तर.. या चित्रपटाचं नाव होतं .... वावटळ
1965 साली आलेला हा मराठी कृष्णधवल चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक शांताराम आठवले आणि ही कथा, पटकथा आहे शंकर पाटील यांची .. चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतात ते कृष्णकांत दळवी, सुलोचना, इंदिरा चिटणीस, आशा पोतदार आणि मराठीतील अन्य बरेच दिग्गज कलाकार ..
अगदी जुन्या काळचा मराठी माणूस .. त्याचं जगणं, शेतीशी जोडलेली त्याची नाळ आणि तसंच नात्यांमधले विविध पदर, रागलोभ प्रेम आणि सरतेशेवटी कितीही वावगं कुणी वागलं तरी ते आपलंच माणूस असं म्हणून एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घेत आयुष्य जगण्याची सुंदर कला ... हे सारं सारं अनुभवायचं असेल तर हा एक साधासोपा आणि तरीही मनाला भावेल असा चित्रपट नक्की पहायला हवा.
संभा आणि त्याची आई हे दोघंच .. वडीलांच्या पश्चात संभावर आईची आणि शेतीची जबाबदारी येते ती तो उत्तमच पार पाडत असतो. गडी देखणा अन् रांगडा त्यामुळे अशा उमद्या मुलाच्या प्रेमात गावातली एक सुंदर देखणी मुलगी पडतेच. संभालाही ती आवडते. संभा आईचा लाडका, आईचं मुलावर निरातिशय प्रेम .. पण तरीही लग्नाच्या वेळी मात्र तो आईच्या मनाविरूद्ध जाऊन स्वतःला आवडलेल्या मुलीशी लग्न करतो आणि मग कथेला कलाटणी मिळते. अर्थातच लग्नानंतर सासू सुनेच्या काहीबाही कारणानं कुरबुरी सुरू होतात. जसजसे दिवस सरतात तसतशी हे सगळं निवळायच्या ऐवजी वाढतच जातं. संभाला इकडे आड तिकडे विहीर अशी गत होते. शेवटी एक मोठ्ठ भांडण होतं तशी सासू रागानं आपल्या भावाकडे निघून जाते .. इकडे सुनेलाही राग अनावर होतो .. ती पोटुशी असते तरीही तशीच उठते नि माहेरी निघून जाते. आता काय करावं .. हा प्रश्न कसा सोडवावा ते संभाला कळत नाही .. आणि मग पुढे एक अशी वावटळ येते नि सारं काही भांडण त्यात विरून जाऊन शेवट गोड होतो .. ही वावटळ काय अन् कशी हे जास्त सांगण्यापेक्षा चित्रपट पाहिलेला उत्तम असं मी म्हणेन..
आजकाल सासू सुनेचं नातं हा माध्यमांमध्ये तसं पाहिलं तर अगदी चावून चोथा झालेला विषय ! पण 1965 साली जेव्हा हा चित्रपट आला असेल तेव्हा मात्र हा विषय अगदी नावीन्यपूर्णच असेल यात शंका नाही. त्यामुळे या चित्रपटातून हा विषय पहाणं आपल्यापैकी काहीजणांना कंटाळवाणं झालं तरीही तो बघताना या भूमिकेतून पाहिल्यास त्यातली गोडी समजेल.
मला या चित्रपटातल्या अनेक गोष्टी आवडल्या .. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या चित्रपटातली गोड लडीवाळ अशी ग्रामीण भाषा .. ही भाषा ऐकणं .. संभाच्या आईने भर शेतात दूरवर काम करत असलेल्या संभाला मारलेली विशिष्ट पद्धतीची हाक .. कानाला गोड वाटते. तसंच या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले कृष्णकांत दळवी.. स्वतः उमदे, रांगडे आणि देखणे .. ते या संभाच्या भूमिकेत अतिशय चपखल दिसले आहेत. त्यांची प्रेयसी म्हणून ज्या अभिनेत्रीने काम केलंय, ती पुढे अनेक मराठी हिंदी चित्रपटात झळकली. आशा पोतदार असं या अभिनेत्रीचं नाव. त्या देखील अतिशय सुंदर दिसल्या आहेत.
जुन्या मराठी चित्रपटांची गोडी म्हणजे त्यांचं साधेपण .. छान साधंसोपं कथानक आणि ते कथानक रंगवणारे सगळे एकसेएक जातिवंत कलाकार ..
बाकी चित्रपटातील गाणी, संगीत वगैरे श्रवणीय आहेच कारण तिथेही पुन्हा अनेक दिग्गज गायक, संगीतकार यांची मांदीयाळीच आहे. चित्रपटाला संगीत दिलय राम कदम यांनी तर पार्श्वगायक आहेत सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, बालकराम, शाहीर साबळे आणि पार्टी ..
तर असा हा एक साधा पण अवीट गोडी मनाला देणारा चित्रपट ..
लॉकडाऊनच्या काळात हे असे सुंदर चित्रपट पहाण्याचा एक नवा वसा मी घेतलाय आणि हातातून या चित्रपटांबद्दलच लिखाणंही होतंय ही निव्वळ सरस्वतीची आणि गणपतीबाप्पाची कृपाच ..!!
- मोहिनी घारपुरे - देशमुख


(छायाचित्र गुगल साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा