बुधवार, १ डिसेंबर, २०२१

फरसाण मिनीसमोसा

 समोसा आवडत नाही असा माणूस दुर्मिळच.

समोशाची भाजी आणि समोशाची पारी या दोन्हीही गोष्टी इतक्या चविष्ट की समोसे खाणारी मंडळी त्यावर अक्षरशः तुटून पडतात. 

तिकडे नाशिकला समोशांबरोबर चिंचेची गोड चटणी किंवा पुदीन्याची हिरवी चटणी मिळते, आणि इकडे विदर्भात तर समोसे चक्क कढीबरोबर आणि चनारश्शाबरोबर खाल्ले जातात. पहिल्यांदा जेव्हा मला हे कळलं तेव्हा खाद्यिकधक्का ( मानसिक पातळीवर विचित्र पदार्थ ऐकल्यावर बसलेला धक्का म्हणून खाद्यिकधक्का ) बसला होता. कढीबरोबर समोसे ऐकल्यावरच मला कसंतरी झालं होतं.. पण प्रत्यक्षात खाताना फारसं विचित्र वाटलं नाही ते एक बरं झालं, त्यामुळे विदर्भवासी मित्रमैत्रिणी मला मिळाली.. अन्यथा ती मंडळीही जीवनात कधी आलीच नसती. 

तर समोसे म्हणजे बटाट्याची भाजी आणि खुसखुशीत पारी एवढंच काय ते समीकरण, पण त्यावर जेव्हा कांदा, कोथिंबिर, हिरवी आणि चिंचेची चटणी आणि दही घालून तो समोर येतो, वर भुरभुरवलेली बारीक शेव तेव्हा लक्षात येतं की दहीसमोसा, किंवा समोसाचाट हा एक अफलातून प्रकार आहे. त्यात कहर म्हणजे जेव्हा त्यावर विदर्भातला थोडासा चनारस्सा गरमागरम घातला की मग तर त्याची चव आहाहाच लागते. 

या समोशांनी अक्षरशः मनं जिंकली आहेत आपली.. म्हणूनच घरी समोसे करण्याचा खटाटोप करता करता मी तेही बऱ्यापैकी उत्तम बनवू लागले याचं मला कोण कौतुक.

पण एवढ्याशावर थांबेल ती मी कुठली... मला व्हेरीएशन करायला आवडतात, नावीन्यपूर्ण कृती करून पहायला फारच आवडतात मग भले त्या पहिल्या फटक्यात नाही जमल्या तरीही आवडतात. तसंच या समोशांनी जेव्हा मन भरलं तेव्हा मी समोशांच्या अन्य प्रकारांकडे वळले.. त्यातले दोन मला आवडलेले प्रकार म्हणजे, 

फरसाण समोसा आणि

खव्याचा समोसा 

तर आज या दोन्हीही पाककृती खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी येथे देत आहे करून पहा आणि नक्की मला कळवा. - 

1. फरसाण समोसा 

चटपटीत असा मिनी समोसा.. हा स्टोअर करूनही ठेऊ शकतो. 

कृती - 

गरम तेलाचं मोहन घालून मैदा भिजवा, चवीला मीठ आणि ओवा हातावर कुस्करून घाला आणि मग हा गोळा तेल चोपडून थोडावेळासाठी बाजूला ठेऊन द्या. 

सारण (स्टफींग) - 

घरात जर हलदीरामची आलू भुजीया असेल तर ती घ्या वाटीभर. ती नसेल तर जेही फरसाण असेल ते घ्या. आता ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात चिंच गुळ किंवा आमचूर पावडर, धणेजिरे पावडर, तिखट चवीनुसार घाला आणि साखर घाला.. आंबट गोड आणि चटपटी चव आली पाहिजे सारणाला त्यानुसार घाला. 

आता आधी पुरीसारखी लाटी करून ती छान गोल पुरीच्या आकारात पातळ लाटून घ्या. मग सुरीने मधोमध कापून दोन भाग करा. आता एक भाग उचलून त्याला कोनच्या आकारात मुडपून घ्या. मुडपताना कडेला थोडंस पाणी लावा म्हणजे पारी नीट चिकटेल. आता त्यात सारण भरा. खालून समोशाच्या फोल्डप्रमाणे आडवा फोल्ड करून समोसे तयार करा. आणि मग हे समोसे मध्यम आचेवर (हाय टू मीडियम) तळा. गरमागरम फरसाण समोसे चवीला तर छानच लागतात. खुसखुशीतही असतात आणि टिकाऊपण असतात, त्यामुळे बरणीत भरून ठेवा आणि पुरवून पुरवून खा. 

2. खवा समोसा 

आता याच पद्धतीने खवा समोसा किंवा ड्रायफ्रुट समोसाही बनवता येतो. त्यासाठी खव्यात साखर व वेलची मिसळून आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून सारण बनवून घ्या आणि समोशाच्या पारीत ते सारण भरून गोड गोड खवा समोसे तयार करा. हे समोसेही साधारण एक दोन दिवस टिकतात. तसेच चवीलाही मस्त लागतात. 

(सोबत मी नुकत्याच केलेल्या या दोन्ही सामोशांचे फोटो जोडत आहे..) 

#MyKitchenKey







बुचाचं झाड ..

 बुचाचं झाड ..
घराच्या रस्त्यावर होतं .. 
ती फुलं तुडवत जाताना अगदी वाईट वाटायचं.. पण रस्त्याच्या कडेकडेने वाट काढत येणंच तेव्हा योग्य होतं. मग त्यातल्या त्यात चार पाच टप्पोरी फुलं वेचून आणायची नि घरी आल्यावर आईला द्यायची.
सुंदर दिवस होते ते..
आता आपण तसे नाही.. आता आपण तिथे रहात नाही.. त्या रस्त्यावर गेलं की ते झाडं मात्र तिथेच उभं दिसतं.. तसंच बहरलेलं .. तसंच डोलत दिसतं.. मग मनाला जरासं बरं वाटतं..
आता शहर वेगळं.. रस्ते वेगळे.. ओळखीच्या खाणाखुणाही नव्याने निर्माण झालेल्या.. त्यांना भूतकाळाचा गंध नाही, आपल्या माणसांचा त्यात स्पर्श नाही.. आपण एकाकी असल्याच्या जाणीवा इथल्या खाणाखुणा देत रहातात. ओळखीच्या खुणेपाशी भेटायला बोलवावं असे मित्रमैत्रिणी इथे नाहीत.. इथे कुणीच आपली ओळख सांगत नाही.
इथल्या रस्त्यांवरच्या खाणाखुणा आता कुठे अंगवळणी पडायला लागल्या.. सुरुवातीला तर केवळ घराची वाट चुकू नये याकरिता त्यांची ओळख ठेवायचे मी .. तितकीच त्यांची ओळख.. नि तितकीच त्यांची सोबत ..
आपण रस्ता चुकलो .. हरवलो .. तर इथे परक्या शहरात कोण येईल आपल्याला शोधत ओळखीच्या खुणांनी .. कोणीच नाही.. तरीही आपल्याला घर आहे म्हणून जबाबदारीचं भान आहे.. रस्ता चुकायची आपल्याला मुभा नाही, म्हणून घरी न चुकता परतायचं.
रस्ते .. हे रस्तेही मोठे आठवणीत रहातात..
मला तर अगदी तेही दिवस आठवतात, जेव्हा आईनं एकटीला घराबाहेर जाऊ द्यायला सुरुवात केली होती.. तेव्हाही असंच वाटायचं मला, की समजा घराबाहेर गेलो आणि घराचा रस्ताच सापडला नाही आपल्याला तर ..
आता मात्र असंच वाटतं की रस्ता तर सापडेल पण वाट पहाणारं कुणीच घरी नसेल ..
तरीही पावलं, नव्या नव्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत रहातात नि पुढे पुढे जात रहातात.. जीवनाची वाट तुडवत रहातात.. कधी सोबत घेऊन कोणाची तर कधी एकट्यानेच समर्थपणे पुढे पुढे जात रहातात.
आणि .. या सगळ्या रस्त्यात नव्या नव्या ओळखीच्या खुणा तयार करत जातात, सोबत घेऊन त्यांना आपली पावलं चालत रहातात..
शेवटाकडे येताना आपली पावलं .. आपली ओळख निर्माण करत जातात. तेव्हा ओळखीच्या खाणाखुणांनाही आपला अभिमान वाटत रहातो .. आपल्याशी त्यांची फार जुनी ओळख असल्याचा ..

- मोहिनी घारपुरे-देशमुख




Translate

Featured Post

अमलताश