किती छोटीशी कथा, किती मोठासा आशय .. किती भावपूर्ण आणि किती मोहकतेने मांडलेलं कथानक ..
सावत्र विधूर मुलगा, त्याच्याशी होणारा दुजाभाव, त्याची दुसरी बायको (कथेची नायिका) तिच्या पूर्वायुष्यात अल्लड आणि दुसऱ्याच कुठल्यातरी मुलाच्या प्रेमात पडलेली .. परिस्थितीमुळे लग्न नायकाशी होतं आणि मिळालेला स्वामी खऱ्या अर्थानी तिचा जीवनसोबती ठरतो. किती साधा नायक गिरीश कर्नाड यांनी उभा केलाय.. साधेसहज संवाद पण किती अर्थपूर्ण आशय मांडत जातात.
हा चित्रपट एक नवा विचार घेऊन आला. चित्रपटाची नायिका, मिनी (शबाना आझमी) चित्रपटाच्या शेवटी जे म्हणते ते खरंच प्रत्येक माणसाने शिकायला हवं असंच आहे, दया, क्षमा आणि शांती हे शब्द पुस्तकातच वाचले आहेत पण परस्पर व्यवहारात या शब्दांचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे या शब्दांचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतरच तुम्ही जाणू शकता .. हा तो विचार ..
शिक्षणाने माणूस समृद्ध होतो पण व्यवहारात शिक्षणाबरोबरच मोठं मन आणि चांगल्या भावना यांची गरज असते. बरेचदा शिकलेली माणसं आपल्या ज्ञानाच्या अहंकारात हे विसरून जातात. आपणच मोठे हा भ्रम होतो आणि त्या भरात कधीच पाय जमिनीवरून घसरून जातात. माणूस म्हणून आपण किती थिटे आहोत हे अशा वेळी एखादा साधासा माणूसही आपल्यासमोर त्याच्या कृतीतून दर्शवून देतो.
चित्रपटाचं मूळ कथानक भारतीय संस्कृतीचं रूप दर्शवणारं .. भारतातील विवाहसंस्थेनुसार स्त्रीसाठी तिच्या नवऱ्याचं घरच तिचं घर.. आणि जिला नवऱ्याचा भक्कम आधार तिला कोणा दुसऱ्याचं मिंधेपण घ्यायची वेळ येत नाही. पण म्हणूनच हा नवरा मुळात कसा असावा हे स्वामी चित्रपटातला नायक आपल्याला दाखवून जातो.
सच्चे मनसे माफी माँगने के बाद गुन्हा, गुन्हा नहीं रेह जाता
एवढा मोठा व्यापक विचार करणारा माणूस जेव्हा नवरा म्हणून मिळतो तेव्हा त्याच्या सहवासात थोडेच दिवस राहिलेली कथेची नायिकाही माणूस म्हणून चार पायऱ्या आपोआपच वर चढते.
चित्रपटाच्या शेवटी तिचा प्रियकर तिच्या घरी येतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि घरच्यांसमोर हे सगळं उघड होतं.. नवऱ्याच्या कानावर गोष्ट जाते पण तरीही तो हलत नाही, स्थिरबुद्धी ठेवतो.. सासू वाट्टेल ते बोलत असते तेव्हा शेवटी नायिकेकडूनही रागाच्या भरात सासूला बोललं जातं, तेव्हा शांतपणे तो म्हणतो, तुला जायचं असेल तर जा पण तुला आईची माफी मागूनच जावं लागेल.. त्याची आई खरंतर सावत्र, शिवाय ही जाणार असेल तर दागिने ठेऊन जा म्हणून त्याच्यामागे तगादा लावते... नायिकेच्या कानावर ते शब्द पडतात, तिरीमिरीत ती सगळे दागिने घरात फेकते, नवरा घरातून शांतपणे निघून जातो.. ती तरातरा बॅग भरते आणि चक्क प्रियकराबरोबर निघून जाते, माफी वगैरेचा तर प्रश्नच उरत नाही .. रेल्वेस्टेशनवर रेल्वेची वाट पहात असताना ती शांत बसते आणि तिला आपली चूक लक्षात येते .. पतीचे शब्द आठवतात, जराजरासी बात पर इतना गुस्सा नही होते, माफ करनेके बाद गुन्हा गुन्हा नहीं रेह जाता, जिसे अपना सबकुछ दे दिया हो उसे कुछ और देकर ही तो खुश किया जा सकता है ... त्याची एकेक वाक्य आठवतात आणि तिला मनोमनी जाणवत रहातं, खरंच आपला पती किती श्रेष्ठ दर्जाचा माणूस आहे .. आता रेल्वेची घंटा झालेली असते, प्रियकर तिला म्हणतो, आता तुला एकच मार्ग आहे, तू थोडे दिवस आईकडे रहा आणि मग मी तुला घ्यायला येईन, मग माझ्या घरी जाऊया .. ती अचानक म्हणते, मला वाटतंय मी माझं घर सोडून तुझ्याबरोबर यायला निघाले ती चूक केलीये .. प्रियकर म्हणतो, पण मला नाही वाटत तुझा नवरा तुला आता परत त्या घरात घेईल ..
आता रेल्वे येते, प्रियकर सामान चढवण्यामागे लागतो .. ही विषण्ण बसलेली पण इतक्यात कथेचा नायक, हिचा पती साक्षात समोर उभा रहातो .. ती बघतच रहाते.. तो तिला म्हणतो, चल .. घरी चल, एका बाईला तिच्या पतीच्या घराशिवाय अन्य जागा नाहीये ..
आता ती निःशब्द होते .. आणि पुढचच वाक्य तो म्हणतो, मी आईला तुझ्या या प्रियकराबद्दल समज दिली आहे .. मलाही तर सगळं आधीच माहीत होतं .. तुझ्या मामांनी मला सगळं सांगितलं होतं
आणि त्याच्या या उद्गारांनी तिचा बांध फुटतो .. खरंच सगळं माहीत असूनही त्याची पुसटशीही जाणीव या माणसाने आपल्याला होऊ दिली नाही .. किती उदात्त, किती श्रेष्ठ .. खऱ्या अर्थानी नरोत्तम असा हा आपला स्वामी ..
आणि क्षणार्धात ती त्याचा हात धरून पुन्हा त्याच्या मागे परत आपल्या घराच्या रस्त्याने निघते ..
चित्रपट संपतो आणि जाता जाता आपल्या मनाची कवाडं उघडून जातो.
भारतात अलिकडे बायकांनी कसं वागावं, कसं बोलावं याविषयी सतत चर्चा झडत असताना, पुरूषांनी कसं असावं आणि स्त्रीची कशी साथ द्यावी हे खरंतर हा चित्रपट सांगून जातो असं मला वाटलं.
ज्या नवऱ्यासाठी बायका त्यांच घरदार, शहर, देश, बालपण, मायबाप, सखेसोबती, खरंतर आपला सारा भूतकाळच सोडून येतात त्या नवऱ्याने स्वतः माणूस म्हणून स्वतःला किती अर्थपूर्ण घडवलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी चित्रपटातील गिरीश कर्नाड यांनी रेखाटलेला नायक ..
हा चित्रपट स्त्रीने कसं असावं यासाठी पाहूच नये तर पुरूषाने कसं असावं हे समजून घेण्यासाठी पहावा असं मी जाता जाता नक्की सांगेन..!
- मोहिनी घारपुरे - देशमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा