'एक अत्यंत दुर्दैवी चित्रपट ..!' असं या चित्रपटाबद्दल नेहेमीच मनात येत राहील याचं कारण तुम्ही सारे जाणताच...!!
' माझे मरण पाहिले मी याचि देही याची डोळा '
या पंक्ती कधीतरी कुठेतरी वाचल्या होत्या... आणि या चित्रपटाची आणि त्यातील हिरो, सुशांतसिंग राजपूतच्या खऱ्या जीवनाची कथा जेव्हा साधर्म्य साधणारी असल्याचं पाहिलं तेव्हा थरकाप झाला. या माणसाने स्वतःच स्वतःच मरण जणू चित्रपटात आधी कितीवेळा जगलं आणि जीवनानेही त्याला तितक्याच लवकर मरण देऊन मोकळं केलं.
एखाद्याच्या मरणानंतर पुन्हा त्याच्या मरणाची कथा .. चित्रपटातही आणि प्रत्यक्षातही.. इतकी चर्चिली गेली की हा माणूस जाता जाता बस्स लाखो काळजांची तार छेडून गेला. आज हा ब्लॉग लिहीणं महाकठीण वाटतंय, कारण, चित्रपटाची कथा लिहू की सुशांतची कथा लिहू हेच कोडं उलगडत नाहीये. एरवी चित्रपटांविषयी लिहीताना मी वाचकांना तो संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर घडावा अशा पद्धतीने लेखन करत असते .. पण दिल बेचाराविषयी लिहीताना मात्र सुशांतविषयीच अधिकाधिक लिहावं असं मनाला वाटतंय. कारण, तो तसं पाहिलं तर आपला कोणीच नव्हता, पण तरीही तो आपला हिरो होता. छोट्या गावाहून मोठ्या शहरात येत स्वतःची छाप सोडत त्याने बॉलीवूड गाजवलं होतं..त्याची मेहनत, त्याचा संघर्ष, त्याचा प्रवास आणि त्याचं घवघवीत यश .. सारं काही आपल्याला दिसत होतं आणि आपण त्याचे मूक साक्षीदार होतो.. पण या मुलानं कसल्यातरी प्रचंड मानसिक तणावाखाली स्वतःशी झगडताना आत्महत्या केली यावर अजूनही विश्वास बसत नाही. देखणा, उमदा, हसरा आणि निरागस असा सुशांतसिंग अजूनही मोहवतोय.. अजूनही खुणावतोय..
त्याला शेवटचं डोळे भरून पहावं म्हणून त्याचा 'दिल बेचारा' पाहिला. शिवाय, तो चित्रपट प्रेक्षकांसाठी इंटरनेटवर फ्री उपलब्ध करून देण्याचा शहाणपणा त्याच्या मित्रांनी केला त्यामुळे तो लगेच पहाणंही सहज शक्य झालं.. म्हणून हा चित्रपट पाहिला आणि पुन्हा एकदा अक्षरशः काळीज हललं.. त्याच्यासाठी जणू आतडं पिळवटून आलं.. डोळे भरून आले .. कंठ दाटून आला.. !!
त्याने रंगवलेला 'मॅनी' .. केवळ अप्रतिम.. !
त्याचं नृत्य, त्याचा रोमान्स, त्याचं कमावलेलं शरीर .. केवळ डोळे भरून पहात रहावं असं.. कोणत्याही मुलीनं त्याच्या क्षणात प्रेमात पडावं असा 'सुशांतसिंग'..
त्याची या चित्रपटातली हिरॉईन, बाकीचे कलाकार.. सगळं ओकेच.. छानच.. पण हा मॅनी .. हा आपल्याला रडवून गेला यार .. !
तो जेव्हा त्यालाही कॅन्सर असून त्यात त्याने पाय गमावल्याचं सांगतो तो सीन.. चटकन मनाला लागतो.. आणि चित्रपटात पुन्हा मॅनी त्याच्या नेत्रहीन मित्रासाठी त्याचा चित्रपट पूर्ण करतो ती सगळी दृश्य .. त्याचा अपमान करणारा अभिमन्यू वीर (सैफ अली खान) जो त्या किझ्झीचा (संजना) आवडत्या गाण्याचा संगीतकार, गीतकार असतो तो भेटतो तो सीन ... हे सगळं मॅनीसारखंच सुशांतच्या खऱ्या आयुष्याशी इतकं रिलेट व्हावं आणि तेही इतक्या झटपट .. हे किती दुर्दैवी म्हणायचं ..
मी चित्रपटाचं कथानक पुन्हा सांगणार नाहीये कारण, त्याबद्दल एव्हाना अनेक जणांनी लिहीलंय. पण तरीही मी त्या प्रसंगांबद्दल लिहीतेय, जे प्रेक्षक म्हणून आपल्या काळजाला चिरत जातात.
संपूर्ण चित्रपटातले दोन तीन प्रसंग .. एक जेव्हा मॅनी थिएटरमध्ये एकटाच पिक्चर पहात असतो आणि एकाएकी त्याला त्रास व्हायला लागतो. तो किझ्झीला कसाबसा फोन करून बोलावतो आणि ती त्याच्यासाठी धावत येते. अंधाऱ्या थिएटरमध्ये पाठमोऱ्या मॅनीला ती क्षणात ओळखून त्याच्यापाशी पोचते तो मॅनीला पोटातून, छातीतून रक्तस्त्राव सुरू झालेला असतो, तो वेदनांनी तळमळत असतो... हा सीन पहाणं असह्य होऊन जातं. 'किती बटबटीत केलाय हा सीन दिग्दर्शकानं !' असं मलातरी क्षणभर वाटून गेलं. तसाच तो दुसरा चर्चमधला सीन .. आपण आता थोड्याच दिवसात मरणार हे कळल्यानंतर मॅनी आपल्याच फ्युनरलची भाषणं देण्याची तयारी आपल्या गर्लफ्रेंडकडून आणि मित्राकडून करून घेतो .. आणि तेही हसत हसत..
हे पहाताना फार फार वाईट वाटलं.. डोळे भरून आले.
किझ्झीचा, तिच्या फेव्हरेट म्यूझिशिअनला भेटण्यासाठी प्रवासाला जाण्याचा हट्ट पूर्ण करावा म्हणून शेवटी मॅनी मधे पडतो आणि तिच्या आईवडीलांना पटवतो.. तेव्हा भर पावसात झोक्यावर बसून तिच्या वडीलांना आपल्या आयुष्याची थिअरी ऐकवणारा मॅनी सुशांतनं असा काही रंगवलाय .. की जणू हे सगळं मॅनी नव्हे तर सुशांतच बोलतोय.. स्वतःविषयीच सांगतोय आपल्या प्रेक्षकांना .. असं वाटून जातं..
मॅनी तिच्या वडीलांना सांगतो, "अंकल मै बहुत बडे बडे सपने देखता हूँ, लेकीन उसको पूरा करने का मन नहीं करता .. किझ्झीका तो बस एक छोटासा सपना है उसे पूरा करने का बहोत मन कर रहा है .. आय नो इट्स सिली (silly) .. इस हालत में पॅरीस जाना.. इट्स अ बीट सिली ( silly ) .. पर किसीका सपना पूरा हो ना उस सिली (silly) की बात ही कुछ और है ... "
सुशांतनीही स्वतःच्या स्वप्नांची शिडी अशीच चढली होती.. एका लहानशा गावातून स्वबळावर मुंबईत येत बॉलीवूडचा हिरो बनणं अजिबातच सोपं नाहीये.. पण त्याने आपली स्वप्न पूर्ण केली होती. जिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना पृथ्वीवर जमीन घेणंही कठीण तिथं या हिंमती तरूणाने स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या, कष्टाच्या जोरावर थेट चंद्रावरही जमीन घेतली होती.. घरातल्या मोठ्या टेलिस्कोपमधून तो अंतराळाकडे नजर लावून अभ्यास करत त्यात रमत असायचा.. आणि मग .. जेव्हा पृथ्वीवरल्या त्याच्या क्षेत्रातल्या सुमार बुद्धीच्या लोकांकडून त्याचा जाहीर अपमान झाला त्यानंतर त्याचा सेल्फ एस्टीम हलला असावा .. हे जग त्याच्यासारख्या ' शुद्ध देसी रोमान्स' करणाऱ्या मुलाच्या स्वप्नांचा असा गळा दाबून टाकणारं आहे हे कदाचित त्याच्या लक्षात आलं असावं .. म्हणूनच की काय त्याच्यासारखा हसरा, कष्टाळू आणि लोकांची दाद मिळवणारा हिरो शेवटी हरल्यासारखा दिसायला लागला असावा.. कुटुंब, पैसा, प्रेयसी .. सगळं काही असूनही माणूस स्वतःच्या मनानी थकला, हरला की मग त्याला हे जगणंच मुळी शिक्षा वाटायला लागते. त्यात पुन्हा यशस्वी आणि नशीबवान माणूस असला की त्याला छळणारे, त्याचे अहीत चिंतणारे लोक आपसूकच निर्माण होतात. मग निरनिराळ्या प्रकारे या स्टारचं मानसिक, आर्थिक शोषण होत जातं. बरेचदा हे सगळं सहेतूक करणारेच स्टारला येऊन चिकटतात, स्वार्थासाठी.. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी ..
' स्वार्थाच्या बाजारात किती पामरे फिरतात ...'
'असतील शीते तर जमतील भुते '
म्हणतात ना, अगदी तसंच... !
सुशांतच्या मृत्यूचं गूढ अजूनही उलगडत नाही.. हे सुद्धा दुर्दैवीच...!
आज सतत त्याच्या मृत्यूविषयी उलटसुलट चर्चा, त्या चर्चांमध्ये फसलेली त्याची गर्लफ्रेंड, तिच्याविषयी 'विषकन्या' वगैरे बोललं जाणं, आणि येत्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या मृत्यूचं होत असलेलं राजकारण .... हे सगळं पहाताना, सामान्य प्रेक्षक आणि सुशांतची फॅन म्हणून मनात येतं... बाबा रे ..त्यापेक्षा एक चिठ्ठी लिहून गेला असतास तर किती सोपं झालं असतं नै सगळं ..? किमान चिठ्ठीत तरी लिहायचं होतंस की तुला नेमकी कोणाची, कशाची भीती वाटतेय, कोण तुला त्रास देतंय ..वगैरे वगैरे आणि जाता जाता, दोन दोन ओळी आपल्या वडीलांसाठी, आपल्या बहिणींसाठी आणि आपल्या चाहत्यांसाठी लिहायच्या असत्या .. म्हणजे सोपं झालं असतं रे सगळ्यांसाठीच... !
पण छे .. इन्सान चाहता कुछ और है .. होता कुछ और है ..
पवित्र रिश्तामधला मानव म्हणून जेव्हा तू टीव्हीच्या पडद्यावर झळकला होतास ना सुशांत अरे तत्क्षणी मोस्ट एलिजीबल बॅचलर म्हणून लाखो तरूणींना तू मोहून घेतलं होतंस .. तुला माहीती होतं ना तू कोण आहेस आणि लोक तुझ्यावर किती प्रेम करतात .. की तुला हे देखील माहिती नव्हतं .. कोणास ठाऊक ..
'आपुल्या हाती नसते काही हे समजावे ..' हेच खरं..!
आता एकच आशा आहे, तुझ्या ज्या चार पाच डायऱ्या पोलीसांना तुझ्या खोलीतून मिळाल्या आहेत, त्यात तरी काहीतरी तू लिहीलेलं असावंस म्हणजे आम्हाला तुझ्या या कृत्याचं कारण कळेल आणि तुझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींना कडक शिक्षा होईल.. असं जर खरंच झालं नं तरच आमच्या मनाला समाधान लाभेल...
तोवर मात्र तू तुझ्यासारखाच आमचाही दिल बेचारा करून गेला आहेस इतकंच जाता जाता म्हणेन...
जिथे कुठे आहेस तिथून जर हा ब्लॉग वाचता येत असेल तर नक्की वाच .. मग तुला कळेल की आम्ही सगळे तुझ्यावर किती प्रेम करायचो.. कदाचित या आमच्या प्रेमापोटी तुला परत येणं शक्य असेल तर ये .. वुई ऑल मिस यू सुशांतसिंग राजपूत ..
अ ग्रेट सॅल्यूट टू यू अँड युअर एफर्ट्स ..
अँड चीअर्स टू युअर सक्सेस इन फिल्म इंडस्ट्री ..
थांबते .. !!
- मोहिनी घारपुरे - देशमुख
copyright@mohineegharpure
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा