गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

अपने पराए


साधारण नावावरूनच कथानक लक्षात आलं तरीही कथेची मांडणी आणि प्रत्येक पात्राचा अभिनय पहाण्यासाठी तरी हा चित्रपट नक्की पहायला हवा असं मी सांगेन. शरत् चंद्र चॅटर्जी यांच्या निष्कृती कथेवर आधारित 1980 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू चॅटर्जी तर प्रमुख कलाकार आशालता वाबगावकर, शबाना आझमी, भारती आचरेकर आणि गिरीश कर्नाड, अमोल पालेकर आणि उत्पल दत्त .. 
गंमत म्हणजे, चित्रपटाच्या शीर्षक गीतात "नई तारकाएँ" म्हणून आशालता वाबगावकर आणि भारती आचरेकर यांचा नामोल्लेख आहे.. अर्थात शबाना आझमी वयाने (कदाचित) या दोघींपेक्षा लहान असूनही चित्रपटसृष्टीत ती या दोघींना सिनीअर कलाकार म्हणून तोवर नावाजली होती. 
कथेत कोणतीही भव्यता नाही, त्यामुळेच अगदी आपल्याच घरातली ही गोष्ट आहे की काय असं चित्रपट पहाताना वाटून जातं. त्यातून एक से एक कसलेले कलाकार चित्रपटाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात की चित्रपट पुन्हा एकदा पहाण्याची इच्छा नकळत होऊन जाते. 
तर होतं असं की उत्पल दत्त (बडे भैय्या) आणि आशालता(बडी माँ / सिद्धेश्वरी) , आणि अमोल पालेकर (चंंदर) आणि शबाना आझमी (शीला) हे आपल्या मुलाबाळांसमवेत एकत्र कुटुंबपद्धतीत सुखाने नांदत असतात. तसं तर बडे भैय्या आणि चंदर एकमेकांचे चुलत भाऊ .. पण घरात सख्ख-चुलत वगैरे विचारही कधी कोणाच्या गावी नसतो. बडे भैय्या आणि त्यांचा सख्खा लहान भाऊ (गिरीश कर्नाड (हरीश)) दोघंही व्यवसायाने वकील असतात आणि चंदर तसा काहीच कामधंदा करत नसतो. त्याचा रस गाण्यात वगैरे असतो त्यामुळे फार काळ कोणताही व्यवसाय वा नोकरी करण्याचा त्याचा पिंडच नसतो. हरीश आणि त्याची बायको नयनतारा तोवर दुसऱ्या शहरात रहात असतात पण कथेची सुरूवातच अशी होते की आता हरीश, त्याची बायको आणि मुलगा पुन्हा घरी सगळ्यांसोबत एकत्र रहायला येणार असतात. हे कुटुंब येतं तोवर शीलाने सगळ्या घरावर आपला प्रेमाचा, संस्कारांचा हक्क गाजवत आपलं वर्चस्व निर्माण केलेलं असतं. मोठी असूनही सिद्धेश्वरीला शीलाच्या गुणांचं कौतुक असतंच शिवाय तिच्या अधिपत्याखाली घर सुरळीत चाललंय हे पाहून ती त्यात समाधानी असते. शीलाही एकदम रोखठोक स्वभावाची .. जे योग्य ते योग्य आणि जे अयोग्य ते अयोग्य अशा सडेतोड स्वभावाची.. त्यामुळे घरातील लहानग्यांवर तिचा प्रभाव जास्तच असतो. घराच्या किल्ल्याही शीलाकडेच कारण ती व्यवहारात चोख असते. मोठ्यांना मान देत, सगळ्यांचा सन्मान ठेवत शीला घर उत्तम चालवत असते. एकीकडे तिच्या मनात हे देखील शल्य असतंच की आपला नवरा काहीच करत नाही त्यामुळे आपण या घरात शक्य तितकं काम करावं म्हणजे आपल्याला कोणी बोल लावणार नाही.. 
