मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कॅलेंडर गर्ल्स

2014 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा कॅलेंडर गर्ल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वी पेज थ्री आणि हिरॉईन हे दोन्हीही वेगळ्या धाटणीचे चित्रपट म्हणून लोकप्रिय झाले होते. साधारणतः त्याच थीमवर पण वेगळा विषय घेऊन आलेला कॅलेंडर गर्ल्स हा त्यांचा चित्रपट आज पाहिला आणि मन विषण्ण झाले. ग्लॅमर जगतात सौंदर्य आहेच पण या जगाची काळी बाजूही आहे. ही दुसरी बाजू या चित्रपटांच्या माध्यमातून मधुर भांडारकर रेखाटतात.. आणि तेच वास्तवही आहे. एकदा का चकचकीत काचेच्या आतल्या झळाळत्या मोहमायी दुनियेत तुमचा प्रवेश झाला की तुम्हाला परतीचे मार्ग फार अपवादानेच उघडतात. त्यामुळेच इथे येण्यापूर्वीच पुढे काय हा विचार करून मगच आलं पाहिजे हे नक्की ..

कॅलेंडरवर वेगवेगळ्या, चित्रविचित्र वेशभूषेत झळकणाऱ्या मुलींबद्दल सामान्य वर्गाला मोठं आकर्षण असतं. सामान्यातल्याच काही नशीबवान मुली एवढ्या उंचावर जाऊ शकतात हा एक दृढ समज. या मुली कोण, कुठून येतात, कुठे जातात याबद्दल फारशी चर्चा होत नाही. केवळ भिंतीवर एक नवीन कॅलेंडर दरवर्षी सजतं आणि त्यातले चेहरे वर्षागणिक बदललेले असतात. या चेहऱ्यामागच्या व्यक्तिंना केवळ तेवढ्यापुरतीच लोकप्रियता, प्रसिद्धी मिळते आणि नंतर एखाद्या तुटलेल्या ताऱ्याप्रमाणे हे चेहरे कुठेतरी अंधारात गुडूप होऊन जातात. ते लोकांना कधीच दिसत नाहीत.. आणि दिसतात तेव्हाही ते पुन्हा त्यांच्या झळाळीसह असतीलच याची काहीच शाश्वती देता येत नाही.. 
कॅलेंडर गर्ल्स ही कथा आहे अशाच पाच मॉडेल्सची. या पाचही मुलींचा तोवर आपसात काहीच संबंध नसतो. एका मोठ्या ब्रँडच्या कॅलेंडरसाठी त्यांची निवड होते. महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद, पाकिस्तान आणि गोवा अशा पाच ठिकाणाहून या मुली मुंबईत येतात. प्रत्येकीचं साध्य एकच, पण दिशा .. ती मात्र वेगवेगळी. आपल्या नात्यांवर ताण देऊन कुणी या असाईनमेंटसाठी येतात आणि कुणी घरच्यांचं उत्तम पाठबळ घेऊन येतात.. असाईनमेंट होते, कॅलेंडर झळकतं.. भरपूर प्रसिद्धी, पैसा या मुलींना मिळतो आणि पुढे .. पुढचे मार्ग प्रत्येकीच्या आयुष्याची रेष वेड्यावाकड्या वळणांनी घेऊन पुढे जात रहाते .. 
आपली हुशारी आणि कधी, कुठे, काय बोलायचं, स्वतःला प्रेझेंट कसं करायचं हे चोख कळलेली मयुरीला या क्षेत्रात येण्यासाठी घरच्यांचा पाठींबा. त्याबळावरच ती येते आणि नंतर तिचा पीए तिवारी (अतुल परचुरे) याच्या साथीने हळूहळू बॉलीवूडमधली अभिनेत्री म्हणून प्रवास करते.
कोलकत्याची पारोमा हट्टाला पेटते .. घरच्यांचा विरोध असतो. गेलीस तर पुन्हा परतून येऊ नकोस असं सांगणाऱ्या वडीलांना आणि भावाला पारोमा म्हणते, मी मुंबईत जाईन.. पुन्हा परतून येणार नाहीच पण तुम्हाला मात्र घेऊन जाईन .. आणि तुम्हाला त्यादिवशी माझा अभिमान वाटेल.
