शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

घर


एक सुंदरसं घर आपलं स्वतःचंही असावं असं स्वप्न घेऊन प्रत्येक माणूस जगतो. घर विकत घेण्याचं स्वप्नं लग्नानंतर तरी अनेकांचं पूर्ण होतं. पण खरं सांगू, घर म्हणजे नुसत्या भिंती आणि मालकी हक्काची आपली खाजगी जागा नव्हे, तर त्यातील माणसांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि बिकट प्रसंगात एकमेकांना दिली जाणारी घट्टमुट्ट साथ यावरच खरं घर उभं रहात असतं.
1978 साली रेखा, विनोद मेहरा यांच्या जोडीने अजरामर केलेला घर हा हिंदी चित्रपट सुपरहिट ठरला तो अनेक कारणांनी ...
मुळात त्या काळात अशी कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं हेच फार प्रबोधनात्मक होतं.. पण तरीही मूळ आशयाला धक्का न देता आणि चित्रपट प्रेक्षकांना प्रबोधनात्मक वगैरे न वाटता, विचार करण्यास प्रवृत्त करेल अशा पद्धतीने दिग्दर्शक माणिक चॅटर्जी यांनी मांडला आहे.
भौतिक सुखं माणसाला नेहमीच हवीहवीशी वाटतात, त्यातलं महत्त्वाचं सुख म्हणजे हक्काचा निवारा .. हा निवारा मिळेपर्यंत आयुष्यही आपल्या गतीनी सुरू असतं. आणि मग, या वेगात, आयुष्याच्या वळणावर सगळेच सुखद प्रसंग येतील हे माणूस गृहीत धरूनच पुढे पुढे जातो.. पण कधीतरी, एखाद्याच्या नशिबी काही निराळंच लिहून ठेवलेलं असतं.
अशीच कथा आरती (रेखा) आणि विकास चंदरा (विनोद मेहरा) या नवविवाहित जोडप्याची ..
दोघंही सुशिक्षित, चांगल्या घरातले..
विकासचं वडिलांशी पटत नसतं, अशातच आरतीच्या तो प्रेमात पडतो.. वडिलांना हा विवाह मान्य नसतो म्हणून विकास घर सोडून जातो. आरतीशी नोंदणी पद्धतीने विवाह करतो.. या साऱ्यात त्याचे ऑफीसचे सहकारी, बॉस त्याच्या पाठीशी असतात.
स्वाभिमानी विकासकडे लग्नानंतर रहायला घर नसतं तेव्हा थोडे दिवस त्याची सोय त्याच्या ऑफीसचे बॉस स्वतः परगावी जाणार असल्याने त्यांच्या बंगल्यावर करतात. मग ते परत आल्यावर विकास आरतीला भाड्याचं घर मिळेपर्यंत काही दिवस माहेरी सोडतो आणि स्वतः एका होस्टेलवर रहातो. पण नवविवाहित असल्याने एकमेकांची ओढ वाटणं तर स्वाभाविकच.. एकदा तो न रहावून आरतीचं मन वळवून तिला एका हॉटेलच्या रूमवर नेतो. नवरा बायको असूनही केवळ स्वतःचं घर नाही म्हणून औट घटकेच्या या रूममध्ये जायला आरती, तिच्या मनाविरूद्ध तयार होते.. पण हाय रे .. या हॉटेलमध्ये पोलिसांची धाड पडते आणि दोघांना पोलिस पकडून नेतात. आम्ही नवराबायको आहोत हे सांगूनही पोलिस विश्वास ठेवत नाहीत तेव्हा विकास आपल्या बॉसना बोलावतो आणि शेवटी दोघांची सुटका होते.
कदाचित पुढे घडणाऱ्या घटनेची चाहूलच या प्रसंगातून दिग्दर्शकाने दिली असावी..
कारण, या घटनेनंतर काहीच दिवसात त्यांना एक भाड्याचं घर मिळतं. नव्यानवलाईचे दिवस आयुष्यात आनंद पसरत असतात. अशातच एकदा विकास आरतीबरोबर लेट नाईट मूव्हीला जाण्याचा प्लॅन ठरवतो. तो ऑफीसमधून परस्पर थिएटरमध्ये येईल आणि आरती टॅक्सीने तिथे नियत वेळेत पोहोचेल असं ठरतं. दोघंही पोहोचतात, पिक्चर संपेस्तोर फार उशीर झालेला असतो .. घरी परतण्यासाठी दोघंही टॅक्सी शोधत असतात पण मिळत नसते. आणि अशातच तो भयंकर प्रसंग घडतो..
एका टॅक्सीतून चार गुंड, दारूडे तिथूनच जात असतात, त्यांची नजर या दोघांवर पडते आणि हाय रे ..पुढे गेलेली टॅक्सी पुन्हा मागे वळते आणि आरतीवर चौघेजण पाशवी बलात्कार करतात.. विकासवर हल्ला करतात आणि तो बेशुद्ध होतो ..
जे व्हायचं ते घडतं आणि भयंकर वळणावर आयुष्य येऊन थांबतं. आता दवाखान्यात आरतीवर उपचार सुरू होतात.. विकासलाही वैद्यकीय मदत मिळते आणि तो लवकर भानावर येतो. आरती शुद्धीवर येते खरी पण तिची जगण्याची इच्छाच मरून गेलेली असते. ती दोनदा आत्महत्येचा प्रयत्न करते पण कोणी ना कोणी तिला वेळीच थांबवतं. इकडे विकास अस्वस्थ असतो.. लोकांच्या नजरा त्याला घायाळ करत असतात, लोकांचे वाईटसाईट शब्दबाण तो रोजच झेलत असतो .. एव्हाना एवढ्या मोठ्या घटनेची न्यूज झालेली असते .. पोलीस, कोर्ट, न्यूजपेपर आणि लोक या सगळ्यांशी विकास एकटा झुंजत असतो. मधल्या काळात तर बिचारा चक्क दारूचे गुत्ते शोधत ते चौघं गुंड कुठे सापडले तर चांगला धडा शिकवू अशा हेतूने शहरभर वेड्यासारखा फिरतो आणि शेवटी एका ठिकाणी, आपण अशा दुष्ट शक्तींशी दोन हात करण्यास असमर्थ आहोत हे एका घटनेनंतर स्वीकारून काहीसा अपयशी मनोवस्थेत घरी परततो.. आणि इकडे आरती, ती आपल्या मनाशी, तिच्या घायाळ शरीराशी लढाई लढत असते.
विकासला ती हवी असते .. पण तिची स्वप्रतिमा डागाळलेली असते. अशा मनोवस्थेत ती घरी येते .. तो तिची वाट पहात असतो.. किंबहुना तो तिला दवाखान्यातून घरी आणण्यासाठी जाणार असतो पण डॉक्टर तिला अँब्युलन्सनी घरी पाठवून देतात. ती दारात उभी पाहून तो खूश होतो .. तुम आ गयी हो तो घर लग रहा है असं तो म्हणतो .. नंतर अनेक दिवस तो तिला अधिक प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. पण इथे ती चुकते.. तिला त्याच्या प्रेमात आता सहानुभूती दिसते .. आणि एका क्षणी ती त्याला म्हणते, मला सहानुभूती नकोय .. तुझं प्रेम खोटं आहे .. तो सांगायचा प्रयत्न करतो, अगं जे काही झालं ते फार वाईट झालं पण ती घटना घडून गेली, आता पुढे जायला हवं .. आपण दोघांनी .. तुझ्याइतकंच मीही या घटनेत पोळलो आहे गं .. पण तिला त्याचं दुःख समजण्यापेक्षा त्या क्षणी स्वतःचाच विचार योग्य वाटतो..
