1952 साली रूपेरी पडद्यावर आलेला हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा खरोखरच एका पहाण्यात समाधानच झालं नाही. एका दिवसाच्या अंतराने तब्बल दोन वेळा मी हा चित्रपट पाहिला याचं कारण इतकी साधी कथा, पण अर्थपूर्ण संवाद आणि आपल्याला जगणं शिकवणारा हा चित्रपट.. यातली गाणी, लता दिदी, गीता दत्त, शमशाद बेगम आणि तलत मेहमूद यांनी गायलेली .. जी कानाला जितकी गोड, श्रवणीय लागतात तितकीच ती थेट मनाला भिडतात.
रूपा (नर्गिस ) एका चाळीत रहात असते. तिचा व्यसनी काका तिला पैसे कमावून आणण्यासाठी आणि त्यावर आपली व्यसनांची गरज भागवण्यासाठी अपरिमित छळत असतो. जवळपास रोजच बिचारी त्याचा मार खात असते. राज (राज कपूर) तिचा शेजारी पण तो काहीसा आवाराच. रूपाच्या स्थितीवर दया दाखवून तिला कधीमधी पैशाची मदत करत असतो आणि बदल्यात तिच्याशी थोडंफार फ्लर्ट करून वेळ घालवत असतो. तिला बिचारीला, भाबडीला तेही कळत नसतं पण ती अंतर ठेऊन रहात असते. एकदा तो तिला पैसे देतो आणि बदल्यात कधीमधी माझी खोली साफ करून देशील असं सांगतो आणि ती खरच दुसऱ्या दिवशी त्याची खोली साफ करायला जाते. तो तिला थांबवतो आणि आपल्या बोलण्यात रमवतो .. वेळ घालवतो इतकंच .. बुडत्याला काठीचा आधार तसं तिला बिचारीला तो राज कसाही असला तरीही त्याचा आधारच वाटत असतो.
असेच दिवस चाललेले असतात पण देवाला काही रूपाची दया येत नसते.
आणि अशातच एकदा व्यसनी काकाचं टाळकं सरकतं आणि तो रूपाला घराबाहेर हाकलून देतो. बिचारी रूपा, आता पुढे फक्त अंधारच .. कच खाते नि जीव द्यायला समुद्रावर जाते खरी पण का कोण जाणे तिची पावलं अडतात .. तिला मागे परत घेऊन जातात. ती तिथून निघते आणि एका दिव्याखाली बसते. प्रचंड थकलेली असल्याने तिला काही क्षणातच तिथेच त्याच अवस्थेत झोप लागते.
जेव्हा तिला जाग येते तेव्हा अशोक ( अशोक कुमार ) तिचं चित्र काढत असतो. ती चमकते, त्याला जाब विचारते .. तो सांगतो, अगं मी एक चित्रकार आहे, आजवर खूप चित्र काढलीत पण हे तुझं चित्र म्हणजे माझी आजवरची सर्वोत्कृष्ट कलाकृती ठरेल बघ .. तो तिची चौकशी करतो आणि तिची कथा ऐकून तो तिला आपल्या बरोबर चल, मॉडेल म्हणून काम कर असं सांगतो आणि त्याचा व्यवस्थित आर्थिक मोबदलाही देण्याचं कबूल करतो. तिला त्याच्यासोबत पुढे जाण्यावाचून काही मार्ग नसतो. ती जाते .. तो तिची एक से एक चित्र काढतो आणि खरोखरीच अल्पावधीतच त्याच आणि तिचं नशीब उजळतं.. ती दोघंही यशोशिखरावर पोहोचतात. प्रचंड श्रीमंत होतात. नावलौकीक मिळवतात. तिला कधी वाटलंही नसेल एवढ्या उंचीवर ती जाऊन पोहोचते. अशोक आणि तिच्यात एक चांगलं नातं निर्माण होत असतं, एव्हाना अशोक तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तिला लग्न करण्याविषयी एकदा आडून विचारतोही पण ती .. ती तिच्याच दुनियेत मश्गूल असते.
कसा कोण जाणे, तिचा माग काढत त्याच दरम्यान राजही येतो.. राज, ज्याने एकेकाळी तिला मदत केलेली असते.. तिला ज्याच्या नुसत्या असण्यानेही एकेकाळी मानसिक आधार मिळालेला असतो .. तोच राज ..
