बुधवार, २५ मार्च, २०२०

'कोरोना सुट्टी ? '.. अरे ही तर ' कर के देखोना ! सुट्टी '


कोरोनामुळे अचानक शाळेला सुट्टी मिळाली आणि माझ्या घरी मात्र


आनंदीआनंद जाहला. याचं कारण, मला स्वतःला अकॅडेमिक्सपेक्षा एक्स्ट्राकरिक्युलर एक्टीव्हीटीजमध्ये खूपच रस आहे.. अगदी बालपणापासून. शाळेतही नाच, गाणं, वक्तृत्व, कथाकथन, उन्हाळी शिबीरं या सगळ्यात मी अग्रणी असायचेच आणि त्यामुळेच त्याचा पुरेपूर वापर मला स्वतःच्या आयुष्यात करता आला, मुख्य म्हणजे, सतत कल्पकतेने विचार करण्याची सवय लागली आणि वेळेचा सदुपयोग करत मल्टीटास्कींग करण्याचीच जीवनशैली आपसूकच अंगिकारली गेली. म्हणूनच, माझ्या मुलीला, निहीराला अचानक सुट्टी मिळाली तर क्षणभर जरी मला बिचकायला झालं तरीही दुसरीकडे मी तिच्या आणि माझ्या या वेळेत काय काय करता येईल याचाही विचार करू शकले.
पहिल्या दिवशी तिनं स्वतःहूनच, "आई .. मला तू आज काहीतरी कुकींग करायला शिकव ना !" असा लडीवाळ हट्ट सुरू केला. माझी मुलगी अवघी पाच वर्षाची आहे, त्यामुळे या अशा गोड हट्टाचं मला खरंच खूप कौतुक वाटलं. मग मी तिला मस्त कपात फेटून केलेली कोल्ड कॉफी बनवायला लागली. अर्थातच्, थोडंसं तिला शिकवायचं आणि तिची मदत करत ते काम पूर्ण करायचं अशा पद्धतीने मी नेहमीच तिच्याशी वागते. त्यामुळे कोल्ड कॉफीचा टास्कही असाच पूर्ण झाला. कोल्ड कॉफी बनवली आणि मस्तपैकी चॉकलेट पावडर भुरभुरवून तिला एखाद्या पदार्थाचं गार्निशिंगही शिकवलं. आता सुट्टीत, असेच कोल्ड कुकींग अंतर्गत अनेक पदार्थ शिकवणार आहे.
आमच्याकडे एक 'गुड मॅनर्स बॅड मॅनर्स'ची सापशिडी आहे तो खेळ तर दिवसभरात कधीही तिच्या इच्छेनी आम्ही मायलेकी खेळतोय.
या सुट्टीत आणखी एक महत्त्वाचा टास्क मनावर घेतला, किंबहुना मला तो सुचला आणि मी लगेच अमलात आणला. तो म्हणजे, तिला डॉक्टरांचं प्रिस्कीप्शन वाचायला शिकवलं. तिला अजून वाचता येत नाही, पण अक्षर ओळख आहे. त्यामुळे औषधांच्या स्ट्रीपवरील नावाचं स्पेलिंग आणि प्रिस्क्रीप्शन वर दिलेलं स्पेलिंग मॅच करून योग्य औषध निवडणं, तो देण्याचं प्रमाण आणि वेळ काय व कशी असते, चुकीचं औषध दिलं गेल्यास रूग्णाचं कसं नुकसान होऊ शकतं हे तिला समजावलं. हे समजावत असतानाच, आणखी एक उपक्रम सुचला तो म्हणजे, अवघड शब्दांचा उच्चार करायला शिकवणे आणि एकाच शब्दाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश प्रतिशब्द काय आहेत त्याची तिला माहिती देत गेले. जसं की 'डॉक्टरांची चिठ्ठी' तिला इंग्लिशमध्ये 'प्रिस्क्रीप्शन' म्हणतात. मग आणखी असे बरेच अवघड शब्द ज्याचा उच्चार करणं तिच्यासाठी या वयात कठीण असू शकतं ते तिला ओघाने शिकवले आणि त्यांचे प्रतिशब्द शिकवले.. जसं, रेफ्रिजरेटर म्हणजे शीतगृह , थर्मामीटर म्हणजे तापमापक, टेलिव्हीजनवरून दृश्य टेलिकास्ट होतं त्यालाच मराठीत प्रक्षेपण असं म्हणतात, रेडीओवरून बातम्या ब्रॉडकास्ट होतात त्याला ध्वनिक्षेपण म्हणतात असं तिला सांगितलं. आता हे सगळे शब्द लहान मुलांसाठी उच्चाराला कठीण आणि गोंधळात पाडणारेही, त्यामुळे येता जाता त्या शब्दांची उजळणी करणे सुरू असते. शिवाय, उच्चार आणि शब्द यांत गोंधळ झाला की खदखदून हसू येतं त्याची मजा तर काही औरच..
गेल्या सुट्टीत आजोळी जाऊन आलो होतो तेव्हा निहीराने आजोबांना देवांची पूजा करताना पाहिलं होतं. एरवी शाळेच्या सकाळच्या गडबडीत तिला साप्ताहीक सुट्टीच्याच दिवशी फक्त पूजा करायला वेळ मिळायचा आणि तेही ती लहान असल्याने, तिला मूड असेल तरच .. कारण, आमची त्यासाठी तिच्यावर सक्ती नाही. पण, या सुट्टीत ती रोज उठल्यावर छान तयार होऊन देवपूजा करायला अधेमधे बसतेय. त्यासाठी माझ्याकडून छान तयारी करून घेते आणि मनोभावे आरती वगैरेही करते ते पाहून खूपच कौतुक वाटतं. मुख्य म्हणजे, तिला स्वतःला देवपूजा करताना आनंद मिळतो हे महत्त्वाचं.
बाकी वेळात, मी तिला हार्मोनियम शिकवतेय, यूट्यूबर ताल लावून एखाद-दोन रागातल्या छोट्या बंदीशीही शिकवल्या आहेत. एकदा तर असं केलं, की, तिला माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या निरनिराळ्या वाद्यसंगीताच्या छोट्या छोट्या क्लिप्स ऐकवल्या. मग त्यांचा आवाज, त्यांचं नाव आणि गुगलवरून त्या वाद्याचा फोटो दाखवला. आता तिला सतार, तबला, सरोद, सारंगी, गिटार, संतूर एवढ्या वाद्यांची तोंडओळख यानिमित्ताने झाली. मग मध्येच खेळताखेळता, ती मला विचारते, " ए आई, आपण तो आवाज ओळखायचा खेळ खेळूया का गं.. ?" मग मी कितीही कामात असले तरीही ते करता करताच मला तिच्याशी हा खेळ खेळता येतो. आता अशाच पद्धतीने तिला निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, त्यांचे फोटोज दाखवणार आहे. फेसबुकवर बरेच माझ्या मित्रयादीतले फोटोग्राफर त्यांचे फोटोज अपलोड करत असतात, त्यापैकी निसर्गाचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे फोटोज मी हमखास तिला दाखवते. यामुळे ती आपोआपच निसर्गाविषयी शिकतेय आणि कला विषयातील सुद्धा ज्ञान तिचा मेंदू आपसूकच मिळवतोय. अलिकडे आपल्या रूटीनमध्ये आपण साधं आकाशाकडेही निवांत पहायला विसरलो आहोत.. पण आम्ही किमान सकाळचा कोवळा सूर्य आणि रात्रीचा प्रसन्न चंद्र, चमचमणाऱ्या चांदण्या आवर्जून दोन क्षण काढून का होईना बघतो.. तिलाही दाखवतो.

एका सुट्टीत आम्ही तिघांनी मिळून बनवलेलं डॉलहाऊस
एवढं सगळं करूनही वेळ उरतोच त्यावेळात आम्ही पुस्तकं वाचतो. शिवाय, गोष्ट तयार करतो... गोष्ट तयार करणं हा देखील एक मोठा रंजक खेळ आहे बरं का. म्हणजे, आपल्यासमोर ज्या वस्तू असतील त्यांचा समावेश करून गोष्ट तयार करायची. उदाहरणार्थ, मी आणि ती खाली लॉनवर खेळायला गेल्यावर तिथल्या बाकावर बसतो, मग समोरची कोणतीही दोन ऑब्जेक्ट निवडतो. त्यात कधी एखादं झाड असतं, तर कधी एखादा पथदीप, कधी एखादी गाडी किंवा कधी एखादं श्वान .. मग आम्ही दोघीच असल्याने कोण कोणतं कॅरेक्टर ते ठरवून घेतो.. आणि मग, जणू आम्ही ती कॅरेक्टर्स आहोत असा विचार करून, एकमेकींशी संवाद बोलतो. जसं, समजा, मी गाडी आणि निहीरा झाड असं ठरलं, तर मग, तिने झाड बनून गाडीशी (म्हणजे माझ्याशी) गप्पा मारायच्या.

झाड (निहीरा) - "ए गाडी .. तू सारखी माझ्या जवळच का उभी असतेस..?"

गाडी (मी) - "अरे, मला तुझी सावली आवडते.. तुझ्यामुळेच तर मला उन्हाची झळ लागत नाही..!"

असे छोटे छोटे डायलॉग बोलत तिला एका एका वस्तूचं महत्त्व सांगण्याचा मी प्रयत्न करते आणि मुख्य म्हणजे ती देखील अशावेळी खूप तर्कशुद्ध विचार करून, तिची छोटी छोटी निरीक्षणं, तिचे अनुभव माझ्याशी शेअर करते. या खेळाचा खूप फायदा अशा दृष्टीने होतो की जेव्हा मुलं त्यांच्या बालबुद्धीने एखादा डायलॉग रचून बोलतात तेव्हा आपल्याला त्यांच्या मनातली खळबळ स्पष्ट कळते.. आणि आपण त्यांना अप्रत्यक्षपणे त्यांच्या मनातील शंकेबाबत मार्गदर्शन करत योग्य रस्ता दाखवू शकतो. शिवाय, मुलं आपोआपच डायलॉग रायटींग व्हर्बली शिकतात आणि आपल्या विचारांची तर्कशुद्ध मांडणी करायला त्यांना हळूहळू जमायला लागते.
मला वाटतं, मुलांना सतत फक्त उपदेशाचे घुटके आणि संस्कार संस्कार करत सतत सकारात्मक काहीतरी सांगत रहाण्यापेक्षा या माध्यमातून घडवणं खूप सोपं तर आहेच आणि जीवनाच्या खूप जवळ नेणारं, खूप खूप रंजक असं आहे.
मध्यंतरी, मी तिला माझ्या लहानपणीच्या बालभारतीच्या कविता रोज म्हणून दाखवायचे. आता ही एक्टीव्हीटी देखील कोरोना सुट्टीत रिपीट होईल. विशेष म्हणजे, यामुळेच माझ्याही कविता तिला ऐकण्याची उत्सुकता असते. "सांग ना आई, तू कोणती कविता लिहीलीस.. ?" किंवा "तुझी ती अमुक एक कथा मला ऐकायचीये.. प्लीज वाचून दाखव नं!" अशीही मागणी तिच्याकडून होते आणि ज्याचं मला विशेष कौतुक वाटतं.
बाकी, मेंदी काढणं, रांगोळी काढणं, चित्र रंगवणं, टॅटू करणं, डीआयवायच्या वस्तू बनवून पहाणं, पत्त्यांचा बंगला बांधण्याचा प्रयत्न करणं, पक्षी निरीक्षण करायला आवर्जून जाणं हे सगळं सगळं एरवीही माझ्या घरी सुरूच असतं.. ते तसं या सुट्टीतही आलटून पालटून सुरू आहेच.
शिवाय, एरवीही मी घरात तिच्याशी खूप बोलते, म्हणजे, माझ्या कामाविषयी, एखादा पदार्थ केला तर तो कसा केला, तो करताना माझं काय चुकलं, माझं आणि बाबाचं एखाद्या विषयावर ठरलेलं काही प्लॅनिंग असेल तर हे सगळं मी तिच्याशी आवर्जून येताजाता बोलत असते आणि तीही माझ्याशी तिच्या गंमतीजमती, कविता, कृतींसह म्हणून दाखवणं असं सगळं सांगत असतेच, त्यामुळे आमच्या घरी गप्पाष्टक तर सुरूच असतं. अधेमधे घरी डोरेमॉन, डोरेमी, नॉमिता आणि शिनचॅन येत जात असतात पण थोडाच वेळ हं !!
सकाळी मी घरकामाच्या गडबडीत असते तेव्हा या सुट्टीत बाबा आणि निहूला छान एकत्र वेळ मिळतोय. त्यामुळे तो तिला वर्तमानपत्रातील बातम्यांचे मथळे वाचायला शिकवतोय. नुकतीच अक्षर ओळख शिकत असल्याने निहूला ते वाचन, अडखळत अडखळत का होईना पण करताना आनंदच मिळतोय हे तिनंच, " आई, मी आत्ता रोज पेपर वाचणार आहे" असं तिच्या बोबड्या बोलात जाहीर करून आमच्यापर्यंत पोहोचवलंय हेही नसे थोडके ! संध्याकाळी बाबा ऑफीसमधून घरी आला की मग फक्त मस्ती आणि मस्तीच असते. किंवा एखादी छोटी चक्कर मारायला जातो. मग दिवसभर काय काय केलं याचा जमेल तसा आणि आठवेल तितका सारांश निहीरा बाबाला सांगते.
मुख्य म्हणजे, सतत नव्या नव्या कल्पना मला सुचत असतात, त्यामुळे आमच्या घरी ही ' कोरोना सुट्टी' म्हणजे .. ' कर के देखोना ' वाली सुट्टीच आम्ही जणू साजरी करतोय.

- मोहिनी घारपुरे - देशमुख


माझ्या या उपक्रमांची महाराष्ट्र टाईम्स, नाशिकने घेतलेली दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार ) 



..............
तुमच्यासाठीही या काही आयडीयाज मला शेअर करायला जरूर आवडतील - 
1. भाषासमृद्धीसाठी शब्दकोडी सगळे कुटुंबीय मिळून सोडवता येतील.

2. डिक्शनरी वाचून अर्थ पाठ करायला लावता येतील. रोज ठरवून दहा शब्द अशा पद्धतीने स्मरणशक्तीही वाढवता येईल, तसेच वळणही लागेल.

3. स्तोत्र मंत्र याचं मुलांच्या मानसिक शांततेसाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मुलांना या सुट्टीत आवर्जून लहान लहान स्तोत्र शिकवू शकता.

4. गप्पा मारा, पुस्तकं वाचा, घरातले खेळ खेळा. चल्लस, पत्ते, सापशिडी वगैरे खेळता येतील.

5. फुलांच्या माळा करणं, फळांचे सॅलड्स करणं वगैरे शिकवता येईल.

6. यूट्यूबचा वापर करून मुलांना परिकथा दाखवा, गाणी ऐकू द्या.

7. चक्कपैकी दुपारची झोप काढा.

8. मोठ्या गाजलेल्या कादंबऱ्यांमधले लहान सहान उतारे मुलांना तुम्ही वाचून दाखवा.

9. पत्र लिहायला शिकवा, कविता करायला शिकवा. किंवा गुगलवर कवितांच्या अनेक साईट्स आहेत त्यावरच्या कविता वाचायला शिकवा, वाचून दाखवा.

10. लहान सहान घरगुती काम मुलांना सांगायला हरकत नाही. शिवाय, आपल्या वस्तू जागच्याजागी ठेवणे, पसारा काढला तर तो आवरून ठेवायला शिकवणे व त्यात त्यांना मदतही करणे हे तर शिकवाच.- mohinee

मंगळवार, २४ मार्च, २०२०

पानगी रेसिपी - स्पेशल पोस्ट

मी केलेली पानगी
मुलीला सासरी आलं की सगळ्यात मोठी तडजोड करावी लागते ती आपल्या चवीशी .. आपल्या आवडीचे पदार्थ सासरच्यांना आवडतीलच असं काही नाही म्हणून ते पदार्थ आपसुकच करणं टाळलं जातं.. आणि सासरच्या पद्धतीनुसार स्वयंपाक करणं आणि आवडो न आवडो सगळ्यांबरोबर, सगळ्यांसाठी जे बनलय ते खाऊन घेणं याला पर्याय नसतो.. शिवाय .. होईल हळूहळू सवय .. म्हणत आपल्या आवडीनिवडी मागे पडतात .. कधी स्वेच्छेने तर कधी नाईलाजाने ! 
पण मग काय आपण आपल्या आवडीचे पदार्थ खायचेच नाहीत का ? तर तसं न करता, आपण आपली वैयक्तिक आवड जपायला हवीच .. आपण आपल्यापुरता आपल्या आवडीचा पदार्थ हौसेने बनवावा आणि मौजेने गट्टम करावा.. सासरच्या मंडळींपैकी कोणी खाणार असेल, चव पहाणार असेल तर अगदी आनंदाने शेअर करावा ..असाच हा माझा आवडीचा पदार्थ म्हणजे पानगी.
ही पानगी केली की आमच्या सुमन आजीची
नेहमी आठवण येते. 

सुमन आजी 
तिच्या हातची पानगी अप्रतिम असायची. ठेंगणीठुसकी आजी थरथरत्या हातांनी आणि बरेचदा वयोमानाने सुजलेल्या बोटांनी पानगी करायला गँसपाशी उभी राहिलेली अजूनही डोळ्यापुढे आहे माझ्या. कधीकधी तिची आठवण आली की पानगी करून खावीशी वाटतात पण इथे विदर्भात झणझणीत चमचमीत पदार्थांसमोर हा पदार्थ फिकाच पडतो म्हणूनच तो खाण्याचा आनंद मिळवण्यासाठी थेट केळीची पानं स्वतः आणण्यापासून सगळं स्वतःलाच करावं लागतं .. पण शेवट गोड व्हावा या न्यायाने पानगी तयार करून खाल्ली की हे असं हळवं हळवं व्हायला होतं जुन्या आठवणींनी ..

तर अशी ही पानगी .. मी आज प्रथमच एकटीने करून पाहिलीत .. बऱ्यापैकी जमलीत याचा आनंद आहे !
- मोहिनी

