माधुरी दीक्षित ताईचा फेमगेम पाहिला.. जबरदस्त आहे.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत नेणारा ही वेबसिरीज..
अनामिका आनंदच्या आयुष्याबद्दल जास्त काही लिहीण्यापेक्षा ते स्क्रीनवर पहाणंच बरं.
मी ते सगळं लिहून भांडाफोड करणाऱ्यातली प्रेक्षक नाही.
मला जे लिहायचंय ते अर्थातच माधुरी बद्दल .. मी तिची फॅन आहे म्हणून तर लिहीतेच आहे, पण मी लिहीलेलं तिच्यापर्यंत कधी ना कधी नक्की पोचेल आणि मला तिच्याकडून शाबासकी मिळेल म्हणून मी हे लिहीतेय.. (हा प्रामाणिकपणा कोणाला आवडेलही कदाचित, कोणाला आवडणार नाही.. त्यांनी माफ करा.)
माधुरी ताईनी वेबसिरीज या नव्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला ते एक बेस्ट काम झालं. कारण आता तिचं वय स्पष्ट दिसू लागलंय, तरीही तिची क्रेझ कमी झालेली नाही. त्यातून तिनी मागे जो बकेटलिस्ट नावाचा मराठी चित्रपट केला त्यानंतर तिच्यावर जी टीका झाली, त्या सगळ्यांचं तोंड बंद झालं असावं ही वेबसिरीज पाहून हे नक्की.. माझंही झालं असं मी म्हणेन. कारण, बकेटलिस्ट हा एक पाचकळ विषय घेऊन त्यावर काहीतरी अतिरंजीत कॉमेडी वास्तव घेऊन माधुरीने लीड रोल करावा हे मला आवडलं नव्हतं. अर्थात इथे मी जितके कठोर शब्द वापरतीये, तितका मला त्या बकेटलिस्टसाठी तिचा राग नाही.. ती माधुरीच आहे म्हणून आणि ती लाडकी आहे, चुकला एखादा निर्णय तिचा तर मी समजू शकते तिला.. सो .. ते सगळं जाऊदे..
आता ही वेबसिरीज .. यात माधुरीने आपला जलवा दाखवण्यात जराशीही कमी केलेली नाही. शिवाय अनामिका आनंदच्या पात्राला तिने चांगला न्याय दिला आहे. तिची मुलगी म्हणून निवडली गेलेली अभिनेत्री सुरुवातीला तिच्या लुक्समुळे खटकते पण त्या पात्रासाठी तीच योग्य आहे असं शेवटपर्यंत वाटत रहातं.. तिचा मुलगा म्हणून जो निवडलाय तो तर अगदीच परफेक्ट आहे त्या कॅरेक्टरसाठी हे निश्चित..
मग काय आवडलं नाही, तर माधुरीचा म्हणजे अनामिका आनंदचा कोस्टार, मनीष खन्ना जरा आणखी बरा निवडला असता तर .. म्हणजे माधुरीबरोबर खुद्द अक्षय खन्नालाही घेता आलं असतं. संजीव कपूर तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत योग्य वाटतो आणि सगळ्यात तिची आई सुहासिनी मुळेही चांगलीच लक्षात रहाते. मकरंद शेवटी एका सरप्राईज भूमिकेत समोर येतो, फारसे संवाद नसूनही अभिनयाच्या बाबतीत तो ग्रेटच माणूस निवडलेला असल्याने ती भूमिकाही सहीच वाटते.
बाकी वेबसिरीजची स्टोरी नावाशी साधर्म्य राखून आहे आणि तिची मांडणीही अप्रतिमच झालेली आहे. तो अनाथ मुलगा माधव, त्याच्या पात्राशी त्या कलाकाराने पूर्ण न्याय दिलेला आहे.. शेवटी जेव्हा माधव आणि अनामिकाची मुलगी अमू प्रेमात पडलेलं दाखवलंय ते बघणं जरा असह्यच झालं मला.. पण ठीक .. कथानकाचा फ्लो परफेक्ट राखला जातो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे, फ कारी भाषा या वेबसिरीजमध्ये तरी अतिजास्त वापरलेली नसल्याने कानांना जरा सुसह्य झालं.
माधुरीने वेबसिरीज या नव्या माध्यमातून काम करतानाही आणि काळाची कितीही गरज असली तरीही आपली डिग्नीटी सोडली नाही.. साधा एक किसींग सीन वगैरेही तिने दिलेला नाही याचं फार फार समाधान वाटलं.
बाकी फेम गेम मात्र एकदा पहायलाच हवा.
अनामिका आनंदही लक्षात रहातेच आपल्या अखेर हीच या फिल्मी दुनियेची खरी कथा आहे.. पण हल्ली माधुरीताईच्या पिढीपासून बऱ्याच मुलींनी ती बदलली आहे. यात विद्या बालन, परिणिती चोप्रा यांची नावं विशेषत्वाने समोर येतात, कारण या मुलींनी स्वतःची पॅशन म्हणून हे क्षेत्र निवडलं आणि आपल्या कामाची गरज म्हणून अनेक तडजोडी या अभिनयापुरत्या मर्यादीत ठेवत, पुढे आपली पावलं वहावत जाऊ दिली नाहीत. तसंच, यांचे कुटुंबीयही कधीच यांच्याविरोधात आलेल्या कोणत्याही पापाराझींच्या फालतू वावड्यांमुळे हादरून गेले नाहीत ना त्यांनी आपल्या मुलींना लोक काय म्हणतील या सबबीखाली त्यांच्यातली गुणवत्ता मारून टाकली नाही हे मला फार फार विशेष वाटतं.
अनामिका आनंद ही जरी या दुनियेची एक बाजू असली तरीही माधुरी दीक्षित ही सुद्धा याच दुनियेची दुसरी सोनेरी बाजू आहे एवढंच मला अधोरेखित करावसं वाटतं, आणि येणारा काळ हा अशा असंख्या माधुरींचा असावा एवढीच मनोमनी प्रार्थना करावीशी वाटते..
- मोहिनी घारपुरे - देशमुख