शनिवार, १७ जुलै, २०२१

बाई, बूब्स आणि ब्रा

गेले तीन चार दिवस सोशल मीडियावर या एकाच विषयावर बरीवाईट योग्य अयोग्य चर्चा रंगली आहे. मराठीतील आजची आघाडीची अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या एका व्हिडीओनंतर तिच्यावर जे असभ्य भाषेत ट्रोलिंग झालं त्यानंतर तिनं लिहीलेली बाई, बूब्स आणि ब्रा ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. 

हा ' न बोलण्याचा विषय ' खरंतर .. 

पण एकंदरीतच बाईच्या स्तनांविषयी नेहमीच फार बोललं जातं. या स्तनांबद्दल पुरूषांना आकर्षण आणि बायकांना त्यांच्या या सौंदर्यस्थळाचा काहीसा सार्थ अहंकार .. म्हणून (ब्रा घाला किंवा नका घालू ) .. स्तनांविषयी बोललं जातंच. 

ज्या स्तनांतून बाल्यावस्थेत चुटूचुटू दूध प्यायलं त्या स्तनांविषयी वासनांध होऊन बरळत रहाणे आणि संधी मिळताच कोणत्याही स्त्रीच्या स्तनांना दाबण्याचा विकृत आनंद घेतल्यावाचून पुरूषांना रहावत नाही हेच खरं. हल्ली तर आभासी दुनियेत हे असं अश्लील कंटेंट एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळेच बाईचा व्हिडीओ आला रे आला की आधी त्या व्हिडीओतील 'बाई'च न्याहाळली जाते ही विकृती बळावत चालली आहे.. आणि हेमांगी कवीचंही हेच झालं. असो, हे सगळे मुद्दे सध्यापुरते बाजूला ठेऊ .. 

तर मुळात बायकांनी घरात ब्रा घालावी की नाही हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हे खरोखरच मान्यच आहे.. पण जरा गडबड वाटते ती या विधानात की घरातील पुरूषांसमोर स्त्रियांनी तसं वावरावं की नाही यात..

खरी मेख इथे आहे, ब्रा लेस तर बायका एकांतात राहूच शकतात पण पुरूषांसमोर वावरताना त्यांच्या इच्छेविरूद्ध त्यांना ब्रा घालून स्तनांना आवळून ठेवावं लागतं, तेही पुरूषाची वासना चळू नये या एकमेव उद्देषाने, हा स्त्रियांवर जुलूम आहे असं हेमांगीचं म्हणणं आहे. 

आणि असं जर तिच्यासारख्या अनेक महिलांना वाटत असेल तर या निमित्ताने आता आपण त्याला पर्यायही शोधायलाच हवा. जर घरात फिट्ट ब्रा घालायची नसेल तर त्याऐवजी असं काहीतरी बायकांसाठी वस्त्र तयार करायला हवं, ज्यात तिच्या स्तनांना नीट आधारही मिळेल आणि तिचा हा प्रायव्हेट पार्ट नीट झाकलाही जाईल. शिवाय सतत घट्ट आवळून बसणाऱ्या ब्रा च्या स्ट्रीप्सने तिचा श्वास गुदमरणारही नाही. 

यासाठी अनेकजणी सांगतील की मग स्पोर्ट्स ब्रा वापरा नि अजून काय काय वापरा .. पण ते सगळं इतकं महाग असतं, शिवाय ते सर्वसमावेशक अद्याप झालेलं नाही याचं कारण तेही फार फिट्ट असतं. 

मी हे सगळं का लिहीतेय .. कारण, गेले दोन चार दिवस या चर्चा आणि त्यावर आलेल्या कमेंट्स वाचताना या विषयाची गुंतागुंत स्पष्टपणे लक्षात आली म्हणून..

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एरवी पुरूषांनी त्यांचा प्रायव्हेट अवयव असा दाखवला, किंवा नकळतपणे तो वस्त्राआडूनही दिसला तर मग आपण बायका त्यांना विकृत किंवा किळसवाणे म्हणून सहज संबोधतो. म्हणजेच काय, आपले प्रायव्हेट पार्ट दुसऱ्याला दिसणं हे दुसऱ्यासाठीही  किळसवाणंच असतं. काहीच महाभाग, विकृत माणसांना हा आनंद हवा असतो. पण सभ्यतेने वागणाऱ्या स्त्रिया वा पुरूषांना अगदी रस्त्यावरून चालणारे 'नागा साधू' जरी दिसले तरीही त्यांचीही क्षणभर किळस येते. लहान मुलंमुली अशा नागा साधूंना पाहून घाबरतात हा अनुभव बहुतांश सगळ्यांनी घेतला असावा. 

काल एक खूप वेगळीच प्रतिक्रिया वाचनात आली माझ्या तेव्हा या विषयाची दुसरी बाजूही खरंच विचार करण्याजोगी आहे असं मला तीव्रतेने वाटलं. ती प्रतिक्रिया होती एका पुरूषाची.. ते कदाचित ग्रामीण भागातले असावेत आणि त्यांनी नीट त्यांच्या ग्रामीण भाषेत या विषयावर लिहीलं होतं, 'की हे बघा, जर घरात वयात येणाऱ्या मुलांपासून ते पुरूषांपर्यंत कोणाचंही अचानक लिंग ताठरलं तर त्यालासुद्धा घरातले इतर पुरूष नीट समजावतात, शिकवतात, नि अशी अवस्था होऊ नये म्हणून त्याला काळजी कशी घ्यायची हे सुद्धा शिकवलं जातं. समजा, भावंड घरात असतील तर भावालासुद्धा बहिणीसमोर कसं वागायचं हे नीट सांगितलं जातंच ना.. जसं मुलींनाही त्यांचे अवयव नीट झाकले जावेत व त्यासाठी ब्रा वापरायला हवी हे शिकवलं जातंच. आता समजा, तुमच्यापुढे एखाद्या पुरूषाचं लिंग उद्दीपीत झालं तर .. तुम्ही त्यालाच नावं ठेवाल नं .. आणि तो जर म्हटला की मला नाही आवडत अंडरपँट घालायला ..मग तो तसा फिरणार तर हे चालेल का तुम्हाला .. नाही ना..?'

ही प्रतिक्रिया वाचून क्षणभर मी खरंच विचारात पडले. कारण, त्या प्रतिक्रियेतील मुद्दे खरोखरच बरोबर होते. तुम्ही घरात एकांतात कसेही रहा पण दुसऱ्या व्यक्तीपुढे जाताना तुम्ही हे सामाजिक संकेत पाळणं हे जास्त संयुक्तिक आहे असं मला वाटतं. ब्रा चा त्रास होत असेल तर किमान कपडे तरी असावेत की आतले अवयव विचित्रपणे दुसऱ्यांना दिसणार नाही.. आणि अशीच काळजी पुरूषांनीही घ्यावी.

आता आणखी एक फार महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो, की एवढी काळजी घेऊनही समजा एखाद्या स्त्रीचे स्तन वा स्तनाग्र चुकून दृष्टीस पडले तर तिला हिणवण्याचा, त्यावरून घाणेरड्या अश्लील प्रतिक्रिया देण्याचा हक्क तुम्हा पुरूषांनाही कोणी दिलेला नाही. एखाद्या स्त्रीला अशा  पद्धतीने बघणंच मुळात चुकीचं आहे. त्यातून या अशा प्रतिक्रिया देणारे बहुतांश लोक लग्न झालेले थोराड माणसं आहेत.. त्यामुळे त्यांना तर एवढाल्या वयाला या विषयावर बोलावसं वाटावं आणि त्यात चवीनं आस्वाद घेत आपल्या कमेंट पोस्ट कराव्या असं वाटणं यातच सगळी समाजाची विकृती स्पष्टपणे दिसते. अनेक बायकांनीही फार भयंकर भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांनाही खरंच एवढच सांगावसं वाटतं, की या अशा वादात पडून पुरूषांच्या बाजूने विचार करताना, पुरूषांच्या या समाजात स्वतःला तुम्ही चांगल्या बायका म्हणून प्रोजेक्ट करालही यशस्वीपणे, पण तुमच्यात हेमांगीइतका प्रामाणिकपणा नाही. उलट तुम्ही लबाड आहात, पुरूषांच्या या राज्यात राणी बनून कसं रहायचं, कसं स्वतःला चांगलं दाखवायचं, त्यांच्या फेव्हरेट कसं व्हायचं या सगळ्यातच तुमचं आयुष्य जाणार त्यापलिकडे तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून कधीच स्वतंत्रपणे विचार करू शकणार नाही आणि हेच तुमचं अपयश आहे बरं का बायकांनो.. त्यामुळे एखाद्या बाईची अशी विकृत थट्टा करण्याचा हक्क तुम्हालाही कोणी दिलेला नाही. 

जाता जाता मला दोन सिनेमांचा उल्लेख इथे करायचा आहे. एक म्हणजे, 'राम तेरी गंगा मैली' आणि दुसरा 'सत्यम् शिवम् सुंदरम्' ..

राम तेरी गंगा मैली चित्रपटात मंदाकिनी बाळाला दूध पाजते तो सीन आठवा.. तेव्हा तिचा एक उघडा स्तन पहाण्यासाठी हा चित्रपट किती वेळा कित्तीतरी लोकांनी पाहिला होता.. आणि सत्यम् शिवम् सुंदरम् चित्रपटात केवळ स्वच्छशुभ्र धूत आणि ओलेत्या वस्त्रासह नाचणारी ती झीनत पहाण्यासाठी त्या गाण्याची पारायणं करणारी शेकडो मंडळी याच समाजाचा भाग आहेत. टारझन चित्रपटातली स्तन दाखवणारी किमी काटकर पाहून टारझनसह चळणारी अनेक मंडळी आजही इथे आहेत.. त्यामुळे स्तनांचं मीडियामधलं राजकारण काही नवं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरही आता हे असंच विकृत राजकारण सुरू झालेलं आहेच. पोर्न इंडस्ट्री तर सगळंच विकू पहातेय. असं सगळं वातावरण असताना प्रत्येक व्हिडीओतून प्रकटणाऱ्या प्रत्येक नव्या बाईच्या शरीराची मापं काढणाऱ्या आणि त्यांचं असं हसं करणाऱ्या विकृत जनतेपासून आपल्यासारख्या चांगल्या, सुशिक्षित आणि सभ्य जनतेनं तरी चार हात लांबच रहावं हेच खरं..

- मोहिनी घारपुरे - देशमुख  


 ही आई आहे ..फक्त  मादी नाही.. 
She is not only a women but a MOTHER
RESPECT EVERY WOMEN



Translate

Featured Post

अमलताश