बुधवार, १६ जुलै, २०२५

अमलताश

अमलताश

एक अतिशय तरल प्रेमकथा ...

खरंतर अशी टॅग लाईन लिहून मी कधीच चित्रपटांविषयी लिहीत नाही पण का कोण जाणे आज हे असं लिहीलं गेलं. 
एक ती आणि एक तो यांची कुठेतरी भेट होते आणि हळूहळू त्या भेटीचं रूपांतर प्रेमात होतं आणि सरतेशेवटी ' they lived happily ever after ' हा मेसेज देत जनरली प्रेमकथा संपतात पण अमलताश वेगळाच आहे. प्रेमाचा एक वेगळा आविष्कार... तो ही वेगळ्या उंचीवर आणि मनाच्या तितक्याच तरल हळव्या भावभावनांचं दर्शन घडवत ... अतिशय रोमॅंटीक संगीताच्या साथीने हा चित्रपट खुलत जातो आणि आपल्यासारख्या तरल माणसांच्या काळजाचा ठाव घेऊन मनात दरवळत रहातो. 
हे असे चित्रपट बनवणारी माणसं, त्यात अभिनय करणारी माणसं आणि ते चित्रपट पहाणारी माणसं ठार वेडी असतात. यांना जगरहाटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी गवसलेलं असतं आणि जे त्यांना कध्धीच शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणून मग आपल्याजवळ असलेल्या कलेच्या माध्यमातून ते व्यक्त होण्यासाठी धडपड करत असतात. 
एरवी हा चित्रपट चारचौघात, चारचौघांबरोबर जाऊन पाहिला असता तर कदाचित इतरांप्रमाणे तो 'बरा' या कॅटेगरीत अजाणतेपणी ठेवला गेला असता, पण असे चित्रपट एकट्याने पहावेत, अनुभवावेत आणि आत झिरपू द्यावेत. पहिल्या भेटीत ते उलगडत नाहीत. मी ही दोन वेळा चित्रपट पहायला सुरूवात केली पण काही ना काही कारणाने मध्येच बंद करावा लागला पण अखेर जेव्हा तिसऱ्यांदा तो पाहिला तेव्हा अनुभवत मुरवत जाणीवेच्या पातळीतून आत झिरपत गेला. 
चित्रपटाची कथा सांगायला गेले तर एका ओळीत सांगता येईल पण तसं करणं म्हणजे गुन्हाच ठरेल कारण मग तुम्ही चित्रपट पाहून त्याने दिलेल्या अत्यंत सुंदर आणि तरल अशा आविष्काराला मुकाल... म्हणून हा चित्रपट कोणी कोणाला सांगू नये तर तो आपापल्या स्पेसमध्ये राहून निवांत अनुभवावा ! 
' अमलताश ' ... हे असं नावंच सांगतं की चित्रपट किती रोमॅंटीक आहे 😊 
राहुल देशपांडेनी रंगवलेला चित्रपटाचा नायक आणि पल्लवी परांजपेनी रंगवलेली नायिका... सुंदर..
साधी आणि सहज ! 
अर्थात कधीकधी ... म्हणजे जेव्हा मी भावनिक पातळीवर तेवढी खोलात शिरलेली नसते तेव्हा इतकी सहजता पडद्यावर पाहाताना ती देखील कृत्रिम सहजता असल्याचं जाणवतं आणि मला कंटाळवाणं होतं. पण अशा कथांना अशा अभिनयाची गरज असते हे देखील खरं. 
म्हणूनच अमलताश निवांतपणे अनुभवताना खुलतो तोवर तो एकसुरी कंटाळवाणाही वाटू शकतो.
अर्थात् हे तर आपल्या मनोवृत्तीवरही अवलंबून आहे.
चित्रपटाचं संगीत, गाणी म्हणजे तर आणखी एक वेगळीच तरल अनुभूती आहे... निश्चितच! एखाद्या वेळी तुमच्या प्रियकरासोबत किंवा प्रेयसी सोबत असताना ही गाणी हे संगीत लावावं आणि त्यातल्या शब्दन्शब्दाची आणि संगीताची जादू आकंठ अनुभवावी...इतकं सुरेख...
मला जाता जाता विशेषत्वाने लिहावंसं वाटतं ते राहुल देशपांडेंबद्दल... अशा पद्धतीचे चित्रपट आणि अशा पद्धतीच्या नायकाच्या भूमिकेसाठी ते परफेक्ट आहेत. एरवी गायक म्हणून त्यांना सगळेच ओळखतात, पण एक असा हळवा नायक म्हणून जेव्हा ते चित्रपटात दिसतात तेव्हा अनेक तरल युवतींच्या मनातला एक गोड, समंजस, साधा, सहज आणि भावपूर्ण नायक त्यांच्यात सापडतो. त्यांचा या भूमिकेनंतर असंख्य तरूणी त्यांच्या प्रेमात पडल्या असतील मला खात्री आहे 😊
नायिकेच्या भूमिकेत असलेल्या पल्लवीने दिसण्याच्या आणि वावरण्याच्या बाबतीत बाजी मारली आहे 😊 पण तरीही ती जरा नाटकी (कृत्रिम) वाटली... पण तरीही एकंदरीत छानच आहे 😊.
नायकाच्या बहिणीच्या भूमिकेत राहुल यांची बहीण दीप्ती मते आहेत. एक दोन प्रसंगी त्यांच्या तोंडी पेरलेल्या ' नालायक ' वगैरे शिव्या या जरा खटकल्या याचं कारण त्या शिवीसदृश उद्गार ... जो आपल्या जवळच्या माणसांकरता लटक्या रागात कधीकधी सहजपणे आपणही करतो, पण ताईच्या एकूण इमेजला आणि स्पष्ट शब्दोच्चारांना मात्र ते उद्गार शोभलेले नाही...ते जरा टोकदार झालेत, थोडे बोथट करता आले असते पण असो त्याने मूळ चित्रपटाला काहीच फरक पडत नाही. हे केवळ माझे प्रेक्षक म्हणून निरीक्षण येथे मांडलेय इतकेच ! 
तर ... असा हा अमलताश... 
दिग्दर्शक सुहास देसलेंचं त्यांच्या या कलाकृतीबद्दल कौतुक आणि चित्रपटातील अन्य सगळे अभिनेते...त्यांच्याही सहज अभिनयाबद्दल त्यांचा कौतुकाने उल्लेख करायलाच हवा! 

चित्रपट यूट्यूबवर अॅड फ्री स्वरूपात उपलब्ध आहे जरूर पहा..

- मोहिनी घारपुरे देशमुख

मंगळवार, १० जून, २०२५

स्ट्रॉ

नेटफ्लिक्सवर काल हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहिला.

 

फोटोत दिसतीये ती 'जनाया'. ती सिंगल मदर आहे. आपल्या मुलीचं आजारपण हा तिच्यासाठी सतत एक चिंतेचा विषय आहे. तिची प्रचंड आर्थिक ओढाताण होतेय. तशातच तिचा कटकट्या स्टोअर मॅनेजर आणि कटकटी घरमालकीण... तरीही ती त्या सगळ्यातून मार्ग काढून लढतेय आणि काहीही झालं तरी दुसऱ्यासाठी चांगलं करण्याची तिची वृत्ती ती सोडत नाहीये. सगळं दररोज असंच घडतंय. 

पण अखेर एक दिवस असा उजाडतोच जो तिला मात देतोच. त्या दिवशी सकाळीच घरभाडं न दिल्यास तुला रस्त्यावर आणेन अशी धमकी घरमालकिणीने तिला दिलीये. तिची कशीबशी मनधरणी करून ती स्टोअरमध्ये जाते तर आज मॅनेजर जरा जास्तच कावलेला आहे. तशातच स्टोअरमध्ये ग्राहकांची वाढती गर्दी आणि त्या गर्दीला तोंड देणारी जनाया... इतक्यात मुलीच्या शाळेतून फोन आलाय, जनायाला आता काहीही करून मुलीच्या शाळेत जायचं आहे. ती स्टोअर मॅनेजरला विनंती करतेय आणि तिच्या पगाराची ती वारंवार मागणी करतेय. हा तिला पगार देण्याबाबत आढेवेढे घेतोय... अशातच स्टोअर मध्ये डाका पडतो. ते पैसे लुटणार इतक्यात जनाया हिंमत दाखवते आणि एकाला बंदूकीच्या गोळीने ठार करते. अशा प्रसंगी तिच्या प्रती ऋणी होण्याऐवजी मॅनेजर उलटतो आणि तिनेच पैशासाठी हा डाका घडवून आणल्याचा आरोप करायला लागतो. आता जनाया खूप चिडते आणि धाडधाड गोळी झाडून त्या मॅनेजरला ठार करते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मॅनेजर आणि एक चोर.. समोर टेबलावर तिजोरीतले सगळे पैसे...पण त्यातही जनाया शांतपणे थरथरत्या हाताने आपला पगाराचा चेक तेवढा उचलते आणि तो वटवून घेण्यासाठी नेहमीच्या तिच्या बॅंकेत जाते आणि एका विचित्र परिस्थितीत अडकते. 

इथून पुढे जे काही नाट्य घडतं ते निव्वळ पडद्यावर पहाण्यासारखं आहे. 

एका सिंगल मदरची साधं दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी सुद्धा किती ओढाताण होते, तिला किती संघर्ष करावा लागतो हे दाखवणारा हा चित्रपट आहे पण निव्वळ इतकंच याचं कथानक नाही. अतिशय सुंदर पद्धतीने नाट्यमय शैलीत कथा पुढे जाते आणि शेवटी प्रेक्षकांना आणखी एक धक्का देऊन जाते.

मी हा चित्रपट कितीही वेळा पाहू शकेन इतके यातील कलाकार श्रेष्ठ अभिनेते आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण चित्रपट नाट्यमय रूपात साकारलाय त्याला तोड नाही. किती साधा विषय पण कुठेही तो अतिरंजित होत नाही ना कुठेही तो मूळ कथेपासून भरकटतो.

अशा कलाकृती पाहाणं म्हणजे नितांत सुख तर आहेच पण अशा कलाकृती आपल्याला जीवनाप्रती खूप खूप संवेदनशील बनवतात ..‌ आपल्याही नकळतपणे आणि तेच या चित्रपटांच खरं यश म्हणायला हवं.

बाय द वे चित्रपटाचं नाव स्ट्रॉ असं अजब का आहे याची उत्सुकता मला वाटली म्हणून मी जरा गुगल केलं आणि त्यातलं मर्म मला समजलं. तुम्हाला मी ते आयतं सांगणार नाही, तुम्ही चित्रपट पहा आणि मग स्वतः अर्थ शोधा ही मैत्रीण या नात्याने अधिकारयुक्त विनवणी ...

नक्की पहा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा.

धन्यवाद 

- मोहिनी घारपुरे देशमुख 


#मलाभावलेलाचित्रपट 

सोमवार, ९ जून, २०२५

हनीमून कपल्सच्या सुरक्षिततेचं काय ?


राजा आणि सोनम हे नवदांपत्य लग्नानंतर हनीमूनसाठी शिलॉंगला फिरायला गेले असता राजाचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागलाय आणि त्याचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतर त्याची ओळख मृतदेहावर गोंदवलेल्या राजा या त्याच्या नावामुळे पोलीसांना पटली आहे. त्याची पत्नी सोनम अजूनही सापडलेली नाही. तिचं काय झालं कोणालाच ठाऊक नाहीये. किंबहुना एकंदरीत हे सगळं प्रकरण काय आहे याचा अजून पोलीस तपास करत आहेत.
या घटनेच्या निमित्ताने मात्र मला खरंच हा आणखी एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतोय की हनीमून कपल्सच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायला हवी ?
नुकतंच कुठे दुर्दैवी वैष्णवी हगवणे या मुलीच्या बाबतीत घडलेल्या घटनेच्या धक्क्यातून आपण सावरत असताना ही दुसरी बातमी येऊन धडकली आहे आणि ती देखील तितकीच अस्वस्थ करणारी आहे.
एम.ए.इन मासकॉम अँड जर्नॅलिझम करताना माझा दुसऱ्या वर्षीचा रिसर्चचा विषय भारतातील लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था हाच होता. त्यामुळे या दोन्हीही बातम्यांच्या निमित्ताने माझं या अनुषंगाने सतत लक्षं जातंय आणि मन हादरतंय. या विषयाची अभ्यासक म्हणून मला माझे विचार इथे मांडावेसे वाटतात.

आजवर भारतातील लग्नव्यवस्था आणि कुटुंबसंस्था या दोन्हीचंही आपण अगदी अंधानुकरण करत आलेलो आहोत. किंबहुना या दोन्हीही व्यवस्थांनी खरंतर आपली संस्कृती सुसह्य करण्याऐवजी त्यातील रिती प्रथा आणि परंपरांनी अनेकांचा जीवच घेतलाय. अरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज, कोणीही सुखी नाही. शिवाय या दोन मोठ्या संस्कारांना जे इव्हेंटचं स्वरूप आलंय ते तर अगदी ओंगळवाणं आहे. वरवर चमकधमक दाखवताना आतमध्ये इतकी षडयंत्र, इतकी नाट्य घडत असतात जी खरंतर सगळ्यांना दिसतात पण कोणीही कोणाच्याही भानगडीत पडत नाही. वैष्णवी हगवणेचे लग्नाचे रील्स पहाताना अगदी पोटातून तुटायला होत होतं मला आणि कित्येकांना... आठवतंय ना ...? 


तर, अलिकडे हनीमूनचंही तितकंच फ्यॅड झालंय. अगदी हिरोहिरोईन असल्यागत विवाहसोहळे रंजक होत चाललेत आणि लग्न झाल्याबरोबर जो नवरा मुलगा हनीमूनसाठी नववधूला दूर कुठेतरी, विशेषतः परदेशात किंवा निसर्गाच्या रम्यतेचा जिथे भरपूर अनुभव घेता येईल आणि एकांत मिळेल अशी ठिकाणं शोधणारा वर हा सर्वोत्कृष्ट अशीच मानसिकता आपल्या समाजाची तयार झालेली आहे. या सगळ्यात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो ती म्हणजे सुरक्षितता.


हनीमूनला जाणारं कपल हे कुठेही जात असलं तरीही ते त्या भागात नवखे असतात, तिथली भाषा माहीत नसते, कोणतीही अडचण आली तरीही वाचवायला कोणीही येणार नसतं, हे सगळं आपल्या गावीही नसतं. अशीच गत एखाद्या मुलीचं दुसऱ्या शहरात लग्न करून देताना त्या मुलीचीही केलेली असते. ती मुलगी नव्या अनोळखी शहरात, अनोळखी माणसांमध्ये कुठे राहील, तिचं स्वतःचं हक्काचं छप्पर तिला आधी घेऊन देण्याऐवजी बावळटासारखे पैसे लग्नसोहळ्यात आणि रिसेप्शन समारंभात उधळले जातात. गावजेवण घातलं जातं. अरे हेच पैसे आधी त्या नवराबायकोच्या डोक्यावर छप्पर खरेदी करून घेण्यात लावा ना, मग त्यांना घेऊन सगळे सणसमारंभ करत बसा, कोण नको म्हणतंय... पण नाही, आपल्याकडे सगळं उलटंय.
तसंच हनीमून कपलला मुळात हनीमूनसाठी कुठेतरी भयंकर दूर, आडवळणाच्या ठिकाणी का जावसं वाटतं यातलं लॉजिक मला कळलेलंच नाहीये. चार भिंतीत करण्याची गोष्ट... सुखाचा सुरक्षित शरीरसंबंध... मग तो करण्यासाठी जागा, ठिकाण हे परिचित असेल तर जास्त बरं नाही का ? पण नाही, आम्हाला मग आम्ही फिल्ममधल्या हिरोहिरोईनसारखे वाटणार नाही. म्हणून आम्ही मोठमोठाल्ले समारंभ करतो. फिरायला समुद्रकिनारी, धबधब्याखाली, बर्फात लोळायला जातो... अरे ठीक आहे, ज्यांचं सगळं टूर प्लॅन व्यवस्थित आखलेलं आहे, नीट काळजी घेतलीये आणि खिशात खुळखुळ आहे त्यांनी जायलाही माझी हरकत नाही. पण जाताना खरंच ठिकाण निवडताना आधी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने करा. कोणत्या ठिकाणी जाणार, कुठे रहाणार हे आधी नीट कसून तपासा. चौकशी करा. जिथे रहाणार ती रिसॉर्ट्स सुरक्षित आहेत ना हे तपासा, सगळीकडे उतावळेपणा बरा नाही. तसंच, सतत फिल्मी दुनियेची कॉपी करून आपलं सगळं तसं व्हायला पाहिजे हा देखील विचार फार डेंजर पद्धतीने बळावतोय जो वेळीच आवरायला हवा.

