शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

गृहप्रवेश



शांत, संथ गतीने सुरू असलेली एक कथा शेवटाकडे जाता जाता किती वळणदार आणि गतीमान होत जाते याचे उदाहरण म्हणजे गृहप्रवेश हा हिंदी चित्रपट .. 1979 साली आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य 
तर कथेची मुख्य पात्र रंगवणारे तीनच कलाकार.. संजीव कुमार, सारीका आणि शर्मीला टागोर..
 तसं पाहिलं तर कथा अगदी नेहमीचीच .. नवरा बायकोच्या सुखी संसारात आलेल्या तिसऱ्या व्यक्तिमुळे नात्यात येणारा तणाव .. पण तरीही या साध्याशा कथेलाच नवा आयाम देण्यात दिग्दर्शकाला यश आलं याचं कारण कथेचा संपूर्णतः निराळा दृष्टीकोण आणि निराळी सहज मांडणी.. 

लग्नानंतर बाई, गृहिणी झाली की ती तिच्यातील सौंदर्य विसरून जाते. सुंदरतेपेक्षा जबाबदारीच्या ओझ्याने अगदी निस्तेज होऊन जाते.. नवराही हळूहळू तसाच होत जातो... अशातच जर आर्थिक परिस्थितीही फार चांगली नसेल तर आणखीनच ओढाताण.. मग संसारगाडाच सर्वात जास्त महत्त्वाचा होतो आणि त्यापुढे आपल्या अस्तित्वाची, स्वप्नांची, स्वतःविषयीच्या कल्पनांची केव्हा माती होत जाते हे आपलं आपल्यालाही कळत नाही. रोज चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता नात्यातला रसदारपणा हरवत जातो. अशातच नवऱ्याच्या जीवनात एखादी नवयुवती  यावी आणि नवऱ्याने तिच्याकडे आकृष्ट व्हावे किंवा बायकोच्या आयुष्यात एखादा उमदा तरूण यावा आणि तिला त्याची भूल पडावी हे सहज शक्य आहे, पण तरीही अशा अवघड वाटांवरूनच नातं पुढच्या वळणावर न्यायचं असतं, स्वतःला सावरायचं तसंच पाय घसरलेल्या जोडीदाराली सावरायचं काम दोघांपैकी एकाने करायलाच हवं असतं नाहीतर घर कसं टिकणार, नाही का ..

अशीच काहीशी कथा होते अमर (संजीव कुमार) आणि मानसी (शर्मिला टागोर) यांच्या संसाराचीही..तो अगदी साधा नोकरदार मनुष्य आणि ती त्याची साधीशी बायको. लग्नानंतर ती दोघं भाड्याच्या घरात आपला संसार थाटतात. सुरूवातीपासूनच लहानसहान गोष्टींसाठी तिला तडजोड करावी लागत असते पण तिची तक्रार नसते. फक्त एकच स्वप्न असतं, स्वतःचं घर घ्यायचं... लग्नाला सात आठ वर्ष होतात तेव्हा तिची ही आंतरिक इच्छा फारच तीव्र व्हायला लागते.. तिला तिचं स्वतःचं घर हवं असतं. आणि तो ..तोपर्यंत तो त्याच्या चाकोरीत पूर्णतः अडकून गेलेला असतो. ती घराच्या चाकोरीत आणि तो त्याच्या चाकोरीत .. एव्हाना मुलगाही मोठा झालेला असतो.. शाळेत जात असतो .. वरवर पाहिलं तर सगळंच सुरळीत चालू असतं. अशातच त्याच्या ऑफीसमध्ये सपना (सारिका) टायपिस्ट म्हणून रूजू होते. ती फारच बोल्ड .. शिवाय स्वकेंद्री .. सतत लोकांनी आपल्याबद्दल बोलावं, आपलं तारूण्य न्याहाळावं, यासाठी मनोमनी धडपडणारी .. अर्थात ऐन वयात आलेल्या कोणाही मुलीला असंच वाटत असतं नाही का .. ते नैसर्गिकच .. त्यात चूक ते काय ..
पण त्यामुळे ऑफीसच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे वरीष्ठांच्या लक्षात येताच ते तिची रवानगी या बोअरींगशा अमरच्या केबिनमध्ये करतात. आणि अर्थातच सपना तिच्या तारूण्यसुलभ हलचालींनी त्याचं लक्ष वेधून घेत जाते.. सुरूवातीला भाव न देणारा तो हलकेच तिच्या प्रेमात पडत जातो. 
इकडे मानसी, घर शोधत असते .. तिला तिचं घर हवं असतं..आणि नवरा अमर दुसऱं घर करण्याच्या नादी लागलेला असतो.. 
शेवटी एकदा सपना त्याला लग्नाबद्दल विचारते आणि लवकर काय ते सांग असं ठणकावते.. तोही विचारात पडतो. बायकोला कसं सांगायचं .या विचाराने आलेली अस्वस्थता आणि नेमका तो रविवारचा दिवस .. रेडीओवर गाणं सुरू, बात निकलेगी तो फिर दूरतलक जाएगी .. आता सगळ्या कथानकाचा प्राण या दृष्यांपाशी एकवटतो .. संजीव कुमारची अस्वस्थता .. नवरा घरी असल्याने सुट्टीच्या दिवशीची नेहमीची कामं करत करत शर्मिलाचं घरातलं वावरणं .. तो तिला सांगायचा प्रयत्न करतो पण .. वेळ .. वेळच चुकत असते सारखी .. हा सगळा अभिनय  निव्वळ अप्रतिम .. होता होता रात्र होते .. आणि शेवटी बिछान्यात तो तिला म्हणतो, मै ... मै तुमसे प्यार नहीं करता .... 
या वाक्याने तिची रिएक्शन काय येईल असं आपल्याला वाटतं .. पण ती .. ती निव्वळ प्रश्नार्थक नजरेनी बघते .. विचारते .. जाणून घेते .. आणि एवढे दिवस हे सगळं सुरू होतं आणि आपल्याला कळलंही नाही याचं तिला आश्चर्य वाटतं .. 
आता तिला आलेली अस्वस्थता .. 
एकाच बिछान्यावर दोघेही असून आता त्यांच्यातलं नातंच गोठून गेलेलं असतं ..
रात्र सरते .. दिवस उजाडतो
ती मोठ्या हुशारीनं की हिंमतीनं त्याला म्हणते, आज तिला भेटायला आण घरी .. मला एकदा पाहू तर दे ती कोण आहे .. मी एवढी वर्ष आईसारखी तुझी काळजी घेतली आता किमान तू जिच्याशी लग्न करणार तिला मला या अधिकारानी भेटू तर दे .. ती विनवते .. तो नकार देतो .. ती म्हणते, सपना ने तुम्हे सिर्फ ऑफीसमें देखा है .. घर में नहीं .. तू घरात जसा असतोस ते तिने पाहिलं तर कदाचित तिला तू आवडणारही नाहीस .. म्हणजे मग तिला आणि तुला दोघांनाही तुमच्या भावना खऱ्या आहेत की नाहीत हे तपासायला मिळेल .. तो म्हणतो, बघेन .. तिला विचारून .. आली तर घेऊन येईन घरी ..
तो कामावर जातो आणि मुलगाही शाळेत जातो..
ही घरी एकटी .. 
काहीतरी विचारचक्र सुरू होतात .. आणि हळूहळू ठाम होत जाते.. 
घराच्या भिंती केव्हापासून घासून ठेवलेल्या असतात पण रंग द्यायला वेळच झालेला नसतो ... एका माणसाला बोलावते, आणखी चार माणसं घेऊन ये आणि चार वाजेच्या आत घराला रंग करून दे असं सांगते.. जसं काही तिला खात्री असते, सपना येणार .. नक्की येणार .. 
इकडे घराला रंगकाम सुरू होतं आणि तिकडे ही स्वतः चक्क ब्यूटीपार्लरमध्ये जाते.. स्वतः सुंदर दिसावी यासाठी काय काय करून घेते .. आणि मुलगा घरी येईपर्यंत घरी येते .. आता या क्षणी घराला रंग चढलेला असतो, तिला स्वतःला रंग चढलेला असतो .. ती आणि तिचं घर निव्वळ अप्रतिम दिसत असतात .. 
मुलगा येतो तर चक्रावून जातो .. घर पाहून .. आणि आईला पाहून म्हणतो, तुम बोहोत बुरी हो माँ .. तुम रोज ऐसी सुंदर क्यों नहीं रहती ..ती फक्त हसते ..
संध्याकाळी नवरा येतो आणि त्याची प्रेयसीही आलेली असते .. 
नवरा क्षणभर अवाक् होतो .. हे आपलंच घर आहे ना .. ही आपलीच बायको आहे ना .. असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर उभा रहातो .. क्षणभर .. आणि तो ते अवघडलेपण घेऊन आता वावरतो .. 
सपना तशीही बोल्डच .. 
एकंदरीतच शेवटचा प्रसंग ज्या पद्धतीने तिघांनीही वठवला आहे .. तो अफाटच म्हणायला हवा ..
एक गाठ बसणार असते आणि तितक्यात नेमका धागा हातात येतो आणि आपण क्षणार्धात सारा गुंता सोडवून टाकतो असा हा शेवटचा प्रसंग ..
काही वेळ त्याच्या घरात घालवल्यावर ती निघते .. त्याची बायको त्याला म्हणते, तिला एकटं जाऊ देऊ नकोस .. तू तिला सोडायला जा .. ती नको म्हणते पण मानसी आग्रह करते .. ती दोघं निघतात .. तो तिला सोडायला जातो .. थोड्याशा अंतरावर जाईपर्यंत त्याचं अवघडलेपण, अस्वस्थता आणि गोंधळ सारं सारं आणखी तीव्र होत जातं .. एका सिग्नलपाशी ती पोहोचतात .. सिग्नल लाल होतो .. ती पुढे निघून जाते आणि तो मागेच थांबतो ..
सर्वात शेवटच्या या सीनसाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क प्रेक्षक देऊन मोकळा होतो आणि विचारचक्र सुरू होऊन आपल्या मनाची पावलं पुन्हा आपल्या घरापाशी आपल्याला घेऊन येतात.

इतकं साधं कथानक पण संवाद आणि एकेका दृश्याच्या मांडणीतून चित्रपट एवढा मोठा अर्थ मांडून जातो की आपल्यासारखी संवेदनशील मंडळी आतून हलल्यावाचून रहात नाहीत. 
मला हा चित्रपट यातल्या गतीसाठी आवडला.. यातल्या दृश्यांसाठी, दिग्दर्शकांच्या मास्टरस्ट्रोक्ससाठी आवडला. शिवाय, बोलीये सुरीली बोलीया हे गाणं आणि लोगोंके घर में रहता हू हे गाणं .. बात निकलेगी ही जगजीतजींची गझल ... ही सगळी गाणी चित्रपटात इतकी सुंदर वाटतात की प्रेक्षक त्या चित्रपटात या गाण्यांमुळे सहजच अधिक गुंतत जातो ..

असे साधे सहज आणि आशयघन चित्रपट असंही मला नेहेमीच फार आवडतात. 
गृहप्रवेशही त्यातलाच एक चित्रपट ..

- मोहिनी घारपुरे - देशमुख 



२ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश