व्यसनमुक्तीच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. याचं कारण अगदी लहानपणापासून मला या सामाजिक समस्येची अनेक उदाहरणं माझ्या अवतीभवती बघायला मिळालीत. गेली दहा एक वर्ष या विषयाबाबत बरचसं वाचनही झालंय.
एखाद्या चांगल्या खाऊनपिऊन सुखी कुटुंबातला मुलगा अचानक वाईट संगतीला लागतो काय आणि बघता बघता पुढे एक एक व्यसनं करत अक्षरशः भीकेला लागतो काय अशा अनेक सत्यकथा विविध माध्यमांतून जेव्हा जेव्हा ऐकल्या, पाहिल्या तेव्हा या प्रश्नाचं गांभीर्य अधिकअधिक कळत गेलं आणि या क्षेत्रात आपणही आपल्या परीने काही ना काही काम करावं ही इच्छा मनात सातत्याने निर्माण होऊ लागली.
मुक्ता चैतन्य ताईबरोबर काम करताना पुण्यातील चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटरच्या वतीने व्यसनांचा विळखा या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रीयेत माझाही थोडाफार हातभार लागला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते असलेले श्री तुषार नातू सरांच्या जीवनाची गाथा वाचनात आली. त्यांच्या जीवनाची 'नशायात्रा' जेव्हा वाचली तेव्हा तर या प्रश्नाचं गांभीर्य अधिक लक्षात आलं. त्यानंतर या समस्येविषयी ब्लॉगवर, सोशल मीडियावर लिखाण केलं. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पत्रकार संघाच्या शिरीष कुलकर्णी सरांनी दिलेल्या संधीमुळे मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली, तर ब्राह्मण उद्योगब्रह्म या ग्रुपतर्फे तुषार नातू सरांचीही मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली.
जितकी जास्त वाचत गेले, बोलत गेले तितकं तितकं या प्रश्नाचं गांभीर्य मला अधिक अधिक जाणवत गेलं.
म्हणूनच, नुकतंच मुक्ता ताईंची फेसबुक पोस्ट पाहिली आणि तीन दिवसीय प्रोजेक्ट दोस्ती या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सहभागी झाले. या कार्यशाळेचा रिपोर्ताज खास तुम्हा वाचकांसाठी येथे देत आहे. तुम्हाला कदाचित याचा उपयोग होईल. तसंच जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात या समस्येशी झगडत असाल आणि तुम्हाला मन मोकळेपणी बोलायचं असेल, तुमचा प्रश्न समाजमाध्यमांवर कोणीतरी मांडावा, लिहावा किंवा तुम्हाला लोकांसमोर येऊन त्याविषयी बोलायचं असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा. आपण मुलाखत, ब्लॉग, फेसबुक पोस्ट यापैकी कोणत्याही एका माध्यमातून तुमच्या समस्येला वाट फोडू. त्याकरिता मी आपल्याला सहकार्य करेन.
धन्यवाद
मोहिनी
....................
काल पहिल्या दिवशी दोन सत्र झाली. यामध्ये पहिलं सत्र 'मुक्ता पुणतांबेकर' यांचं झालं. त्यांचा विषय होता, ' Trends in Addiction '
याविषयी बोलताना मुक्ताताईंनी अगदी सविस्तर आणि छान समजावून सांगितले. व्यसनांबाबतचे समज आणि गैरसमज, व्यसनी व्यक्तीची त्यामागची भूमिका, नव्या काळातील नवी व्यसनं कोणती, त्याबाबत वाटणारं आकर्षण, व्यसनांच्या बाबतीत कुटुंबाची भूमिका या साऱ्या मुद्यांवर त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं.
यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 'श्री. चैतन्य वेंगुर्लेकर' यांनी 'Disease concept' याविषयी मार्गदर्शन केलं.
व्यसनाकडे पूर्वी केवळ वाईट सवय म्हणून पाहिलं जात असे. परंतु गेल्या काही वर्षात वैद्यकीय संशोधनांती व्यसनांना मनोशारिरीक आजार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, आणि म्हणूनच आता व्यसनांकडे बघण्याचा आपलाही दृष्टीकोन बदलावा व आपण आपल्या घरातील व्यसनी व्यक्तीबद्दल अधिक सजग व संवेदनशील व्हावे हे या सत्रात चैतन्य यांनी अधिक स्पष्ट केले. व्यसनाधीनता हा आजार का आणि कसा आहे, त्याची लक्षणं काय, त्याचे परिणाम काय आणि त्याचा इलाज कसा करता येऊ शकतो यावर ते सविस्तर बोलले.
व्यसनाकडे पूर्वी केवळ वाईट सवय म्हणून पाहिलं जात असे. परंतु गेल्या काही वर्षात वैद्यकीय संशोधनांती व्यसनांना मनोशारिरीक आजार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, आणि म्हणूनच आता व्यसनांकडे बघण्याचा आपलाही दृष्टीकोन बदलावा व आपण आपल्या घरातील व्यसनी व्यक्तीबद्दल अधिक सजग व संवेदनशील व्हावे हे या सत्रात चैतन्य यांनी अधिक स्पष्ट केले. व्यसनाधीनता हा आजार का आणि कसा आहे, त्याची लक्षणं काय, त्याचे परिणाम काय आणि त्याचा इलाज कसा करता येऊ शकतो यावर ते सविस्तर बोलले.
त्यांना मी जेव्हा हा प्रश्न केला की,
'व्यसनांचे एवढे प्रचंड दुष्परिणाम जीवनावर दिसत असतात तरीही व्यसनी माणूस व्यसन का सोडत नाही ? उपचार घ्यायला तयार का होत नाही? ' यावर चैतन्य सरांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आणि चिंतनशील आहे.
ते म्हणाले, ' या आजाराला मुळातच ' Desease of Denial ' असे जाहीर करण्यात आलेले आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनी माणसाला व्यसनातून मिळत असलेल्या आनंदातच रहाणं अधिक आवडत असतं, आणि म्हणूनच तो त्यापासून होणाऱ्या इतर कोणत्याही परिणामांची काळजी करत नाही.'
मला वाटतं, 'या आजाराची हीच तर मेख आहे ... !'
जेव्हा आपल्याला ही मेख लक्षात येईल तेव्हा आपल्यासाठी आपल्या कुटुंबातील वा ओळखीच्यांपैकी जर कोणी व्यसनी असेल तर त्याला कसं हँडल करायचं आणि त्याला व्यसनमुक्तीची योग्य ट्रीटमेंट घेण्यापर्यंत कसं न्यायचं हे लक्षात येईल.
व्यसनी माणसांच्या नावानी बोटं मोडण्यापेक्षा, आपण त्यांना मदत करूया, किमान त्यांच्या जीवनाची वाताहत लागेपर्यंत गप्प बसण्यापेक्षा, आपण वेळीच त्यांच्यासाठी पुढे येऊया, एवढा सामाजिक बदल आपण मिळून करणं हेच नव्या काळात फार महत्त्वाचं ठरेल, असं मला कालच्या सत्रानंतर वाटून गेलं.
बघूया, आता आजच्या सत्रात काय शिकायला मिळेल मला ? 😊😊😊😊😊
तोवर बाय बाय
- मोहिनी घारपुरे - देशमुख
mohineeg@gmail.com
छान शब्दांकन
उत्तर द्याहटवाThis is nice blog post ,informative and thoughtful 🤔 one .. Thanks for writing on such subject .
उत्तर द्याहटवाMy pleasure ! Thank You !
हटवा