त्या त्या ठिकाणच्या पोलीसांना सुद्धा हनीमून कपलच्या सुरक्षिततेमध्ये आधीच सामील करून घेता येईल. परंतु ते सगळं शासनाकडून व्हायला हवं तर खरं. म्हणजे कोणत्या शहरात, प्रदेशात कोणतं कपल किती ते किती काळ येणार आहे, त्यांची नाव, ते कुठे फिरणार आहेत, कुठे रहाणार आहेत याबाबत स्थानिक पोलिसांना आधीच इन्फॉर्म करून ठेवता येईल अशी काहीतरी ठोस प्रणाली आपल्याकडे लागू करायला पाहिजे आहे.
आता मध्ये लग्नसोहळ्यातले काही रील्स बघायला मिळाले. सगळ्यात ऑलमोस्ट ती नववधू लग्नमंडपातून स्टेजवर जाईपर्यंत, थोडक्यात बोहल्यावर उभी राहीपर्यंत नाच करताना दिसते. नाही, नृत्य कलेबद्दल माझा काहीही आक्षेप नाहीये पण अरे इतकं सगळं हिरोईनसारखं कॉपी करायचं त्याला माझा खरंच आक्षेप आहे. 
एका रीलमध्ये तर वधूच्या नाचण्यात मुहूर्त टळून जायला लागला म्हणून ते गुरूजी शेवटी स्टेजवरून खाली आले आणि त्यांनी तिला लवकर बोहोल्यावर चढ अशी खूण केली वैतागून... हे बघताना हसावं की रडावं असं वाटलं. 

एकीकडे विधी आणि मुहूर्तही पाहिजे आणि दुसरीकडे चित्रपटातील विवाहसोहळ्याप्रमाणे भडक दिखाऊ थाटमाटही पाहिजे, इकडे पैशांचा अपव्यय होतोय ते वेगळंच, चला एक मात्र चांगली बाजू आहे की यामध्ये भरपूर रोजगार निर्मिती होते. अनेक लोकांना काम मिळतं. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जीवन ... तुमचं खाजगीपण... तुमची सुरक्षितता, या सर्वात महत्त्वाच्या बाबी तुम्ही स्वतःच पणाला लावताय हे कसं कळत नाही तुम्हाला ?

वधू नाचतानाचे व्हिडीओ विचित्र पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्याखाली विचित्र घाणेरड्या कमेंट्सचा पाऊस पडतो, हनिमूनला दूर कुठेतरी जंगलझाडीत गेलेल्या किंवा अनोळखी रेस्तरॉं वगैरेंच्या खोल्यांमध्ये घडणारे विश्वासाने केलेले व्यवहार केव्हाच कुठूनतरी लपलेले कॅमेरे टिपत असतात आणि ते फूटेज यथावकाश प्रचंड व्हायरलही केलं जातं.

इतकंच नाही तर इकडे थाटात लग्न लावून घेणाऱ्या वधू म्हणा किंवा वर म्हणा नंतर हनीमूनच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर जाऊन प्रियकराच्या मदतीने आपल्या जोडीदाराचाच गळा कापल्याच्या ह्रदयद्रावक घटना कानावर येतात तेव्हा अक्षरशः थरकाप उडतो. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली तोच जोडीदार काळ बनून येतो तेव्हा त्या दुसऱ्या निष्पाप जीवाचं काय होत असेल त्या शेवटच्या क्षणी ... विचार करूनही मेंदू सुन्न होतो.

हे विवाहसोहळे आणि हनीमूनसाठी परदेशी फिरायला जाण्याची सक्ती ( जिथे स्वेच्छा आहे तिथे प्रश्न नाही ) पण जिथे समाजाचा दबाव, स्टेटस जपण्यासाठी म्हणून केलेली कृती अशा कॅटेगरीत या बाबी केल्या जात आहेत त्या त्या लोकांनी एक लक्षात घ्यावं की हे सगळं म्हणजे तुमच्या लोभीपणालाच एकप्रकारे खतपाणी घातल्यासारखं आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे असंय ...हजारो ख्वाहीशे ऐसी की हर ख्वाहीश पे दम निकले... आणि आताच्या काळातील माणसांनी स्वतःच्या लोभीपणापायी या ओळींतला अर्थ ... खऱ्या अर्थाने ... हर ख्वाहीशपे दम निकले असा करून आपलंच आयुष्य पणाला लावून ठेवलं आहे.

सो... विचार करा, आपण कुठे चाललोय आणि आपल्याला नेमकं कुठे जायचंय याचा... प्रत्येकानेच विचार करा...

- मोहिनी घारपुरे देशमुख
#विवाहसंस्था 




रविवार, ४ मे, २०२५

गाणे मनामनांचे!

 नमस्कार मित्रांनो,

कसे आहात सगळे ?

गाणे मनामनांचे हा कार्यक्रम मी खास वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी सुरू केला आहे. माझे सहकलाकार ख्यातनाम मेंडोलिन वादक श्री. शरद जोशी काकांना सोबत घेऊन हा कार्यक्रम वृद्धाश्रमात जाऊन आम्ही दोघे सादर करतो. या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे अंताक्षरी आणि मेंडोलिन वादन असं आहे. कार्यक्रमाला अल्पावधीतच अनेक वृद्धाश्रम संचालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. तुम्हीही तुमच्या शहरातील वृद्धाश्रमांमध्ये आमचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. आम्हाला या कार्यक्रमातून केवळ वृद्धापकाळातील जीवनात सुखाचे आणि आनंदाचे चार क्षण वाटायचे आहेत. हा कार्यक्रम अशा आजीआजोबांसाठी चैतन्यदायी ठरतो आहे ज्यांना त्यांच्या संधिकालात जवळचे कोणीही नाही, किंवा असे आजीआजोबा ज्यांचे जवळचे लोक त्यांना कोणत्याही कारणास्तव स्वतःजवळ ठेऊ शकत नाहीत, अशा आजीआजोबांसाठी मी हा कार्यक्रम करून त्यांना थोडावेळ आनंदाचे क्षण वाटते आहे.

आपणही आपल्या जवळील वृद्धाश्रमात कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. गाणे मनामनांचे सर्वार्थाने तेव्हाच मनामनापर्यंत पोचेल जेव्हा आम्ही किमान महाराष्ट्रातील सगळ्या वृद्धाश्रमांपर्यंत पोहोचू...

तेव्हा, या कार्यक्रमासाठी आजच संपर्क करा, मला किंवा शरद काकांना ... सोबत दिलेल्या फोटोत, व्हिडीओत आमचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत, त्यावर व्हॉट्सअप किंवा कॉल करून यासंबंधीत अधिक बोलणी करू शकता. 

धन्यवाद 

मोहिनी घारपुरे - देशमुख



गुरुवार, २७ मार्च, २०२५

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सुगरणींना देखील माझ्या शुभेच्छा... कशा काय ? लेख वाचा मग कळेल ☺️

 

स्वयंपाकघरातला ओटा हा सुद्धा एक प्रकारे रंगमंचच असतो. सतत तिथे उभं रहायचं आणि तुमचं पाककौशल्य सादर करत रहायचं. आपल्या हातच्या उत्तम पदार्थाला मिळणारी 'व्वा' अशी दाद असो किंवा एखादी नाक मुरडणारी प्रतिक्रिया असो .. दोन्हीही एखाद्या कसलेल्या कलाकारासारखी आपण स्वीकारायची असते. 'शो मस्ट गो ऑन' या न्यायाने सतत 'भटारखाना' हसतमुखाने सुरू ठेवायचा असतो. ओट्यापासचा आपला वावर म्हणजे एकपात्री प्रयोगच जणू ... म्हणूनच जेव्हा ज्याला जे लागेल त्याला ते देण्यासाठी क्षणात भूमिकेतले जिन्नस बदलून समोर पदार्थ हजर करून दाखवायचा असतो. 

फोडणीची तडतड, मिरच्यांची धडधड, कढीपत्त्याची कडकड असे साऊंड इफेक्ट्स सतत बँकग्राऊंडला असतात. ते इफेक्ट कमी पडले तर खायला दे म्हणून ओरडणारी मुलंबाळं, रागाने भांडी आपटणाऱ्या सासवा,जावा,नणंदा, भावजया हे मध्येमध्ये गेस्ट अपीअरन्स देत असतातच आणि साऊंड इफेक्टचीही साथ देत असतात ! 

सतत पदार्थांचे घमघमणारे दरवळ आणि चव लाईव्ह इफेक्ट्स देत असतात. 

सगळा परफॉर्मन्स खुबीनं 'वठवणाऱ्या' आपल्याला कधी कधी त्या ओट्यापाशी रडूच फुटतं.. पण तितक्यात आपल्या हिरोची एन्ट्री होते. ओट्यापाशी कधी हळवं होऊन आपले अश्रू तो पुसतो तर कधी त्याचा रोमँटिक हिरोचा अंदाज आपल्याला आवडून जातो. कधीकधी अँग्री यंग मँन बनून त्याचं खेकसणं 'आटप लवकर मला उशीर होतोय जायला' ते सुद्धा त्याक्षणी आवडून जातंच आपल्याला ..

या ओट्याने किती जीवनं जवळून पाहिलीत .. किती किती जणींची मुसमुसणी,धुमसणी अगदी मूग गिळून ऐकलीत .. 

फक्त नायिका बदलत राहिल्या .. परफॉर्मन्स मात्र तोच कायम राहिला .. 

सगळ्या सुगरणींना देखील 

जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏽🌹


- मोहिनी घारपुरे- देशमुख

😊😊


(पोस्ट आवडल्यास नावासह शेअर करावी)

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

उदात्तीकरणाच्या नादात आपण जीवनरस हरवत चाललो आहोत काय ?


गेले दोन तीन दिवसांपासून रणबीर इलाहाबादीया आणि समय रैना प्रकरण देशभरात गाजतंय. मी बातम्या पाहतेय, यूट्यूब पहातेय आणि माझं डोकं सुन्न होतंय. तसं तर ते नेहमीच अशा प्रकरणांनंतर होतंच. यापूर्वीही अशा घटना झाल्या आहेत. दरवेळी कोणीतरी एक बली का बकरा असतो आणि त्याने केलेल्या चुकीचे पडसाद देशभरात उमटतात, तेही इतके तीव्र की दरवेळी कुठूनतरी टोळ्या तयार होतात. चूक केलेल्या माणसाचे पुतळे करून ते जाळायला, त्या माणसाच्या तोंडाला काळं फासायला या टोळ्या इतक्या खुमखुमीने सक्रीय होतात, हा आक्रस्ताळेपणा पाहून माझ्यासारख्या संवेदनशील मनांना अनेक प्रश्न पडतात. त्यातलाच एक प्रश्न मला नेहमीच पडतो तो म्हणजे, उदात्तीकरणाच्या नादात आपण भारतीय लोक जीवनरस हरवून चाललो आहोत काय ?

कधी विचार केलाय तुम्ही असा ?

आपण जन्माला येतो ते आपलं नशीब घेऊन, आणि आपण जन्माला येतो ते जीवन जगण्यासाठी, ना तर जीवन हरवून बसण्यासाठी... मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे, पण म्हणून मृत्यूसमान जीवन जर आपण लोकांना देत असू तर ते चूक आहे. प्रत्येकाला आपलं जीवन सुंदर करण्याचा अधिकार आहे, आणि मुळात आधी प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा, आपल्याला हवं तसं जगण्याचा अधिकार आहे, पण भारतात जी जीवनमूल्य पाळली जातात त्यात प्रत्येकच गोष्टीचं अवास्तव उदात्तीकरण केलेलं आहे. याचा परिणाम म्हणजे माणसांची जीवनं उमलून येत नाहीत तर ती अधिकाधिक कोमेजून जातात. निसर्गसुद्धा प्रत्येक फुलाला छान उमलू देतो आणि कालपरत्त्वे कोमेजून मग ते झाडावरून गळून पडतं, पण आपण माणसं दुसऱ्या माणसाला नीट उमलूच देत नाही. आपली त्यात सतत दुसऱ्याच्यावर शिरजोरी असते. सतत आपण दुसऱ्याला कमी लेखतो, कमी दाखवतो आणि सतत आपण स्वतःलाही फार बडे कोणीतरी असल्याचा देखावा करतो. नाही, मला हे नाही म्हणायचंय की या जगात फार मोठी माणसं खऱ्या अर्थाने झालीच नाहीत, पण मला हे म्हणायचंय की जिनके बसकी वो बात नही, त्यांच्यावर आपण आपलं उदात्तीकरण का लादतो सारखं सारखं ?

मी अशा कित्येक बायका पाहिल्यात ज्या खरंतर सामान्य, अतिसामान्य आहेत, पण या समाजव्यवस्थेमुळे त्या नेहमी स्वतःला मी फार ग्रेट असं दाखवतात, आणि जे आपल्याला चालतं. मी असे कित्येक पुरूष पाहिलेत जे स्वतः कर्तृत्वशून्य आहेत पण त्यांचा समाजातला वावर आणि त्यांची ज्या पद्धतीने ठेप ठेवली जाते ते बघताना मला वेदना होतात. त्याऐवजी एखादा स्वकर्तृत्वावर मोठा होण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती, जो कदाचित तिथपर्यंत पोचू शकत नसेल आणि त्यातूनही त्याच्या हातून आपल्या कामात चूक होत असेल तर मला अशा माणसाला इतर नाकर्त्या किंवा खोट्या आव आणणाऱ्या लोकांपेक्षा जास्त मार्क द्यावेसे वाटतात. 

एखादी स्त्री तिच्या नवऱ्याच्या पश्चात तिचं जीवन रसरसून जगू शकत नाही याचं कारणंच हे आहे की आपण जीवनमूल्यांचं केलेलं उदात्तीकरण, पण त्या नादात आपण त्या स्त्रीचा जीवनरसच काढून घेतोय हे का नाही कळत या समाजव्यवस्थेला ? 

आपण सामान्य लोकांना सामान्य पातळीवर त्यांचं जीवन रसरसून जगण्यात सगळ्यात बंधनं का घातलेली आहेत आणि सगळ्याच माणसांनी आपलं जीवन उदात्त पातळीवर न्यावं हा आपला कधीकधी दुराग्रह का आहे हे अनाकलनीय आहे. माणसांची मशीनं बनवली, माणसांना घोडे बनवून स्पर्धेच्या युगात सतत पळत ठेवलं, आणि इतकं सगळं करून पुन्हा त्यांच्या माथी अपयशी शिक्के मारून समाजात गुन्हेगारी निर्माण केली तरीही आपण आपली समाजव्यवस्था बदलायला तयारच नाहीये. 
सतत लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याविषयी काय बोलतील, याची टांगती तलवार घेऊन जीवन जगतात माणसं. 

त्यापेक्षा माणसांना छान मूल्यशिक्षण द्या, त्यांना त्यांच्या क्षमता आणि अक्षमतांची नीट ओळख करून द्या आणि त्यांच्यासह ज्या त्या माणसाला त्याच्या परीघात छान आनंदाने जगण्याची संधी द्या, स्वातंत्र्य द्या मग बघा प्रत्येक माणूस आपल्यासह हा समाज सुद्धा किती सुंदर करेल. 

मागे मी एक विचार वाचला होता - You can never ask a fish to jump on a tree and then call him a fail attempt.
अर्थात, तुम्ही एखाद्या माशाला झाडावर चढायला सांगून वर त्या माशालाच अपयशी ठरवू नये. 

तसंच आहे, प्रत्येक माणसाने उदात्त व्यक्ती व्हावं हा तुमचा दुराग्रह आहे, कारण प्रत्येकाच्यात तेवढ्या क्षमता नाहीत हे मुळात आपण मान्य करायला हवं असं मला वाटतं. जीवनरस मात्र भरभरून उपभोगण्याचा हक्क प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला आहे. त्यामुळे उदात्त होण्याची क्षमता नसणं हा काही त्या माणसाचा गुन्हा  किंवा दोष नाही. मात्र त्याला देवाने जसं निर्माण केलंय आणि हे सुंदर जीवन जगण्यासाठी या भूतलावर पाठवलंय तर ते जीवन त्या माणसाने त्याच्या पद्धतीने आसुसून जगावं, त्यात कोणाचाही हस्तक्षेप असू नये. 

अर्थात इथे पुन्हा स्वातंत्र्य आणि स्वैराचार हे मुद्दे येतातच, पण क्षणभर आपण गृहीत धरू की अशा व्यक्ती दिलखुलास जगतील, पण धुंद स्वैराचार करणार नाहीत. आयुष्यातले छोटे छोटे आनंद त्यांना मिळू द्यायलाच हवेत. 

म्हाताऱ्या माणसांकडेच बघा. त्यांना रोजचा दिवस कंठणं आपण अवघड करून ठेवलंय. आधीच म्हातारपणाने त्यांचे हातपाय चालेनासे होतात, शरीराला नानाविध व्याधी चिकटलेल्या असतात, अशात आपण त्यांना जास्त खाऊसुद्धा देत नाही मनासारखं, का तर त्यांना त्रास होईल आणि आपल्याला त्याची काळजी वाटते म्हणून... पण हाच माणूस जन्मभर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी अंगावर घेऊन जीवन लढत असतो तेव्हा आपल्याला त्याची काळजी वाटत नाही हे कसं ? 
याउलट पाश्चात्य देशांमधले ज्येष्ठ नागरिक बघा... म्हातारी आजीसुद्धा कायम छान सुंदर तयार झालेली असते. तिला कोणी हा प्रश्न नाही विचारत .. आज काय खास आहे ? आणि इथे भारतातील म्हाताऱ्या स्त्रीयांकडे बघा जरा... कित्येकींना तर घरात सून छळते, पुरेसं पोटभर अन्न खायला दिलं जात नाही, टीव्ही पहाण्यावर बंधन आणि त्याहीपेक्षा आता तुम्ही म्हातारे झालात, तुम्हाला अमुक एका गोष्टीची काय गरज असं म्हणून सगळं त्यांच्या हातून हळूहळू काढून घेतलं जातं. सुंदर साड्यांवर सुनांचा डोळा, सुंदर दागिन्यांवर मुलीचा डोळा... अरे कशाला... तुझ्याजवळ आहे नं हे सगळं मग म्हातारीला वापरू दे की तिचं सगळं छान छान, दिसू दे की रोज सुंदर... होऊ दे की छान तयार काहीच कारण नसताना ... पण नाही, आपण असं करत नाही.

इथे तरूणांचीही तीच कथा आहे. ज्या वयात जबरदस्त शारिरीक आकर्षण वाटतं, त्या वयात आपण त्यांना इतकं बांधून ठेवतो, मुलींशी बोलायचं नाही, मुलांकडे पहायचं नाही, असं वागायचं नाही, तसे कपडे घालायचे नाहीत. अरे त्या वयात जर ती मुलं तशी राहिली नाहीत, तशी वावरली नाहीत तर हळूहळू त्यांच्या स्वप्रतिमेला आणि नंतर हळूहळू सामाजिक प्रतिमेला किती मोठा धक्का बसतो, आणि आत्मविश्वासाची तर पार ऐशीतैशी होऊन जाते. मग असे पंख छाटलेले पक्षी किती मोठी भरारी मारू शकतील बरं याचा विचार करा आणि मग आईबाप रडत रहातात, आमच्या मुलांमध्ये सगळं होतं तरी त्यांचं अमुक काही चांगलं झालंच नाही. पण मग जेव्हा तुमचा मुलगा तुम्हाला सांगत होता की असं नाहीये, मी असं करून पहातोय, मी माझ्या पद्धतीने माझं आयुष्य जगतोय तेव्हा तुम्ही लोकांना थांबवून मुलाला त्याच्या पद्धतीने आनंदाने आणि स्वातंत्र्याच्या छान चौकटीत बसवून दिलेलं आयुष्य उपभोगू का दिलं नाहीत ? 

सतत त्याला केस असे का केलेत, केस रंगवलेत का, कपडे असे का घातले असं करत टोमणे मारत असताना तुम्ही त्या उमलून आलेल्या जीवाला खुरटवून टाकताय हे तुमच्या का लक्षात येत नाही. 

एखाद्याला कितीही वाटलं की त्याने टाटा, बिर्ला, अंबानी व्हावं पण त्याने तसा अभ्यास केला नाही तर होतो का तो कधी टाटा, बिर्ला, अंबानी... नाही ना... पण मग जर तो टाटा, बिर्ला, अंबानी होत नसेल तर मग काय त्याला तो जे आहे ते म्हणून आनंदाने जगण्याचाही अधिकार नाहीये का ? सगळीकडे समाज आणि चार लोकं कशाला मध्ये मध्ये येतात कळत नाही. 

असो, तर हे विचार मनात आले याचं कारण तो इंडिया हॅज गॉट लेटंन्ट नावाचा शो... तरूण मुलांनी तरूण मुलांच्या वयात वेड्यासारखं बरळताना हद्द पार केली म्हणून देशभरात चाललेली छी थू.., अगदी योग्यच आहे. कुठेतरी हे थांबायला हवंच होतं. पण एरवी सगळ्यात लुडबुड करणारे आपण जेव्हा असा शो जन्माला येतो तेव्हा पहिल्याच एपिसोडनंतर आपण थांबवला का नाही हा माझा प्रश्न आहे. अनेक एपिसोड्स आपण चवीचवीने पाहिले आणि जेव्हा आपल्या भारतीय मानसिकतेला धक्का देणारी विधानं आली तेव्हा आपण विरोध केला... पण मग तोपर्यंतही त्या शो मध्ये हेच सगळं सुरू होतं की... मग ते का चाललं तुम्हाला ? याचं कारण त्यात विकृत का असेना एक जीवनरस होता आणि तो तुम्हीही उपभोगत होताच की... 

