मंगळवार, २४ मार्च, २०२०

पानगी रेसिपी - स्पेशल पोस्ट

मी केलेली पानगी
मुलीला सासरी आलं की सगळ्यात मोठी तडजोड करावी लागते ती आपल्या चवीशी .. आपल्या आवडीचे पदार्थ सासरच्यांना आवडतीलच असं काही नाही म्हणून ते पदार्थ आपसुकच करणं टाळलं जातं.. आणि सासरच्या पद्धतीनुसार स्वयंपाक करणं आणि आवडो न आवडो सगळ्यांबरोबर, सगळ्यांसाठी जे बनलय ते खाऊन घेणं याला पर्याय नसतो.. शिवाय .. होईल हळूहळू सवय .. म्हणत आपल्या आवडीनिवडी मागे पडतात .. कधी स्वेच्छेने तर कधी नाईलाजाने ! 
पण मग काय आपण आपल्या आवडीचे पदार्थ खायचेच नाहीत का ? तर तसं न करता, आपण आपली वैयक्तिक आवड जपायला हवीच .. आपण आपल्यापुरता आपल्या आवडीचा पदार्थ हौसेने बनवावा आणि मौजेने गट्टम करावा.. सासरच्या मंडळींपैकी कोणी खाणार असेल, चव पहाणार असेल तर अगदी आनंदाने शेअर करावा ..असाच हा माझा आवडीचा पदार्थ म्हणजे पानगी.
ही पानगी केली की आमच्या सुमन आजीची
नेहमी आठवण येते. 

सुमन आजी 
तिच्या हातची पानगी अप्रतिम असायची. ठेंगणीठुसकी आजी थरथरत्या हातांनी आणि बरेचदा वयोमानाने सुजलेल्या बोटांनी पानगी करायला गँसपाशी उभी राहिलेली अजूनही डोळ्यापुढे आहे माझ्या. कधीकधी तिची आठवण आली की पानगी करून खावीशी वाटतात पण इथे विदर्भात झणझणीत चमचमीत पदार्थांसमोर हा पदार्थ फिकाच पडतो म्हणूनच तो खाण्याचा आनंद मिळवण्यासाठी थेट केळीची पानं स्वतः आणण्यापासून सगळं स्वतःलाच करावं लागतं .. पण शेवट गोड व्हावा या न्यायाने पानगी तयार करून खाल्ली की हे असं हळवं हळवं व्हायला होतं जुन्या आठवणींनी ..

तर अशी ही पानगी .. मी आज प्रथमच एकटीने करून पाहिलीत .. बऱ्यापैकी जमलीत याचा आनंद आहे !
- मोहिनी

