मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

दारा बांधता तोरण घर नाचले नाचले ...



आज गुढीपाडवा. सकाळपासूनच घरोघरी सगळ्या गृहिणींची लगबग सुरू झाली. दाराबाहेर अंगणात सुंदर आकर्षक रांगोळी रेखताना मनातली प्रसन्नता, आनंद उजळून आला. सणाचा थाटच काही निराळा.. अशा सणाला सृष्टीसौंदर्यही काही निराळंच असतं.. आणि त्याचंच वर्णनआपल्याला सापडतं ते साक्षात इंदिरा संतांच्या शब्दाशब्दातून आणि पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरांतून...
( कवयित्री इंदिरा संत) 
हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच या गाण्याने मन मोहून गेलं. सतारीच्या उत्फुल्ल सुरावटीनंतर तबल्याच्या ठेक्यावर पद्मजाताईंचा सुरेल आणि मधाळ आवाज कानावर पडू लागतो आणि इंदिराबाईंचे अमोघ गोडीचे शब्द कानावर पडू लागतात,
दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले
सणावाराचा दिवस असला की प्रत्येक गृहिणीच्या मनात एक निराळाच आनंद, उत्साह असतो. घराच्या दाराला झेंडूच्या पिवळ्याधम्मक फुलांचं नि आंब्याच्या हिरव्यागार पानांचं तोरण बांधल्या क्षणापासूनच त्या सणाचा आनंद मनामनात पसरतो. अंगणात डुलणाऱ्या सोनचाफ्याचं फुलणं, बहरणं देखील कवयित्रीने इतकं सुरेख टिपलं आहे, की निसर्गाशी त्यांची नाळ किती घट्ट जुळलेली आहे याचा अंदाज आपल्याला यावा. एरवी एखादी सुखद घटना, जसं बाळाचा जन्म, महालक्ष्मी मातेचं आगमन वगैरे घरी झालं की सहज आपण म्हणतो, सोनपावलं आली घरी .. ती सोनपावलं जणू बहरलेल्या सोनचाफ्याच्या झाडाने फुलांचा सडा अंगणात घालून आपल्या घरी आणली आहेत असा कल्पनाविष्कार .. ही संपूर्ण कविता म्हणजेच कल्पनांच्या सुखसरी. निसर्गातील एक एक साध्या साध्या अगदी रोज आपल्या डोळ्यांपुढे घडणाऱ्या गोष्टी.. पण एखाद्या कवी मनाच्या व्यक्तिलाच त्या इतक्या सुंदर रितीने आकळतात आणि शब्दांच्या व सुरांच्या सामर्थ्याने त्या आपल्यापर्यंत पोहोचतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गाणं. इंदिराबाई, पद्मजाताई आणि संगीतकार गिरीश जोशी व संपूर्ण वाद्यवृंद यांचा सुमधूर मिलाप म्हणजे हे गाणं असं मला वाटतं.
(पद्मश्री पद्मजाताई फेणाणी .. फोटो गुगलवरून साभार)
भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली

चाकोरीबद्ध आयुष्य जगून मनावर आलेली मळभ क्षणात दूर होते. दारावर तोरण चढलं की अर्थातच मनामनात स्वप्न पालवतात ती सुखाची, आनंदाची. अशावेळी दारं सताड उघडी ठेऊन माणसं मनातला आनंद इतरांसमवेत वाटून घेत असतात. घराच्या भिंती जणू स्वप्नांनी रंगून गेलेल्या असतात आणि खिडकीच्या गजांऐवजी कर्दळीचे खांबच उभे असतात..
किती सुरेख शब्द .. किती सुंदर वर्णन..
आता पुढलं सुखाचं स्थान म्हणजे दाराबाहेर रांगोळी रेखणं. मनोभावे रांगोळी रेखताना प्रत्येक स्त्रीच्या मनात आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी प्रेम, ममत्व दाटून आल्यावाचून रहात नाही. एरवी नोकरीनिमित्ताने म्हणा वा अन्य कारणाने म्हणा अगदी नेमाने रांगोळी काढण्याइतका वेळ देणं शक्य नसलं तरीही अशा सणावाराला तरी शक्यतो स्त्रिया दारापुढे छोटीशी का होईना पण मनोभावे रांगोळी आजही रेखतातच..
सूर्यकिरण म्हणाले घालू दारात रांगोळी
शिंपू पायांवरी दव म्हणे वरून पागोळी
पण गंमत म्हणजे अगदी भल्या पहाटेच साक्षात सूर्यनारायणांनी घराघरांच्या अंगणात केव्हाच आपली सूर्यकिरणं पसरून जणू रांगोळीच रेखलेली असते.. तर पावसानंतर दारांवरून गळणाऱ्या पागोळ्या म्हणतात की चला,चला, या शुभदिनी आपण पुढे होऊन या सोनपावलांवर दव शिंपूया.
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणे बहरून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून

निसर्गाच्या लीलांची किती सुरेख शब्दकल्पनांत मांडणी म्हणायची ही .. अंगणात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओंजळ आजच्या शुभदिनी मी फुलांनी भरून देईन असं कोण म्हणतंय .. तर खुद्द बहरलेली बागच म्हणतेय आणि काहीसं खाली झुकलेलं केळ्याचं झाड हासत म्हणतंय, की त्या सोनपावलांनी दारी आलेल्या प्रत्येकाला मी छान आशीर्वाद देईन.. आहा .. काय सुरेख कल्पना..
पण अशी सगळी जय्यत तयारी झाली असूनही अजून ती सोनचाफ्याची पावलं का बरं आली नाहीत म्हणून जेव्हा वाट पहाणं सुरू होतं तेव्हा अगदी आपल्याप्रमाणे वाराच दारापाशी येरझारा घालायला लागतो.. अस्वस्थ होतो..पण हा वारा मोतिया गंधानी भरलेला आहे आणि तो या सोनचाफ्याच्या पावलांची वाट पहातो आहे.. अस्वस्थपणे येरझारा घालतो आहे..
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेऊनी
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी
सोनचाफ्याची पाऊले आज येतील अंगणी

गाणं इथे संपतं खरं पण जाताजाता आपली ओंजळ भरून जातं, शब्दांनी, सुरांनी ..
या गाण्याची विशेषता म्हणजे कवयित्रींचे शब्द आणि गायिकेचे सूर आहेतच.. पण या प्रत्येक सुरांना भावनांचा आणि वाद्यमेळाचा साज जो काही अप्रतिमरित्या चढवण्यात आलेला आहे त्याला तोड नाही. मुख्य म्हणजे पद्मजाताईंचं गायन इतकं भावपूर्ण आहे की हे प्रत्येक वर्णन, त्यासाठी वापरलेल्या विशिष्ट सुरावटी या सगळ्यांमधूनही पद्मजाताईंच्या गायकीतलं सौंदर्य थेट आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यांचा उत्फुल्ल आवाज, त्यांचा तिन्ही सप्तकातला सहज वावर, मध्येच आवाजातून ओथंबून आलेला आनंद, त्यांच्या गळ्यातून आलेल्या हरकती, मुरक्या यांचा आस्वाद तर शेकडोवेळा हे गाणं ऐकून घ्यावा. या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाद्यांचा केलेला वापर. सतार, तबला आणि जागोजागी पेरलेले बासरीचे सूर ऐकणं म्हणजे कर्णतृप्तता अनुभवणं.
तर .. ही अशी सुरेख कल्पना असलेलं कल्पनातीत सुंदर, मधुर गाणं.
सणावाराला घरात आवर्जून भल्या पहाटे हे गाणं घरात लावावं आणि मग आपल्या कामाला लागावं. एखाद्या गाण्यांतून प्रकट होणारे भाव आपल्या मनाचा ठाव घेतात, किंबहुना त्या गाण्यातून प्रकट होणाऱ्या भावना अगदी त्याचवेळी आपल्याही मनात ते गाणं ऐकताना उमलत असतील तर हेच त्या गाण्याचं मोठं यश म्हणायला हवं.
या गाण्यात वर्णन केलेल्या सुंदर कल्पनांची अनुभूती तर शेकडोवेळा घ्यावी अशी.. म्हणजे रोजचाच सूर्य .. आणि रोजचीच सूर्यकिरणं जेव्हा आपण पहातो तेव्हा कदाचित आपल्याला त्याबद्दल काही विशेष वेगळं वाटत नसावं.. पण या गाण्यात आलेली कल्पना, सूर्यकिरणं म्हणाले .. घालू दारात रांगोळी .. ही कल्पना जेव्हा आपण ऐकतो त्यानंतर जणू रोजचीच सूर्यकिरणं आपल्या दाराबाहेर पसरलेली बघताना असं वाटतं की आज आपल्याही दारापुढे यांनी जणू रांगोळीच रेखली आहे. अगदी अशीच दुसरी सुंदर कल्पना म्हणजे, पागोळी म्हणते की पायांवर दव शिंपूया .. आहाहा.. एरवी अळवाच्या पानावर मोत्यासारखं स्वतःला सावरून बसलेलं दव कुणी पाहिलं नसेल.. पण पावसानंतर झाडातून, छपरांवरून गळणाऱ्या पागोळ्यांचे थेंब जणू स्वतःला दवबिंदू म्हणवून घेत आपल्या पायावर दवांचा सडा घालत आहेत ही कल्पनाच किती सुरेख आहे नै.. या कल्पनेनंतर जीवनातला प्रत्येक पाऊस आणि त्या पावसानंतर गळणाऱ्या पागोळ्या पहाताना माझ्यासारख्या एखाद्या संवेदनशील मनाचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो.
एरवी वाऱ्याच्या झुळूकीने अंगणातली सगळी झाडं डुलतात, मागेपुढे खालीवर होत सारा दिवस त्यांची सळसळ सुरू असते. आपल्या कानांना ती जाणवते, आपल्या डोळ्यांनी आपण अगदी रोजच ती पहातही असतो पण कल्पना सुचण्याचा आशीर्वाद जणू कविंनाच मिळालेला असल्याने, इंदिराबाईंसारख्या एखाद्या अत्यंत संवेदनशील कवयित्रीलाच अंगणात वाऱ्याने काहीशी झुकलेली केळ जणू आल्यागेल्यांना आशीर्वाद देते आहे ही सुरेख कल्पना सुचते आणि गाण्याला अक्षरशः चार चाँद लागतात.
दिवस येतात, दिवस जातात.. कालचक्र अव्याहतपणे सुरू असतं, निसर्गचक्रही सतत न थांबता सुरूच असतं.. पण काळाच्या पटलावरील निसर्गाच्या या सौंदर्यस्थळांकडे मुळात अलवारपणे पहाणं आणि तरलतेने शब्दयोजना करून त्या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणं ही ईश्वरी देणगीच म्हणावी लागेल. कवितेनं तिचं काम केलं .. शब्दाशब्दातून ती प्रकट झाली.. पण जेव्हा तीच कविता सुरांसुरांतून बोलायला लागते तेव्हा जणू ती आपलंच मन आपल्यासमोर प्रकट करत असते. हे कवितेचं मन जाणून, त्यानुसार संगीताची सुरेख, अमोघ रचना करून कवितेला सुरांचा साज चढवण्याचं काम संगीतकार करतो आणि कवितेचं गाणं होतं. आता खरी कसोटी असते ती गायकाची .. गायक आपल्या सुरेल मधाळ सुरांतून जेव्हा तेच गाणं जीव ओतून सादर करतात तेव्हा ते गाणं अक्षरशः सोनपावलांनी आपल्या मनात उतरतं. अशी गाणी मग आजन्म आपली साथ करतात. सुखदुःखाच्या प्रसंगी आपल्याला ही गाणी सोबत करतात.
जीवनातील प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक घटनेवर आजवर कविता नि गाणी जन्माला आलेली आहेत. बाळाचा जन्म असो, मुलीचं सासरी जाणं असो, विरह असो, ईश्वरभक्ती असो, एखाद्या प्रिय व्यक्तिचं आपल्याला कायमस्वरूपी सोडून जाणं असो.. एकूणएका प्रसंगाविषयी गाणी आहेत.. त्या त्या गाण्यांच्या सुरांची विलक्षण ताकद आहे. आपल्या मनात त्यावेळी तोच भाव उमटवून जाण्याइतकी दमदार अशी त्यांची रचना संगीतकारांनी केलेली असते.
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले हे गाणं ऐकताना तर कित्तीतरी वेळेला माझ्या डोळ्यांपुढे यातली एकूण एक कल्पना उभी रहाते. जणू एक छान जरीकाठाची साडी नेसून, केसांचा आंबाडा माळून त्यावर मोगऱ्याच्या टप्पोऱ्या फुलांचा गजरा लेवून एक सुंदर स्त्री घरादाराला सजवण्याकामी एखाद्या मंगलप्रसंगी साऱ्या सकाळपासून सज्ज झालेली आहे आणि तीच हे गाणं म्हणत मनोभावे आपली कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या डोळ्यातली स्वप्न तिच्या घरातल्या भिंतींवर रेखली आहेत, तिच्या अंगणातला सोनचाफा आता क्षणात टपटप फुलांचा अंगणभर सडा घालणार आहे आणि त्या सोनपावलांच्या आगमनाच्या क्षणापूर्वी तिनं आपलं घर इंदिराबाई म्हणतात त्याप्रमाणे सजवून ठेवलं आहे ..

कदाचित आज गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी अशीच लगबग सुरू असेल.. दारी तोरणं, रांगोळ्या नि घराघरात गुढी उभारण्याची घाई .. म्हणूनच आजच्या या मंगलप्रसंगी हे गाणं तुम्हीही ऐकायलाच हवं असं जाता जाता सांगावसं वाटतं !

- मोहिनी घारपुरे - देशमुख (mohineeg@gmail.com)

(अल्बमचे नाव - घर नाचले नाचले, कवयित्री - इंदिरा संत, गायिका - पद्मजा फेणाणी जोगळेकर, संगीत - गिरीश जोशी)

फोटो - गुगलवरून साभार


शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

साज़ - 1998

सिनेमाच्या जादूई दुनियेत मनापासून रमणारी मी एक पांथस्थ आहे. इथल्या चमचमात्या, रंगीबेरंगी दुनियेइतकंच आकर्षण मला इथल्या साध्या सहज सुंदर कलाकृतींबद्दल आहे. किंबहुना साधेपणा आणि सहजता यातलं सौंदर्य माझ्या स्वतःत मला नेहमी गवसतं म्हणूनच जेव्हा समोर तशीच एखादी कलाकृती येते तेव्हा त्यात हरवून जायला होतं.. हरखून जायला होतं.
सई परांजपेंसारख्या श्रेष्ठतम दिग्दर्शिका व्यक्ती म्हणून जितक्या मला भावतात तितक्याच त्यांच्या कलाकृतीतूनही त्या मनाला भिडतात. बटबटीतपणा, ओंगळपणा, अश्लीलता यांच्या माऱ्याचा ज्यांच्या कलाकृतींना स्पर्शही नाही, आणि हे वजा असूनही ज्यांच्या कलाकृती प्रेक्षकांना संमोहित करतात किंबहुना थेट ह्रदयाला साद घालतात ही किमया सईंना कशी जमली असावी असा प्रश्न नेहमीच मला पडतो.. आणि कदाचित त्याचं उत्तर सई यांच्या व्यक्तिमत्त्वातंच आपल्याला सापडतं.
स्पर्श, कथा, चूड़ीयाँ अशा एक से एक हिट्सनंतर 1998 मध्ये सई यांचा एक नवाकोरा आणि वेगळीच कथा असलेला चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकला होता, त्याचं नाव होतं 'साज़'. पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील दोघी सख्ख्या बहिणींची कथा असल्याने या चित्रपटाचं कथानक थेट लता मंगेशकर व आशा भोसले यांच्याविषयीच असल्याच्या वदंता तेव्हा कानी येऊ लागल्या होत्या. मी तेव्हा शाळेत होते, त्यामुळे अशा गोष्टी कानावर पडल्या की अशा चित्रपटांबद्दल मनात एक तीव्र उत्सुकता निर्माण होई. पण असे चित्रपट म्हणजे आर्ट मूव्हीज कधी यायच्या आणि कधी जायच्या ते कळायचं सुद्धा नाही. त्यातून या चित्रपटाबद्दल कमालीचं औत्सुक्य वाटायचं महत्त्वाचं कारण म्हणजे जाकीर हुसैन यांचा अभिनय.. तोवर ते केवळ ' अरे हुजूर, वाह ताज बोलीये ' असं म्हणताना जाहीरातीतून दिसायचे. त्यांचं तबला वादन आणि त्यांचं मोहक रूप टीव्हीवर पाहताना त्या वयात अक्षरशः मनात फुलपाखरं उडायला लागायची. सोनेरी छटा असलेले त्यांचे कुरळे केस जेव्हा ते तबला वाजवत असायचे तेव्हा त्यांच्या मानेसह तालावर थिरकायचे आणि त्यांचं अफाट मोहक हास्य यांनी हजारो युवती घायाळ झाल्या नसतील तरच नवल... मीही त्यातलीच एक.. त्यामुळेच साज चित्रपटाबद्दल फार फार कुतूहल निर्माण झालं होतं.. पण छे.. हा चित्रपट कधी आला नि कधी गेला कळलंही नाही. असंही, उठसूट चित्रपटाला जाणं कधी आमच्या घरात रूजलेलं नव्हतंच म्हणा हे ही एक कारण असावं. फार सिलेक्टेड चित्रपटांची घरात चर्चा वगैरे व्हायची, फार बोलबाला झालेला चित्रपट, तोही आईवडीलांना त्यांच्या नोकरीच्या वेळातून वेळ मिळालाच तर आम्ही सहकुटुंब पहायला जायचो. मुलींनी एकट्या वा ग्रुपने चित्रपटाला जाणं तोवर फारसं मान्यच नसायचं त्यामुळे आमच्यात ती धीटाई फार उशीरा आली.
तर ... साज़ हा चित्रपट मध्यंतरी यूट्यूबकृपेने पहाण्यात आला आणि मी शब्दशः भारावून गेले. शबाना आजमी, अरूणा इराणी, परिक्षित सहानी, अदिती देशपांडे, रघुवीर यादव आणि खुद्द जाकीर हुसैन ... हे कसलेले कलाकार, जावेद अख्तर यांचे अप्रतिम शब्द असलेली गीतं आणि प्रत्येक गाण्याला वेगळा साज देणारे चार संगीतकार.. त्यातील मुख्य संगीतकार जाकीरजी पण अतिथी संगीतकार भूपेन हजारिका, यशवंत देव आणि राजकमलजी यांनी दिलेलं संगीत अफाट .. निव्वळ अप्रतिम. सई यांची कथा, पटकथा आणि संवाद तर कळसाध्यायच म्हणायला हवा.
ही कथा सुरू होते तो काळ साधारण संगीत नाटकांचा. रघुवीर यादव (वृंदावन) आणि आदिती देशपांडे (रेवती) हे जोडपं आणि त्यांच्या दोन कन्या.. मोठी मानसी उर्फ मान दिदी (अरूणा इराणी) आणि धाकटी बन्सीधर उर्फ बन्सी (शबाना आझमी).. वृंदावन नाटकात काम करणारा, संगीताची उत्तम जाण असणारा असा अगदी हाडाचा कलाकार असतो. मोठ्या मुलीनंतर मुलगा हवा म्हणून वृंदावन आणि रेवती फार उत्सुक असतात, त्यांनी आपल्या मुलाचं नावही ठरवून ठेवलेलं असतं, बन्सीधर .. पण होते मुलगीच म्हणून काहीशा खट्टू मनाने ते या मुलीचंच नाव बन्सीधर ठेऊन देतात आणि अगदी तिथपासूनच या धाकटीवर जणू अन्यायाची मालिकाच सुरू होते.. तिचं जीवन हळूहळू कोमेजत जातं आणि त्याला कारणीभूत काही प्रमाणात परिस्थिती तर असतेच पण तितकंच कारण असतं ते म्हणजे मोठ्या बहिणीच्या मनातील मत्सराची, ईर्ष्येची भावना ..
वृंदावनचं तसं बरं चाललेलं असतं. दोघी मुलींना गाणं शिकवणं, नाटकात काम करून थोडेफार पैसे कमावणं.. पण मुलासाठी तिसऱ्यांदा प्रयत्न करतात आणि मुलगा जन्माला येतो पण मेलेला .. या धक्क्याने रेवती अंथरूणाला खिळते. आता तिला जाणवलेलं असतं की तिचा काळ जवळ आला आहे. एके दिवशी लहानग्या मानसीवर बन्सीची जबाबदारी हक्काने सुपूर्द करून आणि शेवंता नावाच्या अगदी घरच्यासारख्या असलेल्या छोट्या कामवाल्या मुलीला मुलींच्या सोबत मागे ठेऊन रेवती अनंताच्या प्रवासाला निघून जाते.. त्या धक्क्यांनी वृंदावन मनाने उद्ध्वस्त होतो आणि त्याला दारूचं व्यसन लागतं. अगदी दोन चार वर्षातच तोही मरतो. इकडे मुली मोठ्या होत असतात, मान दिदी बन्सीची आणि शेवंताची जबाबदारी घेते. एका ठिकाणी छोटी नोकरी करून थोडेफार पैसे कमवायला लागते. काही नातेवाईक त्यांना आपल्यासोबत मुंबईला घेऊन येतात आणि मग रोज भरपूर काम करवून घेत आश्रय देतात. गाण्याची स्कॉलरशिप दोघी मुलींना मिळत असल्याने अल्पावधीतच त्या मुंबईत स्वतंत्रपणे राहू लागतात. मानसी तिथल्या महिलांना भजनं शिकवू लागते आणि संगीतातच पुढच्या वाटा तिच्यासाठी एकापाठोपाठ एक उघडत जातात. इंद्रनील यादव नावाच्या बड्या संगीतकाराकडून तिला पहिली वहिली ऑफर मिळते आणि मानसीचं जीवन बदलून जातं. ती स्टार होते.. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात तिचं खूप नाव होतं.
बन्सीला तोवर आपली दिशा काही गवसलेली नसते. शिवाय आईवडिलांच्या पश्चात् मान दिदीनी आपलं घर सावरलं हे ती जाणून असल्यानेच ती मान दिदीच्या शब्दाबाहेर नसते. एकदा ती स्वतःला गाण्यात करिअर करायचं असल्याची इच्छा बोलून दाखवते पण मान दिदी तिला नकार देते. तिला माहिती असतं, जर बन्सी गायला लागली तर आपण तिच्यापुढे फिक्या पडू .. शिवाय स्पर्धाही वाढेल .. म्हणूनच काहीशा मत्सराच्या, ईर्ष्येच्या आणि असुरक्षिततेच्या भावनेनेच ती बन्सीचं लवकरच लग्न करून देते. लग्नानंतर बन्सीच्या वाट्याला जे भोग येतात ते तर फारच दुर्दैवी.. पण तरीही मान दिदीची साथ असते त्यामुळे बन्सीला बरेच दिवस कळतही नाही की या जीवनात आपली वाट आपण निवडायची असते. मग एकदा बन्सी पुन्हा आपलं गाणं सुरू करण्याचा विषय काढते, यावेळी थोड्याशा हट्टानेच का होईना .. पण अखेर दिदीला ती पटवणार इतक्यात दिदी स्वतःचा मोठेपणा स्वतःकडेच ठेवत तिला म्हणते, अगं, मी अमुक एका संगीतकारांशी बोललेय, आणि त्यांनी आपल्याला ड्यूएट गाण्याची संधी दिलीये.. बन्सीला संधीची नितांत गरज असते .. त्यामुळेच ती आनंदाने हरखून जाते. पण प्रत्यक्षात रेकॉर्डींगच्या वेळी बन्सीबरोबर विश्वासघात होतो. बन्सीच्या सगळ्या ओळी मान दिदीच गाऊन मोकळी होते.. बन्सी तक्रार करायला जाते पण मान दिदीचा अधिकार मोठा .. त्यामुळे खुद्द संगीतकारही तिला काही बोलत नाहीत तर बन्सीलाच लहान म्हणून समजावतात. ती चरचरीत जखम बन्सीला मोठं करून जाते. तिच्या लक्षात येतं की इथून पुढचा प्रवास आपला एकटीचा असणार आहे.. आणि मग ती झपाटून कामाला लागते.. हळूहळू या क्षेत्रात बन्सीचंही बरंच नाव व्हायला लागलेलं असतं. आता तिला तिच्या छळणाऱ्या नवऱ्यापासून कायमची सुटका हवी असते. मान दिदी तिला तिच्या वाईट्ट नवऱ्याच्या ताब्यातून सोडवते, चार पैसे फेकल्यावर तिचा लोभी आणि कामचुकार नवरा तिला घटस्फोट द्यायला तयार होतो. बन्सी माहेरी येते पण पोटात नव्या जिवाची चाहूल लागलेली असते.. कुहूचा जन्म होतो.
कुहूचा जन्म आणि त्यानंतर बन्सीची भरभराट.. बन्सीला त्या वर्षी पंधरा ऑगस्टला गौरव गीत गाण्याचं निमंत्रण खुद्द सरकारकडून बन्सीला मिळतं. ती पुढल्या सूचनांची वाट पहात रेंगाळते आणि अगदी पुढल्याच आठवड्यात टीव्हीवर तेच गौरव गीत गाणारी मान दिदी पाहून बन्सीला आपली संधी हुकल्याचं, आपला विश्वासघात झाल्याचं लक्षात येतं. त्यानंतर ती मान दिदीशी सगळे संबंध तोडून टाकते .. कायमचे ..
विलक्षण गुंतागुंत आणि मानवी जीवनाचे निरनिराळे पैलू उलगडणारी ही कथा पुढे इतक्या सुंदर पद्धतीने उलगडत जाते की आपण त्यात हरवून जातो. बन्सीचं पार्श्वसंगीताच्या शिखरावर पोहोचणं, मानसीची हार आणि नंतर आलेलं प्रचंड एकाकीपण, तिकडे कुहूचं वेगळं आयुष्य.. पण तीही याच गाण्याच्या क्षेत्रातली, त्यामुळे तिचं संगीताचं वेगळं विश्व.. या विश्वात तिला आवडणारा, तिच्यापेक्षा वयाने मोठा असलेला संगीतकार, गायक आणि एक अत्यंत चैतन्यदायी व्यक्तिमत्वाचा धनी असलेला हिमान देसाई (ज़ाकीर हुसैन) .. ज्याच्यावर कुहू भाळलेली असते तो हिमान .. पण तो .. तो बन्सीच्या प्रेमात पडतो.. बन्सीला मागणी घालतो आणि बन्सीही त्याच्या भावनिक गुंत्यात अडकत जाते. कुहूला जेव्हा हे कळतं तेव्हा तिचा राग.. अस्वीकार आणि विश्वासघाताची भावना .. हे सगळं सगळं पडद्यावर पहाणं, अनुभवणं एक निराळाच अनुभव देणारं आहे.
असं संपूर्ण जीवन एका नौकेसारखं, जिच्या स्वतःच्या हातात काहीच नसतं, नावाडी वल्हवेल त्या दिशेनं जात रहायचं.. असं अर्धअधिक जगलेली बन्सी .. आणि पुढे जीवनात आलेल्या आडव्यातिडव्या वाटा नि वळणं.. त्या वाटांवर कधी इंद्रनील तिचा बनून आला तर कधी मान दिदी .. कधी हिमान तिचा बनून आला तर कधी कुहूने तिची साथ दिली .. पण हिमानचा मृत्यू .. त्या क्षणाची साक्षीदार फक्त बन्सी .. ती ते सगळं आठवते आणि मनाने खचत जाते. आपल्या जीवनाची नौका अशी वहावत वहावत आता कुठे नेणार आपल्याला या विचारांच्या गर्तेत ती इतकी हरवते की तिचं गाणं बंद होतं. आपण गाऊ शकतो हा आत्मविश्वासच ती हरवते .. आणि अशातच तिची भेट होते ती तिच्या मानसोपचारतज्ज्ञांशी .. जे तिचं ऐकत जातात. आपली प्रोफेशनल मर्यादा कधीही ते ओलांडत नाहीत. बन्सीला बरं करताना काही काही प्रसंगात ते विचलीत होतात खरे .. पण तरीही त्यांच्या उपचारांचा परिणाम म्हणा किंवा कुहूला सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने बन्सीच्या जीवनात पुन्हा झालेली आनंदाची पखरण यामुळे म्हणा बन्सीचे हरवलेले सूर पुन्हा तिचे तिला सापडतात .. आणि बन्सीचं आयुष्य पुन्हा सुरांचा साज़ लेवून झळाळून उठतं..