तर ते असं सगळं आहे. उदात्तीकरणाच्या नादात आपण लोकांचा जीवनरसच हरवून टाकतोय हे आपल्याला कधी कळेल. 

अहो माशाला उडता येत नाही हे मान्य करा आणि माशाला त्याच्या पाण्यात स्वच्छंद पोहू द्या. तो मासा म्हणून जगेल, मासा म्हणून मरेल. तुम्ही कशाला त्या माशाला राजहंस पक्षी बनवायला जाताय हे मला कळत नाही...

- मोहिनी घारपुरे - देशमुख 






रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

कान्हा बुक क्लब फॉर मदर्सची सुरुवात

गेल्या रविवारपासून श्री गणेशाच्या कृपेने कान्हा बुक क्लब फॉर मदर्सची मी कोथरूड येथील राजहंस पुस्तक पेठेच्या जागेत सुरुवात केली आहे. एक दोन आठवड्यात मी येथून हा बुक क्लब स्थलांतरित करेन, पण जागा, वेळ याची अडचण पहाता हाच बुक क्लब मी ऑनलाईन स्वरूपात देखील सुरू करते आहे. मासिक शुल्क फक्त 200 रूपये भरून आपण सदस्यत्व घेऊ शकता. 
महिन्यातून दर रविवारी सायंकाळी 4 ते 5 यावेळेत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात हा बुक क्लब सुरू राहील. 


उपक्रम क्रमांक 2

सध्या मोहिनी अंताक्षरी ग्रुपमध्ये सुद्धा नवीन सदस्य सहभागी करून घेते आहे. 
इच्छुकांनी संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी वाचा - https://avaantar.com/unique-whatsapp-antakshari/ 

धन्यवाद 
मोहिनी घारपुरे देशमुख 

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

सावित्री पावली !

संध्याकळची दिवेलागणीची वेळ.
आज सावित्रीबाई फुलेंची जयंती. दिवसभर ती त्यांच्याविषयी सोशल मीडियावर वाचत होती. संध्याकाळी तोंड हातपाय धुवून आरशासमोर उभी राहिली.
आज पहिल्यांदाच तिनं मोठ्या कौतुकाने कपाळावर सावित्रीबाईची चिरी लावली आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे आपल्या दारात तुळशीपुढे तिनं 'ज्ञानाची पणती' सुद्धा उजळली. ती मनोमनी खूश झाली.

इकडे रात्री नवरा आला, दर दोन चार दिवसांनी येतो तसा झिंगूनच घरी आला आणि पैशावरून कटकट करू लागला. नेहमीप्रमाणे कशावरून तरी हिची ' अक्कल ' निघाली. आज कशी कोण जाणे ती काही वेळ उगी राहिली. थोडावेळ याचा कांगावा तिनं शांतपणे ऐकला. तिला वाटलं, हा काय नशेत बोलतो, भांडतो तसा वागेल आणि थोड्या वेळाने गप्प बसेल. पण छे, ही जितकी गप्प तितका त्याचा आवाज चढायला लागला. दर दोन वाक्यात पुन्हा पुन्हा हिची अक्कल निघायला लागली. आता मात्र हद्द झाली. आज कुठूनतरी हिच्यात बळ आलं, ती उठली, चालू लागली . घराच्या कपाटातील आतील आणि उघडला, गेले बरेच महिने यानं तिला दिलेल्या पगारातली कुठे कुठे लपवून ठेवलेली रक्कम तिनं आणली आणि क्षणात तो पैसा याच्या थोबाडावर भिरकावला.
" घे, किती पैसे पाहिजे तुला घे ... माझी अक्कल काढतोस रे पैशावरून ? तुझा पैसा तूच तुझ्या मौजमजेवर उधळतोस, व्यसनावर खर्च करतोस... मी मात्र असे लावून ठेवतेय पै अन् पै तू दिलेल्या पगारातील पैशातून.. आणि तू माझीच अक्कल काढतोस? खबरदार इथून पुढे माझ्याशी या भाषेत बोललास तर !" 
ती रागानं चळाचळा कापत होती, तोंडानं त्याला झापत होती... आणि काही क्षणातच तो गप्प झाला होता.

थोडावेळ गेला, वादळ निवतंय असं तिला वाटलं पण पुढच्या काही क्षणातच तो नागोबासारखा पुन्हा फणा काढून आला. 
ही घाबरली, पण पुन्हा हिची 'बुद्धी' मदतीला आली. आता तो डिवचत होता पण ती गप्प राहिली आणि संधी मिळताच ती त्याच्या पुढून सटकली. दुसऱ्या खोलीचं दार तिनं चपदिशी लाऊन घेतलं आणि बाहेरून फुत्कारणारा तो नवरा नामक नाग अखेर चुपचाप दुसऱ्या खोलीत निघून गेला.

आज खऱ्या अर्थाने तिची सावित्री माय तिला आशीर्वाद देऊन गेली. लग्नानंतर तिने हळुहळू गमावलेला तिचा आत्मविश्वास, तिचा बाणेदारपणा, तिचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने तिची ' अक्कल ' जागेवर आली होती. 

कपाळावरची रेखलेली सावित्री मायची चिरी आता कपाळावर पुसट झाली होती पण मेंदूच्या आत खोल शिरली होती...कायमची ! 

- मोहिनी घारपुरे देशमुख 

#सावित्रीमाय  

Translate

Featured Post

अमलताश