अशातच हरीश (गिरीश कर्नाड) आणि नयनतारा (भारती आचरेकर) परत येतात आणि मग सगळं चित्र पाहून  आपोआपच मनात असूया निर्माण होते. मग लहान मुलांची भांडणं, त्यावरून मोठ्या माणसांची भांडणं .. चुगल्या, रूसवे फुगवे टोकाचे वाद .. सतत सुरू होतं. इतकं टोकाला जातं की शेवटी शीला आणि चंदर गावच्या घरात रहायला निघून जातात. पण हरीश आणि नयनताराला तेही बघवत नाही .. शेवटी बायकोच्या बोलण्यात येऊन हरीश  आपल्या मोठ्या भावाला साथीला घेत चंदरवर पैसे खाल्याची केसच ठोकतो .. खरंतर मोठे भाऊ आणि सिद्धेश्वरी फार प्रेमळ असतात, चांगले असतात, नाती जपणारे असतात.. पण या दोघांच्या बोलण्यात येतात आणि एक एक करत घराचं घरपण जातं.. शेवटी सिद्धेश्वरीला शिलाच्या मुलांची आठवण यायला लागते .. स्वप्न पडायला लागतात आणि ती तिच्या नवऱ्याला एकदा गावी जाऊन चंदरची चौकशी करून यायला सांगते. तोही जातो .. आणि पहातो तर शीलाची रयाच गेलेली असते.. चंदरही कोर्टात केसच्या सुनावणीसाठी निघालेला असतो .. मुलं तापाने फणफणलेली असतात. हे सगळं पाहून काहीसा वेंधळा असलेला बडा भैय्या शीलालाच रागवायला लागतो, चंदर किती नाकारा आहे हे बोलायला लागतो .. तेव्हा शीलाच्या डोळ्यात पाणी तरळत .. प्रत्येकजण आपल्या भोळ्या नवऱ्याला बोलतात पण दुसरीकडे आमच्यावर ही वेळ कशाने आली ते कोणीच बघत नाही असं बोलून जाते ..आणि मोठ्या भावाला काय वाटतं कुणास ठाऊक तो सरळ आपली सगळी संपत्ती शीलाच्या नावावर करून मोकळा होतो.. इकडे घरी तोवर हरीश आणि नयनतारा सगळं काही गिळण्याच्या बेतात असतात आणि जेव्हा मोठ्या भावाचं हे कृत्य कळतं तेव्हा दोघंही हातावर हात चोळत रहातात. हरीश लगेचच परत दुसऱ्या शहरात जायला कुटुंबाबरोबर निघतो आणि इकडे मोठा भाऊ चंदर आणि शीलाला आपल्या घरी पुन्हा घेऊन येतो .. सगळा आनंदीआनंद होतो .. सिनेमा संपतो. 
खरंच, ज्यांना आपलं मानतो ते आपले असतात का .. आणि ज्यांना परकं समजतो ते परके असतात का .. जगाचे नियम काही वेगळेच आहेत. केवळ पैशापोटी नाती जोडणारी मंडळी ही आपल्या जवळच्या नात्यातलीही असू शकतात हे आपल्याला जाणवून देणारा हा सिनेमा, आणि परके किंवा दूरचे नातेवाईक म्हणवणारेही कधीकधी एवढं प्रेम, आत्मीयता देऊन जातात की तेच खरे जवळचे वाटतात असंच हा सिनेमा दाखवत जातो. 
हा चित्रपट एवढा सहजसाधा आहे की पहाताना आपणही त्या काळात हरवून जातो. कदाचित हे घर आपलंच तर नाही ना असा भासही क्षणभर आपल्याला झाल्याशिवाय रहात नाही. विशेष म्हणजे प्रत्येक कलाकाराचा अभिनय इतका सुंदर झालाय की त्यामुळे ती पात्र अगदी जिवंत झाल्यासारखी वाटतात. प्रेमळ सिद्धेश्वरी, भांडखोर आणि लावालाव्या करणारी नयनतारा आणि न्यायनिष्ठुर कर्तव्यदक्ष शीला या तिघी जावांनी जे काय काम केलंय ना त्यास तोड नाही. आणि तसंच काहीसे वेंधळे पण जबाबदार बडे भैय्या, काहीसा लालची हरीश आणि बेकार परंतु मनाने सच्चा चंदर हे तिघे भाऊही अतिशय हुबहू वठवले आहेत. 
एकंदरीत, गाणी वगैरे फारशी नसूनही मूळ कथाच अगदी सहजसुंदर असल्याने हा चित्रपट आपल्याला आवडल्यावाचून रहात नाही हे नक्की... 

- मोहिनी घारपुरे- देशमुख 

#मला_भावलेला_चित्रपट

(Photo credit - youtube)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश