मुळातच साऊथकडच्या फिल्म्समध्ये जो एक नीट आणि थेट पद्धतीने विचार मांडण्याची शैली आढळून येते तशीत ती या वेबसिरीजमध्येही स्पष्ट दिसते. दिग्दर्शकाला जे मांडायचंय ते थेट आपल्यापर्यंत पोहोचतं.
ग्रीड ( लोभ, हव्यास ), Rage ( रेज म्हणजे संताप, चीड ), बीट्रेयल ( विश्वासघात ), लस्ट ( वासना ), Vengeance ( सूड ) या पाच शीर्षकांतर्गत समोर येणाऱ्या पाच कथा .. अक्षरशः आपल्या डोळ्यात सोशल मीडिया या माध्यमाबद्दल झणझणीत अंजन घालतात.
सोशल मीडियाबद्दल एकदा का आपण कम्फर्टेबल झालो की मग यातली दुसरी काळी बाजू आपल्या लक्षातही रहात नाही. हे माध्यम हाताळण्यापूर्वी आपण ज्या गोष्टींबद्दल सतर्क असतो, काळजी घेण्यासाठी सज्ज असतो, ते सारंच आपण या भुलभुलैय्यात प्रत्यक्ष अडकल्यावर विसरून जातो. धडाधड अनोळखी लोकांशी मैत्री करत सुटणे, डेटींग साईट्सवर वावरणे, आपली माहिती हळूहळू करत बिनधास्तपणे शेअर करत जाणे, वारंवार लाईक्स मिळवण्यासाठी निरनिराळ्या शक्कल लढवत फोटोज, पोस्ट्स शेअर करत जाणे, लाईक्सचे नवेनवे आव्हानात्मक टार्गेट्स स्वतःला देत पोस्ट्स करत रहाणे या सगळ्याची परिणिती स्वतःचं मनःस्वास्थ्य हरवण्यात तर होतेच होते पण कधीकधी या माध्यमातून होणाऱ्या भयंकर गुन्हेगारीलाही काही दुर्दैवी जणांना सामोरं जावं लागतं अशी अवस्था होते. या साऱ्याच मोहपाशाच्या विळख्यातून एकेक प्रकारचे सायबर गुन्हे कसे आणि कोणकोणत्या मानसिक अवस्थांमध्ये घडतात, घडवले जातात या साऱ्याविषयी या वेबसिरीजमधल्या कथा बोलतात. काही कथा जरा अतिरंजीत असतीलही पण त्यातून मिळणारा संदेश हा महत्त्वाचा असं मला वैयक्तिकरित्या ही सिरीज पहाताना वाटलं.. आणि म्हणूनच आपल्यापर्यंतही हे पोहोचवावं म्हणून तातडीने हा लेखनप्रपंच ..
ग्रीड नावाच्या कथेची नायिका रेखा दिवसागणिक सोशल मीडियाच्या इतकी आहारी जाते की या माध्यमावर हिट होण्यासाठी अक्षरशः कर्जबाजारी होते. आपल्या पतीच्या सांगण्याकडे, समजावण्याकडे वारंवार दुर्लक्ष करत लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या हव्यासात स्वतःचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करून बसते. ती इतक्या थराला पोचते की सोशल मीडियासाठी काही लाख रूपये खर्चून फोटोशूट करण्याचा नाद तिला लागतो. नंतर जेव्हा पैसे नसतात तेव्हा ती फोटोग्राफरला गळ घालते आणि उधारीवर दुसरं फोटोशूट करते. अखेर घराचे हफ्ते भरण्यासाठी नवऱ्यावर एकट्यावर वेळ येते तेव्हा त्याला हे सगळं समजतं नि तो अक्षरशः अशा बेजबाबदार, मूर्ख बायकोला हाकलून लावतो. तरीही हिचे डोळे उघडत नाहीत.. आणि आपल्या हव्यासापोटी ती तिच्यावर लट्टू असणाऱ्या बॉसचा आधार घेत आपलं सोशल मीडिया लाईफ सुरूच ठेवते आणि त्यासाठी वाट्टेल ती तडजोड करतानाही तिला काहीच वाटेनासं होतं.
रेज या दुसऱ्या कथेत एक वयस्कर, जबाबदार गृहस्थ .. थोडासा आग्रही आणि आपल्या संस्कृतीबद्दल जरा जास्त संवेदनशील .. एकदा रस्त्यात एक टपोरी पोरगा बेफामपणे बाईक चालवत असताना एका वयस्कर माणसाला धडकतो आणि वर चार लोकात त्या गृहस्थांना वाट्टेल ते बोलायला लागतो. हे पाहून कथेचे नायक असलेले वयस्कर गृहस्थ पुढे सरसावतात आणि त्याला माफी मागायला लावतात, त्याला चांगलंच सुनावतात आणि संतापाच्या भरात त्या पोराला कानशिलात भडकवतात. आता हा तरूण टपोरी पोरगा सूडाच्या भावनेने पेटतो. या गृहस्थाच्या दैनंदिनीवर लक्ष ठेवतो आणि त्यांचे फोटो काढतो. मग एकदा हे काका एका लहान शाळकरी पोरीशी प्रेमाने दोन शब्द बोलत असतानाचा फोटोही तो पोरगा लपूनछपून काढतो आणि मग काकांच्या नावाने त्या फोटोसह एक संदेश टाईप करून सोशल मीडियावर व्हायरल करून टाकतो.. केवळ सूडापोटी.. त्याने लिहीलेलं असतं, हा माणूस लहान मुलांना पळवतो .. याला नुकतंच पोलीसांनी पकडलंय .. अशा अर्थाचा तो संदेश असतो. हा मेसेज तो पोरगा तुफान व्हायरल करतो आणि अर्थातच याची परिणिती त्या भल्या माणसाची बेअब्रू होण्यातच होते. मग पोलीस कंम्प्लेंट वगैरे होते, पोलीस त्यांना सांगतात सध्या घराबाहेर पडू नका.. थोडेदिवस कुटुंबीयांच्याही पाठींब्यामुळे व विश्वासामुळे काका घराबाहेर पडत नाहीत आणि मनानीही सावरतात. मग काही दिवसांनी मित्रपरिवार व कुटुंबीयांसमवेत सगळे देवदर्शनाला जातात.. तेव्हा एका मित्राच्या नातवाला थोडावेळ त्या गृहस्थांबरोबर बाहेर उभं करून सारीजण मंदिरात पांगतात. हा छोटा आजोबांजवळ जाण्याचा हट्ट करू लागतो पण एवढ्या गर्दीत त्याला एकटं सोडणं केवळ अशक्य म्हणून हे सद्गृहस्थ त्याला समजावू लागतात आणि त्याचा हात सोडत नाहीत. इतक्यात एका फुलवाल्याला तो मेसेजमधला माणूस हाच हे लक्षात येतं आणि पुढच्या काही मिनीटातच त्या सद्गृहस्थांना अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवलं जातं. मंदिरातली काही माणसं त्यांना बच्चाचोर समजून मारझोड करायला लागतात.. अखेर त्यांचे मित्र व परिवार येऊन त्यांना वाचवतात पण तोवर फार उशीर झालेला असतो.. या धक्क्याने ते पार कोलमडतात, शरीराने अपंगत्व तर येतंच पण मनानेही ते कायमचे खचून जातात..
बाकीच्या गोष्टीही अशाच .. मन सुन्न करणाऱ्या.. सोशल मीडियाचं एक वेगळंच वास्तव दाखवणाऱ्या आहेत. त्याबद्दल लिहीत नाही.. पण गोष्टींच्या शीर्षकावरूनच कथा लक्षात यावी.
हल्ली आपल्याला या नव्या माध्यमांनी खरोखरीच मोहपाशात गुंडाळून ठेवलंय. सुदैवाने काही जण ज्यांचे पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर आहेत अशीही बरीच मंडळी या माध्यमांवर सजगपणे वावरत असतात पण बरीच मंडळी या माध्यमात इतकी गुंततात की त्यापलीकडच्या वास्तव जगाचं त्यांना भानच उरत नाही. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवायचा नाही हे कितीही खरं असलं तरीही याच जगातले अनेक अनोळखी लोक विश्वासार्हही आहेत हे सोशल मीडियानेच काही प्रमाणात सिद्धही केलं आहे. जग मुठीत आणून ठेवलंय.. पण तरीही आपल्याला या जगातील ही काळी बाजूही ध्यानात ठेऊन इथे वावरायला हवं, सतर्क आणि सावध रहायला हवं हेच खरं..
- मोहिनी घारपुरे - देशमुख