माझी पानगी रेसिपी खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी -
1. तांदूळाचं पीठ एका पसरट भांड्यात घ्या. पहिल्यांदाच रेसिपी करत असाल तर एक दीड वाटीच पीठ घेऊन त्याचीच पानगी आधी बनवून पहा असा आपला हक्काचा सल्ला आहे.
2. या पीठात तुमच्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घाला. पानगी थोडी गोड लागावीत इतपत ..
3. आता त्यात अगदी चिमूटभर मीठ घाला... चवीसाठी फक्त
4. वेलचीपूड घाला आणि अगदी चिमूटभर सोडा घाला (त्याहून जास्त नको)
5. हे सगळे घटक आधी कोरडेच छान एकत्र करून घ्या.
6. मग हे मिश्रण साधारण धिरड्याच्या पिठाइतपत सैल भिजवा. त्यासाठी दूध वापरलंत तर उत्तम. मिश्रणात एकदम सगळं दूध घालू नका तर थोडं थोडं करत दूध घालून एका हाताने मिश्रण छान एकजीव करत चला म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
7. आता एक पसरट पॅन गरम करायला गॅसवर ठेवा. त्यावर केळीच्या एका पानाचा एक (साधारण चौकोनी किंवा आयताकारात कापलेला) तुकडा (आधी स्वच्छ धुवून व मग पुसून ) ठेवा.
8. त्याला छान साजूक तूप लावून घ्या.
9. आता त्यावर लगेच एखाद डावभर बॅटर घाला आणि डावानेच साधारण गोल आकारात ते पसरवा.
10. वरच्या बाजूनेही पुन्हा साधारण चौकोनी वा आयताकारात कापलेला, केळीच्या पानाचा आणखी एक तुकडा ठेऊन वर झाकण ठेवा.
11. आता साधारण पाच एक मिनीटं एका बाजूने भाजलं की पलटी करून दुसऱ्याही बाजूने छान भाजून घ्या.
12. पानगी छान भाजली गेल्याची खूण म्हणजे घरभर केळीच्या पानाचा सुटलेला दरवळ ...
13. शिवाय, त्यावर हलक्या ब्राऊन रंगाच्या रेषा छान उमटलेल्या दिसायला लागतात दोन्ही बाजूंनी.
14. पानगी कच्ची रहाणार नाहीत याची काळजी घेणे मात्र अत्यावश्यक असते. (यूट्यूबवर पानगीचे अनेक व्हीडिओज मी पाहिले पण माझी आजी ज्या पद्धतीने पानगी करायची ती रेसिपी मला एकाही व्ही़डीओत सापडली नाही. तसेच अनेक व्हीडीओंमध्ये जी पानगी रेसिपी दाखवली आहे ती बऱ्याच अंशी चुकीचीही असल्यासारखं वाटलं... पण असो.. त्याविषयी बोलणे न लगे.. काय मंडळी, बरोबर ना ?)

परवा फेसबुकवर पानगी विषयी पोस्ट शेअर केली आणि अनेक मैत्रिणींनी ताकातल्या पानगीची रेसिपी सांगितली. ती काहीशी अशी आहे की, तांदूळाच्या पिठात मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून आणि जिरं घालून हे मिश्रण ताकात भिजवायचं आणि मग केळीच्या किंवा हळदीच्या पानावर वर सांगितल्याप्रमाणे पानगी करायची. मी लवकरच ही ताकातली पानगी करून पहाणार आहे. तुम्हीही करून पहा.
आणि, मग मला कमेंटबॉक्समध्ये तुमची पानगी कशी झाली याविषयी नक्की कळवा. जमल्यास फोटोही शेअर करा..
कराल नं.. ?

- मोहिनी घारपुरे - देशमुख


४ टिप्पण्या:

  1. मोहिनी खुप छान. मी महिन्यातुन एकदा तरी नक्की पानगी करतो. गरम गरम पानगीच्या सुवासानीच आधी मन प्रसन्न होते. त्यावर साजुक तुप सोडले की तृप्तीचा गुणाकारच.

    उत्तर द्याहटवा
  2. वाह काका ... तृप्तीचा गुणाकार ही टर्म फारच सुंदर टर्म वापरली आहेस.. तुझ्या प्रतिक्रियेबद्दल आभार ..

    उत्तर द्याहटवा
  3. वाह मोहिनी, फारच छान. पानगीची रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही बरेच वेळा पानगी करतो.
    केळीच्या पानावर केलेली गरम गरम पानगी, त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे आनंदाची पर्वणीच.
    आमच्या आईचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    अजून काही रेसिपीज पाठव.

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद काका .. अरे आजीची आठवण नातवंडांसाठी कायम खास असते, त्यातूनही सुमन आजीची ही आठवण माझ्यासाठी चिरंतन स्मरणात राहिलेली आहे.. तिला विसरणं केवळ अशक्य.
    आता तुझ्या प्रतिक्रियेनंतर ब्लॉगवर आणखी रेसिपीज शेअर करत जाईन नक्की ... पुन्हा एकदा आभार.

    उत्तर द्याहटवा

Translate

Featured Post

अमलताश