ती निघून जाते .. जाता जाता आठवणीने तिच्याजवळची घराची चावी घरात ठेऊन देते .. तो आता ठाम होतो .. जा तुला कुठे जायचं तिथे .. मी अडवणार नाही तुला ..असं म्हणून हा व्याकूळ क्षण सावरत तिथेच बसलेला असतो .. त्याची इच्छा नसते तिला जाऊ द्यावं पण आता तिचं तिला उमगेल अशी त्याची अपेक्षा असते .. तो म्हणून थांबतो, वाट पहातो .. पण ती जाते .. ती घरातून तिचं सामान घेऊन निघून जाते ..
ती गेल्यावर हा सैरभैर होतो ..अवघ्या काही क्षणात तिला परत आणण्यासाठी धावत सुटतो .. ती दिसत नाही .. पण त्याला अंदाज असतो .. तो रेल्वेस्टेशन गाठतो.. रेल्वे नुकतीच फलाटावरून निघालेली असते .. तो धावतो, रेल्वेचा पाठलाग करतो पण .. गाडी सुटते .. निघून जाते ..आता त्याच्या डोळ्यात पाणी तरळते .. तो वळतो.. गर्दीकडे बघतो आणि एका कोपऱ्यात आरती दिसते .. नजरानजर होते आणि दोघंही एकमेकांकडे धावतात ..
पिक्चर संपतो ..
आणि जाता जाता आपल्या मनात अनेक भावनांची गर्दी लोटते. घर म्हणजे काय हो.. तर जिथे नवरा बायकोच्या नात्यात एवढी खोली आहे, एवढं प्रेम आहे आणि नात्याची वीण एवढी भक्कम आहे की एकमेकांवर काहीही प्रसंग गुदरला तरीही साथ सुटत नाही ते घर ..
आणि नवरा बायकोचं नातं ..? आणि त्याहीपेक्षा नवरा ? तो तर किती समंजस, किती प्रेमळ आणि किती मोठ्या मनाचा..
केवळ शरीर म्हणजे स्त्री नाही हे ज्याला समजतं, ज्याला बायको म्हणजे उपभोगाची वस्तू वाटत नाही तर सहचरिणी वाटते, ज्याला तिचं मन हवंय असा असतो खरा नवरा.. जो तिची साथ सोडत नाही .. कदापि ..
अशा सर्व कंगोऱ्यांनी विनोद मेहरांनी रंगवलेला विकास हा इतका चपखल ठरलाय की तो आपल्याला आवडल्यावाचून रहात नाही. रेखाजींचा अभिनय, साधेपणा आणि सौंदर्य हे सगळं या चित्रपटातही उजवच आहे.
चित्रपटातली मधाळ गाणी तर अजरामर आहेतच.. आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे, आप की आखोंमे कुछ, तेरे बिना जिया जाएना ही सगळी गाणी चित्रपट गुंफत जातात.
मला सगळ्यात सरप्राईजिंग वाटलेलं एक गाण म्हणजे, फिर वही रात है .. कारण आजवर हे गाण इतक्या वेगळ्या मूडच वाटत होतं पण प्रत्यक्षात, आरती दवाखान्यातून जेव्हा घरी येते तेव्हा रात्री विकास हे गाणं म्हणतो असं चित्रपटात दाखवलंय .. फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाबकी, रातभर ख्वाबमें देखा करेंगे तुम्हे ..
हे गाणं अशा संदर्भाने असेल असा विचारही मी यापूर्वी केला नव्हता त्यामुळे हे गाणं लागलं तेव्हा मी चमकले.. तो विकास खरंच किती किती गोड म्हणायचा ना ..
तर असा हा चित्रपट .. एक वेगळीच कथा सशक्तपणे मांडणारा आणि आपल्याकडील अनेक नवऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ..
तुम्हीही वेळ काढून कधीतरी नक्की पहा ..


- मोहिनी घारपुरे-देशमुख


#मला_भावलेला_चित्रपट









(Photo credit - youtube)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Translate

Featured Post

अमलताश