साहित्य - कढीपत्त्याची वाळलेली पानं, तीळ, खोबरं, भाजलेले शेंगदाणे, कलौंजी, मीठ, तिखट, जीरे, (आवडत असल्यास) लसूण व साखर
कृती -
१. कढीपत्त्याची वाळलेली पानं आधी मिक्सरमधून फिरवून त्याची पूड करून घ्या.
२. आता त्यात (मूठभर) भाजलेले तीळ + शेंगदाणे ( अर्धी वाटी ) + खोबरा कीस ( वाटीभर) आणि कलौंजी ( एक ते दोन टेबल स्पून ) घाला. ( या सर्व जिन्नसाचे प्रमाण कढीपत्त्याच्या पूडीच्या तुलनेत व आपल्या आवडीनुसार कमीजास्त करू शकता )
३. हे सर्व मिश्रण पुन्हा मिक्सरमधून फिरवावं व त्याचवेळी त्यामध्ये योग्य प्रमाणात तिखट, मीठ, साखर चवीनुसार आणि आवडत असल्यास लसूण पाकळ्या चार ते पाच घालाव्या ( मी लसूण घातलेले नाही )
४. आता हे सर्व जिन्नस घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवले की चटणी तयार.
५. शेवटची पण अत्यंत महत्वाची स्टेप म्हणजे ही चटणी एखाद्या पँनमध्ये मंद आचेवर थोडीशी परतून घ्यावी.. साधारण अंदाजे खमंग वास सुटेपर्यंत परतावी व ताबडतोब एका ताटात काढून घ्यावी व थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवावी. यामुळे कढीपत्त्याच्या पानांचा कच्चेपणा जातो तसेच चटणी खमंग चव येते. मात्र फार वेळ व फार मोठ्या आचेवर भाजू नये नाहीतर सगळी चटणी भराभर करपून जाण्याची दाट शक्यता असते.
६. थंड झालेली चटणी पुन्हा डब्यात भरताना त्यात थोडे तीळ, खोबराकीस, कलौंजी, जीरं (थोडंस भाजलेलं) आणि पिठीसाखर किंवा साखरही घालू शकता, यामुळे चटणीचा स्वाद आणखी वाढतो.
७. तीळ, खोबरं कीस आधी भाजून घेऊन मग कढीपत्त्यासह मिक्सरमधून फिरवला तरीही चालतो.
८. कढीपत्ता जर ताजा ताजा असेल तर तो तसाच एकदोन दिवस उन्हात वाळवून मग पूड करावी किंवा ताजीताजी पानं तेलावर परतून कुरकुरीत करून घेता येतात. मला तेल अव्हॉइड करायचं होतं शक्यतो म्हणून मी पानं तशीच ठेऊन नैसर्गिकरित्या वाळू दिली व मग चटणी केली.
ही चटणी नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
- मोहिनी घारपुरे - देशमुख
#mykitchenkey
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा