्थित होतो. तांत्रिक अडचणी तर येत होत्याच थोड्याफार पण तरीही त्या सोडवत आम्ही मुख्य विषयाचा आनंद घेऊ शकलो हेच फार महत्त्वाचं.. 
माझ्यासारखी मुलगी जिला बोलायला आवडतं, जिला गाणं येतं आणि जिचं गाण्यावर मनापासून प्रेम आहे आणि जिला एकंदरीतच आयुष्यात सगळं काही करायचं आहे .. ती मुलगी अशा कार्यशाळेचा भाग झाल्यावर न बोलता, तिचे अनुभव न शेअर करता गप्प बसेल ती कसची .. ( हाहा )
त्यामुळेच अगदी सुरूवातीपासूनच माझं बोलणं आणि प्रश्न विचारणं सुरू होतंच.. पण कार्यशाळेतल्या काही गोष्टी ज्या कौशलजींकडून मी शिकले त्याबद्दल थोडक्यात माझ्या ब्लॉगवर मी लिहीणार आहेच. याचं कारण म्हणजे, ब्लॉग हे एकप्रकारचं डॉक्युमेंटेशनच असतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं, आणि तसंच, अनुभवांचं .. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी अनुभव लिहीते, स्वतःचं आणि इतरांच जगणं लिहीते आणि तसंच मला लेखनाच्या माध्यमातून शक्य होईल तशी इतरांना वेळोवेळी मदतही करतेच. अलिकडेच ब्लॉगची रीडरशिप वाढल्याने ब्लॉगवर काही जाहिरातवजा मजकूरही सुरू केलेला आहे परंतु तो सगळा मजकूर प्रसिद्ध करताना माझ्या ब्लॉगच्या वाचकांची आवडनिवड लक्षात घेऊनच त्यांच्या उपयोगी माहिती ब्लॉगवर मी प्रसिद्ध करत आहे. 
तर .. मुळ मुद्दा .. कार्यशाळेबद्दल थोडंस .. 



दिवस पहिला - 
एखाद्या गाण्याविषयी बोलण्यापूर्वी आम्ही अगदी बेसिक्सपासूनच सुरूवात केली. कौशलजींनी आम्हाला एक मस्त ऑनलाईन क्विझ सोडवायला दिली होती. त्यानंतर अगदी संगीत म्हणजे काय इथपासून आमची सुरूवात झाली. संगीताची व्याख्या, गाण्याची व्याख्या, गाणं म्हणजे काय, संगीताचे प्रकार कोणकोणते याविषयी आम्हाला त्यांनी सविस्तर माहिती दिली.  खरंतर मला या सगळ्याविषयी आणखीन सविस्तर लिहायला आवडलं असतं परंतु, ही कार्यशाळेशी गद्दारी होईल म्हणून मी तसं करणार नाही. या लेखात मी कार्यशाळेतील तपशिल लिहीणं अयोग्य ठरेल .. म्हणूनच मी तो लिहीणं इथे जाणीवपूर्वक टाळणार आहे. 

दिवस दुसरा - 
या दुसऱ्या दिवसाची खरंतर मला खूप उत्सुकता होती. कारण, आज आम्ही प्रत्यक्ष गाण्यांच्या अॅनेटॉमीविषयी (जडणघडणीविषयी) ऐकणार होतो. माझ्याकडे नेमका या दिवशीच थोडावेळ इंटरनेटचा प्रॉब्लेम आल्याने काही मुद्दे ऐकताच आले नाहीत परंतु तरीही काही गाण्यांची जडणघडण ऐकायला मिळाली हेही नसे थोडके. त्यातलं एक गाणं म्हणजे, बडे अच्छे लगते है .. हे गाणं ऐकताना आपल्याला नेहमी रिलॅक्स वाटतं.. सूदींग वाटतं आणि शिवाय हे गाणं म्हणताना आपण ज्या व्यक्तिसाठी ते म्हणतोय त्या व्यक्तीला त्या गाण्यातून व्यक्त केलेल्या प्रेमभावना थेट पोहोचतात. हे सगळं कसं शक्य झालंय तर या गाण्यातील प्रत्येक शब्दासाठी संगीतकाराने योजलेले सूर, या सुरांच्यावर स्वार होऊन उच्चारले जाणारे शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार ज्यातून त्या शब्दांची भावना थेट व्यक्त होईल हा समग्र विचार हे गीत बांधताना केला गेलेला आहे.. आणि अर्थातच प्रत्येक असं गाणं जे ऐकणाऱ्याच्या मनाला जाऊन भिडतं, त्या गाण्याच्या यशामागेही हेच कारण असतं. 

खरंतर, कार्यशाळेतील अनेक बाबींविषयी लिहिण्याचा मोह होतोय .. परंतु, मी तसं करणार नाही. कारण, कुछ बाते एहेसास करनेकी चीझ होती है .. !!
- मोहिनी घारपुरे - देशमुख 


कार्यशाळेची ही काही खास क्षणचित्रे तुमच्यासाठी - 









शुक्रवार, १५ मे, २०२०

हमारी याद आएगी ..

कभी तनहाईयों में यूँ हमारी याद आएगी 
अंधेरे छा रहे होंगे के बिजली कौंध जाएगी ..

नदीच्या किनारी बसलेला तो आणि आकाशातून हसत हसत हे गीत गाणारी ती .. तनुजा .. तिचं सुंदर हास्य, तिच्या गळ्यातली मोत्याची माळ ... गाण्याचे काहीसे नकारात्मक शब्द आणि तरीही गाण्याला एकदम वेगळीच, फ्रेश वाटणारी चाल ... या सगळ्यामुळेच अनेक महिन्यांपासून हे गीत असं का आहे .. ही नेमकी चित्रपटातली काय सिच्युएशन आहे याबद्दल खूप खूप उत्सुकता होती. मग हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे इथपासून शोधाशोध सुरू केली... तेव्हा कळलं की चित्रपटाचंही नाव हमारी याद आएगी हेच आहे आणि यूट्यूब कृपेने आज हा चित्रपट निवांत बसून एकचित्ताने संपूर्ण एका बैठकीत पाहण्याचा योग जुळून आला. चित्रपट पाहिल्या बरोबर त्याविषयी लिहावसं वाटलं नाही तर कसं .. त्यामुळे अगदी लगेच आजच्याच सुवर्ण दिनाला या चित्रपटाविषयी ब्लॉग लिहायचाच हातोहात असं ठरवून लिहीती झाले.. 

तनुजा

1961 साली म्हणजे तब्बल एकोणसाठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक कीदार शर्मा (हो म्हणजे केदार असं स्पेलिंग कुठेच नाही त्यांच्या नावाचं .. सगळीकडे के आय डी ए आर असंच स्पेलिंग दिसलंय म्हणून कीदारच बरोबर) तर संगीत दिग्दर्शक आहेत स्नेहल भाटकर.. चित्रपटाचं खास आकर्षण म्हणजे तनुजा .. आणि तिच्या अगेन्स्ट कीदारजींचा मुलगा अशोक शर्मा .. 

गोष्ट सुरू होते उदयपूरपासून .. अशोक नोकरीनिमित्त उदयपूरला येतो आणि त्याच्याच तोंडून त्याची कथा तो आपल्याला सांगायला सुरूवात करतो. नोकरी मिळाली तरी घर मिळवणं, तेही एका नवख्या शहरात .. हे कोणासाठीही कठीणच. तसाच अनुभव अशोकला येतो आणि घर मिळवण्यासाठी त्याला घरमालकिणीशी खोटं बोलावं लागतं. कारणही तसंच असतं म्हणा, भल्या मोठ्या घरात, एक विध्वा स्त्री, जी अगदी लहान वयातच विधवा झालेली असते ती एकटीच रहात असते. अशोक जेव्हा घर शोधत येतो तेव्हा तो भला वाटल्याने ती त्याला आपल्या घरातलीच एक खोली भाड्याने देते. सुरूवातीला काहीशी फटकून वागणारी ती स्त्री नंतर मात्र अशोकच्या चांगुलपणामुळे त्याच्याशी थोडंसं मन मोकळं करते .. तो ही तिच्याशी बोलता बोलता शेवटी, आपलं लग्न झालेलं नसून आपण ही खोली मिळवण्यासाठी केवळ खोटं बोललो हे तिला सांगून टाकतो. पण तोवर तिच्या मनात अशोकबद्दल थोडंस प्रेम निर्माण व्हायला लागलेलं असतं म्हणून ती त्याला तिथे रहाण्याची परवानगी देते. 

चित्रपटाची ही सुरूवात .. ही पाहूनच आपल्याला असं वाटतं, की ही एक घिसीपिटी कहाणी असणार .. की ती विधवा आणि अशोक प्रेमात पडणार, मग ते लग्न करण्याचं ठरवणार .. मग लोकं विरोध करणार .. वगैरे वगैरे ... पण छे .. कथानकात इथेच तर नवं वळण येतं. 
एका विधवा बाईच्या घरी एक पुरूष भाडेकरू हे तत्कालिन समाजाला झेपणारं नव्हतंच, आणि तेच चित्रपटातंही बरोबर गुंफण्यात कथालेखक यशस्वी झाले आहेत. त्या स्त्रीने अशोकला परवानगी द्यावी तिथे रहाण्याची आणि अगदी लगोलगच तिच्या सासूबाई तिला निरोप धाडतात की त्याला नको ठेऊस घरी म्हणून .. आणि तो जाणार नसेल तर तूच थोडे दिवस गावी निघून ये .. आता खुद्द सासूचा निरोप आल्यावर तो कसा टाळणार .. म्हणून बिचारी आपल्या मनातला अशोकविषयीचा नुकताच जन्माला आलेला प्रेमाचा अंकुर मागे टाकून गावी निघून जाते. इकडे अशोक कामानिमित्त नव्यानेच उदयपूरला आला असल्याने एका सकाळी मस्तपैकी फिरायला निघतो. फरीश्तोंकी नगरी में आ गया हूँ .. असं मस्तपैकी गात गात शहरभर भटकताना एका जत्रेत शिरतो... आणि .. रहाट पाळण्यात बसून मस्तपैकी उस खात खात एन्जॉय करत असतानाच अचानक एक अनोळखी नवयुवती त्याच्या शेजारी येऊन बसते. ही नवयुवती दुसरी तिसरी कोणी नसून मनोरमा ( तनुजा ) असते. मनोरमा आणि तिचा छोटा भाऊ जत्रेत नाचगाणी म्हणत म्हणत भुरट्या चोऱ्या करत असताना त्यांच्यामागे पोलीस लागतो. त्याला हूल देताना तिची काही क्षणांची गाठ अशोकशी होते .. आणि ती ही अशी हवेत .. 
मग काय .. अशोक जत्रेत तिचा माग काढतो आणि ती भामटीच .. त्यामुळे त्याच्याशी गोड गोड बोलून आपली करूण कहाणी सांगून त्याच्याकडून थोडेसे पैसे उकळते. नंतर योगायोग असा की पुढल्याच दिवशी ही दोघं भावंडं अशीच काहीतरी भुरटी चोरी करून पळतात तो पोलीसांपासून लपण्यासाठी चक्क अशोकच्याच घराचा आश्रय घेतात. अशोक त्या दोघांना पाहून आश्चर्यचकीत होतो पण तो खूप चांगला असल्याने त्याला या भावंडांची कणव वाटते. तो मनोरमाला म्हणतो, की तू चोऱ्या कशाला करतेस .. त्यापेक्षा तू नोकरी कर .. मी तुला नोकरी देतो .. आज आत्ता या क्षणाला .. तुम्ही दोघं इथेच रहा आणि तू माझ्यासाठी दोन वेळचा स्वयंपाक कर .. हो ना करता करता ती तयार होते. पण ती इतकी काही साधीसुधी भोळी वगैरे नसतेच.. तिला लहान वयातच जगाचे चटके बसलेले असतात. त्यामुळेच अशोकचा हेतू नेमका काय याविषयी ती साशंक असते. पुढे ती त्याला तपासून घेतेच आणि तिच्या त्या प्रश्नाने अशोक चिडतो... पण ते तितकच. कारण, अशोकला तिचे गुण केव्हाच जोखता आलेले असतात. त्यामुळेच तर तो तिचं आणि तिच्या भावाचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी तिची मदत करायला स्वतःहूनच सज्ज झालेला असतो. अगदी थोड्याच दिवसात अशोक आणि तिच्यात एक नातं तयार व्हायला लागलेलं असतं.. विशेषतः त्याला तिच्याबद्दल काहीतरी विशेष असं जाणवायला लागलेलं असतं. 
एकदा तो तिला म्हणतो, की आज संध्याकाळी माझ्या ऑफीसमधला माझा मित्र प्यारेलाल आपल्याकडे जेवायला येणार आहे.. तर तू काहीतरी छानसा स्वयंपाक करून ठेव आमच्यासाठी. ती होकार देते आणि मग संध्याकाळी त्यांची वाट पहात बसते. काहीशी अवखळ, अल्लड आणि परिस्थितीमुळे गैरमार्गाला लागलेली ती ... असं एकंदरीत मनोरमा हे पात्रं आणि तिचा लहान भाऊ जरी तिच्या प्रत्येक मताशी सहमत असलेला तरीही स्वतंत्रपणे विचार करू शकणारा, परखड असा छोटा मुलगा. 
अशोक आणि प्यारेलाल त्या संध्याकाळी घरी येतात तोच दारातच लावलेलं हरीणाचं स्टॅच्यु डोक्यावर पडल्याने प्यारेलाल झटक्यात बेशुद्ध पडतो.. काहीतरी विचित्रच घडतं. अशोक घाबरून डॉक्टरला आणायला निघतो. तो जातो आणि इकडे ही दोघं भावंड नाना उद्योग करून प्यारेलालला शुद्धीत आणतात. तो भानावर येतो आणि त्याची नजर या अवखळ पण नितांत सुंदर, लोभस आणि नृत्यगाणं येत असलेल्या मनोरमावर पडते. आता तो तिची गरज ओळखून तिला जाळ्यात फासण्याचा प्रयत्न करायला लागतो. त्यासाठी तिची खोटी स्तुती करतो.. तिला सांगतो, मी तुझे फोटोज काढून माझ्या भावाला पाठवेन .. तू इतकी गुणवान आहेस की तुला पिक्चरमध्ये नक्की काम मिळेल आणि तू रातोरात स्टार होशील बघ .. तुला नाचता गाता येतं नं .. मग एक झलक तर दाखव आज मला असं म्हणताच ती बिचारी त्याच्या स्तुतिसुमनांनी हुरळून जाते आणि चक्क त्याच्यासमोर आपली अदा दाखवण्यासाठी नाचते गाते ... 
दिल तोडके जाना है ... मुख मोड के जाना है ..
हे सगळं सुरू असतानाच तिथे अशोक येतो.. आपल्या मित्रासमोर, एका अनोळखी पुरूषासमोर नाचणारी ही मुलगी, जी आता आपली प्रेयसी आहे .. जिच्याशी लग्न करण्याचं स्वप्न आपण पहातोय तिचं हे असं वागणं पाहून तो जागीच स्तब्ध होतो. गाणं संपतं तशी अशोकची आणि तिची नजरानजर होते पण ती भाबडी .. आणि परिस्थितीने गांजलेली .. तिला अशोकच्या त्या नजरेतलं सत्य कळतं पण तिचं भाबडं मन अगदी सहजच प्यारेलालने दाखवलेल्या सुखस्वप्नांकडे आकृष्ट होतं. अशोकच्या समोरच मन्नीचा हात हातात घेऊन प्यारेलाल तिला आणखी स्वप्न दाखवतो आणि ती सहजी त्याच्या जाळ्यात ओढली जाते. प्यारेलाल निरोप घेऊन निघताना तिच्या हातात काही कोऱ्या नोटा दाबतो तर ती भाबडी त्याही स्वीकारणार असते तितक्यात अशोक मध्ये पडतो आणि त्याला दोस्ती का वास्ता देत .. ते पैसे नाकारतो. तो निघून गेल्यावर मन्नीला अशोकच्या रागाचा सामना करावा लागणं सहाजिकच असतं. ती त्याच्या भवती भवती करते नेहमीप्रमाणे पण आज तो तिला सुनावतो .. तू मला काही बोललीस तर मी समजू शकतो, पण लोकांसमोर तू माझी बेज्जती करशील तर मला चालणार नाही.. इज्जत मुझे जानसे प्यारी है .. मै भी तो तुम्हारे बेहेतरी के लिये चोटी का जोर लगा रहा हूँ .. लेकीन मै तुम्हे नाचनेगानेवाली अॅक्ट्रेस के रूपमें नहीं बल्की एक घरेलू और सुशील औरत के रूपमें देखना चाहता हूँ .. कभी मेरा ये सपना पूरा होने दोगी के नही.. ? असं जेव्हा तो तिला ठणकावून सांगतो तेव्हा तिला तिची चूक उमगते. आता तिला अशोकचा चांगुलपणा कळतो. 
पण इकडे, प्यारेलालनी जाळं विणायला सुरूवात केलेली असते. तो अशोकला एक दिवसासाठी कंपनीच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात पाठवतो. अशोक जातो आणि प्यारेलाल हीच संधी साधत मन्नीला भेटायला अशोकच्या घरी जाऊन धडकतो. मन्नीला आणखी स्वप्न दाखवत, तिला तिचे फोटो काढू देण्यासाठी विनवतो.. त्या दिवशी तरी मन्नी त्याला टाळण्यात यशस्वी होते. अशोक लवकर यावा आणि त्याने आपल्याला या माणसापासून वाचवावं असा देवाचा धावा करत असतानाच अशोक येतो आणि तिची अवस्था पाहतो. त्या क्षणी दोघं एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार करतात. अशोकची ख्यालीखुशाली विचारणारं पत्र घरमालकिणीने पाठवलेलं असतं आणि त्याचंच उत्तर लिहीताना, अशोक त्यांना तातडीने बोलावून घेतो आणि पत्रात मन्नीशी लग्न लावून द्या माझं अशी विनंती करतो. याचं कारण, अशोकला आणि मन्नीला, दोघांनाही या जगात कुणीच नसतं. 
प्यारेलाल मात्र टपलेला असतोच.. तो आता अशोकला आठवडाभराच्या टूरवर पाठवतो .. सक्तीनं.. अशोक नकार देत असतो पण प्यारेलाल त्याला पटवतो.. अरे तू कुठे त्या मन्नीसाठी स्वतःचं करीयर बर्बाद करतो आहेस.. अशा दहा मन्नी मिळतील तुला असं काहीबाही बोलून त्याला टूरवर जाण्यास भाग पाडतो. अशोक मात्र, त्याच्या बोलण्याला भुलत नाही पण टूरवर न जाण्याचं कोणतंच दुसरं कारण नसल्याने त्याला दुसऱ्या दिवशी पहाटेची फ्लाईट पकडणं भागच असतं. संध्याकाळी तो घरी येतो तोच काहीसा नाराजीच्या मूडमध्ये.. इकडे मन्नी आणि भुलवा (तिचा भाऊ) अशोकने फिरायला नेण्याचं प्रॉमिस केलेलं असल्याने तयार होऊन त्याची वाट पहात असतात. पण आज अशोकचा मूड नसतो.. तो बाहेर जायला नाही म्हणतो तशी मन्नी त्याच्यावर नाराज होते.. चिडते आणि त्याच्याशी अबोला धरते. तो सांगायचा प्रयत्न करतो तर ती काही ऐकून घेतच नाही.. रात्र अशीच रूसव्यात सरते. दुसऱ्या दिवशी फ्लाईटच्या वेळेवर तयार होऊन अशोक निघतो आणि निघताना भुलवाला जागं करून, नीट सांगून त्याचा निरोप घेतो. मन्नीला नेमकी उशीरा जाग येते त्यामुळे ती उठल्यावर जेव्हा तिला अशोक आठवडाभरासाठी गावाला निघून गेल्याचं कळतं तशी ती आणखीच अपसेट होते. आपल्याला न सांगता, न उठवता अशोक गेला याचा राग मनात असतो त्यामुळेच ती भुलवाला सांगून बाहेर फिरायला जाते. मनातून खूप डिस्टर्ब झालेली ती घरातून निघते आणि स्वतःच प्यारेलालला भेटते. त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करते आणि आयत्या टपलेल्या लांडग्याचा हेतू बरोबर साध्य होणार अशी चिन्ह दिसल्याने गोड गोड बोलत प्यारेलाल तिला आपल्या घरी घेऊन जातो. देखना मै तुम्हे कहाँसे कहाँ पहुँचा दूँगा अशी स्वप्न दाखवत आपल्या घरी तिला फोटोशूटसाठी तयार करतो. घरीच तिच्या वयाची असलेली एक मुलगी, जी प्यारेलालच्या अशा कामात कदाचित नेहमीच मदत करत असते ती मन्नीला छान सजवते आणि मग, बदाम शरबत प्यायला देऊन त्यातून मन्नीला काहीतरी नशायुक्त पदार्थ पाजतात.. मन्नीला शंका येतेच पण तिथे ती मुलगीही असल्याने ती विश्वास ठेवते. मग काय भराभर बदाम शरबताचे पेले रिचवत, आपल्या स्टार बनण्याची स्वप्न पहात मन्नी तिथे खोलीत आता एकटीच उरते आणि हळूहळू तिच्यावर त्याचा असरही व्हायला लागतो. 
इतक्यात हिरोची एन्ट्री होते.. अर्थात अशोक कसा कोण जाणे त्याक्षणी  प्यारेलालच्या घरी पोहोचतो. प्यारेलाल मनातून चरकतो.. अशोकला विचारणा करतो, तू इथे कसा काय ... त्यावर अशोक म्हणतो, माझी फ्लाईट मिस झाली आणि माझ्या अंगात आता तापही चढलाय त्यामुळे मी टूरवर जाऊच शकलो नाही.. तू ऑफीसला नव्हतास म्हणून मी तुझ्या कानावर ही गोष्ट घालायला शेवटी इथे आलो. प्यारेलाल आपले कुहेतू साध्य करण्याच्या अगदी जवळ आला असल्याने अशा वेळी अशोक टपकल्याने त्याला कसंबसं तिथून कटवतो. अशोक घरी येतो तो तापाने फणफणतच .. तो मन्नीची चौकशी करतो तेव्हा त्याला ती सकाळपासूनच बाहेर गेल्याचं भुलवा सांगतो. मग काय .. जणू अघटीताचे संकेत मिळाल्याप्रमाणे ती दोघं तातडीने मन्नीला शोधायला निघतात. इकडे प्यारेलालने तिला बिचारीला भरपूर नशा करवून जत्रेत फिरायला आणलेलं असतं.. निव्वळ तिचा विश्वास संपादन करायचा म्हणून ... आणि जणू तो तिची सगळी स्वप्न पूर्ण करणारा फरीश्ताच असल्याचं तिला भासवायचं म्हणून .. मग तो काय करतो, तिला मेरीगोराऊंडवर बसवतो.. तिथे कोणीच नसतं कारण वेळ संपलेली असते पण तो जास्तीचे पैसे देऊन ते सुरू करायला लावतो आणि आता त्या गोल गोल फिरणाऱ्या नकली घोड्यांच्यामध्ये एका घोड्यावर बसून मन्नी नशेच्या अवस्थेत वाट्टेल ते बडबडायला लागते.. लोकं जमा होतात .. सगळ्यांसमोर तिचं हसं होत असतं.. तितक्यात अशोक आणि भुलवा तिथे पोहोचतात. अशोकला हे सगळं पाहून खूप दुःख होतं. तो तिला थांबवतो.. तिला बोलावतो.. घरी जाऊया म्हणतो पण ती तिला त्याचं बोलणं कळतंही नसतं इतकी ती नशेत असते. प्यारेलाल अशोकला हाकलायला जातो तर दोघांचे दो दो हाथ होतात .. मारमारी इतकी होते की शेवटी मन्नी अशोकला वाट्टेल ते बोलते आणि त्याचा अपमान करून तिथून निघून जायला सांगते. अशोकला अतीव दुःख होतं.. भुलवा आज आपल्या बहिणीला पहिल्यांदा बोलतो की तुझं चुकतंय .. आणि तुझ्यासारखी नीच व्यक्ती माझी बहीण असूच शकत नाही.. असं म्हणून ती दोघंही तिथून निघून जातात.. 
घरी येत नाही तो अशोक गर्भगळीत होतो.. आता त्याच्या अंगातलं त्राण तर गेलेलच असतं आणि मनही पार कोमेजून गेलेलं असतं... त्या रात्री मन्नी प्यारेलालकडेच जाते .. ते अशोकला सहन होणार ते कसं..
अशोक बिचारा हरल्यासारखा जड पावलांनी सगळ्या लोकांसमोर झालेला आपला तमाशा सहन करत तिथून घरी परततो... 
दुसऱ्या दिवशी तो त्याच नदीच्या काठावर जातो जिथे त्यानं मन्नीसोबत सुखस्वप्न पाहिलेली असतात .. आणि आज ती त्याच्याबरोबर नसते. त्याला वाटायला लागतं जणू ती आता त्याच्यावर हसतेय .. त्याला शाप देतेय .... 

