वेबसिरीजचा जमाना सुरू झाला तशी भरपूर वेबसिरीज निरनिराळ्या प्लँटफॉर्म्सवरून पाहून झाल्या. मात्र अलीकडे या वेबसिरीज्सचा एकंदरीतच मला उबग यायला लागला आहे. मुख्य विषय इतके चांगले असले तरीही त्यात दाखवलेल्या बटबटीत अशा सेक्सच्या दृश्यांनी आणि सतत वाक्यावाक्याला पेरलेल्या 'फ**'च्या शब्दांनी अक्षरशः किळस यायला लागली आहे.
बरं,इथे पात्रांच्या वयोमर्यादेचंही बंधन उरलेलं नाही, म्हणजे काय, अगदी कोवळ्या वयातले तरूण तरूणीही हीच भाषा बोलतात आणि पडद्यासमोर सहज निर्वस्त्र होताना, किसिंग सीन्स देतानाही यांना जणू काहीच वाटत नाही इतके हे सराईत वावरतात. दोष यांचा नाही, तर एकंदरीतच या इंडस्ट्रीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बटबटीतपणाचा आहे हेच खरं !
हे 'असं' कंटेंट जास्त विकलं जातं , जास्त पाहिलं जातं या सबबीखाली प्रत्येक वेबसिरीजमध्ये बेसुमार 'तसलं' कंटेंट घातलं जातंय.
मध्यंतरी ती एक वेबसिरीज आली होती, 'She' नावाची ... त्यातलं तर दृश्य पाहतांना त्यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या मुलीची अक्षरशः कीव आणि राग आला. पडद्यावर घाणेरड्या शब्दात तिच्या योनीबद्दल बोललं गेलं आणि अक्षरशः नायकाने तिला त्या जागी स्पर्श केला, तिच्यावर रेप सुद्धा पुढे कथानकाच्या ओघात झाला.
कालच नेटफ्लिक्सवर 'Class' नावाची वेबसिरीज पाहिली, त्यातही सगळं हेच कंटेंट ! विविध पात्रांचे एकमेकांशी निरनिराळ्या हेतूने असलेले शारिरीक संबंध, त्यात आता भरीस भर म्हणून गे आणि लेस्बियन कम्युनिटीतील किमान एखादं तरी पात्र हे वेबसिरीज वाले आपल्या वेबसिरीज मध्ये अक्षरशः घुसवतातच ! मुख्य कथानकात ज्याची खरंतर काहीच गरज नाहीये तरीही समाजाला या लोकांप्रती सहिष्णू बनवण्याचा उदात्त हेतू आपला असल्या चे कारणही हे कंटेंट बनवणारे देतात तेव्हा राग येतो, कारण सतत हे पडद्यावर दाखवण्याने समाज बदलणार नाही, तर त्यासाठी काहीतरी नीट, लोकांना या कम्युनिटीबद्दल 'समजेल' असं कंटेंट जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने मनापासून बनवायला हवं. नुसतंच त्यांचे शारिरीक संबंध पडद्यावर सतत दाखवून उलट किळसच अधिक निर्माण होते हे वास्तव आहे.
मुळात, वेबसिरीजच्या कंटेंट वर कोणाचाही चाप नाही हे खरंतर अडव्हान्टेज मिळालेलं असताना इतकं सतत बटबटीत , घाणेरडं कंटेंट तिथे बनवलं जातंय हे दुर्दैव आहे. यापेक्षा अनेक चांगले विषय चांगल्या पद्धतीने एखादा हुशार दिग्दर्शक मांडू शकतो, पण तेवढा वेळ कोणालाय ना ?
शिवाय या सगळ्या कंटेंटचा ग्राहक आज आपण आणि आपली निरनिराळ्या वयोगटातील मुलंमुलीही आहेत, हे सगळं पाहून एक 'चेकाळलेला' 'उत्तान' समाज म्हणून तर ते पुढे घडणार नाहीत ना याचा विचार करून मनाला अत्यंत यातना होतात.
काही काळापूर्वी 'पॉर्न' पुरतं मर्यादित असलेलं हे कंटेंट आता घरोघरी 'वेबसिरीज' च्या माध्यमातून पोचतंय आणि म्हणूनच आपण या सगळ्या कंटेंटबद्दल आता तरी सावध होऊन विरोध करायला हवाय असं माझं वैयक्तिक मत आहे !
- मोहिनी घारपुरे देशमुख
#मीडिया #जबाबदारी #बदल #योग्य_विरोध