हैद्राबादची नंदिता एका उच्चशिक्षित कुटुंबातली मुलगी.. आईवडील उच्चपदाधिकारी, बहीणही एकदम करिअरिस्ट .. अशा पार्श्वभूमीवर नंदिताला जेव्हा भारतातल्या टॉप, हॉटेस्ट कॅलेंडरची मॉडेल म्हणून निवडलं जातं तेव्हा आनंदीआनंदच असतो.
नाझनीन आपल्या बॉयफ्रेंडच्या साथीने लाहोरहून लंडनला येते पण ही टॉप मॉडेल बनण्याची संधी मिळाल्यावर तिला ती घ्यावीशी वाटतेच.. बॉयफ्रेंडचा कडाडून विरोध असतो पण तरीही त्याला न जुमानता ती पुढचं पाऊल टाकते आणि मुंबईत येते.
शॅरेन गोव्याची असते.. तिची जेव्हा निवड होते तेव्हा तिला स्वतःवर विश्वास असतो. या इंडस्ट्रीत काहीही चालू दे पण कदाचित तिला माहिती असतं की तिला कुठवर जायचंय त्यामुळे त्या विश्वासावर ती मुंबईत येते. 

अशा या पाच जणी.. मुंबई शहरात येतात काय .. कॅलेंडरवर झळकतात काय आणि रातोरात प्रसिद्ध होतात काय  .. त्यांचा स्वतःचाच विश्वास बसत नसतो त्यांच्या नशीबावर .. पुढे दोन तीन महिने या यशाच्या आनंदात जातात आणि आता .. आता खरे कसोटीचे क्षण त्यांच्यासमोर येणार असतात. कारण, आता त्या एकेकट्या असतात, स्वतंत्रपणे जगणार असतात आणि त्यांच्याभोवतीचं वलय त्यांना आयुष्याची बरीवाईट वळणं दाखवणार असतं.
पारोमा कुठे कुठे प्रमुख अतिथी म्हणून मिरवत असतानाच तिचा जुना बॉयफ्रेंड तिला गाठतो.. प्रेम तर असतंच त्यांच्यात कधीतरी पूर्वीच त्यामुळे हाच धागा पकडून ती त्याच्या हातात आपला हात देते..
नंदिताची ओळख एका धनाढ्य कुटुंबातील एकुलत्या एका मुलाशी होते आणि ती मॉडेलिंग करियर सोडून त्याच्याशी विवाहबद्ध होते.
मयुरी अनेक खटपटी लटपटी करत बॉलीवूडपर्यंत पोहोचते.. पैसे कमावत जाते.
शॅरेनची ओळख आणि मैत्री एका माणसाशी होते तो तिच्याकडे तिचं पिआरचं काम मिळवायला येतो, तीही त्याला काम देते, मग जरा बरी ओळख, मैत्री होते म्हणून त्याच्यासोबत फिरायला जाते आणि तो तिच्या नुसत्या सहवासाच्याच रंगेल अफवा बनवून इकडेतिकडे पसरवतो.. इंडस्ट्रीत तिची बदनामी करतो. एका पार्टीत तिला जेव्हा एक फाल्तू मुलगा काहीबाही बोलतो तेव्हा हा सगळा प्रकार तिला कळतो आणि ती त्या पीआरला त्याच्या ऑफीसात जाऊन कानशिलात भडकावते.. आणि या प्रकारानंतर मॉडेलिंगची दारं तिच्यासाठी बंद होऊन जातात.
नाझनीनला एक ब़ड्या बॅनरची फिल्म मिळते खरी पण त्याचदरम्यान भारतात एकदम पाकिस्तानी कलाकारांना काम देऊ नका म्हणून गदारोळ माजतो.. नाजनीनची संधी हुकते आणि भारतात जगणंही तिच्यासाठी फार कठीण होऊन बसतं. थोडे दिवस ती शेरॉन बरोबर रूम शेअर करते पण नंतर पैशाची चणचण भासू लागते. 
आता पुढे कसं म्हणून काळजीत पडलेल्या नाझनीनला एक बाई हेरते आणि मॉडेल म्हणून ओळख मिळवू इच्छिणाऱ्या नाझनीनला पुढे एस्कॉर्ट म्हणून जगावं लागतं ..
नंदीतालाही एव्हाना तिच्या नवऱ्यावर संशय आलेलाच असतो. ती त्याच्यासोबत मुद्दामच मुंबईला जाण्याचा आग्रह करते .. तो तिला आढेवेढे न घेता नेतोही आणि तिच्या नकळत आपल्या रूमवर एस्कॉर्टला बोलावतो .. ती अन्य कुणी नसून, नाझनीनच असते.. नाझनीन त्याला पाहून घाबरते पण तो तिला सोडणार थोडीस असतो.. नाझनीन त्या दिवशी हतबल होते. नंदीता तिलाच त्याच हॉटेलमध्ये भेटायला आलेली असते आणि भेटतेही, तेव्हा ती तिच्या नवऱ्याबद्दलचा संशय नंदिताजवळ व्यक्त करते .. इतक्यात तोही येतो.. आता नंदिताला खूप अनकंफर्टेबल होतं आणि स्वतःच्या चुकाही दिसायला लागतात.. ती तिथून कारण सांगून पळ काढते आणि त्या बाईला भेटून आता यापुढे आपण हे काम करणार नाही असं सांगते.. ती बाई एकदा, अखेरचंच तू हे कर असं म्हणून नंदिताला भऱीस घालते. ती तयार होते .. शेवटची वेळ म्हणून .. आणि ही शेवटची वेळ तिची काळरात्रच ठरते. हा सगळा प्रसंग खरंच पहाण्यासारखा आहे ..
इकडे पारोमाचीही तिच्या बॉयफ्रेंडने वाट लावलेली असते. इमोशनल पारोमाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा बॉयफ्रेंड क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगसाठी पारोमाचा वापर करतो. तीही त्याच्या बोलण्याला भुलते आणि शेवटी जेव्हा पोलीस पकडायला येतात तोवर तो पैशांसकट फरार झालेला असतो. पारोमा पकडली जाते आणि तिला अटक होते. यावेळी तिची जमानत करायला का होईना तिचा भाऊ आणि वडील येतात पण कुटुंबाची इज्जत गेली म्हणून तिला सोबत न घेताच ते तिला एकटं सोडून निघून जातात. पारोमा एकटी पडते .. कायमचीच.
शॅरेनला दरम्यानच्या काळात एका टीव्ही वाहिनीची एँकर म्हणून संधी मिळते आणि तीही त्या संधीचं सोनं करते. त्या वाहिनीच्या प्रमुखाशी नंतर लग्न करून सेटल होते.
मयुरीला मधुर भांडारकरच्या सिनेमात कास्ट केलं जातं.
अशा या पाच जणी नंतर नाझनीनच्या अंत्यदर्शनालाच एकदम एकत्र भेटतात .. तोवर या चांदण्यांचा झगमगाट मावळून गेलेला असतो. वास्तवाचा चटका त्यांना चांगलाच बसलेला असतो.. 
या वळणावर चित्रपट संपतो आणि शेवटाकडे जाता जाता भिंतीवरच टांगलेलं हे जुनं कॅलेंडर बदलून एक नवं कॅलेंडर कोणीतरी चढवत असतो.. आणि आता नवे चेहरे या कॅलेंडरवर झळकत असतात.. 
असा हा चित्रपट आपल्याला फारच हळवं करून जातो.. एका क्षणात आपले पाय जमिनीवर आणून ठेवतो. माणसाला शेवटी नशीबाच्या पुढे जाता येत नाही हेच खरं ं.. आणि कदाचित, आपल्याला कुठवर धावायचंय आणि काय गमावून काय मिळवणार आहोत हे हिशेब माणसाने पुढचं पाऊल टाकण्याआधीच करून ठेवायला हवेत हेच कदाचित चित्रपट सांगून जातो. 
चकाकतं ते सोनं असतंच असं नाही हे देखील या मोहमायी दुनियेत येणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे अन्यथा कोणाची नौका त्याला कुठे भरकटवेल हे सांगू शकतच नाही, कोणीच हेच खरं ..
सर्वार्थाने चपखल असा हा चित्रपट म्हणूनच माझ्यासारख्या, एकेकाळी मॉडेलिंगच्या जगताची दारं ठोठवणाऱ्या आणि इथला खोटारडेपणा अनुभवल्यानंतर वेळीच पाठीमागे फिरलेल्या , एका संवेदनशील लेखिकेला आवडला नाही तरच नवल .. नाही का .. ?
कदाचित तुमच्यापैकीही काहीजणांना तो आवडू शकेल असं मला वाटतं.
थांबते ..!

-  मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - www.imdb.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश