मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

रूई का बोझ


हा एक अत्यंत सुंदर चित्रपट आज योगायोगाने आणि यूट्यूबकृपेने पहायला मिळाला आणि मन भावविभोर झाले. असं म्हणतात, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, पण हे दुसरं बालपण तितक्याच कौतुकाने साजरं मात्र होत नाही. कारण म्हाताऱ्या माणसांचा अनेक घरांमध्ये रागराग केला जातो. त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांच्या वस्तू, रहाणीमान, त्यांच्यावर होणारा खर्च अगदी कोणतंही निमित्त या कटकटीसाठी पुरतं. अनेक कृतघ्न मुलं तर आपल्या आईवडीलांना अशा उतारवयात मारझोड करतात, अक्षरशः हाकलून देतात .. अशा घटना ऐकून आपल्यासारख्या संवेदनशील लोकांचा बांध फुटल्यावाचून रहात नाही.
तर, असंच काहीसं कथानक घेऊन रूई का बोझ हा चित्रपट समोर आला. पंकज कपूर, रिमा लागू आणि रघुवीर यादव या जातीवंत अभिनेत्यांनी या चित्रपटाचं अक्षरशः सोनं केलं आहे. 1997 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चंद्र किशोर जैसवाल यांच्या गवाह गैरहाजिर या कादंबरीवर आधारित आहे. सुभाष अग्रवाल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाची कथा अगदी प्रेडीक्टेबल आहे पण तरीही ती ज्या सुंदर पद्धतीने अभिनीत करून मांडली गेली आहे त्यामुळे चित्रपटाचा दर्जाची उंची फार फार वाढते.
एका खेड्यातलं किसन सहानी (पंकज कपूर) या ज्येष्ठाचं कुटुंब. त्याची तीन मुलं आणि तीन सुना .. दरदिवसाआड काही ना काही कारणावरून घरात होणारे तिन्ही सुनांचे वाद पहाता एके दिवशी तो तिघाही मुलांना समोरासमोर बसवतो आणि वाटणी करून टाकतो. आपण कोणाबरोबर रहायचं हा निर्णय मुलांवर सोपवून देतो. मुलही एकमताने वडीलांनी लहान मुलाबरोबर राहावं कारण त्याला अजून वडीलांची गरज आहे असा निर्णय देतात. लहान मुलगा (रघुवीर यादव) आणि वडील दोघंही खूश होतात.. ही धाकटी सून (रीमा लागू) देखील खूशच असते.. सगळं कसं छान वाटतं.. पण प्रत्यक्षात सगळी घडी बिघडतेच..
काही चूक वडीलांची आणि काही चूक मुलगा, सून आणि नातवंडांची ..
सून काहीशी रागीट, स्वार्थी आणि लोभी तर मुलगा भोळा आणि थोडाफार सुनेच्या आहारी गेलेला..
नातवंड प्रेमळ पण काहीशी उद्धट आणि आगाऊ ..
आणि म्हातारा आडमुठा .. शिवाय चार पावसाळे जास्तच पाहिलेला असल्याने सगळ्यांचे बरेवाईट हेतू मनात ओळखून अधिकच डिवचलेला, आणि उतारवयाने शरीराने हळूहळू साथ सोडल्याने काहीसा अगतिक झालेला..
आता ही अशी परिस्थिती म्हणजे घरात सतत काय काय नाट्य घडत असणार हे तुमच्याही लक्षात आलंच असेल.. हेच नाट्य पंकज कपूर आणि रीमा यांनी एवढं जबरदस्त दाखवलं आहे की लहानसहान प्रसंगही आपल्याला चटका लावून जातात.
एकीकडे आदर दाखवत दुसरीकडे लोभी वृत्तीने वागणारी सून रीमाजींनी अप्रतिम वठवली आहे. दिवसभर घरात सासरे आणि सून व नातवंड .. मग लहानसहान कामं, जसं भाजी आणून देणं, हरवलेल्या बकरीला शोधून आणणं, घरातल्या वरच्या कामांची अपेक्षा सासऱ्याकडून .. सासराही चांगलाच खमका आणि काहीसा लहरी... सूनेनी भेंड्या सांगितल्या तर यांनी लक्षात न राहिल्याने वांगी आणणं, हरवलेली बकरी शोधायला गेला आणि भलतीच कोणाची बकरी पकडून आणली, दारावर पकोडेवाले आला तर लगेच गरमगरम पकोडे घेऊन खाणं असे अनेक प्रसंग मुख्य कथानकाला पूरक ठरतात..
पंकज कपूरनी तर हा अभिनय इतका अप्रतिम वठवला आहे की म्हाताऱ्या माणसांची व्यथा, त्यांना येणाऱ्या लहानसहान अडचणी आणि त्यांना जाणवणारा कुटुंबीयांचा स्वार्थ हे सारं प्रेक्षकांना जाणवल्यावाचून रहात नाही.
एकदा तर किसनजींना अंथरूणातच लघुशंका होते, बिचारे अपरात्री उठून ती चादर धुऊन वाळत टाकतात, तोच सुनेचं लक्ष जातं.. ती ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने मुलाला सांगते .. आणि त्याला वडीलांविषयी तिटकारा वाटून जातो. आणखी एका दृश्यात, किसनजींना घरात बनलेली मक्के दी रोटी जेवायला हवी असते म्हणून ते मागतात .. तर सून कसली जहांबाज .. चक्क त्यांना मक्के दी रोटी खायला नाही म्हणते, सासराही हट्टी .. सूनही हट्टी .. ती नातवंडाकरवी सासऱ्याला दहीभाताचं ताट पाठवून देते. सासऱ्याचा विरस होतो, तो ते ताट खोलीत तसंच ठेवतो आणि झोपून जातो .. तर त्या वासाने रात्री मांजर तिथे घुटमळायला लागते.. त्यामुळे वैतागलेला सासरा पुन्हा उठून ते ताट स्वयंपाकखेलीत नेऊन ठेवतो.. सकाळी सून उठते आणि तिला ते झाकलेलं अन्न दिसतं.. तिला राग येतो.. एकीकडे बडबडत, की आता जर हे न जेवल्याने मेले तर मलाच हा दोष लागणार, लोक मलाच नावं ठेवणार .. असं म्हणत कामाला लागते.. तिकडे सासरा नेहमीची वेळ होऊन गेली तरी झोपलेला .. नातू जातो, आजोबा उठा म्हणून हाका मारतो पण काहीच हालचाल होत नाही. नातू धावत जाऊन आईला आणि भावंडांना सांगतो की आजोबा देवाघरी गेले.. सूनेच्या डोळ्याच टचकन पाणी येते ती धावत जाते..नातवंड धावतात आणि आजोबांना हलवतात .. सेकंदभर काहीच हालचाल होत नाही, आपल्याला वाटतं, गेले वाटतं किसनजी .. पण, तितक्यात डोळे चोळत किसनजी उठतात आणि इकडे सूनेच्या मनातला त्यांच्याबद्दलचा राग पुन्हा मनातून उफाळून येतो.
एकेक सीन अत्यंत बोलका, अत्यंत स्पष्ट..
त्यांचे एक मित्र नेहेमी त्यांना येऊन सुनेशी मुलाशी जुळवून घे आणि गोडीत रहा असा सल्ला देतात, याचे ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न करतात पण म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा .. अगदी तशीच या म्हाताऱ्याची कथा असते.
चित्रपटात नातवंडही ज्या पद्धतीने वागतात, आणि हा खट म्हाताराही ज्या पद्धतीने वागतो ती दृश्य फार बोलकी आहेत.
शेवटी, एकदा सून मुलाला लक्षात आणून देते, की सासऱ्यांच्या खोलीत फार दुर्गंधी येते कारण ते तिथेच कोपऱ्यात जमीनीवर बहुधा लघुशंकेला बसतात.. आपण त्यांना मागच्या अडगळीच्या खोलीत आता ठेऊया असं सुनेचं मुलाचं ठरतं.. पण म्हाताऱ्याला ते मान्य कसं होणार, तो नकारच देतो .. हे ऐकून मुलगा चिडतो आणि म्हाताऱ्या बापाशी भांडतो.. गाव गोळा होतं.. वडील मुलावर हात उचलतात आणि आता या मोठ्या झालेल्या मुलालाही तितकाच राग येतो, मुलगा रागाच्या भरात वडीलांना धक्का देतो .. म्हातारा कोलमडून खाली पडतो.. गावकरी शेपूट घालून पळतात.. सून नातवंड घरातच लपून रहातात, मुलगा रागात निघून जातो .. पडलेल्या म्हाताऱ्याला उचलायलाही कोणी येत नाही.. शेवटी थोड्यावेळाने हतबल म्हाताऱ्याला शुद्ध येते.. एकटाच उठतो आणि गुमान मुलगा म्हणत होता त्या अडगळीच्या खोलीत जातो ..
दुसऱ्याच दिवशी ठरवतो, आता येथे रहायचं नाही. बैलगाडीवाल्याला निरोप धाडतो आणि गावापासून काही अंतरावर असलेल्या देवस्थळी जायला निघतो.. कायमचं.. आता मुलाला सुनेला आपली चूक लक्षात आलेली असते खरी पण वडीलांचा स्वभाव माहीत असतो.. म्हणून त्यांना ते थांबवत नाहीत .. दोन दिवसांनी जाऊन त्यांना घेऊन येऊ असं ठरवतात. सूनही कबूल होते, की आपण स्वार्थीपणे वागलो, आपण लोभी झालो होतो .. आता सासरे रहाणार नाहीत तर आपल्या घराची मूळंच (घर की नीव) हरवली असं तिला वाटायला लागतं..
इकडे सासरा निघतो, मजल दरमजल करत बरच अंतर बैलगाडीवाला जातो .. तेव्हा सासऱा एकटा मागे बसलेला, विचारचक्र सुरू होतं .. मित्रांची बोलणी, समजावणं आठवायला लागलेलं असतं .. काही झालं तरी आपण एकटे आता त्या अज्ञात ठिकाणी काय करायचं , त्यापेक्षा कसे का असेना आपले नातू, सुना आपल्याबरोबर तर होते असं वाटायला लागतं.. एकदा हळूच तो गाडीवाल्याला चल परत जाऊ असं म्हणतोही.. पण ते गाडीवाल्याला ऐकू जात नाही.. आता काही अतंरावरच देवस्थान आलेलं असतं पण मधे नदी लागते.. गाडीवाला म्हणतो, थांबा मी नदीतून रस्ता नेमका कुठून आहे ते पाहून येतो .. रस्ता सापडतो आणि इकडे, सासऱ्यालाही मनातला आवाज स्पष्ट ऐकू येतो.. परत फिरावं हाच रस्ता त्याला योग्य वाटतो आणि तत्क्षणी गाडीवाल्याला तो हुकूम सोडतो .. म्हणतो, अरे .. ही नदी ओलांडून वगैरे कशाला जायचं त्या देवस्थळी.. त्यापेक्षा चल, पुन्हा घरी जाऊया .. आपल्या माणसांजवळ राहीन मी .. आणि गाडी परत फिरते... घराच्या दिशेने..
चित्रपट संपतो .. आणि आपल्याला हायसं वाटतं..
यानिमित्तानी, घराघरातल्या ज्येष्ठांचे प्रश्न इतके थेट मांडले आहेत. शिवाय एक इतकी सुंदर कलाकृती आपण पहातो की मनोरंजनाबरोबरच बरंच काही आपल्याला गवसतं.
म्हातारपण सगळ्यांनाच येतं हे प्रत्येकानेच लक्षात ठेवायला हवं.. त्यामुळे आपल्या घरातल्या ज्येष्ठांना मान आणि प्रेम द्या, त्यांच्या लहानसहान इच्छा वेळीच पूर्ण करा, त्यातच आपला आनंद आहे हे इथे शेवटाकडे जाताना आपल्याला उमगल्या वाचून रहात नाही.
शेवटी, म्हातारा बाप म्हणजे कापसाच्या ओझ्याप्रमाणेच .. सुरूवातीला जड वाटत नाही पण नंतर म्हाताऱ्या बापाचा स्वभाव ओल्या कापसाप्रमाणेच आडमुठा होत जातो आणि मग त्याला सांभाळणं मुलासाठी दिवसेंदिवस जड होत जातं.. म्हणूनच कोणीही मुलगा म्हाताऱ्या माणसाला सांभाळायला पुढे येत नाही... हरकोई बस फेक देना चाहता है .. अशी वास्तव स्थिती चित्रपटाच्या नावातूनच मांडली आहे ती आजघडीला खरी ठरते आहे हे दुर्दैवच ..


- मोहिनी घारपुरे-देशमुख


#मला_भावलेला_सिनेमा









२ टिप्पण्या:

Translate

Featured Post

अमलताश