माझी पानगी रेसिपी खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी -
1. तांदूळाचं पीठ एका पसरट भांड्यात घ्या. पहिल्यांदाच रेसिपी करत असाल तर एक दीड वाटीच पीठ घेऊन त्याचीच पानगी आधी बनवून पहा असा आपला हक्काचा सल्ला आहे.
2. या पीठात तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घाला. पानगी थोडी गोड लागावीत इतपत ..
3. आता त्यात अगदी चिमूटभर मीठ घाला... चवीसाठी फक्त
4. वेलचीपूड घाला आणि अगदी चिमूटभर सोडा घाला (त्याहून जास्त नको)
5. हे सगळे घटक आधी कोरडेच छान एकत्र करून घ्या.
6. मग हे मिश्रण साधारण धिरड्याच्या पिठाइतपत सैल भिजवा. त्यासाठी दूध वापरलंत तर उत्तम. मिश्रणात एकदम सगळं दूध घालू नका तर थोडं थोडं करत दूध घालून एका हाताने मिश्रण छान एकजीव करत चला म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
7. आता एक पसरट पॅन गरम करायला गॅसवर ठेवा. त्यावर केळीच्या एका पानाचा एक (साधारण चौकोनी किंवा आयताकारात कापलेला) तुकडा (आधी स्वच्छ धुवून व मग पुसून ) ठेवा.
8. त्याला छान साजूक तूप लावून घ्या.
9. आता त्यावर लगेच एखाद डावभर बॅटर घाला आणि डावानेच साधारण गोल आकारात ते पसरवा.
10. वरच्या बाजूनेही पुन्हा साधारण चौकोनी वा आयताकारात कापलेला, केळीच्या पानाचा आणखी एक तुकडा ठेऊन वर झाकण ठेवा.
11. आता साधारण पाच एक मिनीटं एका बाजूने भाजलं की पलटी करून दुसऱ्याही बाजूने छान भाजून घ्या.
12. पानगी छान भाजली गेल्याची खूण म्हणजे घरभर केळीच्या पानाचा सुटलेला दरवळ ...
13. शिवाय, त्यावर हलक्या ब्राऊन रंगाच्या रेषा छान उमटलेल्या दिसायला लागतात दोन्ही बाजूंनी.
14. पानगी कच्ची रहाणार नाहीत याची काळजी घेणे मात्र अत्यावश्यक असते. (यूट्यूबवर पानगीचे अनेक व्हीडिओज मी पाहिले पण माझी आजी ज्या पद्धतीने पानगी करायची ती रेसिपी मला एकाही व्ही़डीओत सापडली नाही. तसेच अनेक व्हीडीओंमध्ये जी पानगी रेसिपी दाखवली आहे ती बऱ्याच अंशी चुकीचीही असल्यासारखं वाटलं... पण असो.. त्याविषयी बोलणे न लगे.. काय मंडळी, बरोबर ना ?)

परवा फेसबुकवर पानगी विषयी पोस्ट शेअर केली आणि अनेक मैत्रिणींनी ताकातल्या पानगीची रेसिपी सांगितली. ती काहीशी अशी आहे की, तांदूळाच्या पिठात मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून आणि जिरं घालून हे मिश्रण ताकात भिजवायचं आणि मग केळीच्या किंवा हळदीच्या पानावर वर सांगितल्याप्रमाणे पानगी करायची. मी लवकरच ही ताकातली पानगी करून पहाणार आहे. तुम्हीही करून पहा.
आणि, मग मला कमेंटबॉक्समध्ये तुमची पानगी कशी झाली याविषयी नक्की कळवा. जमल्यास फोटोही शेअर करा..
कराल नं.. ?

- मोहिनी घारपुरे - देशमुख


रविवार, २२ मार्च, २०२०

सोनेरी गाणं - 6

लेफ्ट टर्न बँडच्या एका गाण्याची जन्मकथा 

या गाण्याचा व्हीडीओ झालाय तुफान व्हायरल


जयराज जोशी (ड्रम्स), सुराग सुभेदार (व्होकल्स, गिटार), 
सस्मीत रूद्र (कीबोर्ड), रीगन डीमेलो (बास)
तुम्ही तुमच्या कामात असता आणि इतक्यात व्हॉट्सअॅपवर एक लिंक येते .. एका गाण्याची, तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला ती पाठवलेली असते म्हणून तुम्ही उत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक करता, आणि एकीकडे हातातली कामं उरकायला लागता. इकडे गाणं सुरू होतं... एक असं संगीत ऐकू यायला लागतं ज्याच्या तालावर तुमचे पाय आपोआपच ठेका धरायला लागतात.. सहज म्हणून तुम्ही फोन हातात घेता आणि आता गाणं पहायला लागता.. गाण्यात कोणीच हिरो नाही हिरोईन नाही .. तर गाण्याचे मेन कॅरेक्टर म्हणून चक्क जीआयजो, बार्बी, डायनोसोर, छोटा भीम, डोरेमॉन आणि खूप सारी खेळणीच दिसायला लागतात. आता तुम्हाला खूप खूप उत्सुकता वाटते आणि तुम्ही हातातली सगळी कामंधामं सोडून गाण्याचा व्हीडीओ अगदी एकाग्रतेने पहायला लागता.. सुरूवातीपासून ते शेवटापर्यंत गाणं पहाता पहाता तुम्ही त्यात इतके रंगून जाता की शेवटी तुमच्या गालावर खुदकन् हसू उमटल्याशिवाय रहात नाही..