ये बिजली राख कर जाएगी तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आएगी ..

कभी तनहाईयों में यू हमारी याद आएगी
अंधेरे छा रहे होंगे के बिजली काँध जाएगी 

अशोक आता आसन्नमरणावस्थेत जातो. इकडे त्याची घरमालकीण बिचारी त्याचं लग्न लावण्या हेतूने येते तो समोर हे सगळं दृश्य पहाते.. तिला खरंतर अशोक मनातून खूप आवडलेला असतो पण त्यांची गोष्ट तर कधी प्रत्यक्षात उतरणार नाहीच हे ती जाणून असते.. मग ती अशोकची काळजी घ्यायला सरसावते..
इकडे मन्नीची नशा उतरल्यावर तिच्या लक्षात येतं आपण किती मोठी चूक करून बसलो ते .. मग ती प्यारेलालच्या घरून पळून जाते ती थेट अशोकला भेटायला त्याच्या घरी येते. अशोक बिछान्यावर झोपलेल्या अवस्थेत असतो .. त्याला पाहून ती त्याची मनापासून क्षमा मागते.. मी तुमच्या पायावर डोकं ठेवते पण मला माफ करा.. एवढे नका रागवू माझ्यावर .. काय आता तुम्ही जन्मभर माझ्याशी बोलणार नाही का बाबुजी .. आणि हे म्हणतानाच ती त्याचा हात हातात घेते तो तिला जाणवतं .. बाबूजी केव्हाच देवाघरी गेले. 
प्यारेलाललाही जेव्हा ही बातमी कळते तेव्हा त्याच्याही पायाखालची जमीन सरकते ..
चित्रपट संपतो आणि शेवटच्या फ्रेममध्ये मन्नी आणि भुलवा आपलं सामान घेऊन पुन्हा कुठल्यातरी दुसऱ्या शहराच्या दिशेने जाताना पाठमोरे दिसत रहातात ...

( सौजन्य गुगल साभार )


एक प्रेमकहाणी .. जी आपल्या मनात घर करून जाते. 
प्रेमासारखी अत्युच्च भावना.. जिला माणूस कोण, कुठल्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या अन्य परिस्थितीत वाढलेला या कश्शाकश्शानेही फरक पडत नाही .. अशी भावना मानते ती केवळ दोन मनांचं मीलन .. पण अशोकच्या वाट्याला तेही पूर्णत्वाने येत नाही. मन्नी आपल्या स्वप्नांच्या दिशेने जाताना जो अयोग्य मार्ग निवडते, आणि त्यापेक्षाही जाता जाता ती अशोकवर जी चिखलफेक करून जाते खरंतर त्याने तो कोसळतो. त्याला स्वतःबरोबरच तिचंही जे नैतिक अधःपतन होतं ते पहावत नाही. कारण, तो सच्चा असतो .. तो पवित्र असतो. त्याच्या भावना तिच्याप्रती अत्युच्च दर्जाच्या आणि पवित्र असतात .. पण हे ती छछोर मुलगी काय समजणार .. आणि समजेपर्यंत हातातून वेळ गेलेली असते.. कायमची..
आयुष्याचं हे असंच आहे. हाताशी आलं म्हणता म्हणता कधी मुठीतून निसटून जाईल हे कोणालाच सांगता येणार नाही. मग माणूस काय करू शकतो तर ते इतकंच की हातात जे क्षण आलेत ते सुखाने मनापासून जगू शकतो आणि त्याआधारे भविष्य रंगवू शकतो. 
कधीकधी वाटतं, जर हेच आयुष्याचं सत्य आहे तर मग माणसाला भविष्य रंगवण्याची आस का लागून रहाते... 
का त्याला सतत काहीतरी हवं असतं, आणि कसलाच शोध न घेणाऱी माणसं मग कोणालाच नकोशी तरी का होतात .. 
या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मला सापडलेली नाहीत ..
मला हा चित्रपट पाहून केवळ एकच गोष्ट समजली ती म्हणजे, शेवटी माणूस कोणाच्या आठवणीत कसा राहून जातो तेच खरं ... म्हणून तर चित्रपटाच्या नावातच सगळा मथितार्थ दडलाय... हमारी याद आएगी ..
तनुजाबद्दल जाता जाता स्वतंत्रपणे लिहीलं नाही तर ही पोस्ट अर्धवटच राहील .. कारण, तनुजाजींचा अभिनय, आवाज, त्यांचं दिसणं आणि त्यांची एकंदरीतच सगळी शैली इतकी अफाट सुंदर झालीये या चित्रपटात की कृष्णधवल चित्रपट असूनही तनुजा किती सुंदर आहेत ते या चित्रपटात कळतं. मुख्य म्हणजे, साधे छान नीटनेटके पंजाबी ड्रेस आणि त्यावर नेटची ओढणी हा पेहराव तर इतका खुललाय की आहाहा .. 
तो बालकलाकारही फारच ताकदीचा आणि तसंच अशोक शर्माही फारच चांगला अभिनय, देहबोली यामुळे लक्षात राहून जातात. 
मुबारक बेगम यांच्या आवाजातील कभी तनहाईयोंमे हे गाणं, तसंच शेवटी मुकेशजींच्या आवाजातलं आँखोंमें तेरी याद लिये जा रहा हूँ मै .. दिलसे तुम्हे दुवाए दिये जा रहा हूँ मै .. गाणं ऐकताना डोळे पाणावतात.. 
खरंतर संपूर्ण चित्रपट पहाण्यासारखा आहेच पण मला त्यातलं एक दृश्य फारच आवडलं ते म्हणजे, ज्या दिवशी अशोक मन्नीला न सांगता सकाळीच टूरवर जातो, त्यादिवशी मन्नीला उशीरा जाग येते. ती उठते तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात दहा वाजून पाच सात मिनीटं झालेली असतात. मग तिची लगबग होते. हे सगळं काही दिग्दर्शकानी त्या घड्याळाच्या माध्यमातून चित्रीत केलंय ते दृश्य खरंच बघण्यासारखं आहे. दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांच्या कल्पकतेची पोहोच कुठवर आहे ते अशा छोट्या छोट्या दृश्यांमधूनच जाणकार प्रेक्षकाला चुटकीसरशी लक्षात येत असतं. 

तर ... हा लेख खूप मोठा झालाय हे खरं असलं तरीही हा लेख संपादित करावा असं मला अजिबात वाटत नाही.. कारण काही काही चित्रपटच असे असतात ना .. भरभरून ज्यांच्यावर लिहावं असे ... 
सो .. लेख कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा... 


Translate

Featured Post

अमलताश