असा हा साज़ चित्रपट.
हा चित्रपट पहाणं म्हणजे सुरांची मेजवानीही आहेच एकप्रकारे कारण यातली एक से एक गाणी .. 'बादल चांदी बरसाए' हे गाणं भूपेन हजारिकाजींनी ज्या अवीट माधुर्याने संगीतबद्ध केलंय ते म्हणजे निव्वळ श्रवणीय .. सुखद .. तसंच माझं आवडीचं गाणं, 'क्या तुमने है केहे दिया ..' यात ज़ाकीरजींना पहाणंही तितकंच आनंददायी आहे. फिर भोर भई जागा मधुबन, बादल घुमड बढ़ आए ही गाणीही विशेष आवडून जातात.
शबाना आज़मी आणि अरूणा इराणी यांच्या अभिनयाला तर तोड नाही. तितकाच संयत अभिनय परिक्षित सहानी आणि ज़ाकीरजींचा झालाय. कुहूचं काम करणारी अभिनेत्री आयेशा धारकरही छानच आहे. शेवंताचं काम करणारी अभिनेत्री माधवी शेट्ये, जोशी गुरूजी जे मुलींचे शाळेतले शिक्षक असतात त्यांचं पात्र रंगवणारे हेमचंद्र अधिकारी, मानसी आणि बन्सीच्या भूमिका करणाऱ्या दोघीही बालकलाकार यांचेही अभिनय तोडीस तोड झालेले आहेत. मुख्य म्हणजे संपूर्ण चित्रपटात बन्सीचं जे ट्रान्स्फॉर्मेशन आहे ते शबानाजींनी काय अफाट दाखवलंय.. अरूणा इराणींच्या वाट्याला अशी भूमिका कदाचित पूर्वी कधीच आली नव्हती .. त्यांनी त्यांच्या भूमिकेला चारचाँद लावले आहेत. प्रेमळ, जबाबदार, मोठी बहीण आणि तितकंच तिच्या देहबोलीत अधेमधे डोकावणारी असूया, आपलं स्थान डळमळीत होईल अशी भीती वाटून वागण्याबोलण्यात येणारा थोडीशीच मत्सराची छटा .. हे सगळं सगळं अरूणाजींनी अगदी सुंदररित्या दाखवलं आहे.
आणि अर्थातच, कळसाध्याय म्हणजे सई परांजपे.. स्वतः इतक्या साध्या, करारी आणि थेट .. त्यांच्या कलाकृतींमधूनही त्या तशाच थेट पोचतात. अलिकडच्या काळात सईंसारख्या धाटणीच्या दिग्दर्शिका म्हणून सुमित्रा भावेंकडे पाहीलं जाऊ शकतं. मध्यंतरी स्मिता तळवलकरही मला याच वाटेवरच्या दिग्दर्शिका असल्यासारखं वाटायचं.. पण तरीही या सम हा म्हणतात ना .. तसं सईंचं आहे. त्यांची मांडणी, त्यांची कलाकारांची निवड, त्यांचा अनुभव, मानवी नात्यांची आणि त्यातील गुंतागुंतीची त्यांची जाण, मुळात चित्रपट या माध्यमाची त्यांची समज, त्यांचा अनुभव आणि त्यांची विचारपद्धती याला तोड नाही हे हा चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा जाणवत रहातं.
लक्षात रहाण्याजोगी दोन पात्र म्हणजे बन्सी आणि हिमान .. ते आपल्या सौंदर्याची छाप पाडून जातात.. तसंच जावेद अख्तर यांचे शब्दही .. या चित्रपटासाठी जावेदजींना नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट लिरिक्सही मिळालं होतं.
नातं, बहिणी बहिणींचं .. या नात्याचे कित्तीतरी पदर .. तसंच एक नातं आई मुलीचं .. तसंच एक नातं प्रियकर प्रेयसीचं .. त्या नात्याच्या कित्तीतरी छटा आणि एक नातं डॉक्टर आणि पेशंटचं ..एक नातं घरकाम करणारी पोरसवदा मुलगी आणि तिच्यापेक्षा काहीच वर्षांनी लहान असलेल्या दोघी मुलींचं, एक नातं आईवडीलांचं .. ज्यात एक कोलमडला तर दुसराही उन्मळून पडला.. एकाचं जाणं दुसऱ्याला बेचिराख करून गेलं.. जबाबदारी निभावणं किती कठीण पण मोठ्या बहिणीनं लहान वयात तीही उत्तम पेलली.. मत्सर, ईर्ष्या टळली नाही तिलाही पण म्हणून बहिणीवरचं प्रेम कमी नव्हतं. तीच निष्ठा धाकट्या बहिणीचीही .. दिदीच्या शब्दाबाहेर न जाण्याचं जणू स्वतःलाच दिलेलं वचन ... पण हे सगळं छान शहाणं असलं तरीही आयुष्याची वाट नेहमीच वेड्यावाकड्या वळणांनी पुढे जात असते. माणसाच्या हातात काहीच नसतं.. जे जसं येईल ते तसं निभावत पुढे पुढे जात रहायचं इतकंच काय ते माणूस करू शकतो.. सुखाच्या मृगजळामागे माणूस आयुष्यभर धावत असतो .. ते हाती लागतं तो दिवस सोन्याचा .. बाकी तर जीवनचक्र अव्याहत सुरू ठेवायचं इतकंच ...

सुरोंका साज़ चढने दो .. जीवन आगे बेहेने दो .. जीवन बेहता है .. बेहेने दो ...

- मोहिनी घारपुरे - देशमुख

copyright@mohineeg

Translate

Featured Post

अमलताश