कोणत्याही गाण्याचा प्रवास नेमका कसा कसा होतो त्या सर्व टप्प्यांची बारकाईने ओळख या कार्यशाळेत कौशलजींनी करून दिली. एखादं गाणं, एखादी कविता कशी सुचते, त्याला चाल कशी लावली जाते, त्या चालीचं गाण्यात रूपांतर होत असताना संगीतकारांचा नेमका काय विचार असतो, त्या विचाराची पार्श्वभूमी काय असते, कोणत्या गाण्यासाठी कोणती आणि कशी सुरावट वापरावी, नेमका कसा वाद्यमेळ वापरावा हा सगळा सगळा विचार संगीतकार कसा करतो हे खुद्द एका अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू अशा संगीतकारानंच थेट उलगडून दाखवावं आणि आपल्याला ते घरबसल्या जाणून घेता यावं यातलं सुख एखाद्या संगीतप्रेमी माणसालाच अधिक प्रकर्षाने आकळेल ..
दोन दिवस तब्बल तीन साडेतीन तास आम्ही कौशलजींशी या विषयावर ऑनलाईन बोलत होतो, प्रश्न विचारत होतो आणि हंसिकाजींच्या त्या अनुषंगाने येणाऱ्या काही सुरावटींचा आस्वाद घेत होतो. आम्ही तब्बल पंधरा जणं जगाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यशाळेला आनंदाने उपस्थित होतो. तांत्रिक अडचणी तर येत होत्याच थोड्याफार पण तरीही त्या सोडवत आम्ही मुख्य विषयाचा आनंद घेऊ शकलो हेच फार महत्त्वाचं..
माझ्यासारखी मुलगी जिला बोलायला आवडतं, जिला गाणं येतं आणि जिचं गाण्यावर मनापासून प्रेम आहे आणि जिला एकंदरीतच आयुष्यात सगळं काही करायचं आहे .. ती मुलगी अशा कार्यशाळेचा भाग झाल्यावर न बोलता, तिचे अनुभव न शेअर करता गप्प बसेल ती कसची .. ( हाहा )
त्यामुळेच अगदी सुरूवातीपासूनच माझं बोलणं आणि प्रश्न विचारणं सुरू होतंच.. पण कार्यशाळेतल्या काही गोष्टी ज्या कौशलजींकडून मी शिकले त्याबद्दल थोडक्यात माझ्या ब्लॉगवर मी लिहीणार आहेच. याचं कारण म्हणजे, ब्लॉग हे एकप्रकारचं डॉक्युमेंटेशनच असतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं, आणि तसंच, अनुभवांचं .. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी अनुभव लिहीते, स्वतःचं आणि इतरांच जगणं लिहीते आणि तसंच मला लेखनाच्या माध्यमातून शक्य होईल तशी इतरांना वेळोवेळी मदतही करतेच. अलिकडेच ब्लॉगची रीडरशिप वाढल्याने ब्लॉगवर काही जाहिरातवजा मजकूरही सुरू केलेला आहे परंतु तो सगळा मजकूर प्रसिद्ध करताना माझ्या ब्लॉगच्या वाचकांची आवडनिवड लक्षात घेऊनच त्यांच्या उपयोगी माहिती ब्लॉगवर मी प्रसिद्ध करत आहे.
तर .. मुळ मुद्दा .. कार्यशाळेबद्दल थोडंस ..
दिवस पहिला -
एखाद्या गाण्याविषयी बोलण्यापूर्वी आम्ही अगदी बेसिक्सपासूनच सुरूवात केली. कौशलजींनी आम्हाला एक मस्त ऑनलाईन क्विझ सोडवायला दिली होती. त्यानंतर अगदी संगीत म्हणजे काय इथपासून आमची सुरूवात झाली. संगीताची व्याख्या, गाण्याची व्याख्या, गाणं म्हणजे काय, संगीताचे प्रकार कोणकोणते याविषयी आम्हाला त्यांनी सविस्तर माहिती दिली. खरंतर मला या सगळ्याविषयी आणखीन सविस्तर लिहायला आवडलं असतं परंतु, ही कार्यशाळेशी गद्दारी होईल म्हणून मी तसं करणार नाही. या लेखात मी कार्यशाळेतील तपशिल लिहीणं अयोग्य ठरेल .. म्हणूनच मी तो लिहीणं इथे जाणीवपूर्वक टाळणार आहे.
दिवस दुसरा -
या दुसऱ्या दिवसाची खरंतर मला खूप उत्सुकता होती. कारण, आज आम्ही प्रत्यक्ष गाण्यांच्या अॅनेटॉमीविषयी (जडणघडणीविषयी) ऐकणार होतो. माझ्याकडे नेमका या दिवशीच थोडावेळ इंटरनेटचा प्रॉब्लेम आल्याने काही मुद्दे ऐकताच आले नाहीत परंतु तरीही काही गाण्यांची जडणघडण ऐकायला मिळाली हेही नसे थोडके. त्यातलं एक गाणं म्हणजे, बडे अच्छे लगते है .. हे गाणं ऐकताना आपल्याला नेहमी रिलॅक्स वाटतं.. सूदींग वाटतं आणि शिवाय हे गाणं म्हणताना आपण ज्या व्यक्तिसाठी ते म्हणतोय त्या व्यक्तीला त्या गाण्यातून व्यक्त केलेल्या प्रेमभावना थेट पोहोचतात. हे सगळं कसं शक्य झालंय तर या गाण्यातील प्रत्येक शब्दासाठी संगीतकाराने योजलेले सूर, या सुरांच्यावर स्वार होऊन उच्चारले जाणारे शब्द आणि त्या प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार ज्यातून त्या शब्दांची भावना थेट व्यक्त होईल हा समग्र विचार हे गीत बांधताना केला गेलेला आहे.. आणि अर्थातच प्रत्येक असं गाणं जे ऐकणाऱ्याच्या मनाला जाऊन भिडतं, त्या गाण्याच्या यशामागेही हेच कारण असतं.
खरंतर, कार्यशाळेतील अनेक बाबींविषयी लिहिण्याचा मोह होतोय .. परंतु, मी तसं करणार नाही. कारण, कुछ बाते एहेसास करनेकी चीझ होती है .. !!
- मोहिनी घारपुरे - देशमुख
कार्यशाळेची ही काही खास क्षणचित्रे तुमच्यासाठी -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा