शुक्रवार, ८ जुलै, २०२२

घरातल्या गोष्टी


सारखं काहीतरी होतंय

धुमसतंय, शिजतंय, कुजतंय, बरसतंय

घराच्या चार भिंतींच्या आत

सारखं काहीतरी घडतंय 

ही अशी रेघोट्यांसारखी घर दिसत रहातात एका रेषेत नजरेसमोर. प्रत्येक घराचा आकार वेगळा, श्वास वेगळा, वळण वेगळं आणि आयुष्य वेगळं

माणसं वेगळी .. पात्र वेगळी 

घटना त्याच ... प्रसंग तेच 

नाट्यही तेच तेच 

घर नावाच्या संस्थेच्या आत अडकलेत श्वास, गुदमरलेत श्वास 

घर जपावं, घर टिकावं .. नाती जपावी .. नाती टिकावी 

आपल्यातलं आपलेपण मागे टाकावं, ते विझवून नात्यांना आपल्या रक्ताचं तेल अर्पण करत जावं. सदोदित .. हेच हेच करत रहावं.

कोणी उपाशी राहिलं तर घर मुक्याने रडतं.

घराच्या चार भिंतींना उपाशी माणसाचं मन कळतं

घरातल्या नात्यांना ते दिसतं .. कधीकधी कळतं .. एरवी कळत नाही

भुकेलेल्या माणसाच्या घरातले लोक त्याच्या भुकेची पर्वाही करत नाहीत... अशीही घरं असतात !

घर म्हणजे नाती जपणं, घर म्हणजे प्रेम देणं वगैरे वगैरे गुलाबी गोष्टी 

आपल्या जागी बरोबर असतात.

तरीही धुमसत असतात काही घरं सतत

मग पोर बिचारी निघते मरायला... 

अब बस ... बोहोत हो गया ... अब नहीं झेल सकते हम

असं म्हणत एखादी मुलगी गोड गोड हसत, आपले अश्रू लपवत नदीमायेच्या मीठीत विसावून जाते.. जाता जाता आईबापाला नमस्कार करायला व्हिडीओ कॉल लावते ..

आठवली असेल ना ती .. तीच ती 

तिचा नवरा म्हणाला जा .. मर .. मरता मरता व्हिडीओ मात्र नक्की बनवून पाठव 

तिनं ते ही केलं .. आपल्या मरणाचा व्हिडीओ बनवला ... बिचारी म्हणून गेली, माझ्या मरणासाठी मीच जबाबदार ... इतके तिचे श्वास गुंतले होते तिच्या घरात

पण कोणालाच नाही कळलं ... अखेरपर्यंत ! 

अशीही असतात काही घरं !!

मन जपणाऱ्या घरातली आई सतत दुर्मुखलेली का असते ?

नाती जपणाऱ्या घरातला बाबा सतत चिंतातूर का असतो ?

अशा घरातली मुलं बिचारी सतत भुकेलेली का दिसतात ? 

आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणारी ही कुटुंब सतत नात्यांमध्ये घुसमटलेली का दिसतात ?

- मोहिनी 




Translate

Featured Post

अमलताश