शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

मौसम

कथानक मजबूत असेल तर केवळ दोन तीन मुख्य पात्रांच्या आधारेही सिनेमा किती उंची गाठू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1975 साली प्रदर्शित झालेला मौसम हा चित्रपट .. 
आयुष्याची उमज नेमकी कळलेले दिग्दर्शक गुलझार यांच्या कथेतून आणि दिग्दर्शनातून बनलेला हा चित्रपट आपल्याला रडवल्याशिवाय रहात नाही. वाईटातून नेहमी चांगलं होतं हा विश्वास आपल्या मनात जागं करणारा हा चित्रपट म्हणूनच मनोरंजनाबरोबरच आयुष्याची अनिश्चितता आणि वास्तवता दोन्हीही आपल्याला शिकवून जातो. 
माणूस ठरवतो एक नि होतं दुसरंच .. किंबहुना ज्याचं त्याचं प्राक्तन ज्याला त्याला आपापल्या मार्गाने पुढे नेत असतं आणि एकाचं नशीब दुसरा बदलू शकत नाही तसंच जे घडायचं असतं तेच घडतं अशा आजवर ऐकलेल्या अनेक गोष्टी शब्दशः खऱ्या असाव्यात असं चित्रपटाच्या शेवटी आपल्याला वाटून जातं. 
तर कथा अशी की, दार्जिलिंगमध्ये आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाची तयारी करणारा विद्यार्थी अमरनाथ गिल (संजीव कपूर), एकदा घरी परतताना धडपडतो आणि त्याचवेळी तेथून जात असलेल्या चंदाच्या (शर्मिला टागोर) नजरेस पडतो. तिचे वडील गावातले वैद्य त्यामुळे ती त्याला उपचारासाठी घरी यायला सांगते. पाय चांगलाच मुरगळला असल्याने तो घरी जातो .. उपचार घेऊ लागतो आणि दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. काही महिन्यानंतर अमरनाथला शहरात परीक्षेकरता परतावे लागणार असते तेव्हा तो चंदाच्या वडीलांना आपल्या आणि चंदाच्या प्रेमाबद्दल सांगतो आणि परीक्षेनंतर परत येऊन तिच्याशी लग्न करून तिला घेऊन जाईन असं आश्वासन देतो. वैद्यबुवाही संमती दर्शवतात. अमरनाथ जातो .. आणि हाय रे कर्मा .. तो पुन्हा कधीच परतून येत नाही. अक्षरशः पंचवीस एक वर्षानंतर तो दार्जिलिंगला परततो तोवर त्याचं तारूण्य ओसरून गेलेलं असतं. सहज म्हणून तो तिथल्या गावकऱ्यांपैकी कोणाकोणाकडे चंदाची आणि वैद्यबुवांची चौकशी करतो आणि जे काही समोर येतं ते फार फार ह्रदयद्रावक असतं. त्याला कळतं, वैद्यबुवा तर केव्हाच वारले. त्यांची मुलगी चंदा कोणा डॉक्टरची वाट पहात होती बरीच वर्ष .. तो येईल आणि मला नेईल पण तो कधी आलाच नाही. दरम्यान तिचं लग्न वैद्यबुवांनी गावातल्याच एका लंगड्या, बिजवराशी करून दिलं. तोही फार काही जगला नाही. हिला मात्र दिवस राहिले आणि मुलगी झाली. पण चंदाला केव्हाचच वेड लागलं होतं.. ती सतत मुलीला डॉक्टर बनवायची स्वप्न पहायची आणि तिच्या डॉक्टर प्रियकराची वाट पहायची. नंतर तिची मुलगी डॉक्टर होण्यासाठी शहरात गेली तेव्हा म्हातारी चंदा एका माळी काकाजवळ रहायची .. मुलीने थोडे दिवस पैसे पाठवले आणि चंदा गेल्यावर ते बंद झाले.. तेव्हापासून कोणीही त्या मुलीचा शोध घेतला नाही आणि ती कुठेय, तिचा ठिकाणाही कोणालाच माहीत नाही...
हे सगळं ऐकून अमरनाथ, जो आता उतारवयाकडे झुकलेला असतो त्याचं ह्रदय पिळवटून निघतं. कारण त्याला वाटलेलं असतं, की आपण परतलो नाही तरी चंदाचं आयुष्यात काहीतरी चांगलंच झालेलं असेल .. माणूस कधीच एवढ्या टोकाचं वाईट चिंतत नाही किंबहुना काळावर विश्वास ठेऊनच आयुष्य जगायचं असतं हेच खरं.. त्यामुळेच अमरनाथला जेव्हा ही शोकांतिका कळते तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं. तो शोध घेऊ लागतो, त्या सगळ्या जुन्या खाणाखुणांचा .. त्या खुणांनी तो चंदाचं आयुष्य तर उलगडत जातोच पण आता त्याला मागे हटायचं नसतं .. किमान जे त्याच्या हातात उरलेलं असतं त्याप्रती तरी त्याला जबाबदारी पेलायची असते.. अर्थात, चंदाची मुलगी कजली .. तो तिचा शोध घेऊ लागतो. त्याला कुणीतरी सांगत की ती डॉक्टर झालीये आणि शहरातून पैसे पाठवायची चंदासाठी .. तेव्हा त्याला काहीसं हायसं वाटतं खरं .. पण छे .. खरं आयुष्य एवढं सोपं कोणासाठीच नसतं हेच खरं.. आणि कजली सारख्या मुलीसाठी .. जिचा वडील म्हातारा, लंगडा आणि हिच्या लहानपणीच जो मेला .. जिची आई आयुष्याचे चटके खाता खाता वेडीच झालेली .. तिच्या पाठीशी कोण उभं रहाणार .. कोण तिला डॉक्टर बिक्टर बनवणार नाही का .. अशा दुर्दैवी मुलींना आपल्या समाजातल्या लांडग्यांनी खाल्ल नाही तरच नवल ..
अगदी तशीच करूण कहाणी या कजलीची झालेली असते. अचानक एका वेश्याग्रृहातून समोर आलेली मुलगी जी हुबहू चंदासारखी .. तिच्यावर अमरनाथची योगायोगाने नजर पडते आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तो तिचं जीवन सुधरवण्यासाठी प्रयत्न करतो.. सारखा तिच्यासाठी तेथे येणारा हा म्हातारा माणूस कोणी तसला असेल असं वाटून ती त्याच्याशी बोलते आणि बेटी बिटी म्हणायला लागल्यावर सुरूवातीला चक्क त्याला तेथून हाकलून देते. पण तो माघार घेत नाही.. शेवटी एकदिवस तो तिला वाट्टेल तितके पैसे देतो पण मी म्हणेन तेवढे दिवस माझ्यासोबत माझ्याघरी रहायला चल म्हणतो आणि तिला तिथून काढतो. घरी एका बाईला घेऊन आलेलं पाहून नोकरचाकर ओळखीचे पाळखीचे यांच्या नजरा बदलतात.. पण तो .. त्याला तिचं जीवन सुधारायचं असतं .. ती जणू त्याचीच मुलगी असते .. त्याची जबाबदारी असते ना .. तो तिला घरी नेतो आणि तिचं रहाणीमान वागणं बदलवतो. ओघातच तिची करूण कहाणीही जाणून घेतो. हा गृहस्थ म्हणजे आपलं एक सोफेस्टीकेटेड गिऱ्हाईक असच तिला वाटत असतं .. त्यामुळे तिचं वागणंही थोडंफार तसंलच असतं. पण हळूहळू गोष्ट पुढे सरकते. ती तिची कथा ऐकवते. आई वेडी झाली तेव्हा वडीलांचा एक भाऊ सतत यायचा, त्याची माझ्यावर वाईट नजर होतीच आणि एक दिवस त्यानं डाव साधला. मला नासवून नंतर त्याने इथे आणून बसवली .. आणि मग हेच माझं जीवन झालं .. तिचे ते शब्द ऐकताना अमरनाथला स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल फार फार चीड येते. आपण तेव्हा या मुलीची काळजी घ्यायला का नव्हतो हा प्रश्न त्याला टोचतो.. तिचं कोणा कुंदनवर प्रेम होतं हे जेव्हा ती सांगते तेव्हा पुन्हा अमरनाथच्या आशा पल्लवीत होतात. कदाचित, जशी चंदा, आपली प्रेयसी, हिची आई जशी आपल्या वाटेकडे तब्बल वीस वर्ष डोळे लावून राहिली होती तसाच जर  तोही  हिच्यासाठी आजही थांबला असेल तर आपण आपल्या हातानी या पोरीचं त्याच्याशी लग्न लावून देऊ अशा विचाराने तो एकदा तिला त्याच्या घरी नेतो, तिलाही थोडीशी आशा वाटू लागलेली असते .. पण इथेही नशीब काही वेगळंच दान टाकतं कारण ती कुंदनची चौकशी करते आणि त्याच्या घरातली तिला उत्तर देणारी स्त्री म्हणजे दुसरी कुणी नसून त्याची बायकोच असल्याचं कळतं आणि हे दोघेही पुन्हा एकदा निराश होऊन माघारी येतात. अर्थात तोवर कजलीला हा अमरनाथच आपल्या आईचा प्रियकर आहे हे माहीत नसतंच. 
अमरनाथही एवढी वर्ष अविवाहीतच राहिलेला असतो. त्याला चंदाशीच लग्न करायचं असतं. पण परीक्षेनंतर पुढे तो सर्जन म्हणून काम सुरू करतो तेव्हा त्याच्या हातून शस्त्रक्रीयेदरम्यान एका रूग्णाचा मृत्यू होतो आणि त्याला पुढे तीन वर्ष तुरूंगवास होतो. त्यामुळेच तो चंदाशी काहीच संपर्क करू शकत नाही. शिवाय कैदेतून परत सुटल्यावर त्याला वाटतं, की आता आपण चंदाच्या लायक नाही आणि या मधल्या काळात तर तिचं लग्नही झालं असेल असं वाटून तो पुन्हा कधीच माघारी फिरत नाही. अमरनाथ आपली कथा कजलीला सांगतो पण ती मुलगी म्हणजेच तुझी आई ही ओळख देण्याचं टाळतो.. कारण कजलीने तोवर तिच्या मनात त्या डॉक्टरविषयी किती राग आहे ते सांगितलेलं असतं.