मुंबईतल्या चार भन्नाट, क्रिएटीव्ह तरूणांच्या लेफ्ट टर्न या बँडने नुकतंच रिलीझ केलेलं 'फक इट' हे गाणं मी पाहिलं, अनुभवलं आणि मला माझ्या सोनेरी गाण्यांच्या पानात या एका गाण्याविषयीचं आणखी एक सोनेरी पान जोडल्यावाचून रहावलंच नाही. गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, या गाण्यात चारही लीड आर्टीस्टनी स्वतः कुठेच चमकोगिरी थेट न करता, सगळ्या खेळण्यांचा वापर करून आणि त्यावर स्वतःचे फोटो चिकटवून कठपुतलीवजा अॅक्ट खेळण्यांच्या माध्यमातून दाखवत एक भन्नाट व्हीडीओ सादर केला आहे. 
ही आयडीया मुळात सुचणं, त्यासाठी भरपूर डोकं लावून आणि स्वखर्चाने सगळं शूट पार पाडणं हे खरोखरीच दाद देण्याजोगंच आहे. 
आणि मुख्य म्हणजे या गाण्याचं म्यूझिक आणि व्हीडीओ असला काही अफलातून केला आहे की आजवर असं काही तुम्ही पाहिलं असल्याची शक्यताच नाही. 
ही आयडीया कशी सुचली हे जाणून घेण्याकरीता मी लेफ्ट टर्नचे लीड सिंगर सुराग सुभेदार यांच्याशी गप्पा मारल्या आणि ही सगळी भन्नाट प्रोसेस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
खूप सारी तरूण, उत्साही आणि भन्नाट कल्पनाशक्ती असलेली मंडळी जेव्हा एकत्र येतात आणि काही कल्पक काम करतात तेव्हा आपल्या सारख्या जनसामान्यांसाठी एक पर्वणीच असते. गाण्याच्या क्षेत्रात तर अशा कल्पकतेची काहीच कमी नाही. किशोर कुमारजींचं यॉडलिंग असो, किंवा ए. आर रेहमानचं एक दक्षिण भारतीय टच असलेलं संगीत असो, कविता कृष्णमूर्तींचा तार सप्तकातला आवाज असो किंवा आशा भोसलेंनी म्हटलेली एक से एक आयटम साँग्ज असोत .... हे सगळं जेव्हा म्हणजे ज्या ज्या काळात लोकांसमोर आलं त्या त्या काळी ते सगळं नवीनच होतं... आणि म्हणूनच लोकांना ही सगळी मंडळी अक्षरशः आपल्या या निराळ्या गुणवत्तेनी वेड लावून गेली. गाण्याबरोबरच एखादी हटके आयडीया हिट होते हे जणू या बँडमधील रॉकस्टार्सनीही केव्हाच ओळखलेलं असाव आणि म्हणूनच आपलं प्रत्येक गाणं काहीतरी निराळं करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला असावा. 
एरवी स्पर्धापरीक्षांमागे धावणारी, किंवा नैराश्याशी झगडत असलेली आजची अनेक तरूण मंडळी मोठ्या संख्येने भवताली  दिसत असताना, केवळ चार सहा तरूणांनी एकत्र येऊन एक हिंदी पॉप रॉक बँड तयार करणं, त्यासाठी वेळ, पैसा आणि आपली संपूर्ण कल्पकता लावून या क्षेत्रात झोकून देऊन काम करणं हे सगळं सगळं कौतुकास्पदच आहे. 
जयराज जोशी (ड्रम्स), सुराग सुभेदार (व्होकल्स, गिटार), सस्मीत रूद्र (कीबोर्ड) आणि रीगन डीमेलो (बास) हे चौघेजण एकेकाळचे चांगले मित्र. हे चौघेहीजण गाण्याच्या क्षेत्राशी संबंधीत आणि अशातच बॉलीवूड शोजमध्ये म्यूझिशिअन म्हणूनही दीर्घ काळपर्यंत काम करत होते. अशातच एकदा या चौघाहीजणांच्या लक्षात आलं, की आपण बॉलीवूड शोज करतोय ते खरंय पण त्यात आपलं मन रमत नाहीये. याचं कारण, आपलं स्वतःचं असं काहीच आपल्याला त्यात करता येत नाहीये... आणि इथूनच या चौघांच्या एका वेगळ्या क्रिएटीव्ह प्रवासाला सुरूवात झाली.. आणि जन्म झाला लेफ्ट टर्न या बँडचा ..!
मग गाणी बनवायला सुरूवात केली.. खरंतर, सुरांमध्येच चोवीस तास रमायला सुरूवात केली असं म्हणायला हवं. आयडीया कोणाला कधी आणि का कशी सुचेल याची उत्तरं खरंतर कोणीच कल्पक व्यक्ती कधीच देऊ शकत नाही, तसंच, या चौघाही भन्नाट क्रिएटीव्ह लोकांचं झालं. कारण, जसा एक ग्रुप बनला तसा एकमेकांना केव्हाही नवनव्या आयडीयाज सुचायला लागल्या. गाणी जन्माला यायला लागली. पण मग आता या गाण्यांना लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हा प्रश्न होता. यावरही वर्षभरातच उत्तर मिळालं.
एका शांतनिवांत भागात एका मित्राच्या बंगल्यावर स्टुडीओ करायची परवानगी मिळाली. मग या चौघांनी तोवर शोजमधून जमा केलेला पैसा लावून स्वतःचा असा स्टुडीओ बनवला आणि मग लेफ्ट टर्नचा प्रवास आणखी जोमाने सुरू झाला. 
मी जेव्हा सुरागशी या संपूर्ण प्रवासाबद्दल, त्यांच्या बँडबद्दल, त्यांच्या या गाण्याबद्दल गप्पा मारल्या तेव्हा तर यांचे आणखीही काही चांगले गुण मला कळले. 
सुरागने त्यांंच्या एकंदरीतच या सांगितिक प्रवासाविषयी जे सांगितलं ते ऐकून मला या मुलांचं फारच कौतुक वाटलं. तो सांगत होता, " आम्ही चौघंजणं आमच्याच घरानजीक एक डॉन बॉस्को शेल्टर आहे तिथल्या अनाथ मुलांबरोबर खेळायला, त्यांना गाणी शिकवायला वगैरे जायचो तेव्हा आम्हाला या मुलांसाठी काहीतरी करावं असं वाटायला लागलं.
मग आम्ही चौघांनी आमच्या भागातल्या काही कॉर्पोरेट ऑफीसेसमध्ये जाऊन परफॉर्म केलं आणि त्यांना आवाहन केलं की आम्हाला काही देण्यापेक्षा या अनाथ मुलांसाठी काही द्या. हे आवाहन करून त्यांनी त्या ऑफीसेसमध्ये आठवडाभरासाठी काही बॉक्सेस ठेवले व लोकांना स्वेच्छेनी अनाथ मुलांसाठी काही वस्तू द्यायला उद्युक्त केले. 

हे बॉक्सेस जेव्हा घरी आणले तेव्हा लक्षात आलं की या सगळ्या ऑफीसेसमधून अनाथ मुलांसाठी खूप छान छान खेळणीच आली आहेत.. आणि त्याचदरम्यानलेफ्टटर्नने तयार केलेलं एक  ब्रेकअपवरचं गाणंही रिलीज करायचं होतंच. मग ती खेळणी पहाताच यांचाच वापर करून व्हीडीओ बनवण्याची आयडीया आली. 


ही सगळी खेळणी पाहून त्यावरून एक एक सीन , 
एक एक सिच्युएशन क्रिएट केली. हे सगळं तीन चार तासाचं काम .. शिवाय या चार क्रिएटीव्ह तासात एकमेकांसह धमाल दंगामस्ती तर सुरूच होती .. त्यातूनच काही काही जोक्स तयार झाले ते देखील गाण्यातल्या सिच्युएशन्समध्ये खेळण्यांचा वापर करून चित्रीत करायची शक्कल सुचली. 
स्टेज, बार, तिकीट काऊंटर, रेड कार्पेटवरून एन्ट्री हे सगळं काही या चौघांनीच स्वतः क्राफ्टद्वारे तयार केलं हे विशेष. तसंच, लाईट्ससाठी लेझरच्या कीचेन्सचा वापर केला. मग लिरीक्सनुसार सीन्सचा क्रम ठरवला. दर सेकंदासेकंदाचे सीन्स अक्षरशः लिहून काढले. आपल्या गाण्यात आपणही दिसलो पाहिजे तरच लोकांना आपली ओळख होईल या विचाराने आधी प्रत्येकाचे स्टुडीओत जाऊन आठ दहा निरनिराळ्या एक्स्प्रेशनमधले फोटोज काढले आणि मग वेगवेगळ्या सिन्समध्ये प्रत्येकाचे हे चेहरे खेळण्यांवर लावून त्या माध्यमातून स्वतः व्यक्त झालो. प्रत्यक्ष शूट करायला आणखी एका मित्राची जो प्रोफेशनली काम करतो, त्याची मदत घेतली. प्रत्यक्ष शूटींगला सर्वाधिक वेळ लागला पण फायनली जे गाणं, जे व्हीज्युअल्स मिळाले त्याने खूप धमाल आणली. 
सुराग हे सगळं सांगत असताना एकदम कूल होता.. म्हणजे, ही एवढी सगळी क्रिएटीव्हीटी असलेला मुलगा प्रत्यक्षात एवढा सहज शांत कसा असू शकेल असा प्रश्न कोणालाही पडला असता. पण खरं सांगू का, ज्याला कल्पकता वापरायची असले तीच माणसं आधी स्वतःशी सतत एकाग्र रहाण्याचा प्रयत्न करत असतात.
जेमतेम वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या या बँडचं हे तिसरंच गाणं आहे. मात्र येत्या ऑगस्टमध्ये लेफ्टटर्न बँडतर्फे चौदा गाण्यांचा एक व्हीडीओ अल्बम रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरातच ही मुलं थेट राज्यसभा टीव्ही गाजवून आली आहेत. 31 डिसेंबर 2019 ला रात्री बारा वाजता या बँडने आपला परफॉर्मन्स थेट राज्यसभा टीव्हीवरून दिला यासाठी त्यांचे विशेष कौतुक आहेच. 
कल्पक माणसांना फक्त स्वतःची वाट शोधायची असते.. एकदा का त्यांना त्यांची वाट सापडली की त्यांचा मार्ग ठरलेला असतो, त्यांची मंझिल त्यांना स्वतःच त्या मार्गाने तिथवर घेऊन जात असते.
सुराग आणि लेफ्ट टर्न बँडला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा .. 

- मोहिनी घारपुरे - देशमुख 

( हे गाणं पहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-
  https://www.youtube.com/watch?v=3fQZJxuIUZE )


रविवार, ८ मार्च, २०२०

व्हेरॉनिका .. तीच ती मी ...

ही व्हेरॉनिका .. 
अनोळखी माणसांवर सहज विश्वास ठेवते.
अडचणीत सापडलेल्या माणसाला त्याने न मागताच चटकन मदत करते..
ती मैत्री या नात्याला मानते आणि मनापासून ते नातं निभावते.
ती चंचल आहे, ती बिनधास्त आहे, तिला स्वतःच्या विश्वात रममाण व्हायला आवडतं आणि त्यानंतरच ती सोशलाईझ होऊ शकते .. अगदी कम्फर्टेबली !
ती वरवर उथळ वाटते पण ती खूप खूप डीप आहे.
ती मनाला हवं तसं जगते पण हे सगळं करताना ती तिच्या भावनांशी खूप खूप प्रामाणिक रहाते.
ती निरागस आहे तितकीच ती खट्याळ आणि खोडकरही आहे.
ती जेव्हा प्रेमात पडते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपली जीवाभावाची मैत्रीणसुद्धा त्याच व्यक्तीच्या प्रेमात आहे आणि तोही आपल्या मैत्रिणीवरच प्रेम करतो. आता ती हादरते .. कारण तिला जाणवतं तिनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ती माणसं तिच्याशी अप्रामाणिक झाली आहेत .. मग ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते .. तिला आता तिच्या मैत्रिणीसारखं व्हायचं असतं .. किमान तिच्यासारखं वागणं बोलणं रहाणं तरी जमावं म्हणून ती खटपट करायला लागते..
" मै भी मीरा के जैसी बन सकती हूँ "
असं म्हणताना जाणवणारी तिची केविलवाणी अवस्था पाहून वाईट वाटतं.
पण लवकरच ती स्वतःला सावरते आणि या सगळ्या मानसिक गुंतागुंतीतून बाहेर पडते.
' लेट्स पार्टी गाईज ' असं म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या आपल्या दोस्तांचा ती स्वीकार करते ..
ती तसं करू शकते कारण तिचं मन मोठं असतं.
ती निरागस, चंचल, बिनधास्त, खट्याळ, खोडकर असते पण ती दुष्ट, वाईट, कपटी, कारस्थानी, दुसऱ्याचं वाईट चिंतणारी नसते.
ती जशी असते तशीच असते आणि सगळ्यात सुंदर असतं ते तिचं ' मन ' ..

आज महिला दिनाला सगळेजणं शुभेच्छा देत आहेत , त्यांना मी कोण आहे कशी आहे या सगळ्यापेक्षाही मला शुभेच्छा देणं महत्वाचं वाटलं याबद्दल मी त्यांची आभारी आहेच .. पण इथेही लोकांना माझ्यातील अनेक गुणवैविध्य पाहून आश्चर्य चकीत व्हायला होतंय म्हणून आजचं औचित्य साधून थोडं स्वतःविषयी सांगण्याचा प्रयत्न केलाय .. इतकच !

महिला दिनाच्या शुभेच्छा .. 

- मोहिनी 











 







 










शुक्रवार, ६ मार्च, २०२०

चित्रकार आणि शिल्पकारांना आवाहन


  • आपल्याला आपल्या चित्रांचे वा शिल्पांचे "ई-प्रदर्शन" माझ्या ब्लॉगवर करायला आवडेल का .. ?
  • या प्रदर्शनाद्वारे आपल्याला आपली चित्र वा शिल्प लाखो लोकांपर्यंत पोहोचवून त्यांची विक्रीही करायला आवडेल का ..? 

वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर मला mohineeg@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा ही विनंती.

1. सोबत आपली वैयक्तिक माहिती, आपला फोटो आणि आपल्या चित्रांचे वा शिल्पांचे दहा ते पंधरा फोटो ई प्रदर्शनासाठी पाठवावेत. 
2. तसेच, तुम्हाला विक्रीसाठी जी चित्रे मांडावयाची असतील त्या मूळ चित्रांचे फोटो आणि त्यांचा तपशील ( चित्राचे नाव, माध्यम आणि साईज व विक्रीची अपेक्षित किंमत ) देखील स्वतंत्र फोल्डरमध्ये पाठवावा. 
3. निवडल्या गेलेल्या चित्रकारांना वा शिल्पकारांना ब्लॉगवर प्रसिद्धी व त्यांच्या चित्रांची वा शिल्पांची विक्री करण्याचीही संधी 

( अटी व शर्ती लागू)

- मोहिनी घारपुरे - देशमुख 


Image by <a href="https://pixabay.com/users/Victoria_Borodinova-6314823/?utm_source=link-attribution&amp;utm_medium=referral&amp;utm_campaign=image&amp;utm_content=4696539">Виктория Бородинова</a> from <a href="https://pixabay.com/?utm_source=link-attribution&amp;utm_medium=referral&amp;utm_campaign=image&amp;utm_content=4696539">Pixabay</a>

Translate

Featured Post

अमलताश