तिला अचानक राज भेटायला आल्याने कोण आनंद होतो. ती त्याची अन् अशोकची भेट घालून देते. वयाने मोठा असलेला अशोक अवघ्या काही मिनीटातच राजची पारख करतो. त्याचे कपटी हेतू ओळखतो पण रूपा, तिला ते कसे कळणार .. हळूहळू राज तिला भेटायला वरचेवर येऊ लागतो , तिच्याशी प्रेमाचं नाटक करायला लागतो. त्याने आपलं रहाणीमानही एव्हाना पूर्ण बदलून टाकलेलं असतं. आपण व्यवसाय करतो असं तिला भासवलेलं असतं. आणि ती एखाद्या कोकरासारखी त्याच्या जाळ्यात अडकत जाते. अशोक तिला वेळोवेळी समजावतो. थांबवतो. ज्या कष्टाने तू यश मिळवलं आहेस, ज्या उंचीवर गेली आहेस तिथून एका छोट्याशा चुकीमुळेही तू खोल दरीत फेकली जाशील .. हे वारंवार सांगून सावध करत असतो. राजला तुझ्यावर नव्हे तर तुझ्या संपत्तीवर प्रेम आहे, त्याचा डोळा तुझ्या पैशांवर आहे असं सांगूनही ती आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तिला वाटतं, अशोकलाच आपण पुढे जाऊ नये, जन्मभर त्याची मॉडेल बनून रहावं असं वाटतंय म्हणूनच तो अडवतोय .. आणि एक दिवस अद्वातद्वा बोलून ती आपल्या जडजवाहिरासकट घरातून जाते..
आदल्याच दिवशी तिनं डोळ्यात पाणी आणून राजला विचारून घेतलेलं असतंं, राज मी अशोकने मला दिलेली सगळी संपत्ती त्याला परत करून जर तुझ्याबरोबर आले तरीही तू मला नेशील ना तुझ्या बरोबर .. करशील ना मला आपलीशी ... आणि राज , जणू एक सावज हेरण्यासाठी आलेला लांडगाच, तो सज्जनतेच्या बुरख्याखाली आपलं कपट झाकून तिला ठामपणे रूकार भरतो .. हो, मी तुझा तरीही स्वीकारच करेन गं असं म्हणतो. अन् दुसऱ्याच दिवशी घरातून निघून रात्रीच्या विशिष्ट वेळी पूर्वनियोजित ठिकाणी भेटण्याचं ती दोघं ठरवतात.. आणि म्हणूनच आज ती घरातून तिच्या दागदागिन्यासकट निघते .. अशोक थांबवतो, अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत तिला अडवतो .. पण ती प्रेमात वेडी झालेली मुलगी .. ती चक्क कोणालाही न जुमानता, आपल्या वाटेचे दागिने वगैरे महागाच्या वस्तू, पैसे घेऊन घरातून उर्मटपणे उत्तरं देत निघून जाते.
ठरलेल्या ठिकाणी पोचते आणि वाट पहाते .. थोडा वेळ जातो .. आणखी वेळ जातो .. आणि वेळच जातो फक्त पण राज .. तो येतच नाही..
हाय रे कर्मा .. तिच्या पायाखालची जमीन हादरते. काळोख्या पावसाळी रात्री ती एकटी आणि तिचा प्रियकर येतच नाही..
जड अंतःकरणाने ती माघारी फिरते.. अशोकच्या घराचं दार तिच्यासाठी उघडच असतं .. ती परत येते आणि सुन्न बसून रहाते.
इकडे राजला त्याचे वाईट मित्र पैशांसाठी धोशा लावून असतात, ते भेटतात अन् त्याला सांगतात, तू जायला हवं होतं रे .. ती आज तिच्या सगळ्या पैशांसकट तुझ्याकडे आली होती .. तू मूर्खपणा केलास आणि दोन्हीही गमावलंस .. त्याला उकसवतात.. अजूनही वेळ गेलेली नाही, आता पुन्हा काहीतरी बहाणा करून तिच्याकडे जा.. बघ ती तुझ्यावर विश्वास ठेवेल पुन्हा.. आणि याखेपेला तिचा जीव घे आणि सगळं हडप कर आमचे पैसे आम्हाला परत कर..
दोन दिवस जातात. इकडे अशोक आणि रूपा दोन दिवस सुन्न बसून असतात .. उपाशी , विचारमग्न .. आणि तो आता परत येणार नाही असं रूपाला वाटत असतानाच राज पुन्हा येतो .. तिला भूलथापा देऊन पुन्हा आपलीशी करतो आणि पुन्हा आपल्यासोबत चल असा आग्रह करतो. ती भुलते खरी, पण यावेळेला ती सावधही असते. कदाचित तिला आता खरंखोटं करून पहायचंच असतं. आपल्या मनाच्या खात्रीसाठी म्हणून का होईना, ती त्याच्याबरोबर निघते. आपल्या सामानात सगळे पैसे, दागदागिने आहेत, नीट लक्ष ठेव असं खोटंच त्याला सांगते. ती दोघं एका हॉटेलात वेगवेगळ्या खोलींमध्ये मुक्काम करतात .. तो सज्जन आहे हे त्याला तिला भासवायचं असतं ना .. त्याचे मित्रही त्या दोघांवर लक्ष ठेऊन असतात, ते त्याला लवकर काम आटप म्हणून धोशा लावतात.
आणि रात्री तो तिच्या खोलीतून तिची बॅग लंपास करतो, ती झोपेचं नाटक करत असते. तो पळतो, कुणीतरी चोर चोर अशी आरोळी ठोकतो .. आता पोलीस त्याचा पाठलाग करतात .. गोळी झाडली जाते आणि तो मरतो .. बॅग उघडी पडते तशी त्याचे ते टोळभैरव येतात आणि हात चोळत तेथून पोबारा करतात.. तिच्यासमोर आता सगळं चित्र साफ झालेलं असतं. शेवटी तिला कोणीतरी विचारतं, तू त्याला ओळखतेस का .. तेव्हा ती निग्रहानं नकार देते आणि तिथून निघून थेट अशोकचं घर गाठते.
अशोक एका कॅनव्हास समोर बसलेला असतो. ती येते आणि घडाघडा बोलते, त्याची माफी मागते.. आपण चुकलो हे कबूल करते .. पण अशोक ढिम्म असतो.. शेवटी ती जाते आणि त्याला हात लावून हलवणार तोच अशोक मान टाकतो .. ती किंचाळते .. ढसाढसा रडते.. कॅनव्हास उघडून पहाते तो त्याने त्याच्या मरणाचंच आज चित्र रेखाटलेलं असतं... आता तिच्या दुःखाला पारावार रहात नाही... ती घरभर फिरते .. तिचं मन तिला खायला लागतं. आता घरात वेगवेगळ्या पोझमधली भिंतीवर लटकणारी चित्र जिवंत होतात.. अन् तिचीच चित्र तिला खूनी , पापी, डायन, नीच, बेवफा म्हणायला लागतात .. तू अशोकला मारून टाकलंस, तू मरून का नाही जात असं म्हणू लागतात.. ती बिथरते, आतून तुटते कारण आता तिचंच मन तिला खात असतं ना .. अंगावर येणारी चित्र, मृतावस्थेतला अशोक पाहून अखेरीस ती कोसळते आणि प्राण सोडते ..
चित्रपट संपतो..
आणि आपल्या पुढ्यात आयुष्याचं गांभीर्य ठेऊन जातो. विशेषतः भावनेच्या भरात होणाऱ्या चुका आणि त्यामुळे भरकटलेली आयुष्य पुढे कशी रसातळासा जातात याची कथा सांगणारा हा चित्रपट पहाताना आपण व्याकूळ होऊन जातो. माणसाचं पाऊल कायम पुढे पडत असतं, आणि काळही कायम पुढेच जात असतो, एकदा टाकलेलं पाऊल पुन्हा मागे घेतलं तरी ते पुन्हा त्याच मागच्या मुक्कामाला आपल्याला नेईलच असं काही नाही .. म्हणूनच माणसाने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं पाहिजे आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय कधीही घेऊच नये हाच काय तो बोध या चित्रपटातून घ्यायला हवा इतकंच मी सांगेन ..
- मोहिनी घारपुरे - देशमुख
(Photo credit - youtube)