शेवटी अशी मुलगी आपल्या साहेबांबरोबर कशाला रहातेय यावरून एक दिवस घरातला एक नोकर तिला साहेबांच्या परोक्ष जाब विचारतो आणि तिलाही मनातून वाटू लागतं की खरंच आपण या भल्या गिऱ्हाईकाला ज्याने आपल्याला अद्याप स्पर्शही केला नाही त्याच्या चांगुलपणाची कदर ठेऊन आता त्याच्या आयुष्यातून परत गेलं पाहिजे. दरम्यान हा अमरनाथ त्या वेश्यागृहाची मालकीण असलेली बाई (दीना पाठक) हिच्याकडे जाऊन कजलीला परत इथे न आणण्याची किंमत म्हणजे ब्लँक चेक देऊन येतो. पण इकडे कजली पुन्हा जुन्या अवतारात याच्या घरात फिरत असते.. शिवाय त्याच्या मनातून उतरण्यासाठी ती खोटं कारणही देते. तो चिडतो आणि तिला हाकलून देतो. ती पुन्हा वेश्यागृहात जाते.. पण आता तिला लक्षात आलेलं असतं, की आपल्याही मनात एक स्त्री आहे आणि तिला, तिच्या मनाला त्या म्हाताऱ्या ग्राहकानी स्पर्श केलाय.. ती तसं सांगते आणि वेश्यागृहाची मालकीणही कजलीला त्या देवमाणसाजवळ रहा आणि तुझं आयुष्य पुन्हा उभ कर असं सांगते.. ही जाते, पुन्हा त्या म्हाताऱ्या गिऱ्हाईकाजवळ .. पण एक वेगळीच आशा आता तिच्या मनात असते कारण तिला तो कोण आहे हे तोवर माहीतच नसतं.. 
ती त्याला जवळ घेते आणि तो तिच्या कानशिलात भडकावतो.. 
काय हे सगळं करायला तुला तुझ्या आईने मोठं केलं का .. असं खडसावतो आणि रागाच्या भरात त्याच्या तोंडून चंदा नाव निघतं .. तेव्हा कजलीला कळतं, की आपली आई चंदा ज्याची एवढी वर्ष वाट पहात होती तो डॉक्टर अन्य कुणी नसून हाच आहे .. तिला राग येतो, स्वतःचा, त्याचा आणि स्वतःच्या फुटक्या नशीबाचाही ... ती धावत सुटते.. तेथून दूर निघून जाते ..
तो तिला थांबवत नाही .. 
दुसरा दिवस उजाडतो.. तो पुन्हा शहरात जायला निघतो .. अर्ध्या वाटेवर एका झाडामागे कजली दिसते. डोळ्यात संपलेली स्वप्न असतात आणि चेहऱ्यावर राग, निराशा दाटून आलेली असते तिच्या .. या क्षणी त्याच्यातला बाप पुन्हा जागा होतो.. तो थांबतो.. तिच्या हातात तिने लपवून ठेवलेला कागद पहातो .. तो त्याचा तरूणपणीचा फोटो असतो .. तिने जपून ठेवलेला, तिच्या आईने जपून ठेवलेला .. 
त्याला गहीवरून येतं .. तो कजलीला म्हणतो, चल बेटी, आता आपल्याजवळ मागे वळून पहाण्यासाठी काहीच उरलेलं नाही .. आता आपण पुढे निघून जाऊया .. एकमेकांच्या सोबतीनं .. आणि दोघांच्याही आयुष्यात एक नवा मौसम, एक नवा ऋतू पुन्हा बहरतो .. वडील मुलीच्या नात्याने त्याचं आयुष्य आता पुन्हा बहरून जाणार असतं ..

तर असा हा मौसम चित्रपट .
शर्मिला आणि संजीव दोघांच्या अभिनयाने एका उंचीवर पोहोचलेला.. तितकीच व्याकूळता आपल्या मनात उतरवतात ती या चित्रपटातील एक से एक गाणी .. 
दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन, रूके रूके से कदम रूक के बार बार चले, छडी रे छडी कैसी गले में पडी .. ही गाणी फार फार ओघवती वाटतात.. अर्थात ती तितकीच सुंदर आहेत म्हणूनही आजही लोकप्रिय आहेतच यात शंका नाही .. 
जीवनाचे ऋतू कधीच एकसारखे नसतात आणि कोणता ऋतू कोणासाठी काय घेऊन येईल हे तर कुणीच सांगू शकत नाही .. माणसाने फक्त पुढे जात रहावं आणि आपली जबाबदारी घेत आणि चांगूलपणा देत जावं हेच गुलझार या चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचवतात.. 
जीवनाचं गूढ अगदी साधेसहजपणाने आपल्यासमोर उलगडणारे गुलझार म्हणूनच फार फार आवडून जातात ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

(photo credit - www.alchetron.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश