चाँद की चाल भी खफासी हुई ..
रात की आँख भी शराबी है
सारी कुदरत नशेमें है जब चूर ..
अरे मैने पी ली तो क्या खराबी है ...
सावन के महीने में ...
एक आग सी सीने में ..
लगती है तो पी लेता हूँ ..
दो चार घडी जी लेता हूँ ...
असं गुणगुणत एक उमदा तरूण दारूच्या बाटलीशी (जणू) बोलत बोलत दारूचा आनंद घेत उशीरा रात्री रस्त्यातून चाललेला असतो.. कोण असतो तो तरूण .. ? ज्याला घरादाराची शुद्ध नसते .. आपल्या माणसांची चिंता नसते आणि स्वतःची तर त्याहूनच नसते... इतक्यात त्याची आई त्याला शोधत शोधत तिथे येते आणि आपल्या उमद्या पोराला असं रात्रीबेरात्री दारूच्या नशेत रस्त्यावर झिंगत .. नाचत गात असताना पहाते तेव्हा तिच्या काळजातून एक आर्त कळ उमटते. काय करावं या पोराचं ..? या विचारानी क्षणभर बेचैन, व्याकूळ झालेली ती आई पुढल्याच क्षणी आपल्या मुलाजवळ जाते आणि त्याला खडे बोल सुनावायला लागते. अचानक आईला समोर पाहून तो तरूण अर्थातच घाबरून खोटं बोलायला लागतो आणि सांगायला लागतो .. 'माँ .. मैने शराब नहीं पी है .. मैने शराब नहीं पी है ...' पण ते सगळं ऐकायची मनःस्थिती तिची नसतेच कारण इकडे घरी तिचे पती आणि त्या तरूणाचे वडील मृत्यूशय्येला टेकलेले असतात. ती माऊली आपल्या भानावर नसलेल्या पोराला हाताशी धरून घरी आणते आणि 'वडीलांकडे बघ रे पोरा' अशी अजीजीनं विनंती करायला लागते .. पण नशेत आकंठ बुडालेल्या त्याला ते सगळं उमजेपर्यंत इकडे वडीलांनी प्राण सोडलेले असतात. त्यांचा मृत्यू झालाय हे कळताच माऊलीचा आक्रोश अन् कानावर पडलेलं आपल्या लहान बहीणीचं रडं ऐकल्यावर तो तरूण खडबडून भानावर येतो पण वेळ निघून गेलेली असते.. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरच्या रागापोटी आई आपल्या लहान मुलीला घेऊन घर सोडून निघून जाण्याच्या बेतात असते तेव्हा भानावर आलेला तो तरूण आईला कशीबशी गळ घालतो आणि अखेर आज या क्षणापासून आपण दारू कायमची सोडल्याचं वचन देतो तेव्हा कुठे आईचं मन पाघळतं.. आणि तिचे पाय उंबऱ्याआड थबकतात. या तरूणाचं नाव असतं 'केशव'.
1964 साली आलेल्या 'शराबी' या चित्रपटातलं पहिलंच गाणं ऐकलं आणि या चित्रपटाबद्दल मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली. व्यसनी माणसाचं आयुष्य कोणत्या क्षणी भरकटेल आणि रंगात आलेला जीवनाचा डाव तो कधी उधळून देईल याची काहीच शाश्वती नसते हेच वास्तव या चित्रपटातून दिग्दर्शक राज रिषी यांनी मांडलं आहे.. आणि अर्थातच चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील कलाकार देव आनंद (केशव), ललीता पवार (केशवची आई), मधुबाला (कमला) या तिघा कसलेल्या कलाकारांनी हे कथानक आपल्या सुंदर अभिनयाने आपल्यापर्यंत अत्यंत संवेदनशीलरित्या पोचवलं आहे. मदनमोहन यांचं कमालीचं मधुर, मोहक संगीत आणि त्यात गुंफलेली एक से एक गाणी चित्रपटाचं कथानक सहजगत्या आणि एका सुंदर लयीत आपल्यापुढे उलगडत जातात. 'सावन के महीनेमें एक आग जो सीनेमें लगती है तो पी लेता हूँ', 'तुम हो हसीं कहाँ के .. हम चाँद आँसमाँके', 'मुझे ले चलो .. आज फिर उस गली में', 'कभी ना कभी कहीं ना कहीं कोई ना कोई तो आएगा ..' अशी एक से एक गाणी मनाचा ठाव घेतात.
ही कथा आहे 'केशव' नावाच्या तरूणाची..
केशवचे वडील मरतात तेव्हा तो आईला आपण पुन्हा कधीही दारूला हातही लावणार नाही असं वचन देतो आणि त्यानुरूप तो स्वतःत बदलही करतो. त्याच्यात झालेला बदल पाहून कमला, जी केशवची प्रेयसी असते, तिचे वडील त्या दोघांचं लग्न लावून देण्याचं ठरवतात.. इतकंच नव्हे तर केशवला आपल्या कोळशाच्या खाणीत जबाबदारीचं कामही देतात. केशवचं सगळं लवकरच सुरळीत होणार असतं..त्याने आता दारूपासून कायमचं दूर रहाण्याचा निग्रहच केलेला असतो ना .. अनेक मित्र नानाप्रकारे त्याला रस्त्यात भेटल्यावर दारू पिण्यासाठी उद्युक्त करत असतात पण केशव त्यांना बधत नसतो. लग्नाची तारीख ठरलेली असते.. सगळं कसं आनंदात सुरू असतं. पण, हाय रे कर्मा, लग्नाच्या तारखेआधी केशवच्या जीवनात एक स्वाभाविक घटना घडते पण त्याचे पडसाद इतके खोलवर उमटतात आणि सगळ्यांचंच जीवन उध्वस्त होतं.
दारू पिणाऱ्या व्यक्तीनं दारू सोडायची ठरवली आणि समोर सतत दारूचा संदर्भ या ना त्या कारणाने येत राहीला तर दारू पिणाऱ्या माणसाचा मनोनिग्रह कमीच पडतो हे आपण जाणतोच. व्यसन हा एकप्रकारचा मनोशारिरीक आजारच आहे असे अभ्यासकांनी सिद्धही केलेले आहे. त्यामुळेच, केशवचा दारू सोडण्याचा पक्का निग्रह आणि त्या निग्रहाला या ना त्या कारणाने लागलेला सुरूंग याची कथा शराबी या चित्रपटातून ज्या विलक्षण पद्धतीने मांडलेली आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं .. !
दारू सोडण्याचा निग्रह केला तरीही शरीराला दारू न मिळाल्याने व्यसनी माणसाला शारीरिक त्रास प्रचंड होत असतो.. एकदाची दारू मिळाली की मगच त्याचं मन आणि शरीर शांत होतं. अगदी हीच अवस्था केशवचीही व्हायला लागते. त्याला पोटात प्रचंड वेदना व्हायला लागतात पण तेव्हा आई बहीण, त्याची काळजी करणारी माणसं त्याच्याजवळ असतात त्यामुळे त्या अवस्थेतून तो बाहेर पडू शकतो. आपल्या या त्रासावरचं औषध घेण्यासाठी एका हकीमाकडे तो जातो तेव्हा हकीमाकडे औषध तर असतं पण औषध देण्यासाठी बाटली नसते.. केशवनेही बाटली आणलेली नसते त्यामुळे हकीम त्याला औषध देण्यासाठी नेमकी दारूचीच रिकामी बाटली निवडतो. त्या बाटलीचा स्पर्शही खरंतर केशवला नको असतो पण त्याचा नाईलाज होतो. औषध आणि इस्त्रीचे कपडे घेऊन घरी परतत असताना कमला रस्त्यातून चाललेली दिसते आणि केशवला तिची थट्टा करायची लहर येते.. आपल्याजवळ दारूची बाटली आहेच म्हणून तो आपण दारू प्यायलो असल्याची नक्कल करतो .. मग एक रोमँटीक गाणं होतं आणि नेमकं घरी परतण्याची वेळ तर दोन दारूडे त्या आडवाटेला येऊन पिण्याचा कार्यक्रम करत असतात आणि त्यांनी केशवची औषध भरलेली दारूची बाटली पळवलेली असल्याचं केशवच्या लक्षात येतं. तो त्यांच्याशी भांडून बाटली तर घेऊन निघतो आणि इथेच सगळा घात होतो कारण, ती बाटली त्याची औषधाची नसते तर ती दारूची बाटली असते.
घरी पोचून रात्रीच्या वेळी झोपायला खोलीत गेल्यावर केशवला टर्की लागते आणि खूप त्रास व्हायला लागतो. कपाटातून औषधाची बाटली उघडून थोडंसं औषध तरी प्यावं या विचाराने तो बाटलीतलं पेय ग्लासात ओततो आणि क्षणात त्याच्या पायाखालची जमीन निसटते.. कारण, ऐन टर्की लागलेली असताना समोर आलेलं हे पेय हे औषध नसून चक्क दारू आहे हे त्याला दिसतं.. आता खरी कसोटी असते.. आता ते पेय प्यायचं की नाही हे केवळ केशवच्या हातात असतं आणि नेमक्या याच चुकार क्षणी त्याचा आत्मसंयम ढळतो. केशव ग्लासात ओतलेली दोन चार घोट दारू एका अत्यंत मोहाच्या क्षणाला बळी पडून पितो आणि त्या दोन घोटातच पुढच्या जीवनाचा बळी जातो...कारण, त्याच्या खोलीतून येणारे आवाज, ग्लास फुटल्याचा वगैरे आवाज ऐकून म्हातारी आई त्याच्या खोलीत येते आणि समोरचं चित्र पाहून संतापते.. तो सांगण्याचा प्रयत्न करतो काय झालं .. किती त्रास होतोय आपल्याला ... तो प्रामाणिकपणे सांगत असतो पण एकदा का नाव कानफाट्या पडलं की अशा माणसावर सख्खी आईसुद्धा विश्वास ठेवत नाही.. केशवच्या बाबतीतही हेच होतं. खुद्द त्याची आई आज त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला घराबाहेर काढते .. विषण्ण मनोवस्थेत घराबाहेर पडलेल्या केशवला दारूडा मित्र भेटतो आणि केशव नको नको म्हणत असतानाही त्याच्या तोंडात दोस्तीखातर दारूची बाटली अक्षरशः जबरस्तीने देतोच.. टर्की सुरू असताना दारूची बाटली तोंडात येणं म्हणजे तर केवळ विषच .. केशवची इच्छा नसतानाही आणखी चार घोट पोटात जातात तशी त्याला चढते.. आता तो पूर्वीसारखा पुन्हा गाणं म्हणत रस्त्यातून फिरायला लागतो आणि त्या भरातच कमलाच्या घरासमोरून जात असताना कमला त्याला पहाते.. ती अडवते, त्याला जाब विचारते पण तोवर कमलाचे वडील येतात नि केशवची अवस्था पाहून कमलाबरोबरचं लग्न मोडतात. केशव माफी मागत असतो, सांगायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो पण कोणीच त्याचं आज ऐकत नाही.. एका क्षणात लग्न, नोकरी, घर आणि जीवनाचं फुलवलेलं सुंदर स्वप्नं पार विझून जातं.
आता केशव मनानी पुन्हा पूर्ण खचतो... जगण्याबद्दलची निराशा त्याला आता आणखी आणखी व्यसनांकडे खेचत सुटते .. आता तो पूर्णपणे रिलॅप्स होतो आणि पुन्हा एकदा सगळा वेळ मद्यालयात घालवायला लागतो.
केशवचं पुढे काहीच बरं होत नाही आणि कमलाचंही पुढे फार काहीच बरं होत नाही. कमलाचे वडील मरण पावतात तशी कमला केशवच्या घरी, दुसऱ्या गावात निघून येते कारण तिचं स्वतःचं असं वडीलांशिवाय कोणीच नसतं. कमला आपल्याकडे आलेली पाहून केशवच्या आईला वाटतं, आता केशवचं आणि कमलाचं लग्न लावून द्यावं.. ती केशवला त्याबाबत विचारते पण कमलाबद्दल आता केशवच्या मनात कमालीचा आकस असतो.. जी मुलगी माझी एक छोटीशी चूक समजून घेऊ शकली नाही ती मुलगी माझी साथ काय देणार असं म्हणत तो आता कमलाशी लग्नाला नकारच देतो.. आणि असंही आता तो पूर्वीसारखा केशव राहीलेला नसतोच .. तो आता अट्टल दारूड्या केशव झालेला असतो.
अशा दारूड्या केशवला पुन्हा एकदा मद्यालयात कोणातरी इसमामुळे एका नव्या कोळशाच्या खाणीतच नोकरी मिळते. पुन्हा नोकरी .. पुन्हा नवी उमेद .. केशव पुन्हा निग्रह करतो की आता ही मिळालेली नोकरी नीट करायची, टिकवायची.. पण नियतीला कदाचित हे देखील मान्य नसतं. नेमकी याच खाणीत केशवची आई एवढे दिवस काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असते. केशवचा कामाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी त्याच्या आईला त्याला अपघातातून वाचवण्याची वेळ येते. समोर बेशुद्धावस्थेत पडलेली स्त्री आणि दुसरीकडून जोरात रूळावरून येणारी कोळशाने भरलेली गाडी .. केशव क्षणार्धात आपल्या जीवाचीही पर्वा न करता त्या वृद्धेला रूळावरून वाचवतो आणि तिचा चेहरा पहातो, तेव्हा त्याला धक्का बसतो .. कारण, ती त्याचीच आई असते... त्याला वाटतं, जीव वाचवला म्हणून तरी त्याची आई पुन्हा त्याला प्रेमभराने जवळ करेल .. त्याच्या चुका विसरून जाईल नि त्याला क्षणात माफ करेल पण तसं होत नाही. त्याची आई त्याला बधणार नसते .. कदाचित तिचा आता केशववरचा विश्वास कायमस्वरूपी उडालेला असतो म्हणूनच ती तशाही परिस्थितीत त्याला समोर पाहून झिडकारतेच.. इकडे कमलाच्या मनात केशवने नोकरी धरल्यापासून पुन्हा नवं आयुष्य सुरू करण्याची आशा पल्लवीत झालेली असते.. पण आता केशव पूर्ण बदललेला असतो याची कल्पना त्या भाबडीला नसते.
व्यसनांची अंतिम पायरी .. म्हणजे पूर्णतः संयम ढासळणे .. आणि केशव आता या पायरीवर पोचलेला असतो. खाणीत काम करतानाही भवती जे मजूर त्यांपैकी बरेच जण मद्यप्राशनाला सरावलेले ..त्यामुळेच पुन्हा एकदा केशवच्या अंतउर्मी जाग्या होतात. केशवला मिळालेल्या पगाराचं तो काय करेल हे आई चांगलीच जाणून असते त्यामुळे ती त्याचा पगार त्याच्याकडून अधिकाराने काढून घेते.. केशवला त्याच्याच पगारातला छदामही आई देत नाही आणि त्यामुळेच केशव आता आणखीनच हतबल होतो. आता काय करावं या विचारातच अखेरीस केशव घरातल्या देवापासची चांदीची पूजेची भांडी आईच्या नकळत (आणि कदाचित स्वतःच्या अंतर्मनाच्याही आवाजाच्या नकळतच) चोरतो आणि थेट मद्यालयात ती विकून दारू विकत घेतो.. आईच्या हे लक्षात येताच ती अखेर मद्यालयात जाऊन केशवला जाब विचारते पण तो तिला उडवाउडवीची उत्तरं देतो. आई चिडते .. देवाची भांडी विकून घेतलेली दारूची बाटली केशवच्या हातून हिसकावून घेते आणि फोडून टाकते.. तर आज केशवच्या व्यसनाची परिसीमा होते.. तो रागाच्या भरात आईचाच गळा दाबतो ..पुढच्याच क्षणी त्याला त्याची चूक लक्षात येते आणि तो मागे हटतो. तिथून निघतो नि कामाच्या जागी पोचतो. तिथल्या एका अधिकाऱ्याजवळ त्याच्या हातातली बाटली पाहून दोन घोट दारूची याचना करतो.. पण अधिकारी त्याला नकार देतो.. आज केशववर एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली असते. घड्याळात ठीक दुपारचा एक वाजला की खाणीत सुरूंग लावायचा असतो आणि या कामी काहीही चूक झाली तर हजारो मजूरांचा जीव जाऊ शकतो याची कल्पनाही तो केशवला देतो. केशव कामाच्या दिशेनी निघालेला पाहून अधिकारी आपली हातातली बाटली अन्य कोणी बघेल या भीतीने तिथेच खाली फेकून देतो आणि केशवची नजर दूरूनही त्या बाटलीला हेरते.. कारण, आज त्याला प्रचंड टर्की लागलेली असतेच. कधी एकदा दारूचा थेंबही मिळेल अशी अवस्था झालेली असते. कोणालाही लक्षात येण्याआधी केशव बाटलीच्या दिशेने धावतो आणि सगळ्यांच्या नकळत एक कोपरा पकडून दारू ढोसून मन शांत करतो.. इतक्यात एक मजूर केशवजवळ येऊन आनंदाने सांगतो, आज आमचा खूप आनंदाचा दिवस आहे, आज तीन महिन्यांचा पगार आणि बोनसही मिळणार आहे.. पण केशवचं डोकं आज जागेवर नसतं. तो दारू ढोसत बसलेला असतो ना.. जेव्हा बाटली संपते तेव्हा झिंगलेल्या अवस्थेतच तो हातातला कंदील नाचवत घड्याळ पहायला जातो .. घड्याळात बारा वाजून पाच मिनीटं झालेली असतात पण नशेची अंमल असल्याने केशवला तेव्हाच एक वाजल्याचं दिसतं आणि तो खाणीत सुरूंग पेटवून देतो.. क्षणार्धात हाहाःकार माजतो. खाणीत स्फोट होतात आणि हजारो मजूरांचं जीवन धोक्यात येतं. कुणी अपंग होतं.. कोणाचे मृत्यू होतात.. गदारोळ माजतो. या अपघातात त्याची आई जबर जखमी झाल्याचं केशवला जेव्हा याची देही याची डोळा दिसतं तेव्हा त्याचे डोळे खाडकन् उघडतात पण पोलीस त्याला पकडून नेतात. केशवच्या विनंतीवरून शेवटी त्याला दवाखान्यात त्याच्या आईला भेटायला नेलं जातं. तोवर केशवचं ह्रदयपरिवर्तन झालेलं असतं पण वेळ निघून गेलेली असते... कारण या अपघातात केशवच्या आईचे दोन्ही पाय गेलेले असतात... अखेरीस केशवचे डोळे उघडतात, त्याला त्याच्या वागण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.. कधीही भरून न येण्यासारखी. केशवच्या पश्चात्तापाला अखेरीस त्याची आई समजून घेते आणि एवढा प्रसंग होऊनही त्याला ती पुन्हा माफ करते आणि कमला केशव पुन्हा एकत्र येतात.. आणि अर्थातच केशवला पुढे त्याच्या गुन्ह्याची कायदेशीर शिक्षाही भोगावी लागतेच..
तर असा हा शराबी चित्रपट
आज देवआनंद यांचा वाढदिवस.. देवआनंद यांच्या अभिनयाची परिसीमा या चित्रपटात जाणकार प्रेक्षकाला आकळेल. एक साधा सहज स्वप्नील वागणारा तरूण, ते एक अट्टल दारूडा, वाताहत लागलेला तरूण हा भूमिकेचा प्रवास देवानंद यांनी अप्रतिम रंगवला आहे. विशेष म्हणजे देवआनंद स्वतः अजिबात मद्यपान करत नसत असं माझ्या वाचनात आलं आहे.. त्यामुळे तर त्यांनी वठवलेला केशू .. केशव म्हणजे त्यांच्यातील कसलेल्या अभिनयाचा अप्रतिम आविष्कारच म्हणायला लागेल.
त्याकाळी हा चित्रपट गाजला नसेल तरच नवल कारण, मुळात हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून एवढा सशक्तपणे मांडणं हे देखील काम दिग्दर्शक राजरिषी यांनी चोख केलं आहे. चित्रपटातील अनेक दृश्य काळजाचा ठाव घेणारी आहेत. पहिल्यांदा टर्की लागते तेव्हा केशवच्या समोर असलेला मद्याचा पेला आणि त्याच्या मनातलं द्वंद्व आणि ते दृश्य कंटीन्यू होतं तेव्हा समोरच्या भिंतीवर केशवची आणि त्या ग्लासची दाखवलेली गडद होत गेलेली सावली, आणखी एक दृश्य, जेव्हा केशवची बहीण घरात कमला आणि आईकडे आपल्या भावाने पुन्हा नोकरी सुरू केली असून तो बघा कसा पुन्हा छान माणूस होईल आता हे कौतुकाने सांगत असते आणि इकडे केशवची चाहूल लागताच .. 'भैय्या' करून त्याच्याकडे पायऱ्या उतरून झेपावते पण केशव परततानाच नशा करून आलेला असल्याने तिला तो झेलू शकत नाही आणि मुन्नी खाली पडते .. ते दृश्य पहाताना गलबलून येतं.. अशी अनेक दृश्य इतकी बोलकी आहेत की अशा अनेक शराबी माणसांचं आयुष्य कसं असेल याची कल्पना आपण करू शकतो. सगळ्यात शेवटी खाणीत केशवच्या चुकीने जे सुरूंग लावून स्फोट होतात तो संपूर्ण प्रसंग पहाताना हादरायला होतं.. एरवी जे लोक दारूचं समर्थन करत असतात, त्यांनी अशा अपवादात्मक परिस्थितीचा विचार कधीच केला नसेल हे मी खात्रीशीर सांगू शकते. हा विचार या चित्रपटाने मांडून, दारूचं समर्थन करणाऱ्यांच्या डोळ्यात चांगलंच झणझणीत अंजन घातलं आहे यात दुमत नाही.
- मोहिनी घारपुरे - देशमुख